शनिवार, १७ एप्रिल, २०२१

पहा जरा परतून*

मनमाड पॅसेंजरनं कर्जत सोडलं, तेव्हा उकाड्यामुळं कलबलत होतं. सारा डबा हाय हाय करीत होता. गाडी घाट चढू लागली, तेव्हा तर उकाडा जास्तच वाढला.

बुधा धसमुसळ्यासारखा पासिंदरांचे पाय तुडवीत दाराकडे धावला. पासिंदरांनी तोंडं वाकडी करीत त्याला काहीबाही म्हटलं. पण तिकडे त्याचं लक्ष नव्हतं. तो दाराशी पोचला, अन् उगवतीकडल्या अंगाला दारातून तोंड बाहेर काढून वाकवाकून पाहू लागला.

हवेची वाट अडवल्याबद्दल त्याला पासिंदरांनी लाख शिव्या मोजल्या. एकाने त्याला, दारातून बाहेर वाकू नको, असा हितोपदेशही केला. पण बुधाचं तिकडे लक्ष नव्हतं. त्याला कसलंच भान राहिलं नव्हतं. तो डोळ्यांवर हात दे-देऊन समोरचा डोंगरमाथा निरखीत होता.

माचीवरला बुधा

त्याच्या एका डोळ्यात फूल पडले होते. दुसऱ्या डोळ्याला आता कमी दिसू लागलं होतं. तरी तो उगवतीकडली डोंगराळ पट्टी न्याहाळित होता.

अजून त्याची दिठी कुठंच स्थिर होत नव्हती. ती डोंगरांमागून डोंगर हुडकीत होती. पण त्याला पाहिजे होतं, ते सापडंत नव्हतं.

गाडी वर चढत होती. बोगद्यात शिरत होती अन् बाहेर पडत होती. दर दोन मिनिटांनी गाडीतले पासिंदर रात्र अन् दिवस अनुभवीत होते. डब्यातले दिवे मधूनच अंधुक होत होते. पुनः उजळत होते.

पण बुधावर या अंधार-उजेडाचा काहीच परिणाम होत नव्हता. बोगदा सुरू होताच तो डोळे चोळीत होता. गाडी बोगद्याबाहेर पडताच उगवती निरखीत होता, अन् पुनः निराश होत होता.

करता करता गाडी चौदाव्या बोगद्याबाहेर आली, अन् बुधाला पाहिजे होते ते एकदम सापडलं. त्याचं मन हरीखानं मोहरलं. त्यानं निरखून निरखून पाहिलं, की किल्ले राजमाची होता तिथंच आहे अजून!

इतक्यात गाडी पंधराव्या बोगद्यात शिरली. जणू बुधाच्या मनाला ठेचच लागली. पण बोगदा संपला, अन् राजमाचीचा अलीकडील बालेकिल्ला पुनः समोर उभा ठाकला. बुधाच्या अंधारू पाहाणार्‍या मनात कोवळ्या उन्हाचा कवडसा पडला.

मग निरनिराळी टेकाडं आड येऊ लागली. कधी शिखरं, कधी बोगदे, राजमाची दिसायची अन् पुनः लपायची. होता होता गाडी एका मोठ्या बोगद्यातून बाहेर आली, ती मावळतीकडे. उगवतीच्या अंगाला एक भला डंगाळा डोंगर पलीकडलं सगळं अडवून उभा राहिला.

राजमाची दिसेना झाली, तरी बुधानं आपलं डोकं दारातून आत घेतलं नाही. त्याच्या मनापुढलं राजमाचीचं चित्र अभंग, अक्षय्य राहिलं.

गाडीनं खंडाळा सोडलंन्, अन् ती लोणावळा स्टेशनच्या यार्डात कोकलत उभी राहिली. कारण लाइनीवर एक कुत्र्याचं पिलू खेळत होतं. ग्याटवाला पोर्टर धावत आला. त्यानं पिलाच्या पाठीत एक चापट घातली. तशी पिलू क्यांव क्यांव करीत दूर पळालं. मग गाडी स्टेशनात शिरली. फलाटावर येऊन उभी राहिली.

त्याच वेळी खंडाळ्याच्या अंगानं आठदहा ढगही तरंगत लोणावळ्यावर आले. पण ते काही थांबले नाहीत. पुढं चालते झाले. पिंजत पिंजत, आकार बदलीत ते पांगले.

बुधा घाईघाईनं गाडीतून उतरला, अन् तिकीट देऊन स्टेशनातून बाहेर पडला. इतका वेळ गाडीतल्या गलग्यानं त्याला अगदी कावल्यासारखं झालं होतं. आता वाऱ्याची एक झुळुक आली. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या पिंपरी अन् जांभळींवरून. त्या झुळकीनं बुधाला कुरवाळलं. तिच्या लडिवाळ स्पर्शानं त्याला फार बरं वाटलं. ती झुळुक त्याच्या माहेरची होती.

मुंबई-पुणे रस्ता ओलांडून तो तुंगारली गावात शिरला. माचीकडून डोईवर तुपाची चरवी घेऊन बोंबल्या येत होता. बुधाला पाहाताच तो गपाक्कदिशी उभा ठाकला, बोलला,

"बुधादा, तुमीच हाये जनू?"
'व्हय् व्हय्! रामराम!"
“रामराम! न्हव, पर मंदीच ?"
बुधा गडबडून बोलला,
'व्हय! पर समदं ठीक हाये ना ?"
“हाये त का झालं! पर- समदं म्हंजी ?"

डोळ्यांवर आडवा हात ठेवून त्याच्याकडे निरखून पाहात बुधा बोलून गेला,
“समदं म्हंजी- ट्येमलाईचं पठार- शिरीवर्धन- मणरंजेण-
पहिल्या क्षणी बोंबल्याला बुधा काय म्हणतोय, ते उमगलंच नाही. दुसऱ्या क्षणीही उमगलं नाहीच; पण फार फार हसू मात्र आलं. तो फुदकून फुदकून हसला. मग कसाबसा बोलला,
“अवो- ट्येमलाईचं पठार म्हंजी का भाकरीचा तुकडा हाये? का कुनी हड्या पळवून नील? जितं हुतं तितंच हाय त्ये!"

बुधा थोडासा लाजला. थोडासा कोमेजला. त्यानं ज्या आप्रुकीनं विचारलं होतं, त्या आप्रुकीची बूज राखली गेली नाही. तिची थट्टा झाली.

मग तो तसाच पुढं सरत बोलला, “चलतो वले! न्हाई त पोचायला टाइंब व्हायाचा."

झपाझप पावलं उचलीत त्यानं धाकट्या धरणाची भिंत ओलांडली. वर निघताक्षणी त्याला लंबाड्या जांभळीखाली ठाकरवाडी दिसली. डाव्या हाताला झाडांनी झाकलेली टेकडी. उजव्या हाताला उताराच्या आड डोळेमिचकावणी करीत लपून बसलेलं धरणाचं पाणी. ते दृश्य दिसताच त्याच्या मनाला मघा झालेली जखम बुजली. पुन्हा एकदा डोळ्यांवर हात ठेवून त्याने ते दृश्य पाहिलं. डोळेभरी पाहिलं. मग तो झपाट्यानं पावलं उचलीत चालू लागला. जणू त्याला पाय नव्हतेच. होते ते पंख.

घळीच्या तोंडाशी त्याला ठाकरणी भेटल्या. माचीजवळ वळंज नावाची ठाकरवाडी. तिथून लाकडाच्या मोळ्या घेऊन त्या भल्या पहाटेस लोणावळ्याला गेल्या होत्या. मणामणाच्या मोळ्या त्यांनी दहाबारा मैल डुयांवर वाहिल्या होत्या. सहा आण्यांपासून साडेअकरा आण्यांपर्यंत जो भाव निघाला. त्याला त्या विकल्या होत्या. त्या पैशातून मीठ-मिरची घेतली होती. तंबाखू अन् बोंबील घेतले होते. धाकल्यांसाठी एखाद आण्याची जिलबी घेतली होती. आता त्या आपल्या घरकुलांकडे परत निघाल्या होत्या.

त्या हसत होत्या. खिदळत होत्या. कुणाची तरी नक्कल करीत होत्या. फाटक्या कांबरुणांमुळे त्यांना लाज वाटत नव्हती. चिराळलेल्या पायांचा अन् कांट्यांनी ओरबाडलेल्या अंगांचा उबग वाटत नव्हता. त्यांचा हरीख पाहू बुधाला आणिकच हलकं हलकं वाटलं. विनोदानं उजळलेल्या ठाकरणींच्या मुद्रा त्याने एकदा कपाळावर हात देऊन न्याहाळल्या. मग तो गाडीवाटेनं घळ उतरू लागला.

मध्येच पावटी गाडीवाटेचा आसरा सोडून शेजारच्या उंचावावर चढली होती. बुधानं गाडीवाट सोडून दिली. तो लांच लांब पावलं टाकीत पावटीवरून चालला.

दुतर्फा निगडी धुमारली होती. आवळी चवऱ्या ढाळीत होत्या. शिलेदारासारखे ताठ उभे आंबे आकाशापर्यंत पोचले होते. एका किंजळीवर वाघाट्याची वेल फोफावली होती. तिनं आपले कोवळे हात बाहेर पसरले होते. येत्या जात्याच्या अंगाला ती कुरवाळीत होती. शेजारच्या येकळीच्या जाळीतून आपले तांबडे डोळे उघडून गुंजांच्या शेंगा टकाटका रानाकडे बघत होत्या. वाघाटीच्या कुरवाळण्याचा मान करून बुधा पुढं चालला, तो रानजुई डोक्यात दहावीस पांढरीफेक फुलं खोवून तोऱ्यात उभी असलेली त्यानं पाहिली. छाती फुलवून त्यानं तिचा वास घेतला. त्या वासाबरोबरच शेजारच्या रामेट्याच्या पिवळ्याधम्मक फुलांचा वास, वाटभर पसरलेल्या घाणेरीच्या फुलांचा अन् फळांचा वास, कुड्याच्या फुलांचा मंदसर वास- असे किती तरी वास त्याला जाणवले. तो तटकन् उभा राहिला. त्याच्या वयातली पन्नासपंचावन्न वर्ष जणू त्या वासानं पुसून टाकली. त्याला वाटलं, की कालच तर आपण हा सगळा वास घेतला होता. या वासानं वेडे होऊन आपण रानभर हाका घालीत हिंडलो होतो. काट्याकुट्यातून, येकळी-टाकळीतून, आपट्या कांचनातून, लवलवत असलेल्या गवतातून.

मग तो धावत खोगळीतून खाली निघाला. पण एका दगडाला ठेचकाळून जेव्हा तो खाली कोसळला, तेव्हा त्याला जाणवलं की आपल्या डोळ्यात फूल पडलं आहे. आपण आयुष्याच्या ढळतीवर उभे आहोत. मग तो अंग झटकीत उठला. मंदावल्या वेगानं लंगडत चालू लागला.

खाली उतरल्यावर तो कडेपठारावर पोचला, तो त्याला समोर लांबवर आवळ्याजावळ्या भावांसारखे एका शेजारी एक बसलेले राजमाचीचे बालेकिल्ले श्रीवर्धन अन् मनरंजन दिसले. अंधुक अंधुक दिसले. ते किल्ले दृष्टीस पडताच तो उभा राहिला. एकदम त्यांच्या म्हाताऱ्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. ते बोटांनी निरपून टाकीत त्यानं समोरचं दृश्य न्याहाळलं.

उजव्या हाताला मैलभर लांबीचा काळाभंगार कडा छाती फुलवून उभा होता. डाव्या हाताला सुस्तावून पसरलेली दरी. दरीच्या अंगाला उतारावर भात अन् नागलीची कापलेली खाचरं. लांबवर कड्याच्या आसऱ्यानं धावत असलेली गाडीवाट.

एकदम त्याला वाटलं, की आपली या रहाळाशी जन्मजन्मांची ओळख आहे. गेले अनेक जन्म आपण याच रहाळात जन्मलो आहोत. रांगलो अनु धुळीनं लिडबिडलो आहोत. भाताच्या खाचरांतून खपलो आहोत. रानात भटकलो आहोत. शेवटचा श्वास आपण इथंच कुठं तरी टेंभुर्णी अन् कारवीच्या झुडपाखाली घेतला आहे. आपल्या त्या जन्मांच्या शरीरांची राख इथं रानभर पसरली आहे. तीतून पावसाळ्यात सोनकीची पिवळी नाजुक फुलं धुमारली आहेत.

असा तो त्या रानानं झपाटला. मग त्याच धुंदीत तो पुढं चालला. टेपाडं चढत अन् उतरत. वाटेत फणसराईत तो क्षणभर थांबला. नुसतं नावच तेवढं फणसराई. फणसाचं एकही झाड नाही. इतर झाडांचीच दाटी. मग हलत्या झाडांचा वारा अंगावर घेऊन अन् घाम पुसून तो पुढं चालला. कमानकड्याखालून जात असता त्याला ठाकर भेटत होते. फॉरेस्टगार्ड भेटत होते. पण त्या कुणाकडेच त्याचं लक्ष नव्हतं. त्याचं धोतर सगळं कुसळांनी भरून गेलं होतं; ती टोचणीही त्याला जाणवत नव्हती.

राजमाची डाव्या अंगाला अगदी जवळ भिडली. पण मध्ये दरी पसरली होती. बुधानं गाडीवाट सोडून दिली. तो डाव्या हाताच्या पावटीनं दरीतल्या झाडावळीत शिरला. आभाळाला टेकलेल्या झाडांच्या सावलीतून तो चालू लागला. त्याला दुतर्फा धुमसत असलेल्या कोळशाच्या भट्ट्या दिसल्या. कुणी एक ठाकरीण एका झुडपावर कोयतीचे घाव घालीत होती. दुसरी एक हातानी झुडपांचं जंजाळ वारीत मधमाशांची पोळी शोधीत होती. त्यांनी क्षणभर बुधाकडे निरखून पाहिलं. मग त्या पुन्हा आपल्या कामाला लागल्या.

भले थोरले धोंडे ओलांडीत बुधा घळीतल्या ओहोळात उतरला. निळं निळं पाणी फुलिया फळिया वोळणार्‍या वनस्पतींच्या मुळ्यांतून वाहात होतं. त्या मुळ्यांचा कस संगे घेऊन. उन्हाळा बाहेर कडकडत होता; पण ओहोळाचं पाणी थंडगार होतं. भल्या सपाट्या काळ्याशार खडकांमधून ते धावत होतं. पाणलोटाच्या दबावानं खडक एकमेकांत गच्चम बसवलेले होते. ती पाण्याची धार पाहून बुधा हरिखला. धोतर वर उचलण्याचं भानही त्याला राहिलं नाही. तो तसाच जाऊन पाण्यात उभा ठाकला. पाण्याची शीतळवंती त्याच्या पायाच्या जाड कातडीतून आत शिरून त्याच्या शिरात भिनली. सगळं सुखच सुख झालं.

- oOo -

पुस्तक: ’माचीवरला बुधा’
लेखक: गो. नी. दाण्डेकर.
प्रकाशक: मॅजेस्टिक प्रकाशन
आवृत्ती सातवी (डिसेंबर २००५)
पृष्ठे: ३ ते ७

---

*कविवर्य कुसुमाग्रजांची 'शेवटचे पान’ या शीर्षकाची एक सुरेख कविता आहे. त्यातील भाव प्रेयसीचा असला तरी बुधासारख्यांना त्यांच्या रहाळाने मारलेली हाक म्हणूनही पाहता येते. त्या कवितेचे धुवपद हेच शीर्षक म्हणून इथे वापरले आहे.

---
संबंधित लेखन:
वेचताना... : माचीवरला बुधा >>
सोयरे वनचरी >>
---


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा