सोमवार, २१ ऑक्टोबर, २०१९

नातं

नैसर आता अधिक झपझप पावले टाकीत होता. आपल्या आणि नैसरमधे अधिक अंतर राहणार नाही याची दक्षता अनीशाची पावले घेत होती. नगर संपले आणि अनीशाने नैसर आणि आपल्यातले अंतर नष्ट केले. थोड्याच अंतरावर अंधुकसा प्रकाश. जवळ गेल्यावर झोपडी दिसली. नैसर झोपडीजवळ गेला आणि दरवाज्याला विचारावे त्याप्रमाणे विचारले,

'आत कोण आहे का? '

थोड्या वेळाने दरवाजा अर्धवट उघडला आणि आतून रस्त्याला विचारावे तसे उलट विचारले,

'कोण पाहिजे?'

'आम्ही वाक्प्रसकडून आलोय, आम्हाला नेमिताजला भेटायचंय'

नैसरने वाक्प्रसचा उल्लेख करताच पटकन दरवाजा पूर्णपणे उघडला गेला आणि

'या, आत या.'

दरवाज्यालाच शब्द फुटले.

परिव्राजक

'या झोपडीत नगरापासून दूर हा नेमिताज एकटाच का राहात असावा?' असा एक प्रश्न नैसरच्या मनात उगवू पाहात होता, पण नैसरने तो प्रश्न मुळासकट उखडून दूर फेकून दिला.

खाणं होताच अनीशा पटकन झोपली.

नैसर आणि नेमिताज झोपडीबाहेर अंगणात झोपेची वाट पाहात पडलेले. दोघेही गप्प, शांत आणि तरीही जागे, म्हणून दोघेही एकमेकांच्या दृष्टीने झोपलेले. उद्या आपण नदी ओलांडणार, दंडगिरीवर पाऊल ठेवणार... नैसर उद्याला आज बनविण्यात गुंग झालेला. त्यामुळे नैसर जागा.

नेमिताजही जागा. नेमिताजच्या जागेपणाचं कारण होतं अनीशा. झोपडीत झोपलेली. सौंदर्याचं अप्रतिम रूप. मात्र अनीशाविषयी वासना नाही जागी झाली नेमिताजच्या मनात. जागा झाला तो एक प्रश्न की ज्याच्यामुळे त्याला झोप येईना. 'नैसरची अनीशा कोण?' हा प्रश्न जोवर जागा आहे तोपर्यंत नेमिताजला झोप येणं शक्य नव्हतं. शेवटी नेमिताज उठून बसला. थोडा वेळ तसाच बसून राहिला आणि मग त्याने हाक मारली.

'नैसर.'

नैसर तर जागाच. उद्यामध्ये गुंग झालेला. त्यानं फक्त 'हं' म्हटलं. नंतर बराच वेळ शांतता. नैसरला वाटले की, आपण दंडगिरीला जाऊ नये म्हणून नेमिताज शेवटचा प्रयत्न करीत असावा.

'तू जागाच आहेस?'

'हं' नैसर.

'एक विचारू का?' नेमिताजचा प्रश्ना अगोदरचा अस्वस्थ प्रश्न.

'हं' नैसरची संमती.

'आत झोपलेली अनीशा तुझी कोण?... म्हणजे तुम्हा दोघांचं नातं काय?'

नैसरला वाटले, कोणत्याही दोन माणसांच्या नात्यांसबंधीची तिसर्‍या माणसाला लागलेली चिंता ही म्हणजे सनातन समस्याच होय. नैसर काहीच बोलत नाही म्हटल्यावर नेमिताजच पुन्हा म्हणाला.

'माझा प्रश्न आवडला नसेल तर उत्तर देऊ नकोस.'

असे म्हणून नेमिताज आडवा झाला. तसा नैसर उठून बसला आणि नेमिताजकडे अंधारात उगीचच पाहू लागला. पण हे ही नेमिताजला जाणवले की काय कोणास ठाऊक म्हणून नेमिताज झोपूनच म्हणाला.

'मी हा प्रश्न विचारला म्हणून कदाचित रागावला असशील पण आज तुम्ही नगरात प्रवेश केल्यापासून ज्यांनी ज्यांनी तुम्हाला पाहिले असेल त्या सर्वांच्या पुढ्यात आता या वेळी, मी तुला विचारलेला प्रश्न आणि त्यांनीच जन्माला घातलेली एक किंवा अनेक उत्तरे शांतपणे झोपली असतील. पण प्रत्यक्ष तूच माझ्याजवळ असल्याने मी स्वतःहून कोणत्याही उत्तराला जन्माला घातलं नाही.'

यावर हसत नैसर म्हणाला.

'एखादा प्रश्न किती लोकांच्या मनात निर्माण झाला याला तसे फारसे महत्त्व नाही. उलट एकाच वेळी अनेकांच्या मनात जर एखादा प्रश्न निर्माण झाला तर तो तितकासा महत्त्वाचा नसण्याची शक्यता अधिक. कारण मोलाचा प्रश्न एखाद्याच्याच मनात निर्माण होऊ शकतो. आता तू म्हणतोस त्याप्रमाणे हा प्रश्नही अनेकांच्या मनात निर्माण होऊनही त्यांनी त्याचा उच्चार केला नाही, याचा अर्थ असा की त्या प्रश्नाचं उत्तर जन्माला घालण्याचं स्वातंत्र्यही त्यांनी स्वतःजवळ सुरक्षित ठेवलं आहे. आता फक्त तुझ्या प्रश्नासाठी, जर मी तुला सांगितलं की ती माझी बहीण आहे तर ती म्हणेल मी तिचा बाप आहे, आणि मी जर म्हटलं की ती माझी मुलगी आहे तर ती म्हणेल मी तिचा भाऊ आहे... मी म्हणालो की ती माझी मैत्रीण आहे तर ती म्हणेल मी तिचा जन्मभर न संपणारा वैरी आहे, आणि मी म्हटलं की ती माझी पत्नी आहे तर ती म्हणेल ती मला अद्याप ओळखतही नाही. कारण कोणत्याही दोन माणसांमध्ये एखादं नातं निर्माण व्हायचं असेल तर त्या नात्याला त्या दोघांचीही संमती असायला हवी. आणि असं तुला सांगण्यासारखं कोणतंच नातं आमच्यात अजून जन्माला आलेलं नाही.'

नेमिताजची प्रतिक्रिया काय होते यासाठी नैसरने थोडा वेळ कान जागे ठेवले आणि थोड्या वेळानंतर ते ही मिटले.

- oOo -

पुस्तकः 'परिव्राजक'
लेखकः गौतमीपुत्र कांबळे
प्रकाशकः सेक्युलर पब्लिकेशन
दुसरी आवृत्ती (२००९) (पहिली आवृत्ती: एक्स्प्रेस पब्लिशिंग हाऊस, २००४)
पृ. ४४ - ४६.

---
संबंधित लेखन:
वेचताना... : परिव्राजक >>
राजपुत्र >>
---


संबंधित लेखन

1 टिप्पणी: