RamataramMarquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

बुधवार, ३ डिसेंबर, २०२५

यमुनातीरीचे बुलबुल

  • खूपच लहान होते तेव्हा टाळ्या वाजवत म्हटलेलं एक तसं निरर्थकच गाणं अजून आठवतं. कदाचित् अंक शिकवण्यासाठी ते गाणं रचलेलं असेल.

    यमुनेच्या तीरी किती बुलबुल असतील?
    बुलबुल असतील,
    बुलबुल असतील हो?

    आणि मग या प्रश्नाला उत्तर म्हणून म्हणायचं,

    एक तरी, दोन तरी, तीन तरी असतील.
    चार तरी असतील,
    चार तरी असतील हो!

    गाणं म्हणता म्हणता पाच, सहा, सात, आठ अशी बुलबुलांची संख्या वाढवत न्यायची. मी तेव्हा बुलबुल मुळी पाह्यलाच नव्हता. तो केवढा, कुठल्या रंगाचा असतो, त्याचा आवाज कसा असतो हे मुळीसुद्धा माहीत नव्हतं. आणि यमुनेची तरी कुठे काही माहिती होती!

    आणि माहिती करून घेण्याची जरुरी पण तेव्हा, त्या गाण्यापुरती तरी वाटली नाही. उलट नेहमी, अगदी नेहमी, मनात एक नदी वळण घेत वहात यायची. पाण्यानं खूप भरलेली नदी. काठांवर खूप दाट गवत. किंचित् पुढे गर्द झाडांची झिम्मड. पलिकडच्या काठाला वळणापाशी थोडी वाळू. पांढरी चमकणारी आणि तिथे खूपच खूप बुलबुल. गुलाबी झाकेचे पांढरे पक्षी. अतिसुरेल दीर्घ शीळ घालावी तसा त्यांचा आवाज....

    KavitechyaVatevar

    रात्री अंथरुणावर पडल्यावर देखील ती यमुना आणि तिच्या काठाशी वाळूवर उतरलेले ते बुलबुल डोळ्यांसमोर येत रहायचे. सहज कुणाला पाहायला मिळणार नाही असं काहीतरी पाहत असल्यासारखं वाटायचं. मार्जोरी किनन रॉलिंग्ज या लेखिकेची एक अप्रतिम कादंबरी आहे. मराठीत 'पाडस' या नावानं तिचा अनुवाद प्रसिद्ध झाला आहे. त्यात करकोच्यांच्या नाचाचं फार अद्भुत आणि स्वप्नतरल वर्णन आहे. तसलंच ते कल्पनेतलं दृश्य असायचं. त्यातली ती वेळ संध्याकाळचीच असायची नेहमी आणि तिथे बुलबुल थव्यांनी उतरत असायचे. म्हणून तर वाढत जायचे ना ते!

    त्या मनातल्या दृश्याशी खोल कुठेतरी कविता गुंतलेली असायची. जणू यमुनेचं पाणी वहात आलं की त्या पाण्याबरोबर तीही वहात येणार किंवा जणू बुलबुलांच्याबरोबर तीही काठावर उतरणार असं वाटत रहायचं. अतिशय उत्कंठित करणारी काहीतरी गूढ़ भावना होती ती. पुष्कळ पुढे रामदासांच्या ओळी अचानकच समोर आल्या.

    कल्पनेचा प्रांत, तो माझा एकांत
    तेथ मी निवांत बैसईन

    वाचताक्षणी मला प्रथम आठवले ते माझ्या यमुनेकाठचे बुलबुल. मधल्या काळात यमुना प्रत्यक्ष पाहिली होती. दुर्गाबाईनी तिच्यासाठी वापरलेलं ‘दुःखकालिंदी’ हे नाव माझ्यापुरतं सार्थ असलेलं लख्ख अनुभवलं होतं. त्या अनुभवानं तिचं पाणी सावळंच आहे हे समजलं होतं.

    शिवाय आम्ही राहत्या घराची जागा बदलली होती आणि नव्या घराभोवतालच्या झाडावरून चक्क आमच्या गच्चीच्या कठड्यावरच बुलबुल पक्षी उतरुन येत होते. मुठीएवढ्या त्या पाखरांची जोडी तर पुष्कळ वेळा दिसे. आपल्या काळ्या शेपटीखालचा लालकेशरी ठिपका नाचवत ती दोघं येत आणि छोट्या छोट्या पल्ल्याच्या स्वराघातांची बोली बोलत.

    माझ्या त्या जुन्या यमुनेकाठच्या बुलबुलांपेक्षा प्रत्यक्षात त्यांचं रूप केवढं तरी निराळं होतं. पण रामदासांच्या शब्दांनी कल्पनेच्या ज्या एकांत परिसराकडे बोट दाखवलं होतं त्या माझ्या परिसरात वाहत येणाऱ्या यमुनेचं पाणी तसंच तुडुंब होतं. गवत तसंच दाट सळसळतं. झाडं तशीच हिरवी गर्द डंवरलेली आणि वळणाशी चमकत्या वाळवंटात उतरणारे गुलाबी झाकेचे पांढुरके बुलबुलही तसेच, दीर्घ शीळ घालणारे ती उतरती संध्याकाळ आणि ते दृश्य अगदी तसंच होतं. कवितेच्या जन्मखुणा त्या दृश्यावर पुसट उमटून असलेल्या तशाच आणि ती किंचित उदास गूढताही तशीच.

    शांताबाई शेळके पुण्यात रहायला आल्या आणि पुढल्या पंधरा वर्षांमध्ये मला फारसे ओळखीचे नसलेले पुष्कळ नवे-जुने साहित्यिक आणि कवी माझ्या आठवणींच्या परिसरात मुक्कामाला आलें. त्यात एक कथालेखिका होती, कृष्णा जे कुलकर्णी नावाची. प्रसिद्धीच्या झोतात ती कधीच आलेली नव्हती. साधं पण अत्यंत उत्कट आणि मर्माला स्पर्श करणारं लिहिणारी होती. म्हणजे मी तिच्या कथा वाचल्या तेव्हा ती हयात नव्हती. पर तिचं पुस्तक शांताबाईंनीच प्रथम माझ्या हातात ठेवलं. तिचा तो एकच कथासंग्रह, नाव होतं, ‘यमुनातीरीचे बुलबुल’. १९३९ ते ४१ अशा तीनएक वर्षात ‘स्त्री’ ‘किर्लोस्कर’, ‘सत्यकथा’ यांसारख्या मासिकांमधून कृष्णा कुलकर्णीनं कथा लिहिल्या. तिच्या काळात कथा लिहिणाऱ्या लेखिकांपेक्षा खूपच वेगळ्या कथा. वाचताना चकित व्हावं इतक्या अनोख्या संवेदनशीलतेने ती लिहित होती. कवितेइतक्या तरलतेनं लिहित होती.

    मी त्या कथासंग्रहावर लोभावलेच. तिच्याविषयी शांताबाईंना सारखं विचारत राहिले. पण त्यांनाही तिची फारशी माहिती नव्हती. बेळगावकडची ती लेखिका होती आणि अगदी तरुण वयात म्हणजे वयाच्या एकविशीतच ती मरण पावली एवढंच त्यांनी मला सांगितलं. मग तर त्या कथांचं मोल मला जास्तच वाटायला लागलं. वयाच्या विशीत त्या मुलीच्या जाणिवा कशा प्रगल्भ असल्या पाहिजेत ! तिच्या कथांचं वेगळेपण हे तिच्या आयुष्याकडे बघण्याच्या दृष्टीत आणि तिच्या समजुतीत आहे, तिच्या संवेदनशीलतेत आहे हे लक्षात आलं आणि त्या कथा मराठीच्या कथाप्रवाहाकाठी यमुनातीरीच्या बुलबुलांसारख्याच उतरलेल्या वाटायला लागल्या. ते गाणं म्हणजे तिच्या माझ्यामधला जणू अदृश्य बंधच होता.

    नीलू, मध्दू, राम, जलजा अशा पाच-सात छोट्या पोरांची टोळी बाबू कुत्र्याला बरोबर घेऊन गावाबाहेरच्या टेकडीवर करवंदांच्या जाळ्यांकडे पिकनिकला जाते. बरोबर असते त्यांची ताई सुलू. तिला ज्याच्याविषयी आकर्षण आहे तो मुजुमदार नावाचा एक तरुण मुलगाही त्यांच्याबरोबर आहे. त्या दोघांमधलं आकर्षण, त्यानं तिचा धरलेला हात मुलांनी खोटी खोटी बंदूक रोखून त्याला चोर ठरवून केलेली लढाई आणि नंतर तिच्या मनाच्या चमत्कारिक अवस्थेत मुलांनी सुरू केलेलं गाणं– यमुनेच्या तीरी किती बुलबुल असतील?...

    पिकनिक संपते. मुलं आपापल्या घरी जातात. सुलुताई मात्र घराच्या पायरीवरच बसलेली. वाऱ्याच्या झोताबरोबर दुरून आलेलं कापऱ्या आवाजातलं अस्पष्ट गाणं ती ऐकते आहे. यमुनेच्या तीरी किती बुलबुल असतील?...

    १९९५ साली ‘बहिणाई’ नावाच्या एका वार्षिकाचा दिवाळी अंक मी कथा विशेषांक म्हणून संपादित केला. त्या अंकात ही कथा मी पुन्हा एकदा छापली. माझ्या मनातल्या गाण्याची आठवण धरून कृष्णा कुलकर्णीपर्यंत मनोमन पोचण्याचा माझा तो एक प्रयत्न होता. शिवाय शांताबाईंनाच मी तिच्या कथांवर लिहायला लावलं. किती सुंदर लेख लिहिला शान्ताबाईंनी! मी मनात म्हणत राहिले, “वाचते आहेस का तू हे सगळं ? जिथे कुठे असशील तिथून पाहते आहेस का माझी ही धडपड?”

    ती कुठे होती कुणास ठाऊक. पण तिला बहुधा माझी तगमग कळली असावी. आयुष्याचा चटका काय असतो याची तिला मिळालेली क्रूर जाणीव तिनं तिच्या ‘इंद्रजाल’ नावाच्या एका कथेत व्यक्त केली होती. ती बेळगावची होती म्हणून की काय जीएंच्या कथेनं तीच जाणीव अधिक प्रगल्भ रुपात सांभाळली होती. पण मला तिनं तिची आणि तिच्या त्या बुलबुलांच्या गाण्याची आठवण जागवल्याची जी तडफडून शिक्षा केली ती विलक्षणच म्हटली पाहिजे.

    मी त्यावेळी सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष डॉ. विश्राम रामजी घोले यांच्यासंबंधी संशोधन करत होते. विश्राम रामजींचे पणतू मला भेटले आणि त्यांच्या घरातून मला पुष्कळ कागदपत्रंही मिळाली. त्यापैकी एक होतं जुन्या वर्तमानपत्राचं कात्रण. विश्राम रामजींच्या घराण्याच्या संदर्भातली एक बातमी त्यात होती. मी ते उघडलं आणि सहज लक्ष गेलं तेव्हा शेजारीच कृष्णा कुलकर्णीच्या निधनाची बातमी तिच्या फोटोसकट छापलेली मला दिसली. अगदी मोजक्या दोन-चार ओळींतली औपचारिक बातमी. मृत्यूचं कारणही त्यात नव्हतं आणि मराठी वाङ्‌मयविश्वाला वाटायला हवी होती ती हळहळ आणि दुःखही नव्हतं.

    मी शान्ताबाईंना तो योगायोग सांगितला तेव्हा म्हणाल्या, ‘खरं सांगू का, तुला मी आधी बोलले नव्हते आणि मला पुरावा देता नाही यायचा, पण असं ऐकलंय् की मुंबईला कृष्णा कसल्याशा ट्रेनिंगकरता गेली होती. ती रेल्वेनं बेळगावला एकटीच परतत असताना म्हणे गाडीतल्या सोल्जरांनी तिला एकटी पाहून तिच्याशी ... आणि कुणाला काही कळलंच नाही. नंतर म्हणे लोणावळ्याजवळ कुठेतरी झाडीत ती सापडली. तेव्हा जिवंत नव्हती ती...’

    ऐकताना माझ्या कानाजवळून सोल्जरांच्या बंदुकीतली गोळी सुटल्याचा प्रचंड मोठा आवाज झाला आणि यमुनाकाठचे बुलबुल प्राणांतिक कलकल करत उडून गेले.

    -oOo-

    पुस्तक: कवितेच्या वाटेवर
    लेखक: अरुणा ढेरे
    प्रकाशक: अभिजित प्रकाशन
    आवृत्ती पहिली.
    वर्ष: २०१०.
    पृ. ३१-३५.

1 टिप्पणी: