रविवार, ६ मार्च, २०२२

भविष्यवाणी

पण माझ्यात तर असामान्य कौशल्य आणि शक्ती नाहीयेत." हॅरी न राहवून बोलून गेला.

“आहेत, तुझ्याकडे आहेत," डम्बलडोर ठामपणे म्हणाले. “तुझ्याकडे एक शक्ती अशी आहे, जी वॉल्डेमॉर्टकडे कधीच नव्हती. तू-"

“मला माहीत आहे!" हॅरी अधिरेपणाने म्हणाला. "मी प्रेम करू शकतो!” मोठ्या मुष्किलीने तो हे शब्द गिळू शकला की, त्याचा काय उपयोग होणार आहे?'

“होय हॅरी, तू प्रेम करू शकतोस." डम्बलडोर म्हणाले. पण त्यांच्याकडे पाहून असं वाटत होतं, की जे काही बोलता बोलता हॅरी थांबला, ते त्यांना चांगलंच माहीत होतं. "तुझ्या बाबतीत जे काही घडलं, त्याचा विचार करता ही एक उल्लेखनीय बाब आहे. हॅरी, तू किती विलक्षण आहेस, हे कळायला तू अजून तू फारच लहान आहेस."

हॅरीने थोडंसं निराश होऊन विचारलं, "याचा अर्थ, भविष्यवाणी जेव्हा असं म्हणते की, माझ्यात 'अशा काही शक्ती असतील, की ज्यांची सैतानी शहेनशहाला कल्पनासुद्धा असणार नाही,' तेव्हा तिला फक्त प्रेमच अभिप्रेत असतं का?”

"होय- फक्त प्रेम " डम्बलडोर म्हणाले. "पण हॅरी, तू हेही कधी विसरू नकोस, की भविष्यवाणी जे काही म्हणते, ते केवळ वॉल्डेमॉर्टने तिला महत्त्व दिल्यामुळेच महत्त्वाचं ठरतं. मी तुला ही गोष्ट मागच्या वर्षाच्या अखेरीला सांगितली होती. वॉल्डेमॉर्टने स्वतःच त्याच्या जिवावर उठणाऱ्या व्यक्तीच्या रूपात तुझी निवड केलेली होती– आणि तुझ्या रूपात त्याने स्वतःच स्वतःचा शत्रू निर्माण केला!"

"पण त्याचा अर्थ तोच झाला की-- "

"नाही, त्याचा अर्थ तोच होत नाही!" डम्बलडोर अधीरपणे म्हणाले. आपला काळवंडलेला आणि आक्रसलेला वाळका हात हॅरीकडे रोखून ते म्हणाले, "तू भविष्यवाणीला नको इतकं महत्त्व देतो आहेस."

हॅरी पॉटर आणि हाफ-ब्लड प्रिन्स

हॅरी गडबडून म्हणाला, "पण तुम्हीच तर म्हणाला होता की भविष्यवाणीचा अर्थ असा आहे--'

"वॉल्डेमॉर्टने ती भविष्यवाणी कधी ऐकलीच नसती, तर ती पूर्ण झाली असती का? त्या परिस्थितीत तिला काही अर्थ उरला असता का? अर्थातच नाही! भविष्यवाणी कक्षात ठेवलेली प्रत्येक भविष्यवाणी खरी ठरते असा तुझा समज आहे का?"

"पण..." हॅरी चक्रावून जात म्हणाला, "पण मागच्याच वर्षी तुम्ही म्हणाला होता की आमच्यापैकी एकाला दुसऱ्याला मारावं लागेल--"

"हॅरी, हॅरी, त्याच्यामागे फक्त एकच कारण होतं आणि ते म्हणजे वॉल्डेमॉर्टने एक गंभीर घोडचूक करून ठेवली होती आणि प्रोफेसर ट्रिलोनींच्या भविष्यानुसार वर्तणूक करून ठेवली होती! वॉल्डेमॉर्टने तुझ्या वडिलांची हत्या केली नसती तर त्याने तुझ्या मनात सुडाची त्वेषभावना जागृत करून ठेवली असती का? सरळ आहे, नाही! तुझ्याकरता बलिदान देण्याकरता त्याने तुझ्या आईला भाग पाडलं नसतं, तर त्याला भेदता न येण्यासारखं जादूई संरक्षण तिनं तुला दिलं असतं का? सरळ आहे, की नाही! हॅरी, तुझ्या लक्षात नाही आलं का? वॉल्डेमॉर्टने आपल्या कट्टर वैऱ्याला स्वतःच निर्माण करून ठेवलेलं होतं, जगभरातले सगळे हुकुमशहा हे असंच करत असतात! हुकूमशहा ज्या लोकांचं शोषण करत असतात त्यांनाच ते किती वचकून असतात, याची तुला कल्पना तरी आहे का? या सगळ्या हुकुमशहांना पुरेपूर माहीत असतं, की एक ना एक दिवस त्यांच्या अगणित सावजांपैकी कुणी ना कुणीतरी त्यांच्या विरुद्ध दंड थोपटून उभा राहणार आहे आणि बदला घेणार आहे. वॉल्डेमॉर्टही त्यांच्यापेक्षा वेगळा नाहीये! त्यामुळे त्याला आव्हान देऊ शकेल अशा व्यक्तीचा तो नेहमी शोध घेत असतो. त्याने ती भविष्यवाणी ऐकली आणि तो लगेचच कामाला लागला. या सगळ्याचा परिणाम असा झाला की भविष्यात त्याच्या जिवावर उठेल अशा व्यक्तीची त्याने स्वतःच निवड तर करून ठेवलीच, शिवाय त्याने त्याला विलक्षण अशी घातक शस्त्रंही देऊन ठेवली!”

"पण--"

"हे सगळं तुला समजून घ्यावंच लागेल!" डम्बलडोर उठून उभ राहात म्हणाले आणि ते खोलीतल्या खोलीत येरझाऱ्या घालायला लागले. त्यांच्या पाठीमागे त्यांची झगमगती शाल लहरत होती. त्यांना इतकं अस्वस्थ झालेलं हॅरीने यापूर्वी कधीच पाहिलेलं नव्हतं. "तुला मारण्याचा प्रयत्न करून वॉल्डेमॉर्टने माझ्यासमोर बसलेल्या उल्लेखनीय व्यक्तीची निवड करून ठेवली आणि त्याने स्वत:च त्याला त्याचं साधनही देऊन ठेवलं! तू वॉल्डेमॉर्टचे विचार आणि महत्त्वाकांक्षा पाहू शकलास, ही त्याचीच चूक आहे. तो ज्या भाषेत आदेश देतो ती सर्पभाषा तुला समजू शकली, हीही त्याचीच चूक आहे. पण हॅरी, वॉल्डेमॉर्टच्या बाबतीतली विलक्षण समज तुझ्यात असूनही, (ही एक अशी गोष्ट आहे, की जिच्याकरता एखादा प्राणभक्षी काहीही करू शकतो,) तू काळ्या जादूकडे कधीही आकर्षित झाला नाहीस. तू कधीही, एक क्षणभरही, वॉल्डेमॉर्टचा हस्तक बनण्याची इच्छा दर्शवली नाहीस!"

‘‘अर्थातच मी नाही दर्शवली!” हॅरी त्वेषाने चवताळून म्हणाला. “त्याने माझ्या मम्मी-डॅडींना ठार केलं!"

“थोडक्यात काय, तर तुझ्यातल्या या प्रेम करण्याच्या क्षमतेमुळेच तू सुरक्षित आहेस!” डम्बलडोर ठासून म्हणाले. “एकमेव सुरक्षाकवच, जे वॉल्डेमॉर्टसारख्या शक्तिशाली जादूगाराला मात देऊ शकतं! असंख्य प्रलोभनं आणि हालअपेष्टांवर मात करूनही तुझं हृदय पवित्र राहिलं, अगदी अकरा वर्षांचा असताना तू आरशात पाहताना ते जेवढं पवित्र होतं, तेवढंच. तो आरसा मनातली इच्छा दाखवू शकायचा आणि त्या वेळी त्याने तुला अमरतेच्या किंवा श्रीमंतीच्या ऐवजी लॉर्ड वॉल्डेमॉर्टला नेस्तनाबूत करण्याची रीत दाखवली होती. हॅरी, जे तू त्या आरशात पाहिलं होतंस, ते किती कमी जादूगारांना दिसतं, याची तुला कल्पना तरी आहे का? आपला सामना कुणाशी आहे हे वॉल्डेमॉर्टला तेव्हाच कळायला हवं होतं, पण त्याला समजलंच नाही!

“पण आता त्याला ही गोष्ट कळून चुकलेली आहे. स्वतःला कसलीही इजा होऊ न देता तू लॉर्ड वॉल्डेमॉर्टच्या मेंदूत सहज प्रवेश केला होतास, पण तो मात्र असह्य हाल सोसल्याशिवाय तुझा कब्जा घेऊ शकत नाही हे त्याला मंत्रालयात समजलं होतं. हरा, माझ्या अंदाजाप्रमाणे त्याला यामागचं कारण जरी समजत नसलं, तरी तो आपल्या आत्म्याचे तुकडे करण्याच्या इतक्या धांदलीत होता की निष्कलंक आणि संपूर्ण आत्म्याच्या अतुलनीय शक्तीला समजून घेण्याकरता तो एक क्षणभरही थांबला नाही. "

"पण सर, वाद घालण्याची खुमखमी आवरून धरण्याचा आटोकाट प्रयत्न " करत हरी म्हणाला, एकूण एकच ना पण? मला त्याला मारण्याचा प्रयत्न करायला हवा, किंवा--"

"करायला हवा?" डम्बलडोर म्हणाले. "प्रश्नच नाही, तुला करायलाच हवा! पण भविष्यवाणीत तसं म्हटलंय म्हणून नाही! असा प्रयत्न केल्याखेरीज तू स्वस्थ बसूच शकणार नाहीस, म्हणून करायला हवा! आपण दोघंही ही गोष्ट मनोमन जाणून आहोत! एक क्षणभर अशी कल्पना करून पहा, ती भविष्यवाणी तू कधीच ऐकली नसतीस! त्या परिस्थितीत तुला वॉल्डेमॉर्टबद्दल काय वाटलं असतं? विचार करून बघ!"

हॅरी त्याच्या समोर येरझाऱ्या घालणाऱ्या डम्बलडोरांकडे पाहत राहिला. तो विचारात पडला. त्याने आपली मम्मी, आपले डॅडी आणि सिरिअसबद्दल विचार करून पाहिला. त्याने सेडरिक डिगोरीबद्दल विचार केला. त्याचं हृदय पेटून उठल आणि ती आग त्याचा गळा भाजून काढायला लागली.

“त्याला मेलेला पाहायची माझी इच्छा असती," हॅरी म्हणाला, "आणि ते काम मलाच करून टाकावंसं वाटलं असतं."

"वादच नाही, तुला हे काम करावंसं वाटलंच असतं!" डम्बलडोर ओरडले. "तुझ्या लक्षात आलं ना, की कोणतीही गोष्ट तुम्हाला अपरिहार्यपणे केलीच पाहिजे असा काही त्या भविष्यवाणीचा अर्थ नाही! पण भविष्यवाणीमुळेच लॉर्ड वॉल्डेमॉर्टने तुला आपल्या बरोबरीचं स्थान देऊन ठेवलं... दुसऱ्या शब्दात सांगायचं तर, तुला आपल्या मार्गाची निवड करण्याची मोकळीक आहे, भविष्यवाणीकडे पाठ फिरवण्याची मुभा आहे! पण वॉल्डेमॉर्ट भविष्यवाणीला अनिवार्य मानतो. तो तुझा शोध घेतच राहील... त्यामुळे एका गोष्टीवर शिक्कामोर्तब होतं की-- "

"की आमच्यापैकी एकजण शेवटी दुसऱ्याला मारणारच, " हॅरी म्हणाला. "होय.”

डम्बलडोर त्याला जे काही समजावून सांगायचा प्रयत्न करत होते, ते सरतेशेवटी त्याला उमगलं. 'जीवनमरणाचं युद्ध लढण्याकरता एखाद्याला रणांगणात खेचूनही नेता येतं, किंवा तो स्वतःच ताठ मानेने रणभूमीवर जाऊ शकतो. कदाचित काही लोक असं म्हणतीलही, की दोन्हीत फारसा काही फरक नाहीये; पण डम्बलडोरांना माहीत होतं - आणि आता मलाही समजलेलं आहे. हॅरीने मनातल्या मनात अभिमानाने विचार करून पाहिला आणि 'माझे मम्मी डॅडीपण ओळखून होते - की जगात याच कारणाने जो काय फरक पडायचा तो पडत असतो.'

- oOo -

पुस्तक: हॅरी पॉटर आणि हाफ-ब्लड प्रिन्स
लेखक: जे. के. रोलिंग
अनुवाद: मंजूषा आमडेकर
प्रकाशक: मंजुल पब्लिशिंग हाऊस
वर्ष: २००५
पृ.४८६-४९०.


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा