शनिवार, २७ फेब्रुवारी, २०२१

बुद्धिबळातील ’मार्शल’ आर्ट
चित्रातील बुद्धिबळाच्या पटाकडे पाहिल्यावर बहुतेकांच्या मनात  चित्रात दाखवलेल्या माणसाप्रमाणेच  'हा काळी मोहरी असलेला येडाय काय?' असा भाव प्रथमदर्शनी उमटेल. आपला वजीर नि हत्ती दोघेही खुशाल पांढर्‍याच्या प्याद्यांसमोर नि वजीराच्या पट्ट्यात आणून काय आत्महत्या करायची आहे का असा समज होईल.

पण गंमत पहा. हा डाव काळ्याचाच आहे! कसा ते बघा. 

---

१. आता काळ्याची खेळी असेल तर वजिराने एच-२ प्यादे मारले की डाव संपतो. 

एक पर्याय म्हणजे  घोडा एफ-३ मधे आणला की तरी एका खेळीनंतर डाव संपतो. पांढर्‍याचे जी-२ प्यादे पाठीमागे राजा असल्याने ब्लॉक आहे. राजा फक्त एच-१ मधे जाऊ शकतो. पण काळ्याने हत्ती अथवा वजिराने एच-२ प्यादे मारले की मात होते. 

आणखी एक शक्यता म्हणजे घोडा एफ-३ मध्ये आणून राजाला शह देतानाच पांढर्‍या वजीरावर नेम धरता येतो. काळ्या वजीरामुळे जी-२ प्याद्याला हा घोडा मारता येत नाही.

२. पांढर्‍याची खेळी असेल तर त्याला प्रथम १ मधे उल्लेख केलेल्या तीनही शक्यता बंद कराव्या लागतील. बारकाईने पाहता निव्वळ एफ-३ वर हल्ला करून भागत नाही. मूळ धोकादायक असलेल्या वजीर वा हत्तीला ठारच मारावे लागते. 

किंवा एफ२ मधील प्यादे एक किंवा दोन घरे पुढे सरकवून पांढर्‍या राजासाठी ती जागा मोकळी करुन घेता येईल. पण याचाही उपयोग नाही. कारण घोडा प्रथम ई-२ मध्ये येऊन पांढर्‍या राजाला एच-१ मध्ये जाण्यास भाग पाडेल. मग काळा वजीर किंवा हत्ती एच-२ प्यादे मारुन मात पुरी करेल.

आणखी एक पर्याय म्हणजे एफ-१ मधला पांढरा हत्ती हलवून राजाला एक जागा निर्माण करणॆ. पण याने फारसा फायदा नाही. प्रथम वजीर एच-१ प्यादे मारुन शह देईल. पांढरा राजा एफ-१ मध्ये आला की वजीर एच-१ मध्ये जाऊन मात पुरी करेल.

३. काळ्याचा हत्ती ठार मारण्याचा एकमेव मार्ग म्हणजे जी-२ प्याद्याने मारणे, पण ते काळ्या वजीराने  ब्लॉक केले आहे. तेव्हा हे शक्य नाही. 

४. वजीर ठार मारायला तीन पर्याय आहेत.

अ. एफ-२ (हत्तीपुढच्या प्याद्याने) ठार मारणे. पण इथे काळ्याला एक सोपी खेळी आहे घोडा ई-२ ->शह. पुन्हा राजाला फक्त एच-१ हीच जागा शिल्लक आहे.  (एफ-२ रिकामी झाली असली तरी तिथे एफ-८ मधील काळ्या हत्तीचा जोर आहे.) तो तिकडे सरकला की काळ्याचा ई-८ मधील हत्ती पांढर्‍याच्या ई-१ हत्तीचा बळी घेऊन बॅक-रँक* मात देतो.  (*राजा शेवटच्या पट्टीत तीन प्याद्याआड अडकून पडला आहे. काळ्याचा हत्ती वा वजिरासारखा सरळ हल्ला करणारा मोहरा तिथे येऊन शह देतो. पांढर्‍याला मध्ये घालण्यास उपलब्ध मोहरा नसल्याने मात होते.)

ब. एच-२ प्याद्याने वजीर मारणे. हा तर सरळ सरळ आत्मघात आहे. कारण आता एच-२ मधल्या काळ्या हत्तीला एच पट्टी आंदण दिल्याने अ. पर्यायातील घोड्याची खेळी सरळ मातच देते.

क. वजीराने ठार मारणे. 
पण यानंतर  काळा पुन्हा तीच घोड्याची खेळी करतो आहे. राजा एच-१ ला गेला की पांढर्‍याचा वजीर पडतो. इथे हत्तीने नव्हे तर पुन्हा घोड्यानेच त्याचा बळी घ्यायचा आहे. यामुळे हत्ती जिथला तिथे राह्तो नि एच-२ प्याद्याला घोडा मारणे शक्य होत नाही.(एफ-२ ने तर नाहीच नाही कारण पुन्हा अ. मधे सांगितल्याप्रमाणे मात होते.) पुन्हा राजा जी-१ मधे सरकतो. 

इथे काळ्याचा घोडा एफ-१ मधल्या पांढर्‍या हत्तीचा बळी घेऊ शकतो, पण त्यातून त्याच्या एच-२ हत्तीचा बळी जाईल. तेव्हा त्यापेक्षा काळा घोडा परत ई-२ मधे येऊन शह देत स्वतःला मोकळा करून घेईल नि त्याचवेळी शह बसल्याने पुढची खेळी हत्तीला वाचवायला मदत करेल. 

किंवा आणखी एक पर्याय म्हणजे आधी एच-३ मधील काळा हत्ती हलवून घोड्याच्या जोरावर एच-५ मध्ये नेऊन सी-५ मध्ये बसलेल्या पांढर्‍या हत्तीला आव्हान देईल. यात एकतर हत्तींची देवाणघेवाण होत काळा घोडा एच-मध्ये सुरक्षित पोचेल, किंवा पांढर्‍याने हत्ती बचावल्यास पुढच्या खेळीत काळा घोडा योग्य त्या ठिकाणी हलवून सुरक्षित करता येईल.

किंवा काळ्या घोड्याने ई-४ मध्ये येऊन सी-५ मधील पांढर्‍या हत्तीवर नेम धरता येईल. पुन्हा एकतर हत्तींची देवाणघेवाण होईल किंवा पांढर्‍या हत्तीने उलट घोड्यावर हल्ला केला तर एच-३ हत्ती मदतीला नेऊन दोघांची एकाच वेळी सोडवणूक करता येईल.

बॅक-रँक मात शक्यता टाळण्यासाठी पांढर्‍याचा मागचा हत्ती फारसा हलू शकत नसल्याने पटावरची स्थिती एक घोडा अधिक असलेल्या काळ्याला अधिकच अनुकूल होऊन जाते.  पांढर्‍याला हाच त्यातल्या त्यात बरा पर्याय उरतो.

या सार्‍या शक्यता पाहून पांढर्‍या मोहर्‍यांनी खेळणार्‍या लेविट्स्कीने राजीनामा दिला.

इंटरनेट कृपेने शोधाशोध करता हा डाव १९१२ मध्ये खेळला गेला असे दिसते.  काळा वजीर थेट पांढर्‍या वजीराच्या आणि दोन प्याद्यांच्या समोर आणून ठेवणारी मार्शलने केलेली अखेरची खेळी पुढे ’सुवर्णवर्षाव खेळी’ म्हणून ओळखली गेली. या खेळीनंतर काही प्रेक्षकांनी सोन्याची नाणी उधळली अशी दंतकथा सांगण्यात येते. पण खुद्द मार्शलच्या पत्नीने मात्र एक पेनी (सर्वात लहान नाणे) देखील उडवले गेले नसल्याचे सांगितले. पण डच जर्नालिस्ट, लेखक आणि बुद्धिबळ खेळाडू असलेल्या टिम क्रोबेने या खेळीला जगातील पहिल्या तीन बुद्धिमान खेळ्यांमध्ये स्थान दिले आहे.

---

सामान्यपणे सामाजिक-राजकीय मुद्द्यांभोवती रुंजी घालणार्‍या भाष्यचित्रकारांपैकी एकाने फुटबॉलादि प्रसिद्ध खेळांच्या तुलनेत फार प्रसिद्ध नसलेल्या एका खेळाला नि खेळाडूला दिलेली ही मानवंदना आहे. त्याअर्थी हे भाष्यचित्र लक्षणीय आहे.

ज्यांना शक्यतांचा विचार करायला आवडतो, त्याआधारे भविष्याचा वेध घ्यायला नि त्यावर नियंत्रण राखायला आवडते त्यांच्यासाठी बुद्धिबळ हा खेळ खूप काही शिकवू शकतो.  शक्यतांकडे पाहण्याची चिकाटी असली की वरकरणी इतरांना हरता दिसणारा डावही जिंकता येतो. 

ज्यांना मोहर्‍यांचे काळे नि पांढरे रंगच फक्त दिसतात आणि ज्यांच्यात 'भविष्य हे नियत आहे किंवा इतर कुणाच्या हाती आहे' असे समजण्याची शरणागत वृत्ती असते ते खरे दुर्दैवी. त्यांनी आपला पेशन्सचा डाव मांडावा. पत्ते येतील तशी रांग लागेल. चारही रांगा पुर्‍या करता आल्या नाहीत तर  बॅड'लक’ म्हणून पत्ते गोळा करायला मोकळे. ना निर्णयाची जबाबदारी आपली, ना परिणामाची!

-oOo- 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा