मंगळवार, २ फेब्रुवारी, २०२१

भाषा: राष्ट्र, धर्म... आणि हत्यार

(अलिकडेच द वायर या संस्थळाने हिंदी-उर्दू भाषेच्या राजकारणावर अथेर फारुकी यांनी लिहिलेला एक लेख प्रसिद्ध केला आणि मी पूर्वी फेसबुकवर लिहिलेल्या या पोस्टची आठवण झाली. थोड्या बदलांसह ’वेचित’ वर नोंदवून ठेवतो आहे.)

राष्ट्र (nation) ही अखेर एक संकल्पना आहे. त्याच्या सीमारेषा तुम्हाला आखाव्या लागतात, समाजाच्या गळी उतरवाव्या लागतात. राष्ट्राच्या भौगोलिक, भाषिक, वांशिक अशा अनेक प्रकारच्या व्याख्या निर्माण केल्या गेल्या, रुजवल्या गेल्या. त्याआधारे राजकीय सत्ता उभ्या राहिल्या, देश (state) निर्माण झाले. 'आमच्या देशाला इतक्या वर्षांचा इतिहास आहे' वगैरे वल्गना वर्तमानात कर्तृत्वाची वानवा असलेले, किंवा त्यासाठी करावे लागणारे कष्ट वा मेहनत करण्याबाबत आळशी असणारे, आणि भविष्याची भीती गाडून टाकण्यास उत्सुक असणारे, भूतकालभोगी समाजच असले आधारहीन दावे कुरवाळत बसतात. वस्तुनिष्ठ दृष्टीने पाहिले, तर काळाच्या प्रवाहात देश निर्माण होत असतात, विखंडित होतात, विलयाला जातात, कधी ते पादाक्रांत केले जातात, आणि भूगोल बदलत राहतो...

अमुक काळात तमुक भूभाग हा ढमुक देशाचा भाग होता म्हणजे आज त्या वारशाने ढमुक देशाचा वारस मिरवणार्‍या देशाने वा गटाने त्यावर हक्क सांगणॆ याला सोयीची भूमिका घेणेच म्हणता येते. इतिहासातील काळाचा कोणता तुकडा आपण निवडतो, त्यानुसार त्या भूभागाची मालकी या वा त्या - कदाचित त्या काळात अस्तित्वातही नसलेल्या - देशाच्या ओटीत टाकता येते. ही कृती स्वार्थप्रेरित आणि आपल्या गटाची पक्षपातीच असते. 

भारतामध्ये मु्स्लिम लीग आणि हिंदु महासभेसारख्या संघटनांनी धार्मिकतेला राष्ट्रवादात रूपांतर करण्याचा प्रयत्न केला.  ज्याप्रमाणे मध्यपूर्व आशियामध्ये पसरलेल्या अनेक मुस्लिम राष्ट्रांनी आणि युरपभर पसरेल्या ख्रिश्चनाबहुल देशांनी धर्म हे राष्ट्र असल्याची संकल्पना मोडीत काढली, त्याचप्रमाणॆ पूर्व पाकिस्तानने पश्चिम पाकिस्तानपासून दूर होताना उर्दू=मुस्लिम हे गणित मोडीत काढले. तिथे भाषा हा राष्ट्रनिश्चितीचा निकष अधिक प्रबळ ठरला. 

दोन देशांच्या निर्मितीनंतर हिंदू महासभेचा प्रभाव ओसरत गेल्यानंतर तिची जागा घेण्यास सरसावलेल्या संघ परिवाराने त्यासोबतच भाषिक राष्ट्रवादाचा पुरस्कार करण्यास सुरुवात केली.  यासाठी त्यांनी पद्धतशीरपणे भारतातील मुस्लिम हे उर्दू भाषिक असल्याची हाकाटी पसरवण्यास सुरुवात केली. त्याचवेळी या दाव्याचे महत्व मुस्लिम कट्टरवाद्यांनीही ओळखले होते.  विविध स्थानिक भाषा संवादासाठी वापरणार्‍या भारतीय मुस्लिमांना एकाच सूत्रात बांधण्यास हा धागा उपयुक्त ठरणार होता. हिंदुत्ववाद्यांना द्वेषाला सोयीचे असलेले गृहितच कट्टरतावादी मुस्लिमांना आपला गट बांधण्यास उपयुक्त ठरत होता. थोडक्यात आपापले स्थान बळकट करण्यासाठी दोनही विरोधकांनी अप्रत्यक्षपणॆ एकमेकांच्या हातात हात घेऊन पावले टाकली... आजही टाकत आहेत. आणि सामान्य त्यांच्यामागे फरफटत जात आहेत. 

भूतकालभोगी हिंदुत्ववाद्यांनी संस्कृत ही प्राचीन आणि हिंदी ही अर्वाचीन भाषा आपल्या भाषिक राष्ट्रवादाचे साधन म्हणून पुढे रेटायला सुरुवात केली आहे. आणि त्यासाठी उर्दूला मागे रेटणॆ त्यांना अपरिहार्य ठरले. त्यासाठी याच देशात निर्माण झालेली, गंगा-जमनी संस्कृतीचे एक प्रतीक असलेली उर्दू त्यांनी मुस्लिम समाजाच्या ओटीत टाकली, नव्हे त्यांना करकचून बांधून टाकली. आणि मग त्या ’अमंगळ’ लोकांची भाषा आत्मसात करण्यापासून ’आपल्या’ लोकांना परावृत्त करणे सोपे झाले. द्वेष रुजवणे हा सर्वात सोपा उपाय दोन्ही धार्मिक कट्टरतावादी वापरतात. तो सर्वाधिक परिणामकारकही असतो. एखाद्या झाडाच्या मुळाशी मोरचूद टाकून निश्चिंतपणॆ निघून जाणार्‍या आणि त्या झाडाचा तिळतिळ होत जाणारा मृत्यू समाधानाने पाहात राहणार्‍या विकृत लाकूडतोड्यासारखे हे दोघे गळ्यात गळा घालून या भाषिक लढाईतून समाजातील भेग वेगाने वाढत जाताना पाहून संतोष पावत असतात. माथेफिरु धर्मवेडापायी माणसांचे नरबळी देण्यासही न कचरणारे एखाद्या भाषेच्या हत्येबाबत संवेदनशील असतील ही अपेक्षाच मूर्खपणाची आहे.

अमंगळ लोकांच्या भाषेचा मुद्दा आला आहे तर हिंदुत्ववाद्यांच्या लाडक्या संस्कृतचा उल्लेखही अपरिहार्य आहे. सोयीचा इतिहास, समाजव्यवस्था, नीतिनियम रुजवणे, त्यासाठी उपयुक्त ठरणारा प्रॉपगंडा ऊर्फ प्रचार-प्रसारासाठी माध्यमांचे महत्व ब्राह्मणांनी फार प्राचीन काळापासून चोख ओळखले होते. त्यामुळॆ  देवांशी हॉटलाईन असल्याचा दावा करणार्‍या त्या जमातीने  देव-भाषा म्हणत तिला इतर ’अमंगळ’ समाजामध्ये फारसे रुजू दिले नाही. त्यातून पवित्र देव-भाषा विटाळेल असा त्यांचा दावा होता.  पुढे विशेषत: ब्रिटिशांसोबत आलेल्या इंग्रजीने आणि त्यातून आलेल्या रोजगारसंधीही सर्वप्रथम साधणार्‍या त्याच समाजाने व्यवहारात संस्कृतचे बोट सोडले. त्यातून नकळत तिची पीछेहाट होत गेली. त्यांच्याच कर्माने मरु घातलेली ही भाषा जिवंत ठेवण्यासाठी आणि प्राचीनत्वाचा सोस मिरवण्यासाठी आता त्याबाबत आक्रोश सुरु आहे. आणि हे करणारे स्वत: आपल्या पुढच्या पिढीला इंग्रजी आणि चोख व्यावहारिक शिक्षणच देत आहेत. संस्कृत ही भाषा त्यांच्या खांद्यावरचा एक अस्मितेचा झेंडा म्हणूनच शिल्लक राहिली आहे. 

थोडक्यात संस्कृतच्या ठेकेदारांनी तिला आपल्याच लोकांपासून दूर ठेवून तिची वाढ खुंटवली आणि इंग्रजीच्या आगमनानंतर स्वत:ही तिचा हात सोडून तिला वार्‍यावर सोडली. आता केवळ देव्हार्‍यातल्या शाळिग्रामासारखी तिची पळभराची पूजा उरकून दिवसभराची इंग्रजीची चाकरी करायला ते चालते होतात. 

हिंदुत्ववाद्यांनी आणि मुस्लिम कट्टरतावाद्यांनी कितीही भेग पाड्ण्याचा प्रयत्न केला तरी, संस्कृतला ज्या दुर्भाग्याला सामोरे जावे लागले तसे उर्दूला सामोरे जावे लागलेले नाही. उर्दू ही भारतीय मुस्लिमांची भाषा ही हाकाटी दोन्ही बाजूंनी केल्याने, भाषांनी विभागलेल्या मुस्लिम समाजाला एक सामायिक ओळख मिळत असल्याने ती आनंदाने स्वीकारली.  पण असे असूनही तिच्यामध्ये निर्माण झालेल्या दर्जेदार साहित्यामुळे, विशेषत: शायरीमुळे, ती मुस्लिम समाजाबाहेरही अंगीकारली नि अभ्यासली गेली आणि वाढत गेली. भाषेच्या आणि लिपीच्या पावित्र्याच्या खुळचट कल्पनांनी आपल्याच भाषेची हत्या करणार्‍यांच्या हाती उर्दूचा द्वेष करण्यापलिकडे काही उरलेले नाही.

ज्यांच्या ’तरक्कीपसंद’ भूमिकेमुळे  हिंदुत्ववादी आणि कट्टर मुस्लिम असे दोघेही ज्यांचा मनापासून द्वेष करतात त्या जावेद अख्तर यांचा एक व्हिडिओ दोन-एक वर्षांपूर्वी पाहायला मिळाला. 


या माणसाचे उर्दूवर मनापासून प्रेम आहे. त्या भाषेला एका धर्माच्या दावणीला बांधल्यामुळे होणारी त्याची तडफड समोरूनही अनुभवता येते. या व्हिडिओमध्ये समोरच्या पंजाबी तरुणांना जावेद तळमळीने विचारतात, ’अरे तुम्ही सर्वाधिक उत्तम साहित्य यात निर्माण केले, ही तुमची भाषा आहे. मग तुम्ही असे कसे तिला इतरांच्या ओटीत टाकून मोकळे होतात, आपल्याच अपत्याला असे कसे नाकारता?’ खरंतर त्यांना हा प्रश्न पडायला नको. इथला करंटा हिंदू समाज ब्रेड खाल्ला म्हणून तू बाटलास म्हणत आपल्याच लोकांना ख्रिश्चन धर्माच्या ओटीत टाकून मोकळा होत असे. एखाद्याची जबरदस्तीने सुन्नत केली गेली म्हणून, मूळ धर्म, देव-विचार-परंपरा-रीतीभाती यावरची श्रद्धा कितीही अभंग असली तरी त्याला मुस्लिम मानू लागे. काहीही नि कुणालाही आपलेसे करण्यापेक्षा दूर ढकलण्यास उत्सुक असलेला हा समाज आहे. अगदी त्यातील पुरोगामी मंडळींमध्येही मला हा दोष ओतप्रोत भरलेला दिसतो. 

१७९८ मध्ये, म्हणजे जेमतेम सव्वादोनशे वर्षांपूर्वी कुराण उर्दूमध्ये प्रथम अनुवादित केले गेले. सिंधीतील त्यापूर्वी सातशे वर्षे (तपशील त्यांनी दिलेला, बरोबर चूक मला माहित नाही!) आणि हे करणार्‍याविरोधात मौलवींनी फतवा जाहीर केला होता की अशा अमंगळ भाषेत आमचे पवित्र पुस्तक लिहिले म्हणून! थोडक्यात मौलवी लोक अठराव्या शतकाच्या शेवटी उर्दूला अमंगळ भाषा मानत होते! ती मुस्लिमांची असण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता!  पण द्वेषाचे राजकारण करणार्‍यांच्या सोयीसाठी ती मुस्लिमांची भाषा ठरली. 

अख्तर यांनी आणखी एक महत्वाचा मुद्दा अधोरेखित केला आहे तो असा की बहुतेक भाषांमधले पहिले साहित्य हे धार्मिक आहे. उर्दू ही अशी पहिली आणि कदाचित एकमेव भाषा आहे जिचे पहिले साहित्य हे विद्रोही आहे. आणि अगदी अख्तर म्हणतात ते शब्दश: खरे असले/नसले तिचा प्रचार प्रसार हा शायरीच्या माध्यमातून झाला ज्यात तरक्कीपसंद शायरीचा वाटा मोठा (सर्वात मोठा आहे की नाही मला ठाऊक नाही. अभ्यासकच ते सांगू शकतील. ) आहे.  उर्दू ही या देशातच तयार झालेली भाषा आहे, सर्वात अर्वाचीन, सर्वात तरुण भाषा आहे. त्या अर्थी ती तरुणांची आहे तशीच दार्शनिक शायरांचीही. एका धर्माच्या दावणीला तिला बांधणारे द्वेषाने आंधळे झालेले असतात किंवा आधी द्वेष नि मग ’आमचीच’ म्हणणारी टिपिकल धार्मिकांची द्वेष-आप्पलपोटेपणा अशी दुभंग व्यक्तिमत्वच दाखवत असतात. 

वैय्यक्तिक अनुभवाचा उल्लेख करायचा झाला तर संस्कृतला गीर्वाणभाषा, देवभाषा म्हणत अठ्ठावीस इंची छाती साडेअठ्ठावीस इंची फुगवणार्‍या समाजातच मी जन्मलो. शाळेत तीन वर्षे अभ्यासक्रमातले संस्कृत शिकलो. त्यापलिकडे  टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या तीन परीक्षाही दिल्या. पण त्या भाषेचे वळण मला कधीच परिचयाचे, आपले असे वाटले नाही. पण गजल, शायरीच्या माध्यमातून ओळख झालेली उर्दू मात्र भावली. आजतागायत तिची साथ मिळते आहे. ’आमची पवित्र लिपी अशा अमंगळ भाषेला दिल्याने ती अपवित्र होईल’ म्हणत नागरी लिपीत उर्दू लिहिण्यास मज्जाव करणार्‍या माथेफिरु मुखंडांच्या कृपेने ही भाषा फारसी-अरेबिक लिपीमध्ये लिहिली जाते. मला ती अवगत नाही. तरीही माझे फारसे बिघडत नाही. ज्या तरक्कीपसंद शायरीच्या माध्यमातून ती माझ्यापर्यंत पोचते, ती खिडकी आमच्या संवादास पुरेशी आहे. ’आपले तेच चांगले’ असा दुराग्रहाचा कारभार न करता ’भावले ते आपले’, ’पटले ते आपले’ किंवा थोडे अधिक ठोस विधान करायचे तर ’चांगले ते आपले’  असा माझा बाणा असल्याने मी तिला आपले म्हटले आहे.

मुळात सजीवांनी भाषा विकसित केली ती संवादासाठी, संदेशांच्या वा विचारांच्या देवाणघेवाणीसाठी. माणसांची भाषा तर अधिक समृद्ध. अन्य सजीवांप्रमाणॆ तिला केवळ वर्तमानाचे बंधन नाही.  भूतकाळाचे, भविष्यकाळाचे, इतकेच काय निखळ विचाराचेही पैलू तिला मिळत गेले आहेत. अशा वेळी तिला द्वेषाचे, फाटाफुटीचे साधन बनवणार्‍या विकृतांच्या झुंडींचा विवेकी विरोध अतिशय महत्वाचा ठरत असतो. जावेत अख्तर हे त्या विवेकी विरोधाचे एक अध्वर्यू म्हणून उभे आहेत.

- oOo -

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा