सोमवार, १५ मार्च, २०२१

इतिहासाचे अवजड ओझे ('Man in the iron mask' च्या निमित्ताने)

पारंपरिक शेती करणारा शेतकरी जमिनीचा पोत राखण्यासाठी आलटून-पालटून पिके घेत असतो. जमिनीतील रसद्रव्ये शोषून घेणारे खादाड पीक घेतल्यानंतर त्याचे पुनर्भरण करणारे दुसरे पीक घेतो. किंवा एक हंगाम तिला विश्रांती देण्यासाठी एखादे दुय्यम पीक घेतो.

ोक्याला भरपूर ताप देणारे, विचाराला चालना देणारे, प्रश्नांना व विश्लेषणाला जन्म देणारे पुस्तक वाचून झाल्यावर, चित्रपट वा मालिका पाहून झाल्यावर डोक्याला विश्रांती देण्यासाठी मी ही कार्टून पाहतो. कधीकधी ’आऽणि ते सुखाने नांऽदू लाऽगले’च्या समेवर संपणार आहे याची खात्री आहे अशी गुलगुलीत प्रेमकथा असलेले चित्रपट पाहतो. विपश्यना, ध्यान, स्तोत्रपठण या सर्वच प्रकारात जो काही काळ डोके बंद (आमच्या संगणकाच्या भाषेत सांगायचे तर फक्त रॅम(RAM) वापरायची प्रोसेसर नाही.) करण्याचा उद्देश असतो, तोच मी यातून साध्य करतो. पण हा नेहमीच यशस्वी होतो असे नाही.

करमणूक म्हणून वात्रट 'किंग ज्युलियन'च्या करामती पाहताना प्रत्येक एपिसोडमध्ये लेखकांनी आपल्या जगण्याच्या एकेका पैलूवर मार्मिक भाष्य केले आहे असे ध्यानात येते, संगणकपूर्व जमान्यातील डिस्ने चलच्चित्रपटात दिलेला ट्रॉली इफेक्ट किंवा लाईट सोर्स इफेक्ट दिसतो ('स्नोव्हाईट’ मध्ये घाबरलेला बुटका दार उघडून हळूच थरथरत्या हाताने कंदील आत सरकवतो तेव्हा दाराची सावली आणि त्याची स्वत:ची जमिनीवर पडलेली सावलीही तशीच थरथरते.) नि मग इतरत्रही असे तपशील शोधण्यासाठी आमचा डोक्यातला प्रोसेसर पुन्हा चालू होतो नि सगळं मुसळ केरात जातं.

’डार्क’ या कालप्रवासावरील एका अत्यंत गुंतागुंतीच्या मालिकेचा अखेरचा सीझन पाहण्याची पूर्वतयारी म्हणून मेंदूचे ’क्युरेटिंग’ करत होतो. ’सीरिज म्हणून बकवास आहे' हे आधीच समजल्याने 'आपले डोके चालू होणार नाही.’ असा विचार करुन छान जुन्या लोकांची गोष्ट-बिष्ट सांगणारी 'व्हर्साय' ही नेटफ्लिक्स वरील मालिका बघितली. नेहमीप्रमाणे आमची गाडी घसरली आणि त्यातील ’मॅन इन द आयर्न मास्क’ या उपकथानकात अडकून पडली.

चौदाव्या लुईने एका माणसाला सुमारे सदतीस वर्षे तुरुंगवासात ठेवले होते. त्याचा चेहरा कायम(?) लोखंडी पिंजर्‍याने जखडलेला होता. या गूढ मुखवट्याआडच्या चेहर्‍याचा वेध अनेकांनी घेतला आहे. ही व्यक्ती कोण हे अखेरपर्यंत गुलदस्त्यात राहिले. पण या रहस्याला अनेक फाटे फुटले.

वोल्तेअर, अलेक्झांडर दुमास यांच्यासारखा तत्त्वज्ञ आणि लेखकांनी यात उडी घेतली. या दंतकथेमध्ये कुठतरी व्हॅटिकनचा संबंधही सांगितला जातो. त्यामुळे याबाबतचे रोममधे प्रचलित असलेले समज, हॉलंड-नेदरलॅंडसमध्ये प्रचलित असलेल्या वदंता, फ्रान्समध्ये चौदाव्या लुईला ’लुई द ग्रेट’ मानणार्‍यांमध्ये असलेला समज आणि त्याला ’टायरन्ट’ म्हणजे क्रूरकर्मा समजणार्‍या गटामध्ये सांगितली जाणारी कथा... अशी अनेक प्रतिबिंबे दिसून येतात. या सार्‍याचा सांगोपांग वेध घेणार्‍या दोन लेखांचे दुवे खाली दिले आहेत.

पण हल्ली वाचण्यापेक्षा ’पाहणे’ अधिक पसंत केले जात असल्याने अभ्यासकही त्यांच्या शब्दांना दृश्य माध्यमात घेऊन जात आहेत. तर हौशी मंडळीही 'तरुभवताली तणकट' रुजवण्याचा आपला हक्क बजावत आहेत. त्यामुळे ’Real man behind the iron mask’, ’Who was the man behind the iron mask’ असे प्रश्न देऊन शोध घेतला तर यू-ट्युबवर अनेक व्हिडिओ सापडतील. (दुर्दैवाने ज्या 'व्हर्साय’मध्ये मी हा उल्लेख नि त्यासंबंधीच्या घटना व विवेचन पाहिले त्यातील प्रसंगांचा व्हिडिओ मात्र सापडला नाही.)

या ’मॅन इन द आयर्न मास्क’बाबत पाहिले, तर व्हॅटिकन आणि हॉलंड, ऑस्ट्रियाच्या राज्यकर्त्यांनी धूसरतेवर आपल्या स्वार्थाचा रंग चढवून प्रसारित केलेल्या आवृत्त्या प्रसिद्ध आहेत. वास्तवाच्या जवळ जाऊन अनुभवसिद्ध असल्याचा दावा केलेली, पण तरीही परमुखे ऐकलेलीच अशी वोल्तेअरची एक आवृत्ती आहे. लेखकाचे स्वातंत्र्य अंतर्भूत असलेली अलेक्झांडर दुमासची आवृत्ती, पुढे याच नावाच्या चित्रपटातून दिसलेली अन्य एक ललित आवृत्ती, या पलिकडे तपशीलांचे फरक दाखवणार्‍या कदाचित असंख्य मौखिक आवृत्त्या... कोणती खरी, नि कोणती खोटी याचा निवाडा वस्तुनिष्ठपणे करणे अशक्यच. विचाराने आळशी असलेले लोक, स्वार्थानुकूल किंवा ’खरी असावी असे वाटते’ म्हणून आहेच असे मानून पुढे जातात.

अशा एखाद-दुसर्‍या कथा/घटना यांबाबतच हे खरे असते असे नाही. एकुणच इतिहास हा रुजवलेलाच असतो. लिखित इतिहास हा एका बाजूने जेत्यांनी लिहिलेला असतो, त्यामुळे त्यांना धार्जिणा असतो असा एक समज आहेच. पण दुसरीकडे इतिहासाच्या धर्म, वंश, देश, विभागीय अशा आवृत्त्या असतात. त्यांचा परस्परांना छेद जात असतो. अमका इतिहास खरा आणि तमका इतिहास खोटा हे आपापल्या गटानुसार लोक ठरवत असतात.

बहुजन समाजात प्रचलित असलेला, ब्राह्मणांना गैरसोयीचा मौखिक इतिहास खोटा आहे असे ब्राह्मण समजत असतात. त्यांच्याकडे लिखित माध्यमांतून त्यांच्याच पूर्वजांनी लिहिलेला, त्यांच्या जमातीला सोयीचा इतिहास हाच खरा, असे त्यांचे गृहितक असते. उलट दिशेने आता कोणत्याही अभ्यासाशिवाय, केवळ ब्राह्मणी इतिहास खोडून काढण्यासाठी घरबसल्या लिहून काढलेला इतिहास ’खरा इतिहास’ आहे असे ’मानणारे’ अब्राह्मणी समाजात भरपूर सापडतात.

इस्लामचा मूळ पुरुष इस्माईल हा अब्राहमचा अनौरस पुत्र असल्याची कथा ’खरा इतिहास’ मानून ख्रिस्ती नि ज्यू मंडळी त्या धर्माचे दुय्यमत्व- आणि पर्यायाने आपल्या धर्माचे श्रेष्ठत्व, सिद्ध होते असे मानतात. इतिहासातील सोयीचा काळ निवडून अमक्या देशातील तमका भूभाग हा आमचाच आहे असा दावा करत एखाद्या देशातील राज्यकर्ते त्यावर बळाने वा अन्य मार्गाने ताबा मिळवू पाहतात.

सोयीनुसार ऐतिहासिक पात्रांचे हीरो होतात, सैतान होतात; लेखणीच्या फटकार्‍यासरशी अपयशाच्या कथा देदिप्यमान विजयात रूपांतरित करुन रुजवल्या जातात. तुम्हाला आजवर शिकवलेला इतिहास खोटा आहे असे म्हणत नवे राज्यकर्ते, नव्याने बळ मिळालेले समाजघटक आपल्या सोयीचा नवा इतिहास ’खरा’ म्हणून शिकवू लागतात. या उलथापालथीमध्ये अतिशय सातत्य आहे.

वाईट इतकेच की एखादा देश त्या इतिहासाच्या कर्दमात रुतून बसतो. वर्तमान आणि भविष्याची उपेक्षा करून आपल्या यशाच्या कहाण्या इतिहासात शोधतो. त्यातल्या खर्‍या खोट्या मुद्द्यांवर त्या देशातील लोक एकमेकांची डोकी फोडतात. आमच्या नेत्याला चार पदव्या लावण्याऐवजी तीनच पदव्या लावून तुम्ही आमच्या समाजाचा अपमान केला आहे म्हणून गल्लीतल्या टिनपाट ब्रिगेड, संघटना, सेना यांचा सडकछाप नेता तावातावाने एखाद्या अभ्यासू लेखकाला शिव्या घालतो, त्याच्या लेखनावर बंदी घालण्याची मागणी करतो.

लेखकाला दोन मिनिटाचे फुटेज न देणारी चॅनेल्स नि वृत्तपत्रे या सडकछाप नेत्याची वक्तव्ये पुन्हा पुन्हा दाखवून या निमित्ताने समाजात कलागत लावून पुढच्या काही दिवसांची टीआरपीची बेगमी करु पाहतात.

भूतकालभोगी, आळशी, निर्मितीक्षमतेला शून्य किंमत देणार्‍या समाजाचे हे चित्र आहे.

इतिहास-कथेतले कोणते वास्तव नि कोणते भासमान या प्रश्नाचे उत्तर बहुतेक माणसे आपापल्या पूर्वग्रहांनुसारच शोधत असतात. पण ते तसे आहे हे बहुतेकांना मान्यच नसते. कारण एक काहीतरी बरोबर असते नि बाकी सारे चूक; त्यातही आपल्या गटाला सोयीचे ते बरोबर नि गैरसोयीचे ते चूक, अशी त्यांची पक्की खात्री असते. थोडक्यात पर्यायांपैकी एकाच बाजूला ते उभे असल्याने त्यांना त्याच्याकडे तटस्थपणे पाहाणे शक्य होत नसते.

इतिहास हा केवळ दृष्टीकोन असतो. अगदी अभ्यासकाने अभ्याससिद्ध म्हटलेला इतिहासातही त्याच्या स्वत:च्या दृष्टिकोनांचे, निवडलेल्या चौकटींचे, तो ज्या समाजगटाचे प्रातिनिधित्व करतो त्या गटाच्या हिताचे रंग मिसळलेले असतातच. पण ज्यात त्यांचा स्वार्थ कुठेही गुंतलेला नाही, असे वरील उदाहरणाप्रमाणे एखादे तटस्थ प्रकरण समोर ठेवले, तर इतिहासाची एकच आवृत्ती तंतोतंत खरी मानणे हा किती मूर्खपणा आहे हे कदाचित समजू शकेल.

इतिहास हा खरा किंवा खोटा नसतोच. तो फक्त सोयीचा वा गैरसोयीचा असतो इतकेच! इतिहासातून प्रेरणा वगैरे मिळते हे बनेल दावे आहेत; त्याभोवती आपल्या स्वार्थाचे उत्सव, मतपेटीची गणिते जमवू पाहणार्‍यांनी रुजवलेले. अक्षरश: अगणित पुतळे नि स्मारके उभारणे, ’खरा इतिहास कुठला नि खोटा कुठला’ प्रकारच्या वांझोट्या लढाया गल्लीबोळातल्या अर्ध्या चड्डीतल्या पोराटोरांनी लढवत जातीय नि धार्मिक अस्मितांच्या कर्णकटू पिपाण्या वाजवणे एवढेच साधले आहे. यापलिकडे इतिहासाने या देशात काहीही निर्माण केलेले नाही.

त्यामुळे आपल्या भूतकालभोगी देशाला इतिहासाच्या चिखलातून बाहेर काढून, आपल्या पुढच्या पिढीला रचनात्मक, निर्मितीक्षम कामाकडे वळवायचे असेल, तर शालेय अभ्यासक्रमातून इतिहास हा विषय वगळला पाहिजे. मुले सज्ञान झाल्यावर, विचाराची किमान पातळी विकसित झाल्यावर, महाविद्यालयातच इतिहासाचे शिक्षण दिले, तर शालेय जीवनात मेंदूत इतिहासज्वर चढून बसल्याने वास्तविक जगाला त्या दूषित दृष्टीने पाहू लागलेल्या मुलांचा बुद्धिभ्रंश काही प्रमाणात तरी कमी होईल. आणि इतिहासाचे अवजड ओझे वागवत चिणून पडलेली तरुणांची क्रिएटिव्हिटी, निर्मितीक्षमता जरा मोकळा श्वास घेऊन भविष्याचा वेध घेऊ शकेल.

एकेकाळी मार्क्सवादाचा प्रभाव असलेले पं. नेहरु पुढे त्यावर साधकबाधक विचार करत, त्याची बलस्थाने, त्यातील न्यूने यांवर बोट ठेवत तो पूर्णांशाने स्वीकारता येणार नाही या निष्कर्षावर आले.त्यासंबंधीचे एक विवेचन इथे वेचित चाललो वरच वाचता येईल.

इतिहासाचा वस्तुनिष्ठ आणि स्व-ला बाजूला ठेवून केलेला अभ्यास याच धर्तीवर असायला हवा. ज्या पृथ्वीवर तुम्ही उभे आहात तिचा आकार तुम्हाला पुरा दिसू शकत नाही. मग पायाखालच्या जमिनीला पृथ्वीचे प्रातिनिधिक रूप समजून तुम्ही पृथ्वी सपाट आहे असे समजू लागता. अंतराळात गेलात तर तिचा आकार तुम्हाला पूर्णपणे दिसू शकतो. पण त्यासाठी तुम्हाला जमिनीचा आधार सोडावा लागतो. आर्किमीडिज ’मला पृथ्वीबाहेर उभे राहण्यास जागा द्या. मी पृथ्वी उचलून दाखवतो.’ म्हणाला, त्याचा मथितार्थ हा आहे.

अशा अभ्यासातून, अधिक पुराव्यांनी आपले दैवत वा प्रेयस दुय्यम ठरले तर ते मान्य करण्यातका मनाचा खुलेपणा त्या अभ्यासात राहू शकला पाहिजे. तरच त्याला अर्थ राहतो. अन्यथा इतिहासही आपल्या गटाला रुचणारी परीकथा म्हणूनच शिल्लक राहतो.

-oOo-

1. Versailles: What is the true story of the Man in the Iron Mask?
2. Who Was the Real Man in the Iron Mask? (National Geographic)
3. सदर दंतकथेचा(?) वेध घेणारा एक माहितीपट:


संबंधित लेखन

1 टिप्पणी: