-
“आपल्या आजच्या व्याख्यात्या श्री...... ह्यांच्या कन्या आहेत—”
माझी ओळख करून देणाऱ्या बाईंच्या बोलण्याला सुरुवात झाली. त्यांचे बोलणे मी अर्धवट ऐकत होते; पण मन मात्र बाईच्या बोलण्याने जाग्या झालेल्या स्मृती आणि कल्पना ह्यांत गुंतले होते. “एकदा लग्न उरकून टाकले म्हणजे जबाबदारी सुटली” असे बाबांचे बोलणे मॅट्रिकच्या वर्गात असल्यापासून ऐकले होते. माझा पुढे शिकण्याचा हट्ट, बाबांचा त्रागा, शेवटी “कर, काय वाटेल ते कर” ह्या शब्दांनी मोठ्या कष्टाने दिलेली परवानगी हे आठवले; व तीच भाषा, तेच भांडण आणि तोच शेवट दरवर्षी परीक्षेच्या शेवटी कसा व्हायचा हे आठवून क्षणभर हसू आले.
ते रागात आले म्हणजे अस्सल प्राकृतात पाचपन्नास शिव्या हासडून बोलत. आम्ही जरा मोठी झाल्यावर तर रोज ह्या-नाही-त्या गोष्टीवरून वादविवाद व शेवटी भांडण ठरलेलेच होते. ते जितके तापट तितकी आई शांत. त्यांनी म्हणावे, “ह्या पोरांच्या तोंडास तोंड देण्यानं टेकीस आलो,” तिने म्हणावे, “सगळी तुमच्या वळणावर गेली आहेत,” की त्यांनी चूप बसावे. त्यांचे प्रेमातले भाषण म्हणजे असेच. मुलींना ते ‘म्हैस’ म्हणत व मुलांना ‘बैलोबा.’ आम्हांला मुले झाल्यावर ही प्रेमाची बिरुदे ते नातवंडांना लावू लागले.
“ह्यांनी आपलं सर्व आयुष्य स्त्रियांच्या उन्नतीकरिता वेचलं...” बाई बोलत होत्या तिकडे माझे लक्ष गेले. हे उद्गार बाबांबद्दल खास नव्हते. “ह्यांनी काढलेल्या स्त्री-शिक्षणसंस्था सुपरिचित आहेत.”— अस्से, अस्से. आता मामंजीबद्दल बोलत आहेत वाटते. ठीक, चालू द्या. आहे अजून बराच अवकाश. मी जरा पाय लांबवले, कोचावर अंग जरा जास्त रेलले व डोळे फार वेळ न मिटण्याचा निश्चय केला. “सर्व स्त्रियांना त्यांनी आपल्या ऋणात बांधलं आहे.” माझी ओळख करून देणे चालूच होते– खरंच, मामंजीनी मला कोणत्या ऋणात बांधले आहे ?
त्यांच्या मुलाची बायको म्हणून मी त्यांची. ह्यापलीकडे त्यांच्या-माझ्यात काही बंधन होते का ? लग्न होऊन मी घरी आले तेव्हा निदान सासरचे वडील माणूस म्हणून फक्त कर्तव्यभावना तरी होती. त्यांचीही माझ्याबद्दलची भावना अशीच असावी. मुलाला आवडली ना, मग माझे म्हणणे नाही. एका माणसासाठी सर्वस्वी अनोळखी माणसांत मी जाऊन पडले होते. ती माझ्याबद्दल साशंक होती, मी त्यांच्याबद्दल होते. लौकिकात मी त्यांना व त्यांनी मला आपले म्हटले होते. पण मने मिळायची होती. त्याच्यासाठी कितीतरी काळ लोटायचा होता. मला त्यांचे करायचे होते, त्यांनी माझ्या उपयोगी पडायचे होते. किती भांडणे व्हायची होती, कितीदा समजुती काढायच्या होत्या !
प्रत्येक सासुरवाशीण ह्याच चक्रातून जात असणार. सासरची माणसे हीन असली तर ज्या माणसाच्या प्रेमामुळे मुलगी घरात आली त्याचेसुद्धा प्रेम नाहीसे करून तिला निराधार करून टाकतील. पण माझ्या सासरची माणसे सुवृत्त, चारित्र्य-संपन्न अशी होती. दर भांडणातून, आयुष्यातील दर प्रसंगातून, प्रेमाची नवी-नवी बंधने निर्माण होत होती, व आज माझी मुले केवळ आईबापांच्या नाही, तर काका-काकूंच्या, मामा-मामींच्या व दोन्ही आजोबा-आजींच्या प्रेमाच्या उबेत वाढत होती. मामंजी तर माझ्या घरात चालताबोलता आशीर्वाद नाहीत का ?
“कॉलेजात ते शास्त्र शिकवितात,” बाईचे शब्द परत ऐकू आले, “त्यांनीही वडिलांप्रमाणे आपल्याला शिक्षणकार्याला वाहून घेतलं आहे.” मामंजी संपून आता ह्या बाई माझ्या नवऱ्याकडे वळलेल्या दिसतात. काय वरवरचे बोलत असतात माणसे ! ह्यांना माहीत तरी आहे का तो कसा आहे ते? विषयसुद्धा कुठचा शिकवतो ते धड माहीत नाही, मग बाकीचे काय सांगणार कपाळ ! माझे मन परत घरगुती स्मृतींच्या जाळ्यात गुरफटले.
थोरली मुले आजोबांना भिऊन असत; पण धाकटीला मात्र आजोबा म्हणजे तिची खाजगी मालमत्ता वाटते जणू. आणि आजोबांनासुद्धा कितीही कामात असले तरी तिच्या आग्रही आप्पलपोट्या प्रेमापुढे हार खावी लागते. आजोबाच काय, घरातील प्रत्येक माणूस सर्वस्वी तिचे पाहिजे. संध्याकाळी आम्ही जरा एकमेकाजवळ बसून बोलत असलो की, हिला ते मुळीच खपत नाही– ताबडतोब मध्ये घुसते, त्याचे तोंड आपल्या हातात धरते व सांगू लागते, “बरं का दिनू, आज कनी मला मास्तर म्हणाले...” ती मामाकडे गेली म्हणजे घरात निवांत बोलत बसता येते. पण आता अगदी दोघांच्याच अशा गोष्टी बोलाव्यात तरी कुठे लागतात ? एकमेकांची मनःस्थिती कळायला बोलायची गरज आहेच कुठे ? पाठमोरा असला तरी नाही का मला समजत की, आज काहीतरी बिघडले आहे म्हणून ? मला लांबूनच पाहून तो नाही का विचारीत, “आज काय ग झालं आहे ?”
ठण्– घड्याळात अर्ध्या तासाचा ठोका वाजला. ओळख करून देणाऱ्या बाईची गडबड उडाली. “तेव्हा ह्या... ची कन्या आहेत. सुप्रसिद्ध महर्षी ह्यांच्या सूनबाई, सुप्रसिद्ध प्राध्यापक ह्यांच्या पत्नी आहेत, व स्वतःसुद्धा शिकलेल्या आहेत. मी त्यांना आता भगिनींना चार शब्द सांगण्याची विनंती करते.” असे म्हणून त्या झटकन खाली बसल्या. मला थोडे हसू आले. माझ्या भटक्या मनाला आवरून माझे भाषण केले व समारंभ आटोपला.
पण बाईनी करून दिलेली ओळख अपूर्ण आहे व तीत काहीतरी राहिले ही हुरहूर मनाला लागली ती काही जाईना. दोन दिवसांनी मी घाईघाईने रस्त्यातून जात होते. संध्याकाळ संपत आली होती, पण रात्र अजून पडली नव्हती. रस्त्याच्या कडेने मुलांचे घोळके घराच्या दारापुढून उभे होते. चार भिंतीच्या कोंडवाड्यात जाण्याचा क्षण ती जरा पुढे ढकलीत होती. त्यांच्या गप्पातील शब्द अधूनमधून माझ्या कानांवर येत होते. इतक्यात जवळच्याच एका घोळक्यातून शब्द ऐकू आले, “अरे, शूः, शूः, पाहिलीस का ? ती बाई जाते आहे ना, आपल्या वर्गातल्या कर्त्याची आई बरं का– ”
– मी थांबले. एक चुटकी वाजवली. त्या दिवशी बाईनी सांगितलेली ओळख आज पुरी झाली. बाई हे सांगायच्या विसरल्या होत्या, नव्हे का ?
(‘परिपूर्ति’ या लेखातून)
- oOo -पुस्तक: परिपूर्ती
लेखक: डॉ. इरावती कर्वे
प्रकाशक: रा. ज. देशमुख आणि कंपनी
आवृत्ती दुसरी (१९५१), दहावे पुनर्मुद्रण (१९९०)
पृ. १४४-१४६.--
टीप:
मूळ लेखनात बरेच मोठे परिच्छेद आहेत. मोबाईलच्या छोट्या पडद्यावर वाचण्यास सोयीचे व्हावे म्हणून मी शक्य तितकी संगती राखून लहान परिच्छेदांत विभागले आहे, अर्थातच मजकुरात काहीही बदल न करता.--
उपसंहार:
सामान्यपणे मी वेचा इथे समाविष्ट करताना प्रास्ताविक म्हणून, किंवा सरळ ‘वेचताना’ या शीर्षकाखाली स्वतंत्र लेखामध्ये माझे भाष्य मांडत असतो. पण इथे त्याला अपवाद करुन उपसंहार जोडतो आहे. कारण हे भाष्य वरील वेचा वाचून झाल्यावरच वाचले जावे, अशी माझी इच्छा आहे.
जिथे सामान्यपणे नवरात्राचे नऊ रंगवाले वा मेहंदीचे फोटो, पुराणाला इतिहास समजून केलेले दावे इत्यादि वाचायला मिळते अशा एका ‘संस्कारप्रधान’ फेसबुक ग्रुपमध्ये, साधारण दोन-तीन महिन्यांपूर्वी एका स्त्रीने ‘बघा इरावतीबाईसुद्धा बाईची खरी ओळख ही आई म्हणूनच असते, हे मान्य करतात.’ असे ठसवण्याचसाठी या लेखातला शेवटचा प्रसंग शेअर केला होता. मला वाटते, असाच काहीसा दावा एका जाहीर कार्यक्रमातही झाला. त्यावर इरावतीबाईंची नात असलेल्या प्रियदर्शिनी यांनी हा चुकीचा निष्कर्ष असल्याचे स्पष्ट केले होते.
पुरा लेख वाचल्यावर हे खरेतर अडाण्यालाही सहज लक्षात आले असते. आता असा द्राविडी शोध लावणारे अज्ञान्यांहून अज्ञानी म्हणायचे की स्वत:चा अजेंडा रेटणारे (जे आजकाल अगदी पैशाला पासरी झाले आहे) धूर्त म्हणायचे?
लेखाची सुरुवातच एका स्वतंत्र वाक्याने केली आहे, जे अपूर्ण वाक्य आहे! म्हणजे ‘ही केवळ सुरुवात आहे’ हे तिथेच सूचित केले गेलेले आहे. इरावतीबाईंची ओळख परप्रकाशित स्वरूपात करुन देण्याची तिथे केवळ सुरुवात होते आहे. यात प्रथम त्या एका प्रसिद्ध नि कर्तबगार पुरुषाची मुलगी, एका कर्तबगार पुरुषाची सून, एका बुद्धिमान पुरुषाची पत्नी... अशी पुरुषाच्या आधारे उभी असलेली स्त्री– म्हणजे साधारणपणे संस्कृती, संस्कार वगैरेच्या बाता मारणार्या समाजाला, विशेषत: कुटुंबविलीन स्त्रियांना आवडेल अशी करुन देण्यात आली आहे.
पण लेखात इरावतीबाईंनीच त्या-त्या पुरुषाला जोडून (hyphenated) करुन दिलेल्या ओळखीसंदर्भातील विसंगतीवर बोट ठेवले आहे. तेव्हा खरेतर या परप्रकाशितपणाच्या दाव्यातील फोलपणा स्पष्ट होतो आहे. कदाचित त्या संस्कारी काकू म्हणूनच अस्वस्थ झाल्या असाव्यात. त्यातून त्यांना शेवटचा प्रसंग सापडला, नि त्यांनी युरेका म्हणून घरातल्या घरात नाच केला असावा. निदान ‘मुलाची आई ही पुरुषाच्या संदर्भातील ओळख तरी बाई नाकारुच्चं शकल्या नाहीत’ असा समज करुन घेऊन त्यांना विजयाचा आनंद झाला असावा.
पण तो शेवटचा प्रसंग हा इरावतीबाईंच्या मिश्किल भाष्याच्या नमुना आहे. ‘आता एवढंच राहिलं होतं’ अशा स्वरुपाचे ते भाष्य आहे. इरावतीबाईंना तीन मुले, दोघी मुली नि एक मुलगा. इथे त्यांची ओळख मुलाच्या– म्हणजे त्यांच्यापैकी पुरुषाच्याच संदर्भातच स्वीकारली गेली आहे हे ध्यानात घ्यायला हवे. वडील झाले, सासरे झाले, पतीही झाला; आता फक्त पुरुष मूल– म्हणजे मुलगा तेवढा राहिला. त्याच्या संदर्भात एकदा आपली ओळख अधोरेखित झाले की ‘स्त्रीची ओळख पुरुषामुळेच असते’ या सनातनी समजुतीआधारे होणारी आपली ओळख पुरी झाली असा मिश्किल उपहास त्यात आहे.
संस्कार नि संस्कृती या नावाखाली सनातनी नि मागास मतांचा प्रचार-प्रसार करणारे अज्ञपणे त्यात स्वविचाराच्या चष्म्यातून पाहातात किंवा हेतुत: अपलाप करुन थोरांच्या वा प्रसिद्ध व्यक्तींच्या नावे आपला अजेंडा रेटतात. हा वैचारिक भेसळीचा धंदा भारतात काही संघटना सहा-सात दशकांहून अधिक काळ जोमाने चालवत आहेत. इरावतीबाईंच्या व्यक्तिमत्त्वावर आपल्या सनातनी विचारांचा शेंदूर थापून त्याचा गौरव करण्याची चलाखी याच अजेंड्याचा भाग आहे.
---
To Dumbo, with Love पहलगाम आणि आपण हट्टमालाच्या पल्याड... ज्याचा त्याचा युटोपिया! स्वप्नात पाहिले जे ... दिशाभुलीचे गणित अमेझिंग अॅमेझॉन वांझ राहा रे परतुनि ये घरा... - ३ : ययाती, बुधा आणि... माणूस परतुनि ये घरा... - २ : कांदिद, कालिदास, आणि आरती देवी परतुनि ये घरा ... - १ : पेराल्टा, ऑर्फियस आणि नचिकेता ‘ग्लॅड फॉर ग्लाड?’ : ग्लाड, वीरभूषण आणि मी
मंगळवार, २२ एप्रिल, २०२५
ओळख
संबंधित लेखन
इरावती कर्वे
परिपूर्ती
पुस्तक
ललित
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा