शुक्रवार, १९ फेब्रुवारी, २०२१

त्या बाजूने पाहाताना

MarvinCartoon

काही काळांपूर्वी साठवून ठेवलेलं टॉम आर्मस्ट्राँगच्या मार्विनचं हे भाष्यचित्र* काल सापडलं. मार्विन आणि जॉर्डन ही जोडगोळी अजून सर्वस्वी परावलंबी आयुष्याच्या टप्प्यावर आहे. माणसाच्या पिल्लाचे पहिले स्वावलंबी काम म्हणजे स्वत:ची स्वच्छता स्वत: करणे. ही पहिली 'जबाबदारी’ स्वीकाराण्यास मार्विन नाखूष आहे. इतके छान चाललेल्या आयुष्यात होऊ घातलेला हा बदल त्याच्या दृष्टीने ’जगाची उलथापालथ करणारा’ आहे. आणि म्हणून त्याला तो भयकथेचे रूप देतो आहे.

सापेक्षता आणि दृष्टीकोन हे खरंतर जगण्याचे अविभाज्य भाग आहेत. बहुतेकांना तत्त्वतः - किंवा तोंडतः :) - मान्यच असते. परंतु असे असले तरी त्यांच्या जाणीवेत असतात असे मात्र नाही. सर्वसामान्य माणूस व्यक्त होताना किंवा साहित्यिक, कलाकार, परफॉर्मर याचे भान ठेवतीलच असे मात्र नाही. त्यामुळे अनेकदा व्यवहारात लंब्या-चौड्या तात्त्विक गप्पा मारणारे वर्तनाने सर्वस्वी विसंगत दिसतात. 

तसंच साहित्यात, विशेषतः कथा कादंबरी, नाटक-चित्रपटाची संहिता यांत अनेकदा पात्रे बरीच पण व्यक्तिमत्वे एक किंवा दोन, अशी स्थिती दिसते. एखाद्या नाटकात सारी पात्रे लेखकाचीच भाषा बोलत आहेत हा अनुभव तर वारंवार येणारा. त्यांचे म्हणून स्वतःचे व्यक्तिमत्व आहे, दृष्टीकोन आहेत, विचार आहेत याचे भान लेखकाला नसते; असले तरी ते लेखणीतून उतरेलच असे मात्र नाही.

आपल्याकडचे बालवाङमय तर बहुधा त्या त्या लेखकांचे पौगंडावस्थेतील स्वप्नविश्व आणि आकर्षणविषय घेऊनच साकार झालेले असते. ज्या वयोगटासाठी आपण हे लिहीत आहोत त्यांच्या भावावस्थेचे, जगाचे आणि दृष्टीकोनाचे - भौतिक आणि वैचारिकही - भान या लेखकांना क्वचित दिसते. ('जी.एं.'चे 'बखर बिम्म'ची हा एक अपवाद.) मुले म्हटले की त्यांना फँटसीच आवडणार या एकांगी कल्पनेतून मुलांसाठीचे साहित्य लिहिले जाते. त्यांच्या पातळीवर जाऊन विचार करणे बहुतेकांना साधत नाही.

माझ्या बहिणीने सांगितलेला एक गंमतीशीर किस्सा. तिच्या एका चाइल्ड-सायकॉलजिस्ट मैत्रिणीचा छोटा जेमतेम दीड-दोन वर्षांचा मुलगा. नुकताच कमोडचा वापर करू लागलेला. एकदा साहेब बराच वेळ त्यावर बैठक जमवून बसलेले. आईला इकडे ऑफिसला जायची घाई. त्यापूर्वी साहेबांना पाळणाघरात पोचवायचे होते. एक सहकारी आधीच येऊन बसलेली. 

बर्‍याच वेळा सांगूनही साहेबांचे आपली 'खुर्ची' सोडण्याचे काही चिन्ह दिसेना तेव्हा आईने लष्करी कारवाई करून 'उगाच टाईमपास करू नकोस. आवर.' असे म्हणत फ्लश चे बटन दाबले नि इकडे बाहेर येऊन मैत्रिणीशी काही बोलत होती. इतक्यात स्वारी दिगंबर अवस्थेत बाहेर आली आणि आईकडे रोखून पाहात तक्रार करती झाली. 'मी शीटवर असतानाच कसा फ्लश केलास तू, वाहून गेलो असतो म्हणजे.' क्षणभर शांततेनंतर आई नि मावशी हास्यकल्लोळात बुडाली.

पण आई चाईल्ड-सायकॉलजिस्ट असल्याने तिने त्याबद्दल थोडा विचार केला नि तिच्या लक्षात आले की प्रसंग वाटतो तितका हास्यास्पद नाही. त्या पोराच्या आकारमानाचा विचार करता त्या टॉयलेट-बोल मधे ते पोरगं सहज बसलं असतं. आणि एकदा ते झालं की फ्लशचं येणारं पाणी हे तुम्हा आम्हा पूर्ण वाढून बसलेल्या लोकांच्या दृष्टीने पाहिलं तर एखादा जलविद्युत केंद्रातील पुरुषभर उंचीच्या त्या पाईप्समधून येणार्‍या पाण्याइतकं व्यापक आणि वेगवान. अशा वेळी माणूस वाहून जाण्याच्या भीतीने व्यापला जाणं अगदीच साहजिक आहे...

...यावरून मला आम्ही लहानपणी राहात होतो तो वाडा आठवला.

त्या वाड्याच्या अंगणात आम्ही क्रिकेट खेळायचो. एवढ्याशा अंगणात फक्त ऑफ-साईडच होती. तेव्हा आमचं क्रिकेटही असं ’एकांगी’ होतं. त्या अंगणात कौतुकाने स्लिप, गली, दोन पॉईंंट फील्डर्स (त्या बाजूला राहणारे काका चेंडू घरात आला की जप्त करीत, आणि खेळणारे सगळेच सेहवाग, म्हणून ही तरतूद) एक कव्हर आणि एक मिडॉफ इतके खेळाडू मावत. 

वाडा सोडला नि सुमारे दहा एक वर्षांनी परत गेलो तेव्हा ते अंगण इतकं लहान कसं झालं, इथे दोन खेळाडू तरी क्रिकेट खेळू शकतील का असा प्रश्न पडला. ज्या पॅसेजमधला गेलेला दिवा बदलण्यासाठी स्टूल आणावे लागे त्याचे छत आता डोक्याला लागेल की काय असे वाटावे इतके खाली कसे आले असा प्रश्न पडला होता. जगण्यात सातत्य वा सलगता (continuity) असली तर हे अचाट अनुभव येत नाहीत. बराच काळाचा ब्रेक घेतल्यानंतर 'परतुनि गेलो' तर त्यावेळची जाणीव नि आजची जाणीव यात पडलेल्या फरकाशी सामना होण्याची अनुभूती घेता येते.

याच सापेक्षतेचं आणखी एक उदाहरण सापडलं ते मार्क पारिसीच्या एका व्यंगचित्रामध्ये. जेम्स कॅमेरनचा चित्रपट येऊन गेल्यापासून ’टायटॅनिक’ची शोकांतिका जगभर प्रसिद्ध झाली. पण त्या घटनेकडे मार्क वेगळ्याच दृष्टिकोनातून पाहतो. तो असा विचार करतो की या दुर्घटनेबाबत त्या समुद्रातील शार्क माशांना काय वाटले असेल?

माणसांच्या दृष्टीने झालेली ही शोकांतिका, मांसाचा एकरकमी पुरवठा झाल्याने शार्क माशांच्या दृष्टीने एखाद्या पार्टीसारखी ठरली असेल. आषाढी अमावास्या ऊर्फ गटारी अमावास्या किंवा मुस्लिमांची बकरी-ईद ही कोंबड्या वा बकर्‍यांच्या दृष्टीने लोकसंख्येत मोठी घट करणार्‍या एखाद्या भूकंप अथवा पुरासारखीच असते. 

मध्यंतरी बर्ड-फ्लूच्या साथीच्या वेळी माणसांच्या आहारातील चिकन गायब झाले तेव्हा किंवा श्रावणात कोंबड्यांनी सुटकेचा निश्वास सोडल्याचे व्यंगचित्रही समाजमाध्यमांवर फिरत होते. त्यावर मनसोक्त हसणारे परिसीच्या या चित्रावरही तितक्याच मनमोकळेपणे हसू शकतील का?

HappyEnding

-oOo -

* वृत्तपत्रांतून येणार्‍या अशा चित्रांना सामान्यपणे ’व्यंगचित्र’ म्हटले जाते. ही संज्ञा हिंदीतील ’व्यंग्य’ या शब्दापासून आलेली, ’व्यंग्यचित्र’ अशी असावी. त्या 'व्यंग्य’चा अर्थ उपहास, अथवा तिरकस टिपण्णी असा आहे. याउलट मराठी ’व्यंग’चा अर्थ वैगुण्य, न्यून असा आहे. त्यामुळे ती मराठी संज्ञा मला कधीच पटली नाही. असे चित्र नेहमीच वैगुण्यावर बोट ठेवते असे नाही. 

वृत्तपत्रांतून येणारी अशी चित्रे प्रासंगिक, अप्रासंगिक मुद्द्यांवर भाष्य करतात. त्यामुळे त्यांना भाष्यचित्र म्हणणे मला अधिक सयुक्तिक वाटते. यामुळे अशा चित्रांसाठी मी भाष्यचित्र अशी वर्गवारी निर्माण केली आहे.


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा