पी. वाय. : ... कुळकर्णी, ह्याचा जबाब मात्र तुम्हाला द्यावा लागेल. बरीवाईट कशीही का होईना, एक इमारत आम्ही बांधत आणली आहे. तिला सुरुंग लावायला काही माणसं पेटून उठली आहेत. त्यांच्या बाजूला तुम्ही आहात का ह्याचा जबाब तुम्हाला देणं भाग आहे. खरा प्रश्न तो आहे. विचार करून उत्तरे द्या. या सगळ्या प्रकरणात आम्ही कुठं उभं राहायचं ते तुमच्या उत्तरावर अवलंबून आहे.
तो: फार अवघड प्रश्न विचारलात पी. वाय. तुमची सगळी चौकशी याच दिशेने चालली आहे हे माझ्या कधीच लक्षात आलं होतं. पण पी. वाय., या प्रश्नाचं मी काय उत्तर देणार? मी मघाच तुम्हाला सांगितलं की आंधळ्या वायलन्सचा मी पुरस्कर्ता नाही. ते ही अर्धसत्य आहे. खरी गोष्ट अशी आहे की वायलन्सची मला भीतीच वाटते. मी रक्त अजून जवळून पाहिलेलंसुद्धा नाही... माणसाचं रक्त... ते सांडून शस्त्रांनी गनिमी युद्धाच्या मदतीनं इथं राजकीय उलथापालथ घडवून आणायची ह्याची कल्पनाही मी करू शकत नाही. हा मोठा देश आहे. ह्या सबंध देशाला कार्यप्रवण - कसलंही कार्य, हिंसक काय, अहिंसक काय... करायला फार थोर प्रतिभेचा माणूस पाहिजे. तो मी नव्हे हे मला पक्कं ठाऊक आहे…
बंदुका हाती घेऊनच क्रांती होऊ शकते हे म्हणायला, लोकांना सांगायला ठीक आहे... पण हे सांगणार्या माणसाला स्वतः हाती बंदूक घ्यावी लागते. ती घेतली नाही तर त्या सांगण्यावर कुणाचा विश्वास कसा बसणार?...
का तुम्हाला थिअरीचीच भीती आहे? पी. वाय., त्यात घाबरण्याजोगं काही नाही. थिअरी लिहिण्यात, तिची हुषार मांडणी करण्यात सगळा जन्म जातो! ह्या देशात जितके शब्दकामाठी सांपडतील तितके दुसरीकडे कुठे मिळायचे नाहीत. त्यांच्यापासून कसली भीती आहे? शब्दसुखी माणूस हा भित्रा असतो. तो इतरांनी क्रांती कशी करावी हे सांगेल. स्वतः काय करणार?...
हे ही नाटक थोडावेळ चालतं. मग या शब्दसुख्यांचं प्रचंड नैष्कर्म्य ध्यानात येतं. आणखी एक तत्त्वज्ञ इतिहासजमा होतो. पंचवीस लेख, एकदोन पुस्तकं आणि अगणित भाषणं ह्यापलिकडं त्याच्यापाशी दुसरं काही असंत नाही...
माझ्यापाशीही दुसरं काही नाही. किसानांना संघटित करायला मी कसा जाणार? त्यांची भाषासुद्धा मला समजत नाही. आम्ही या समाजात राहून परागंदा आहोत. परागंद्यांच्या हातून क्रांती होत नसते...
अशा परागंद्यांनी हाती शस्त्र घेऊन क्रांती करा असं सांगणं याला काही अर्थ नाही. इतरांचा तर सोडाच पण आमचाच आमच्यावर विश्वास नाही. पी. वाय., हे सगळं कबूल करण्याचा प्रामाणिकपणा माझ्यात आहे. मी कुणाला कशाला शस्त्र घ्यायला सांगीन्...पण असं सांगावसं वाटतं, अगदी जीव ओतून सांगावसं वाटतं - एक मोठा प्रलय घडावा आणि त्यात हे सगळं वाहून जावं असं वाटतं खरं. पर्वतप्राय आग लागावी आणि त्यात आजची व्यवस्था भस्मीभूत व्हावी असं वाटतं खरं. फार वेळा वाटतं…
तेव्हढं सांगायची, बोलायची माझी ताकद नाही. घोषणा मी ही करू शकेन. पण घोषणा म्हणजे विचार नव्हे. घोषणेला नुसता आवाज पुरतो... विचारांना आत्मबळ लागतं. ते माझ्यापाशी नाही…
आज आम्ही पराभूत असलोच तर ते त्यामुळं. मग काही नाही. संवयीपोटी चर्चा करतो. मान नेहमी वरती राहावी ह्यापेक्षा दुसरी अपेक्षा नाही. ही व्यवस्था शत्रू आहे. त्या शत्रूशी कसं लढावं हे सांगता येत नाही. निदान त्या शत्रूच्या प्रलोभनांना बळी पडू नका एवढं सांगतो. मास्तर दुसरं काय सांगणार?...
[दमला आहे. ताण आता अगदी असह्य झाला आहे.]
पी. वाय., आश्चर्य याचं वाटतं की , इतक्या साध्या प्रपंचाची तुम्हाला भीती का वाटते? दहा माणसं ताठ उभं राहून मोडायला शिकतात ह्याची भीती का वाटते? पी. वाय. याचं उत्तर द्या.अगदी प्रामाणिकपणे सांगा. चार अभ्यास मंडळं, एखादं युनियन, एखादी संघटना, दहा-वीस ताठ माणसं यांची तुम्हाला भीती वाटते? पण का?
[जांभेकर आणि क्षीरसागर यांना काही बोलायचे आहे. पी.वाय. दोघांनाही परावृत्त करतात. परिस्थितीचे पुरते नियंत्रण आपल्या हातात आहे हे लक्षात येऊन-]
पी. वाय.: थांबा जांभेकर, तुम्ही नंतर बोला. गोंधळून गेला आहात. आणखी गोंधळात पडू नका.
[जांभेकरांना पी. वाय. च्या आत्मविश्वासाने झपाटून टाकले आहे.]
पी. वाय.: इतकं सगळं लख्ख बोललात आणि अखेरीस अगदी चुकीचा, बालिश प्रश्न विचारलात कुलकर्णी ! सगळं कबूल केलंत आणि ते करता करता एकदम गरीब होऊन गेलात! नाहीतर हा प्रश्न विचारला नसतात…
आम्ही भीत नाही... अजिबात नाही. जे तुम्हाला स्वच्छ कळलंय ते आम्हालाही कळलंय…
लढाई जिंकणाराला लढाई कळत नसते. ती कळणारे फक्त दोघं. एक लढाईत पोळणारा आणि दुसरा लढाईपासून पळणारा. श्रीधर विश्वनाथ, मी पळालेला आहे तो लढाई चांगली ठाऊक असल्यामुळे. वांझोटेपणानं जळून जायची माझी तयारी नव्हती, तुमची होती…
वांझोटं जळणार्यांची भीती इतकीच की त्यांच्यामुळं आमचं पलायन उघड होतं. पळून जाणार्यांना ते आवडंत नाही! तेव्हा ही भीती नव्हे. हा फक्त रुचीचा प्रश्न आहे. कळलं? आम्हाला असं नग्न करणार्यांनी त्याची किंमत द्यायलाच हवी... ती तुम्हाला द्यावी लागणार आहे…
मला वाईट वाटलं. श्रीधर विश्वनाथ, खरंच वाईट वाटतं कारण तुम्ही माझे मित्र आहात…
पण त्याचा इथे काय संबंध? तुमचीही सोय आम्ही करून ठेवली होती. तुमच्यासारख्यांची. 'त्याग', 'तळमळ', 'निरलस कार्य' हे शब्द तुमच्यासाठी राखून ठेवले होते. अट फक्त एक. काम करायचं. पायाला भेगा पडेपर्यंत चालायचं. फक्त लोकांना शत्रू कोण ते सांगायचं नाही. मग तुम्हाला बक्षिसं देण्याचं काम आम्ही केलं असतं. तुमची 'चिंतने' आम्ही पुस्तकरूपात छापली असती. 'सर्वेऽपि सुखिनः सन्तु' म्हणणारे थोर तत्त्वज्ञ केलं असतं. तुमच्या एकसष्टीला आणि पंचाहत्तरीला मी भाषणे केली असती. तुम्ही बोलला असता. तुमच्या शिष्यांनी तुमचे विचार शब्दांकित केले असते.
अट एकच. आम्ही शत्रू आहोत असं काही तोंडातून बाहेर पडू द्यायचं नाही.
- oOo -
नाटक: 'उद्ध्वस्त धर्मशाळा'
लेखकः गो. पु. देशपांडे
प्रकाशकः पॉप्युलर प्रकाशन
आवृत्ती पहिली, पुनर्मुद्रण (१९९८)
पृ. ५६ ते ५८.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा