(सुमारे दहा बारा वर्षांपूर्वी अविनाश चव्हाण या काहीशा अबोल पण रसिक मित्राशी ओळख झाली. व्यवसायाने बिल्डर असलेला हा मित्र प्लॅन, परवानग्या, विटा, सिमेंट, वगैरे जगातून वैतागून बाहेर पडायचा नि आम्हा दोन-चार मित्रांना पकडून त्याच्या ऐसपैस गाडीत घालून भटकायला घेऊन जायचा. या भटकंतीचा मुख्य उद्देश असे गप्पा. इंटरनेटवरुन आमची ओळख झाली ती अक्षरश: एकाच क्षणी आम्ही दोघांनी ’पाडस’ या पुस्तकाबाबत लिहिलेल्या प्रतिसादामुळे. त्यामुळे या गप्पांमध्ये मुख्यत: पुस्तके नि चित्रपट यावर घनघोर चर्चा चालत. ’राशोमोन’वर मी लिहिलेल्या मालिकेनंतर पाडस, माचीवरला बुधा ही दोन पुस्तके आणि मॅट्रिक्स चित्रपट मालिका यावर मी लिहायला हवे असा त्याचा आग्रह होता. मैफल सोडून तो मध्येच निघून गेल्यानंतर पाच-सहा वर्षांनी बुधावर लिहिण्यास मुहूर्त लागला आहे. हा लेख त्याच्याच स्मृतींना अर्पण. )
---
आयुष्याच्या संध्याकाळी जगण्यातील ईर्षा मावळू लागल्यानंतर माणूस हळूहळू अंतर्मुख होऊ लागतो. बालपणाकडे परतुनि येण्याची, जगण्याच्या मुळांना पुन्हा स्पर्श करण्याची ही ओढ माणसांना कायमच राहते. माणूस काय साध्य केले, काय मिळवले, काय जमले नाही, काय गमावले याचा धांडोळा घेऊ लागतो. जगण्याचे धुके विरत जाऊन बालपणी पाहिलेली, जगण्याच्या संघर्षात वा मिळेल ते कमावत राहण्याच्या अहमहमिकेत हरवून गेलेली काही स्वप्ने पुन्हा स्वच्छ दिसू लागतात. भौतिक यशाची अनेक शिखरे पादाक्रांत केलेल्यांनाही ’परत फिरावे घराकडे अपुल्या’ची ओढ लागत असते. मग आपल्या मुळांकडे, बालपणाकडे आणि पर्यायाने गावाकडे परतुनि जाण्याचा विचार सुरु होतो.
पण अनेक स्टेशने पुढे गेलेली जगण्याची गाडी वळवून मागच्या स्टेशनांकडे नेणे इतके सोपे नसते. बालपणाचे तुटून गेलेले, विरलेले धागे आणि दरम्यानच्या जगण्यात नव्याने निर्माण झालेले नि बळकट होत गेलेले बंध, या निर्णयासमोर अडथळा म्हणून उभे राहतात. मग स्वत:पुरता दिलासा म्हणून 'आपण नाही, आपले नाव तिथे राहावे' अशी धडपड माणसे करतात.
जगण्यासाठी पोटाच्या पाठी लागून गावांतून, छोट्या शहरांतून मुंबईसारख्या मोठ्या शहरांत आलेले, किंवा नव्या स्वप्नांच्या शोधात अमेरिकेसारख्या स्वप्नप्रदेशाकडे उडत उडत गेलेले लोक, आपल्या मायभूमीमध्ये एखादे घर विकत घेऊन ठेवतात. जगात कुठल्याही भूमीच्या कुशीत वास्तव्य असले, तरी नाळ इथे जोडलेली आहे हे स्वत:च्या स्मृतितून निसटू न देण्याचा तो एक प्रयत्न असतो.
'पासोव्हर' या सणाला जगभरातले ज्यू जसे ’पुढल्या वर्षी जेरुसलेम’ असा निर्धार करतात, तसे निवृत्तीनंतर वा उतारवयात त्या घरात परतून जाऊ अशा दुबळ्या आशेवर वर्तमानातले, अन्य भूमीतले जगणे सुखाने जगत राहतात. पण आपल्या घरट्याकडे परतुनि जाण्याचा तो निर्धार प्रत्यक्षात आणणारा अगदी विरळा. नव्या जगातली नि जुन्या जगातली तफावत त्यांना प्रकर्षाने जाणवत राहते. परतून जाताना जुन्या जगातली अभावाची छिद्रे त्यांना प्रकर्षाने दिसत राहतात, आणि त्यांचा निर्धार हळूहळू ढासळत जातो. मग तो निर्णय हळूच पुढे ढकलून ’रद्द झालेला नाही’ याचा खोटा दिलासा ते स्वत:ला देत राहतात.
पण भौतिक बाजूखेरीज भावनिक पातळीवरही माणूस बालपणाकडे परतून येत असतो.... ’सिटिझन केन’ या अतिशय प्रसिद्ध चित्रपटात धनाढ्य उद्योगपती चार्ल्स फॉस्टर केन याने आपल्या अखेरच्या क्षणी उच्चारलेल्या ’रोझबड’ या शब्दाचा वेध पत्रकारांना त्याच्या बालपणाकडे घेऊन जातो. अंतर्बाह्य खलनायक म्हणून रंगवल्या गेलेल्या दुर्योधनावर ’मातृगर्भाशयाची ओढ’ या शीर्षकाचा लेख अरुणा ढेरे यांनी लिहिलेला आहे. त्यात गांधारी आणि दुर्योधन यांचे नाते आणि अखेरच्या क्षणी त्याने तळ्याचा आश्रय घेणे यातील संकेतार्थ उलगडून पाहिला आहे.
’आपली नाळ जिथे पुरली तिथेच आपली राखही पडावी’ या तीव्र इच्छेने मुंबईकर चाकरमानी बुधा चर्हाटेही आपल्या बालपणीच्या जगाकडे, राजमाची किल्ल्याकडे परतून येतो. परतून आल्यावर आपल्या बापदाद्यांच्या त्या भूमीवर सजीव-निर्जीवाशी नाते जोडत जातो.
बुधाचे परतून येणे हे केवळ स्मरणरंजनस्वरूप नाही. लहानपणी जमवलेल्या पोस्टाच्या स्टॅंप्सकडे किंवा आपण गिरवलेल्या पहिल्या मुळाक्षरांकडे ज्या साक्षीभावाने पाहतो तसे नाही. पाहिले नि वही मिटून ठेवत दुसर्या क्षणी वर्तमानात परत जाणे नाही, की मुंबईतून एखाद्या सप्ताहाअखेरीस दोन दिवस आपल्या गावी बांधून ठेवलेल्या घरात उतारकरूसारखे राहायला येणेही नाही. तो येतो तो त्या भूमीत आपली मुळे रुजवण्यासाठीच. त्यासाठी त्या राहाळाचे रहिवासी असलेल्या झाड-झाडोर्यांपासून, जीव-जिवारांशीही नाते जोडत जातो. म्हणून दाण्डेकरांनी बुधाच्या कहाणीला ’माचीवरला बुधा’ असेच शीर्षक दिले आहे. जुन्या म्हणीला किंचित बदलून घेत ’माचीतून येसी माचीस मिळसी’ अशी या बुधाची कथा आहे.
बुधाच्या या परतुनि येण्याच्या आसक्तीची तुलना साहित्यात करायची झाली तर हेन्री डेविड थोरोच्या ’वॉल्डन’ किंवा जॅक लंडनच्या ’कॉल ऑफ द वाईल्ड’शी करता येईल. पण थोरो जरी निसर्गाकडे जात असला, त्याच्याशी एकरूप होऊ पाहात असला, तरी बुधाप्रमाणे त्याची मुळे तिथे नाहीत. त्याने निवडलेल्या जागी तो तसा उपरा आहे. एका विशिष्ट तात्विक भूमिकेतून तो ते नाते जोडू पाहतो आहे. त्यात एक प्रकारे निसर्ग संरक्षकाची, पालकाची, वरचढ असल्याची भूमिका तो घेतो आहे.
तर दुसरीकडे आमीश या नावाने ओळखला जाणारा एक पंथ निसर्गाने देऊ केलेल्या गोष्टींवरच संपूर्ण उपजीविका करण्याच्या जिद्दीने राहतो. पण त्यातही बदलांना, तांत्रिक प्रगतीला अट्टाहासाने दिलेला नकार अंतर्भूत होत असतो. बुधा अशी कोणतीच भूमिका मांडत नाही. आपली माती लाडक्या माचीच्याच परसात पडावी एवढीच त्याची माफक इच्छा आहे.
त्या असोशीने तो मुंबईहून निघतो. मुंबई ते माचीच्या घेर्यातले टेमलाईचे पठार या प्रवासादरम्यानची त्याची उलघाल, असोशी दाण्डेकरांनी सुरेख टिपली आहे. लोणावळ्याला उतरुन माचीकडे निघालेल्या बुधाच्या चालीबद्दल दाण्डेकर म्हणतात, ’जणू त्याला पाय नव्हतेच, होते ते पंख.’ त्याच्या चित्तवृत्तीवर परिसरघटकांचे होणारे परिणाम, परिचिताचे दर्शन होताच निवत जाणारा त्याच्या मनातला संभ्रम आणि गमावलेपणाची शंका त्याला माचीच्या एक एक पाऊल जवळ घेऊन जातात. एक एक परिचित पान, टेकाड, वाट, माणसे पाहात पुढे जाताना ’माहेरी’ आल्याची त्याच्या मनात रुजत जाणारी भावना वाचकाच्या मनात हलके हलके उतरत जाते.
बुधा चर्हाटेच्या घराण्याकडे माचीवरच्या पाण्याच्या टाक्यांच्या देखरेखीचे काम होते. या राखणदारांच्या उदरनिर्वाहासाठी टेमलाईच्या पठारावरचा तो तुकडा राजाकडून इनाम म्हणून मिळालेला. त्यात भात, नागली, वरी, खुरासणी (कारळे) यांची पिके काढत त्याच्या पूर्वजांनी उदरनिर्वाह केलेला. आता बुधाही त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून जगू पाहतो आहे. काळाच्या ओघात गडाचे मानकरी माचीला सोडून बुधाप्रमाणेच पोटामागे परागंदा झालेले.
इथे असा एक विचार मनात येतो की गडकोट ही सत्तास्थाने असलेली व्यवस्था होती तेव्हा हे जंगलवासी कातकरी, ठाकर, जित्राबांमागे पोटासाठी वणवण करणारे धनगर हे विशिष्ट कामाचे मानकरी होते. त्या व्यवस्थेत त्यांच्या उदरनिर्वाहाची हक्काची सोय लावली होती.
लोकशाहीच्या नव्या व्यवस्थेमध्ये जेव्हा ’सर्व नागरिक सारखेच’चा - कदाचित फसवा - उद्घोष झाला, तेव्हा या नव्या व्यवस्थेमध्ये यांना हक्काची जागा उरली नाही. मग माचीचे मानकरी मुंबईला जाऊन चाकरमानी झाले. गिरण वा कंपनी बंद केली वा मालकाची खप्पा मर्जी झाली की बेरोजगार होऊ लागले. ’राष्ट्राची संपत्ती ही सर्वांची, जो जो ओरबाडेल तयाची’च्या जमान्यात दर्याखोर्यात, जंगलात विखरुन पडलेले हे लोक संघटित शहरी जमावापुढे कसे टिकाव धरणार?
एखादा बुधा परतून येऊ शकतो कारण परतून येण्यासाठी त्याचे काहीतरी तिथे शिल्लक आहे. उरलेले बहुतेक सारे एकतर जगण्याची पालं उचलून परागंदा झालेले असतात किंवा शहरी जगात मिळवण्याच्या अहमहमिकेमध्ये अमेरिका-स्थित भारतीयांप्रमाणॆ ’थोड्याच वर्षात परत येणार’चा फसवा दिलासा स्वत:ला नि इतरांना देत राहतात.
हा शहरी दृष्टीकोन पुरा रुजलेला, मुंबईतच लहानाचा मोठा झालेला बुधाचा मुलगा भिवा आपल्या बापाला भेटायला येतो. आपल्या प्रवासाबाबत सांगताना तो म्हणतो ’लोनावळ्याला उतरलो साडेपाचला- न्हाई, साडेपाच वाजून तीन मिंटांनी...' तो पुरेपूर मुंबईकर झाल्याचे हे निदर्शक आहे. बुधा ज्या ठिकाणी राहतो, तिथे सकाळ, दुपार संध्याकाळ आणि रात्र असा चार टप्प्यात मोजला जाणारा दिवस त्या मुंबईकरासाठी मात्र १४४० मिनिटांच्या टप्प्यांत विभागला गेला आहे.
आता दोघांच्या जगण्याच्या वाटा जशा वेगळ्या झाल्या आहेत, तसेच त्यांच्या काळाचा अक्षही वेगवेगळा झाला आहे. एकाच घरात राहूनही अनेकदा दोन पिढ्यांच्या आयुष्यातील काळाचे परिमाण वेगळे असते. अलीकडेच पाहिलेल्या ’मसान’ या हिंदी चित्रपटात एकाच भूभागावर राहणार्या भिन्न व्यक्तींसाठी असलेला भिन्न काळाचा अक्ष फारच सुंदरपणे मांडला होता. इथे तर बुधा आणि भिवा हे तर सर्वस्वी वेगळ्या परिसंस्थेत जगत आहेत.
बापलेकांची ही भेट म्हणजे तुमचे-आमचे शहरी जगणे आणि बुधाचे जगणे यांच्या परस्पर-विसंवादाचा एक उत्कृष्ट नमुना आहे. बापाला भेटायला आलेला भिवा त्याच्या आवडीच्या बिडीचे बंडल घेऊन आला आहे, त्याचवेळी आपण सिगरेटशिवाय काही ओढत नाही हे आवर्जून सांगतो आहे. आता बुधाने मात्र बिडी सोडून चिलमीशी सलगी केली आहे.
भिवाच्या बोलण्यात येणारे सारे विषय हे त्याच्या/त्यांच्या मुंबईतील आयुष्याशी निगडित आहेत. बापाच्या या नव्या जगण्याबाबत त्याला काडीचे कुतूहल नाही. बापाच्या जगण्याच्या देखण्या, दखलपात्र पैलूंबाबत तो उदासीन आहे. भिवाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालेल्या सार्या सजीव-निर्जीवांच्या मेळ्याला तो ’बिरान्या** गावचा गोतावळा’ म्हणून त्यांची संभावना करतो आहे. ते सारे त्याच्या जाणिवेचा भागच नाही. (परस्परांपासून दूर राहिल्याने बाप-लेकांमध्ये आलेला अंतराय, एकमेकांच्या जगण्याला सामोरे जाताना कसा विरघळत जातो हे मांडणार्या ’पोस्टमेन इन माउंटन’ या नितांतसुंदर चित्रपटाची इथे आठवण होते. )
बुधा आता स्वयंपूर्ण आहे, आपल्यावर अवलंबून
नाही, याचे भानही त्याला नाही. बाप आता नवकरी सोडून बसला आहे, म्हणजे एक प्रकारे खुडूक झाला आहे. आणि आपण कमावते झालो, म्हणजे घरचे कर्ते आता आपण आहोत असा त्याचा समज झालेला आहे. तेव्हा आता बुधाने आपल्या मतानेच वागायला हवे असा काहीसा आविर्भाव त्याच्यात दिसून येतो. 'परत मुंबईला जायचे आहे' असे फर्मान सोडून बाप येणारच, नव्हे त्याला यावेच लागणार असे गृहित धरुनच तो वागतो. यात एका बाजूने बापाच्या भल्याची चिंता असली, थोडाफार घरचा स्वार्थ असला, तरी आता बापाच्या मताला काही किंमत द्यावी असे त्याला वाटत नाही हेच महत्त्वाचे दिसते.
बुधाच्या कथेचा आधार असलेल्या भाषेबद्दल आवर्जून बोलायला हवे. दाण्डेकरांची भाषा प्रवाही आहे. अर्थ शब्दांतून समजून घ्यावा लागत नाही तो मागुते येतोच आणि शब्दांशिवाय तुमच्या मनात रुजून जातो. बोली भाषेतील अनेक सुंदर शब्दांचा असलेला वापर करकरीत व्यवहारी भाषेची सवय असणार्या वाचकालाही सहजपणे उचलून बुधाशेजारी, त्याच्या शेजारी, त्या टेमलाईच्या पठारावर नेऊन सोडतो. त्या भाषेच्या मार्दवामुळेच त्याच्या आसमंताशी बुधाने जोडलेली नाती सहजपणे उलगडत जातात.
वाघाटीच्या कुरवाळण्याचा मान करुन बुघा पुढं चालला... रानजुई डोक्यात दहावीस पांढरीफेक फुलं खोवून तोर्यात उभी असलेली त्यानं पाहिली... निळं निळं पाणी फुलिया फळिया वोळणार्या* वनस्पतींच्या मुळ्यांतून वाहात होतं. त्या मुळ्यांचा कस घेऊन... घाणेरी फतकल घालून बसली आहे.... धसमुसळ्या कांडेसांबरीनं ऐसपैस मांडा ठोकून आपले हातपाय पसरले होते... त्यांचा हरीख कोंबांवाटे बाहेर पडला... दोन-अडीच महिन्यांची मुसळधार पिऊन जणू सगळं रान उतलंमातलं होतं... बुधा (कोळ्याच्या) जाळ्याजवळ उभे राहून ते कवतिक न्याहाळू लागला... सगळं उगवतीकडच्या तांबड्यानं देखणं होऊ लागलं... रान तांबूस पालवीनं साजरं झालं...
बोली भाषेतील विशिष्ट शब्दही असे आहेत की त्या शब्दातूनच एक आपुलकी, एक बंध सहजपणे दिसतो. हजार पानांनी पिंपळ ’पाल्हेजला’ असं दाण्डेकर म्हणतात. कुत्रा ’किरण बांधून’ बसला म्हणतात, पावसाळा 'उबाला' म्हणतात, त्याच्या बाळमनी असा हेतू ’उदेजला’ होता म्हणतात. पायवाटेला ’पावटी’ असा आपुलकीचा शब्द वापरतात. याखेरीज चघाळ (शेकोटीच्या आगीला चघळायला द्यायचे ते चघाळ), नसराणेपणा (नखरेलपणा), मध चुपीत बसणे असे काही सोपे, नि ते माहित नसलेल्या वाचकालाही अर्थाची उमज सहज पडावी असे काही शब्दही सोबत येतात. चिलीम पेटवताना पहिली ठिणगी पडली, शेवाळ धुमसू लागले की फुंकर मारुन जाळ करण्याला त्यांनी ’वारा पाजला’ असा वाक्प्रचार वापरला आहे.
'पाण्याची शीतळवंती त्याच्या पायाच्या जाड कातडीतून आत शिरुन त्याच्या शरीरात भिनली. सगळं सुखच सुख झालं'. (पान ७) ज्यांनी कधी ट्रेकिंग केले असेल, त्यांना 'सुखच सुख झाले' याचा अर्थ सहज जाणवेल, कदाचित पायाखाली त्या गार पाण्याचा आभासही होईल. काही तास रखरखाटातून पायपीट केल्यावर समोर आलेल्या ओढ्यात पाय सोडताच 'सुखच सुख झाले'चा अलौकिक अनुभव येतो. त्याची तुलना कित्येक तासांची पायपीट करुन अखेर गडावर पोचल्यावर होणार्या सुखाशीच होऊ शकते. 'आपण ही तंगडतोड करण्याच्या फंदात का पडलो’ असा वैताग चरमसीमेला पोचला असताना ही दोन्ही सुखे समोर येतात, तेव्हा आता इथून हलूच नये असे वाटावे इतके ’सुखच सुख होते’. घरबसल्या नेचर वीडिओज् बघणार्यांना त्याचा लाभ होत नसतो.
’मी याच राहाळाचं ल्येकरु-’ असं बुधा म्हणतो, तेव्हा हा म्हातारा स्वत:ला ल्येकरु म्हणतो म्हणून त्याच्या नातवाच्या वयाची मुलं खुदुखुदू हसतात. पण हे वाचणारा संवेदनशील वाचक मात्र अंतर्मुख होतो. दाण्डेकरांनी ’घर’ वा वस्ती अधिक सरावलेला शहरी शब्द न वापरता ’राहाळ’ असा अस्सल बोली भाषेतला शब्द वापरला आहे. 'वस्तीला राहाळापर्यंत पोचण्यासाठी बराच पल्ला गाठावा लागतो’ असं म्हटलं तर बहुतेक शहरी मंडळी बुचकळ्यात पडतील अशी शक्यता आहे.
जिथे अनेक जण सोबत राहातात, जगणे वाटून घेतात ते राहाळ. संपूर्ण राहाळाला जोडणारे असे बंध असतात. त्यातील सर्वांचेच परस्परांशी नाते प्रस्थापित झालेले असते. ज्याचे दार लावले असता आतले नि बाहेरचे अशी विभागणी पुरी होते ते ’घर’, आणि व्यावहारिक नात्याने जोडलेल्या अशा घरांची 'वस्ती' होते. घर एकाचे वा कुटुंबाचे असते, तर वस्ती या शब्दात काहीसा उपरेपणाचा आभास होतो. त्यामुळे त्या राहाळात पोचताच आईबापाच्या कुशीत आल्याचा जो आनंद, श्रांतपणा निवल्याची जी भावना बुधाच्या मनात उमटते तिने नकळत त्या वाचकाचेही डोळे ओलावले तर आश्चर्य नाही.
दारी येणार्या खारुटल्यांसाठी बुधा नागलीच्या भाकरी करतो. केवळ त्यासाठीच जमिनीच्या एका तुकड्यावर नागली पेरतो. त्या भाकरींचे नीट तुकडे व्हावेत म्हणून एक दिवस त्या तशाच ठेवून देतो. त्यांना मुंग्या लागू नयेत म्हणून गवताचे शिंके करुन त्या टांगून ठेवण्याची खबरदारीही घेतो. दुसर्या दिवशी त्या चुरून त्यांना खाऊ घालतो. नागर आयुष्यात एखादा माणूस दुसर्या माणसासाठी कधी इतके कष्ट करण्याची शक्यता किती? अर्थात माणसाची 'भूक' खारोटीहून बरीच अधिक असल्याने ते परवडण्याजोगेही नसते हे ही खरे.
या खारींच्या पिल्लांच्या मागे लागलेल्या आपल्या कुत्र्याला दटावताना बुधा म्हणतो, ’सुकाळीच्या! त्या न्हान लेकरांना धरीतो!’ त्या 'धरीतो’ वरुन मला एकदम कुठल्याशा जुन्या मराठी चित्रपटातील दिनानाथ टाकळकर आठवले. त्यांच्या तोंडून येणारे ते ’करीतो’, ’धरीतो’ बाजाचे शब्द कसे गोड भासत याची आठवण झाली. वरील वाक्य त्यांच्या तोंडून आल्याची कल्पना केली आणि त्यांनी बुधाची भूमिका बहारदार केली असती असं वाटून गेलं. (अलीकडे येऊन गेलेल्या चित्रपटात सुहास पळशीकर यांनी ही भूमिका केली. दुर्दैवाने चित्रपट पाहायचा राहून गेला.)
माणसाच्या उच्चारांतही एक गंमत असते. माझ्या मते शहरी माणसांच्या आणि निसर्गाच्या कुशीत राहणार्यांच्या भाषेतील केवळ शब्दांत नि व्याकरणातच फरक असतो असे नाही. त्या शब्दोच्चाराचा ’लगाव’देखील निराळा असतो. कुठे उच्चार लांबतात, कुठे घाईघाईने उच्चारल्याने संधी होतात. कुठे जनावरांच्या, पक्ष्यांच्या आवाजाचे हेल माणसाच्या बोलण्यात बेमालूम मिसळून जात असतील. डोंगरातील वस्तीमध्ये दूर दूरपर्यंत आवाज पोचावा म्हणून आवाजाला विशिष्ट प्रकारचे हेलकावे दिले जात असतील. थोडक्यात भाषेला परिसरघटकांचे आवरण पडलेले असते. (पठारावर राहणार्यांची गाणी आणि जंगलात राहणार्यांची गाणी यांच्यात ध्वनिच्या वापरात कसा फरक पडतो हे प्राची दुबळेंनी सुरेख उलगडून दाखवले होते त्याची आठवण होते.)
पण फक्त निसर्गाशीच बुधा नाते जोडत जातो असे नाही. रोज ठराविक वेळेला डोक्यावरुन जाणारे इवायन (विमान), बहिरोबाच्या देवळाच्या पठारावरून खाली दूरवर दिसणारे कोकण, माचीच्या दरीमध्ये सरावासाठी आलेले जवान यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क न येताही त्याचे बंध जुळून जातात. इतक्या उंचावरून त्यांना आपले बोलणे ऐकू जाणार नाही हे ठाऊक असलेला बुधा तिथूनच त्यांची वास्तपुस्त करतो, विमानाची वेळ टळली तर कासावीस होतो आणि खालचे कोकण ढगांच्या पडद्याआड दिसेनासे झाले की अस्वस्थ होतो.
त्याच्या या जगण्यातलं सर्वात मोठं आव्हान होतं ते वणव्याचं. शहरी जीवनात अनेक हत्यारे नि उपकरणे दिमतीला असलेल्या एखाद्यासमोर इतके मोठे आव्हान कधीच उभे राहात नाही. राहिले तरी त्याच्याशी एकट्याने झुंज घेण्याची पाळी त्याच्यावर येत नाही. त्या वणव्याशी लढण्यासाठी बुधाकडे कोणतेही मॉडर्न हत्यार नाही. डोळ्यात फूल पडलेला, म्हातारा बुधा केवळ निर्गुडीच्या फांदोर्यांच्या सहाय्याने त्या राक्षसी संकटाशी झट्या घेतो ते त्याच्या आवळीबाय, खारुटली, शेळी, कुत्रा, त्याच्या झोपडीवर आज्यासारखी सावली धरणारा उंबर, यासारख्या सुहृदांना वाचवण्यासाठी. जगण्यातला हा सर्वात मोठा नि अखेरचा संघर्ष बुधा जिंकतो. अशा बिरान्या गावात बुधा एकटा राहू शकेल का? या भिवाच्या शंकेला दिलेले हे सणसणीत प्रत्युत्तर म्हणता येईल.
शहरी जीवनात माणूस जगण्याच्या शेअर संपवून जातो तो एकतर वाळवीने पोखरलेल्या झाडासारखा अंथरुणाला खिळून झिजत जातो किंवा एका घावात झाडाची फांदी खोडावेगळी करावी तसा त्याच्या जगण्याचा तुकडा पडून जातो. पण बुधासारखा माणूस ज्या परिसराला आपले म्हणतो तो परिसर, त्याचे सुहृद त्याला त्याच्या जगण्याचा शेवट जवळ आल्याची जाणीव करुन देत, त्याला सोबत करत राहतात. जवानांचा सराव संपून ते निघून जातात, विमानाचे येणे थांबते, जिवाभावाचा सोबती कुत्रा जातो, केवळ मरण्यासाठी म्हणूनच दारी उगवलेली म्हैस कड्यावरुन पडून भीषण मृत्यूला सामोरी जाते. जगण्याचा एक एक संदर्भ निसटत जातो आणि त्यांचे बोट धरुन बुधा शांतपणे आपल्या शेवटाला सामोरा जातो, विरघळून जातो.
- oOo -
टीपा:
*’जन हे वोळतू जेथे’ या शीर्षकाची मुक्तिबोधांची एक कादंबरी आहे; सत्यजित रेंच्या ’अपू त्रिधारा’ प्रमाणेच मुक्तिबोधांनी लिहिलेल्या विशू त्रिधारेतील एक.
** वैराण, वीरान (हिं.)
---
'माचीवरला बुधा’ या पुस्तकातील दोन वेचे इथे ’वेचित चाललो...’ वर समाविष्ट केले आहेत. यातील पहिला वेचा आहे तो त्याच्या माचीकडच्या प्रवासावरचा आणि दुसरा आहे तो विलयक्षणीचा. थोडक्यात हे दोन वेचे असोशी आणि विरक्ती अशा दोन भावना प्रकट करणारे आहेत.
१. पहा जरा परतून
२. सोयरी वनचरी
---
हे सर्वांगीण आणि सखोल टिपण वाचून असं वाटलं की बुधाची एवढी पारायणं करूनही बुधा कसा तो मला आकळलाच नाही. नुसतंच आवडलं, आवडलंय या पलीकडे माझी गाडी गेलीच नव्हती, त्या आवडण्याची मिमांसा स्वतःशी कधी केलीच नाही.
उत्तर द्याहटवामानावेत तितके आभार कमी होतील या टिपणासाठी.
आपला आनंद हाच आमचा संतोष. :) _/\_
हटवा👌🏽👌🏽👌🏽💙💜🤎
उत्तर द्याहटवा_/\_
हटवा