सोमवार, १२ जून, २०२३

स्वातंत्र्य आणि गुलामगिरी

तो बाहेर पडून चालू लागला तेव्हा त्याला कोणीतरी हाक मारली व थांबवले. एका घराच्या कट्टयावरून एक माणूस उतरला व त्याच्याकडे आला. त्याने किंचित आश्चर्याने पाहिले व लगेच त्याला ओळख पटली. तो माणूस. मघाचा व्यापारी होता.

“ मी तुझीच वाट पाहत थांबलो होतो, हे ऐकून तुला आश्चर्य वाटेल, नाही ?” व्यापारी म्हणाला. त्याच्या आवाजात रेशमी कापडाच्या घडीचा मृदुपणा होता. त्याच्या बरोबर चालू लागता त्याने हात मागे एकमेकात अडकवले व तो म्हणाला, “तूही एक प्रवासी आहेस, तू कोठेही जायला मोकळा आहेस, म्हणून मी तुझ्याशी बोलायला थांबलो होतो. जर तू पायमोकळा आहेस, तर तू एखादे काम स्वीकारशील ? त्यात तुम्हा भरपूर द्रव्य मिळेल, अनेक शहरे पाहता येतील आणि तुझ्यावर कसलीही जबाबदारी राहणार नाही. ”

“म्हणजे अगदी मनाजोगते काम दिसते हे ! ” तो हसून म्हणाला. “ खरे म्हणजे मी प्रवासी नाही, तर एक भटक्या आहे. मला काही काम स्वीकारून स्वतःला बांधून घ्यायचे नाही, कारण मी भटकत असतो तरी काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत आहे. तेव्हा तोंडात लगाम घेऊन चालणार नाही. पण काम तरी कसले, काय आहे ?”

रमलखुणा

“काम असे आहे. मी व्यापारी आहे, तो हिर्‍यामोत्यांचा नाही, तर गुलामांचा आहे. उद्याच सकाळी गुलामांचा एक तांडा कारवा गाठण्यासाठी माझ्या गलबतातून जाणार आहे. तेव्हा त्यांच्याबरोबर जाण्यासाठी मला एका ताठ तरुण माणसाची फार गरज आहे. मी तुला पाहिले त्यावेळी मला वाटले, हा माणूस आपल्याला मिळाला तर फार बरे होईल. हा माणूस पाहू लागला की याच्या नजरेत कोठे क्षितिज आड येत नाही. ”

पण या शब्दांनी तो आज फार अस्वस्थ झाला. त्याने तुटकपणे विचारले, “पण आपल्यासारख्याच माणसांची खरेदी-विक्री करून पोट जाळण्यात कमीपणा नाही का ?”

“तू हा प्रश्न प्रथमच विचारणार हे मला माहीत होते व त्याच उत्तराची मी तयारी करत होतो.” व्यापारी शांतपणे म्हणाला. “शिवाय, तो प्रश्न विचारणारा तूच काही पहिला नाहीस. इतर वेळी मी हसून गप्प राहत असे. कारण, प्रश्न काय, –कोणीही मूर्ख माणूस प्रश्न विचारू शकतो. पण ज्यांच्या प्रश्नांना उत्तरे द्यावीत अशी लायकी असणारा हजार-लाखांत एकटाच असतो. त्यात का बरे कमीपणा वाटावा ? मेंढ्या, घोडे, उंट, यांचा व्यापार करण्यात शरम नाही, तर माणसांचाच व्यापार करण्यात कसली शरम आली आहे ? हे प्राणी अगदी क्षुद्र आहेत, माणूस तेवढा उच्च आहे, म्हणून त्याला त्यांची खरेदी-विक्री करण्याचा अधिकार आहे, हे तुला कोणी सांगितले ?

“घोडा माणसाप्रमाणे कृतघ्न नाही. उंट वादळाच्या प्रसंगी मालकाला एकटा टाकत नाही. स्वतःची स्त्री देऊन त्या जनावरांपैकी कोणी मोठेपणा मिरवित नाही. माणूस जेवढा खालच्या पातळीवर उतरू शकतो, तेवढे उतरणारे जनावर तुला माहीत आहे? शिवाय, एखाद्याला हातपाय आहेत, तो पोट भरतो, तो प्रजा निर्माण करतो, केवळ एवढ्यामुळेच का तो तुझ्या बरोबरीचा ठरतो ? मग तर तू वेडा आहेस. काही माणसे खास तुझ्या बरोबरीची नाहीत, आणि हेही लक्षात ठेव, तू स्वतः काही माणसांच्या बरोबरीचा नाहीस. सर्व माणसांत ज्या गोष्टी समान आहेत, त्या फक्त माणसांतच आहेत असे नाही. त्या सगळ्या प्राण्यांतच आहेत. पण ज्या गोष्टींमुळे माणूस इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे, त्यांच्याबाबत समानता असणे केवळ अशक्य आहे.

“आणि गुलामगिरी तू समजतोस तेवढी दुर्मिळ नाही. धर्मसंस्थापक काहीही खुळचट बोलला तरी ते शब्द गळ्यात अडकवून तुम्ही हजारोंनी गुलाम होता, हजारो वर्षे गुलाम राहता, आणि विशेष म्हणजे ही गुलामगिरी जेवढी प्राचीन, तेवढा तुम्हांला तिचा फार अभिमान वाटतो. तुझा सम्राट सांगेल त्या देशाविरुद्ध तुम्ही आंधळेपणाने तलवारी उगारता ! अरे, तू या देशात जन्मला असतास, तर येथल्यासारखाच पोशाख करायच्या साध्या गुलामगिरीतून सुटायला तुला फार धैर्य दाखवावे लागले असते ! काही गुलामांना तांड्यातांड्याने निरनिराळ्या देशांत विकले जातात. बाकीचे आपल्या घरात राहूनच गुलाम म्हणून मरतात.”

“तुझा तो धंदाच असल्याने तू त्याला असले स्वरूप देत आहेस इतकेच !” तो म्हणाला.

“नाही. तू चुकलास. तो माझा धंदाच असला तरी माझ्या अनेक धंद्यांपैकी तो एक आहे. माझे पोट काही त्यावर अवलंबून नाही. मला संपत्तीचा मोह नाही. तुझ्याएवढे उंच असे दिनारांचे ढीग माझ्या हाताखालून जात असले तरी माझे स्वतःचे घर अगदी साधे आहे. त्यात दरबारी गालिचे नाहीत, आणि माझ्या घरात एकही गुलाम नाही.”

“मग हा धंदा चालू ठेवण्याचे कारण काय ? ” त्याने विस्मयाने विचारले.

“तेच तुला तू जर माझे काम स्वीकारशील तर चांगले समजेल. दीडदोनशे गुलामांवर तुझी सत्ता असेल. तू काय मी काय, आम्ही त्यांना गुलाम केले नाही. ते गुलाम झाल्यावरच आमचा त्यांच्याशी संबंध आला. तेव्हा मनाला कसली टोचणी असण्याची गरज नाही. तुझ्या सत्तेला मर्यादा असणार नाही. त्याचप्रमाणे त्यांच्या जीविताची तुझ्यावर कसलीच जबाबदारी राहणार नाही.

“त्यांतील काही मेले तर तुझा त्यात काहीच दोष नाही असे खुद्द इतर गुलामच तुला सांगतील. जबाबदारी आणि कर्तव्ये यापासून मुक्त असलेली अनिर्बंध सत्ता अत्यंत उन्मादकारी असते. हा नवा अनुभव तुला येईल. ते गुलाम काही वेळा चांगले वागतील पण चांगले वागले की हटकून त्याचे पारितोषिक मिळतेच असे नाही, हे त्यांना माहीत असते. त्यामुळे त्यांचा चांगुलपणा अत्यंत निरपेक्ष असतो. उलट पाठीवर चाबकाचा फटकारा बसला की त्यांना फारसा खेद नसतो, कारण अशा तर्‍हेचे प्रायश्चित्त मिळते, ते आपल्याकडून अपराध झाला म्हणूनच नव्हे, हे देखील त्यांना माहीत असते. तुझी लहर म्हणजेच तुझा न्याय, हेच त्यांच्या मनात पूर्ण ठसलेले असते. मित्रा, तू अगदी देवाप्रमाणे त्यांच्यावर हुकमत गाजवशील ! मद्याच्या नशेत तू बरळलेला एक शब्द म्हणजे धर्म, तू केलेले एखादे अर्थहीन कृत्य म्हणजे न्याय आणि केवळ चाळा म्हणून तू दिलेला आसुडाचा प्रहार म्हणजे कदाचित स्वतःच्या पापाचे प्रायश्चित्त– असले वातावरण तुला इतर कोणत्या व्यवसायात मिळेल ते तरी सांग !”

“पण हे असे काही कायम चालणार नाही. हे काम म्हणजे झोपलेल्या ज्वालामुखीच्या टोकावर बसल्यासारखे आहे. दीडदोनशे चालती बोलती माणसे– त्यांतील एक माणूस तरी कधीतरी जागा होईल, संतापाने प्रतिकार करील आणि मग तुझे बुडबुड्याचे साम्राज्य फुटून जाईल!” तो म्हणाला.

गुलामांचा व्यापारी किंचित वाकला व मोठमोठ्याने हसू लागला. तो म्हणाला, “हे बघ, तुझी सारी उमर आहे त्यापेक्षा जास्त वर्षे मी या धंद्यात काढली आहेत. आणखी एक गोष्ट, मला वाटते, मी तुला सांगितली नाही. मी स्वतः गुलाम म्हणून तांड्यात भटकलो आहे. अरे, तू म्हणतोस ते स्वातंत्र्याचे प्रेम माणसात भूकतहानेप्रमाणे उपजत आणि अखंड नसते. हां, तसे काही प्राण्यांत असू शकेल.”

व्यापाऱ्याने आपल्या एका बोटाकडे पाहत आठवत म्हटले, “ उदाहरणार्थ, डोंगरी ससाणा घे. तू त्याला पाचसात वर्षे खाणेपिणे दे. पण पहिली संधी मिळताच तो तुझे बोट फोडील. तू जर निष्काळजी राहिलास तर तो तुझे डोळे कोचून काढील आणि निघून जाईल. त्यांच्यातला हा निखारा कधीच विझत नाही. काही मुठीएवढी पाखरे असतात, पण ती पिंजऱ्यातच दाण्यांना स्पर्श न करता मरून पडतील. माणसाचे तसे नाही. स्वातंत्र्यप्रेम ही एक मुद्दाम निर्माण केलेली जाणीव आहे, आणि ती सतत जागी ठेवण्याचा प्रयत्न केला नाही तर ती सहज मरून जाते. म्हणूनच काही प्रबळ युयुत्सू देश शतकानुशतके दास्यात राहतात. आणि त्या अवधीत प्रजेची संख्या देखील भरमसाट वाढते.

“तू दोन वर्षे एक माणूस माझ्या ताब्यात दे. हातात आसूड न घेता, त्याच्या पायात साखळदंड न घालता मी त्याचा गुलाम करून दाखवीन. मी काय करतो माहीत आहे ? मी या साऱ्यांपेक्षाही भयंकर अस्त्र वापरतो. मी त्यांना चांगले कपडे देतो, खायला भरपूर घालतो, आणि रात्री शांतपणे झोपू देतो. यात जखडलेला माणूस गुलामगिरीतून काय सुटणार ? एकदा मी माझ्या सगळ्या गुलामांना सांगितले, ज्यांना जायचे आहे त्यांनी खुशाल निघून जावे.”

“मग काय, ते तात्काळ नाहीसे झाले असतील नाही ?” त्याने उत्सुकतेने विचारले.

“चुकलास. अवघी तीन माणसे गेली, आणि त्यांतील दोन आठवडाभरातच परतली. कारण काय तुला माहीत आहे! येथे काय, अन्यत्र काय, गुलामगिरी होतीच. निदान या ठिकाणी त्यांच्या भुका तरी निश्चितपणे भागत. आणखी एक गोष्ट घ्यानात घे, ते जरी गेले असते तरी स्वतंत्र झालेच नसते. दुसरी कसलीतरी गुलामगिरी त्यांनी आनंदाने स्वीकारली असती, कारण माणूम गुलाम असतो तो मुख्यत्वेकरून आपल्या मनात ! मग ते कोणत्यातरी प्रमुखामागून आंधळेपणाने गेले असते, मठात राहिले असते, किंवा कोणत्यातरी नव्या प्रेषितामागे मेंढरासारखे हिंडले असते. आपण स्वतंत्र, स्वतः म्हणून जगण्याचे ओझे सगळ्यांनाच पेलते असे का तुला वाटते ? या ठिकाणी सारे ठीक असते. दुसरा कोणीतरी विचार करतो, हुकूम सोडतो, नियम करतो, त्यामुळे स्वतः जगण्याची व त्याचे प्रायश्चित्तही भोगण्याची जबाबदारी आपोआपच नाहीशी होते.

“ही गोष्ट धर्माला देखील फायद्याचीच आहे. जेथे प्रश्न विचारण्याची, स्वतंत्रपणे वागण्याची पूर्ण मुभा आहे, असे किती धर्म आजपर्यंत जगात टिकले आहेत ? प्रत्येक धर्मावर अशी पाटीच लावलेली असते— ‘आपले वृषण येथे फोडून घ्या. तुम्हांला शांती मिळेल !’

“यात शेवटी एकच कठोर सत्य राहते. आपण एकेका शब्दाचे गुलामच राहतो. पण शब्दांसारखी मायावी पिशाच्चे दुसरी नसतील. तेव्हा जर प्रथम कोणती गोष्ट करायचे आपण धैर्य दाखवले पाहिजे तर एकामागोमाग कासवे उलटी करीत गेल्याप्रमाणे शब्द पालथे करीत जायला शिकले पाहिजे, म्हणजे त्यांचे फिकट दुबळे भाग देखील आपणाला दिसतील. प्रत्येक शब्दातच त्याचे विरुद्ध, विरूप दर्शन देखील कोठेतरी दडलेले असते. आणि तू शब्दाचे एकच रूप ध्यानात घेऊन त्याच्यावर विसंबलास की भलत्याच वेळी बरोबर विरुद्ध असे रूप दाखवून तो तुला फशी पाडेल. दीर्घकाल मनात द्वेष बाळगून सूड मिळवून विजय हस्तगत करावा, तर तो क्षण रिकाम्या करवंटीसारखा ठरून जय हाच पराजय ठरतो. मंगल प्रेमाच्या परिपूर्तीत क्षणिक वासनांच्या क्षणिक समाधानाचा लगदा हाताला चिकटतो.

“आपणाला अंतिम ज्ञान झाले असा हर्ष होतो, तो क्षण तर केवळ पूर्ण आत्मवंचनेचा तरी असतो किंवा आपल्या लहानशा आवाक्यात जास्तीत जास्त काय आले याची अखेर कबुली असते. स्वातंत्र्याची आपल्या मनाप्रमाणे व्याख्या करून माणूस त्याविषयी बडबडतो, त्या वेळी तो कुंभारकिड्याच्या त्या लहान घरट्यात गुलाम होऊन राहतो; तर आपण गुलाम आहो अशी कठोर जाणीव पूर्णपणे स्वीकारणारा माणूस स्वतंत्र होतो. आणि आपल्या ज्ञानवंतांनी केले आहे काय, तर अमर्याद वाळवंटात असल्या शब्दांची बुजगावणी उभी करून आपण वाळवंटाचा नकाशा केला आहे व प्रवास सहज केला असा तोरा मिरवला आहे. आपण सामान्य माणसे अगतिक होतो; म्हणून दिशा नसली तरी गती तर आहे एवढ्या क्षुल्लक समाधानाने या कासवाच्या पाठीवर बसून प्रवासाला निघतो. ”

-oOo-

पुस्तक: रमलखुणा
लेखक: जी. ए. कुलकर्णी
प्रकाशक: पॉप्युलर प्रकाशन
आवृत्ती चौथी, दुसरे पुनर्मुद्रण
वर्ष: १९९५.
पृ. १२२-१२७.

या वेच्यामध्ये मी लहानसा बदल केला आहे. यात दोन ते तीन दीर्घ परिच्छेद होते. मोबाईलसारख्या लहान स्क्रीनवर हा सलगपणे वाचणे जिकीरीचे ठरते.त्यामुळे या परिच्छेदांचे मी दोन-तीन लहान परिच्छेद केले आहेत. मूळ मजकुरात वा वाक्यांच्या क्रमवारीमध्ये काही बदल केलेला नाही वा भरही घातलेली नाही.

---


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा