RamataramMarquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

सोमवार, २२ डिसेंबर, २०२५

स्वतंत्रते...

  • भल्या सकाळीच सारा गाव कलकलत उठला. लष्कराचा रिसाला तोफा-बंदुका घेऊन येत होता. रिसाला जसजसा जवळ येऊ लागला, तसतसा सारा जनाना रसोड्यात जाऊन पडदाशीन झाला नि सगळा मर्दाना हात उपरण्यानं बांधून रिसाल्याच्या स्वागताला उभा राहिला. दहेजमध्ये मिळालेल्या ढाली, तलवारी किंवा ठासणीच्या बंदुका घेऊन लष्कराच्या रिसाल्याशी मुकाबला करणं शक्यच नव्हतं. तेव्हा मागतील तितक्या कोंबड्या, बकऱ्या, शाली, गोधड्या देऊन नाक घासायचं, यापरता पर्याय नव्हता. गुलबेगनं रांजण रिकामा केला... चकचकीत चांदीच्या सहा हजार कोरी रुमालात बांधून घेतल्या... लष्कराचा जो कुणी मनसबदार असेल, त्याला नजराणा करायला !

    रिसाला बगाडीयो गावात शिरला. गुलबेग लोटांगण घालायला पुढं सरसावला. गावाचा मुखिया होता तो. गावकऱ्यांची जान-अब्रू वाचवायची त्याची जबाबदारी होती. पण... त्याला लोटांगण घालावेच लागले नाही !

    फौजेचा रिसाला काही मारकाट, लूटमार न करता शिस्तीत उभा राहिला... मग मेजरसाहेबानं गावात मोठा खांब ठोकला.... नि एक नवा झेंडा फडकावला.... तीन रंगांचा! त्या झेंड्याला खडी ताजीम दिली नि फौजेच्या बँडवर गाणं वाजू लागलं :

    ‘जनगणमन अधिनायक जय हे....’

    युद्धविराम आणि होरपळ

    गुलबेग आणि सगळा गाव त्या नव्या झेंड्याकडं वेड्यासारखा पाहत होता. आजवर असा झेंडा त्यांनी कधी पाहिला नव्हता. त्यांना दोनच झेंडे माहीत होते. गावातल्या जिंदापिराच्या दर्यावरचा झेंडा नि समोरच्या पिटारा गावच्या कर्णावणी देवीच्या देवळावरचा भगवा झेंडा. असा तीन रंगांचा झेंडा त्यांनी आजवर कधी ऐकलाही नव्हता!

    फौजेच्या बँडचं गाणं संपलं नि करंडे भरभरून आणलेले लाडू, जिलब्या फौजेच्या जवानांनी गावकऱ्यांना वाटायला सुरुवात केली. तोफा, बंदुका घेऊन आलेलं लष्कर.... मारपीट न करता, बायका न बाटवता लाडू-जिलब्या वाटतंय, हे पाहून गावकऱ्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. हट्टेकट्टे, बंदूकधारी जवान भोंग्याभोंग्यात जाऊन मिठाई वाटत होते.... बायामाणसांकडं.... ‘बहेनजी, पानी पिलाऐंगी?’ म्हणून पाणी मागत होते.

    गावकऱ्यांची भीड चेपली. मग सगळी माणसं जिंदापिरासमोरच्या मैदानात जमली. सर्व लोक जेद्दाहच्या समोरील शेतात जमले. मिठाई खात खात खाली बसली आणि नि मेजरसाहेबांचे भाषण ऐकू लागली.

    “...भाईयों, आज हमारा देश आझाद हो गया है ।”

    या वाक्यावर साऱ्या जवानांनी टाळ्या वाजवल्या. म्हणून मग सगळ्या गाववाल्यांनीही टाळ्या वाजवल्या. पण त्यांना हे कळलं नाही.... आझाद व्हायला आपण गुलाम होतो केव्हा? आपण तर फक्त खुदाचे बंदे ! आता काय, खुदापासूनही आपण आझाद झालो?

    “देशाची फाळणी झाली आहे आणि पाकिस्तानपासून आपल्या ‘हिदुस्थान’चं... आपल्या सीमेचं रक्षण करणं आपलं कर्तव्य आहे!”

    मेजरसाहेबांचं भाषण आता म्हाताऱ्या नि शहाण्या गुलबेगच्याही डोक्यावरून जायला लागलं, की ही हिंदुस्थान, पाकिस्तान काय चीज आहे? पश्चिमेला सिंध आहे... कराची मोठं शहर आहे. तिथला लाल तांदूळ सणावाराला आणून खातो. रणात खूप आतवर समुद्राचं पाणी शिरलं, की आपण सिंधमध्ये जाऊन मजुरी करतो. वर डोक्यावर राजपुताना आहे. तिकडं उंटांचा बाजार भरतो. रेबारी तिथं उंटांची खरेदी-विक्री करतात. पूर्वेला सौराष्ट्र आहे.... राजांच्या सलतनती आहेत... तिथं.... आपलं कशिदाकाम विकून तिथनं आपण चांदीच्या कोरी आणतो... हे हिंदुस्थान, पाकिस्तान कुठायत ?

    “समोरचा पिटारा गाव पाकिस्तानच्या हद्दीत गेलाय नि आपलं बगाडीयो.... हिंदुस्थानच्या सीमेवरचं शेवटचं गाव आहे. तुम्ही कुणीही सरकारच्या परवानगीशिवाय पाकिस्तानात जायचं नाही आणि तिकडच्या माणसांना आपल्या हद्दीत येऊ द्यायचं नाही... आणि कुणी आला, तर पकडून ठाण्यावर आणायचं!”

    मेजरसाहेबांच्या या हुकमानं सगळा गाव गंभीर झाला... आणि नकळत अश्रू ढाळू लागला. रक्ताचं नातं-गोतं आपलं.... तरी आपण पिटाऱ्याला जायचं नाही ? त्यांनी बगाडीयोला यायचं नाही?

    मग चैत्रपुनवेला कर्णावणीदेवीच्या जत्रेला हिंदूंनी कसं जायचं? आणि पिटाऱ्यातल्या मुसलमानांनी जिंदापीराच्या उरसाला कसं यायचं? पिटाऱ्याचं आणि बगाडीयोचं कधीच भांडण झालं नाही. तिकडं कुणाची मयत झाली, की आपण इकडं सुतक पाळतो. इकडं कुणी जन्माला आला, की तिकडं मिठाई वाटतात. मग पिटारा कसा दुश्मनांच्या हद्दीत गेला? आपला वैरी कसा?

    मेजरसाहेबांचं भाषण संपलं, तेव्हा गुलबेगची लाडकी मुलगी हबीबा-पफुली ओक्साबोक्शी रडत होती. तिची मुळी शादीच पिटाऱ्यातल्या शमसुद्दीनशी तय झाली होती. पिटारा, म्हणजे तिचं ससुराल. शादी मोडायची ? शमसुद्दीन तर तिला खूप आवडत होता.

    संध्याकाळ झाली, तसा लष्कराचा रिसाला पुढं चालू पडला. सीमेवर ठाणी करायला.

    गुलबेगनं डोळे किलकिले करून चार कोसांवरच्या पिटारा गावाकडं पाहिलं... तिकडंही एक नवाच झेंडा फडफडत होता. चाँदतारा असलेला हिरवा झेंडा, पण तो मशिदीवरचा वाटत नव्हता!

    ***

    रणामध्ये लष्कराची ठाणी बसली नि गुलबेगचं रणातलं महत्त्व आणखीन वाढलं. गुलबेगला रणाची खडा न् खडा माहिती होती. कोणत्या भरतीच्या दिवशी रणामध्ये कुठकुठपर्यंत पाणी किती शिरेल, याचा त्याला पक्का अंदाज असायचा. रणामध्ये कुठं दलदल आहे, हेही त्याला चांगलं ठाऊक होतं.

    निव्वळ उंटाच्या पावलांच्या ठशांवरून उंट काय वयाचा, कुठल्या जातीचा असेल... त्याच्यावर वजन किती असेल, माणसं किती असतील, हे नेमकं तो सांगू शकायचा, हिवाळ्यात माजावर येणाऱ्या उंटांना कसं शांत करायचं... नि वयात आलेल्या उंटाना नाकेलं पाडून, मुआर कशी बांधायची, यात तर तो पटाईतच होता आणि एक उपयोगी सिव्हिलियन म्हणून लष्करी अधिकारी त्याच्याशी दोस्ती ठेवून होते !

    या दोस्तीचा फायदा आपल्याला मिळेल... नि साऱ्या गावाला नि रिश्तेदारांना पाकिस्तानात म्हणजे समोरच्या पिटारा गावी पफुलीच्या शादीसाठी जायला परवानगी मिळेल, याची गुलबेगला खात्री होती. रजबचा महिना तोंडावर आला होता. शादीची तयारी जोरात चालली होती. काचामोत्यांचा सेहरा जवळजवळ तयार झाला होता. मुलीसाठी कंजरी आणि बायांसाठी चोळी शिवायची घाई चालली होती. लग्नात चांगले मौलूद गाणारेदेखील सांगून ठेवले होते. जावयाला लग्नात देण्यासाठी एक ढाल-तलवार नि ठासणीची बंदूकही आणली होती.

    "हुजूर... बेटीकी शादी तय हो गयी है!" गुलबेगनं सलाम घालत मेजरसाहेबाना संगितलं.

    तोंडातला चिरूट काढत मेजरसाहेब हसला. “किससे?” साहेबानं विचारलं.

    आणि गुलबेग मोठ्या उत्साहानं आपल्या भावी जावयाचं कौतुक करू लागला. “सामनेवाले पिटारा गावचा लडका शमसुद्दीन... त्याचा बाप बाबूमियाँ माझा पुराना दोस्त, मुलगा मोठा होनहार...”

    “क्यों? हिंदुस्थानात तुझ्या पोरीला कुणी पोरगा मिळाला नाही का?”

    गुलबेग कावराबावरा झाला.

    “क्या करूँ, हुजूर... शादी आधी पक्की केली. हिंदुस्तान, पाकिस्तान नंतर झालं. मेरे रिश्तेदार, गाववाले पिटारा जाने को इजाजत चाहते हैं ।”

    “मी नाही देऊ शकत परवानगी. पासपोर्ट ऑफिसात जाऊन पासपोर्ट काढा. पाकिस्तान एम्बसीतून व्हिसा घ्या.... नि जा!” मेजरसाहेबांनी सांगितलं.

    “ये पासपोर्ट, व्हिसा, क्या होता है हुजूर?” गुलबेगनं विचारलं.

    –आणि मेजरसाहेबांनी जी माहिती दिली, ती ऐकून गुलबेगचे डोळेच पांढरे झाले.

    बाप रे!... आधी भूजला जायचं, फॉर्म आणायचे, सगळ्या माणसांची माहिती लिहायची. मग सहासहा फोटो जोडायचे. सगळ्यांचे फोटो काढायचे, म्हणजे सगळा गाव भूजला न्यावा लागेल. रणात कुठला आला आहे फोटोग्राफर ? नंतर पैसे भरायचे. मग पासपोर्ट मिळणार. पासपोर्ट मिळाला, की दिल्लीला पाकिस्तानच्या वकिलातीला टपालाने अर्ज पाठवायचे.... मग त्यांचा व्हिसा मिळाल्यावर पाकिस्तानात जायचं, म्हणजे तोवर हा रजबचा महिना जाऊन पुढल्या सालचा रजबचा महिना उगवायचा. आणि खर्च किती? एवढा खर्च तर बादशहा बेगमांनाच शक्य. समोरच्या चार कोसांवरच्या गावाला जायला इतका खर्च?

    रात्री आपल्या भोंग्यात गुलबेग मियाँ हुसेन विचार करत बसला. आपल्या लहानपणीसुद्धा राजे-महाराजे होते, सुलतान, बादशहा होते. गोऱ्या साहेबाचं सरकारही होतं. तेव्हा आपण इकडून तिकडं जायचो. राजपुतान्यातून उंट आणावयाचो. भूजमधून चांदी घेऊन सिंधमध्ये नेऊन पोचवायचो. तेव्हा कुठं लागायचा पासपोर्ट, व्हिसा? ही हिंदुस्थान-पाकिस्तानची सरकारं अजबच आहेत. रक्तानात्याच्या माणसांना सणासुदीला भेटायला पासपोर्ट-व्हिसा घ्यायला लावतात.

    गुलबेगनं खूप डोकं खाजवलं; पण त्याला मार्ग सापडेना. साऱ्यांचा पासपोर्टचा एवढा खर्च त्याला घरदार विकूनही झेपणार नव्हता. आणि कुठं जन्माचं पाकिस्तानला रहायला जायचं होतं, की त्यासाठी एवढा खर्च करायचा?

    गुलबेगनं ठरवून टाकलं, मेजरसाहेबांचा हुकूम नाही ऐकायचा. हद्दीवर काही प्रत्येक गजावर शिपाई नाही. रात्री उंटांचा काफला घेऊन चूपचाप सगळ्यांना पिटाऱ्याला घेऊन जायचं. शादी झाली, की दुसऱ्या दिवशी परत यायचं.... एवढ्यानं असा काय मोठा गुन्हा होणार होता?

    कुराणात सांगितलंय, दिवसातून पाच वेळा नमाज पढावयाचा. कुठे पढता येतो आपल्याला ? सरकारचा हुकूम काय पैगंबराच्या आज्ञेपेक्षा मोठाय? पाळता आला, तर पाळायचा, नाही पाळता आला, तर मोडायचा!

    फाळणी झाली खरी नि रणातली सारी भोळीभाबडी पापभीरू माणसं एकदम चोर-लुटारू ठरली. त्यांना रणात पिकवायला, उगवायला काहीही नव्हतं. हजारो चौरस मैलांचं विस्तीर्ण रण. त्या रणात फक्त अठ्ठावीस गावं नि चोवीस हजारांची वस्ती.

    पावसाळा संपला की, सिंधमध्ये जायचं नि मजुरी करावयाची. जे मालधारी होते,.... ते गुजरातेतला माल उंटांवर लादून सिंधमध्ये नेऊन पोहोचवायचे. रण तुडवल्याची बिदागी पोटभरणीला पुरायची.

    कमाई अगदीच कमी झाली, तर माणसं चूचनी गवताच्या रोट्यांबरोबर सरड्यासारख्या सरपटणाऱ्या... जमिनीत बिळं करून राहणाऱ्या ‘सांड्याला’ भाजून खायचं. हां.... आता सांड्याचं मांस गरम उन्हात खाल्लं, तर रक्ताच्या उलट्याच व्हायच्या! म्हणून शक्यतो उंटाच्या दुधाचा खवा नि चूचनीचे रोटले खाऊनच ढेकर द्यायचे. पैसे शिल्लक असले, तर चांदीच्या कोऱ्या रांजणात भरून ठेवायचे. सहा कोरी दिल्यावर गोरं सरकार देखील एक रुपया द्यायचं.

    फाळणी झाली नि रणातले मालधारी स्मगलर ठरले. पूर्वी जो धंदा ते इमानानं करायचे, तोच धंदा बेइमानीचा ठरला. ‘स्मगलिंग’ म्हणून नोंदला गेला. जे मजूर सिंधला जायचे, ते आता दूर खाली दक्षिणेत बलसाडला जाऊ लागले. सिंधमध्ये जायला परवानगी हवी, माल न्यायला परवाना हवा. तो मिळवणं, रणातल्या गरिबांना शक्यच नव्हतं.

    –आणि सर्वात मुख्य म्हणजे खांब ठोकून देश तोडला, तरी माणसं कशी तोडता येणार? माणसांची जात, धर्म, देश वेगवेगळे असले, तरी नातीगोती, नाक, कान, डोळे सारखेच असतात ना?

    कुणाची आई हिंदुस्थानात, तर आजी पाकिस्तानात... भाऊ पाकिस्तानात, तर बहीण हिंदुस्थानात... असा सारा घोळ झाला. सुंता असो, की मयत; शादी असो, की दफन; इकडून तिकडे पासपोर्टशिवाय माणसांनी जायचं नाही.

    कसं शक्य होतं ते?

    पाच-पन्नास मैलांचं अंतर कापायला शे-पाचशे खर्च करायचे? एवढे पैसे साठवणं, म्हणजे जन्माची मेहनत....

    म्हणून मग रणातल्या माणसांनी ठरवून टाकलं... ठोकले आहेत नुसते खांब.... तारा तर लावल्या नाहीत ना? का भिंतीही बांधल्या नाहीत... जायला यायला अडथळा कसला? त्यांना करू देत फाळणी.... आपण जोडणी करू.

    बस ! याच एका गोष्टीमुळं ठोकलेल्या हद्दीच्या खांबांना काही अर्थ राहिला नाही. चैत्र पुनवेला इकडचे हिंदू पिटारा गावाच्या कर्णावणी देवीच्या जत्रेला जात राहिले...नि तिकडचे मुसलमान इकडच्या बगाडीयोच्या ‘जिंदापिरा’च्या उरसाला रमझानच्या महिन्यात येऊ लागले.

    हद्दीचे खांब असून नसल्यासारखेच झाले.


    ठोकलेल्या खांबांबरोबर लष्कर आलं नि झाडीवाली माणसं आली, तशी रणातली माणसं हळूहळू बदलू लागली! पूर्वी कमरेएवढी मातीची गोल भिंत बांधून त्यावर गवताची टोपी चढवल्यावर तयार होणाऱ्या भोंग्यात ते सुखासमाधानानं राहत होते... पण आता त्यांनाही विटासिमेंटच्या नि धाब्याच्या घरांची स्वप्नं पडू लागली !

    पूर्वी लग्नामध्ये मौलूद गायचे, संध्याकाळी मशिदीत अजान म्हणायचे, यापेक्षा संगीताशी त्यांचा जास्त संबंध नव्हता. आता जवानांप्रमाणे आपल्यापाशीही रेडिओ हवा, असं त्यांना वाटू लागलं.

    चांदीच्या कोऱ्या गेल्या, तरी लष्कराबरोबर बंदे रुपये आणि ढब्बू पैसे आले. ते आले, तेच मुळी नवी दुनिया घेऊन.... ते छाप्याचे पेपर घेऊन आले. पेपरातले फोटो रणातल्या लोकांना पाहता यायचे, अक्षरे मात्र वाचता यायची नाहीत... आणि मुळात, माणसाला माणसाशी बोलायला अल्लानं जबान दिली असताना, ही लिखापढी हवी कशाला? तरी पण आहे तरी काय गंमत, म्हणून पाहायला रणातली मूठभर माणसं लिहा-वाचायला शिकली !

    आणि त्यांना कळलं.... काश्मीरसाठी हिंदुस्थान-पाकिस्तान युद्ध झालं. ते ऐकून गुलबेगसकट सगळी माणसं खदखदून हसली. झाडीवाल्या माणसांची त्यांना खूप मजा वाटली!

    आम्ही मातीच्या डोंगरासाठीही कधी शेजाऱ्यांशी लढाई केली नाही, मग वितळणाऱ्या बर्फाच्या डोंगरासाठी ही माणसं कशाला रक्त सांडतात? काय हा अडाणीपणा? तरी पण काश्मीर लढाईत रणातल्या माणसांनी नाक खुपसलं नाही. आपण बरं, आपलं काम बरं, ही त्यांची वृत्ती! दुसऱ्याच्या भानगडीत शिरायचं नाही... हिंदुस्थान-पाकिस्तान तिकडं लढोत, नाही तर मरोत, आपल्याला काय करायचंय?

    पण निवडणुकीची गोष्ट ऐकून रणातले लोक खूश झाले. आपला मुखिया आपण निवडायचा, ही कल्पना त्यांना खूपच आवडली. निवडणुकीची ते आतुरतेनं वाट पाहू लागले. तरीसुद्धा रणात निवडणूक कधी आलीच नाही.

    हिंदुस्थानात निवडणुका पार पडल्या, पाकिस्तानात त्या पार गुंडाळल्या गेल्या. तरी त्या रणात नाही आल्या. हजारो मैलांचा प्रदेश. उंटाशिवाय वाहन नाही. चोवीस हजार माणसं, दहा हजार मतदार... मतदान होणार पाच हजार... त्यासाठी लाख रुपये कशाला उडवायचे?... एक पुढारी, की पक्ष रणात फिरकला नाही.

    कुणाची भाषणं रणानं ऐकली नाहीत... की मतदान केलं नाही.

    रणातले लोक खट्टू झाले !

    - oOo -

    पुस्तक: युद्धविराम आणि होरपळ
    लेखक: अनिल बर्वे
    प्रकाशक: ऊर्जा प्रकाशन
    आवृत्ती दुसरी
    वर्ष: २००४
    पृष्ठे: ५-७, ९-१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा