रविवार, १८ जून, २०२३

वाळूचा किल्ला

गोव्यातला 'कलंगुट' हा प्रसिद्ध सागरकिनारा. दिवस कलला होता. उन्हे सौम्य झालेली होती...

समोर निळा सागर गर्जत होता आणि वाळूत रंगीबेरंगी माणसे हिंडत होती. सोबतीला कोणी नसल्यामुळे मला फार एकटे वाटत होते. गोव्यात डेप्युटेशनवर येऊन मला महिना झाला होता. मुलाबाळांची आठवण येत होती. ह्या सुरेख, निसर्गरम्य प्रदेशात आपण एकटे का आलो? उद्योग-धंद्याच्या निमित्ताने आपण एवढे भटकतो; पण सदैव एकटे, असे का बरे ?

गर्दीतून बाजूची जागा बघितली आणि वाळूत पाय रोवून बसलो. दोन्ही हात वाळूत खुपसले. निळ्या-निळ्या पाण्यावर दृष्टी पसरली. उगाचच ओळी ओठांवर आल्या-

'ने मजसी ने परत मायभूमीला
सागरा, प्राण तळमळला. '

एवढ्यात चिमुकला, गोड आवाज आला, "अहो- "

"का हो?"

"जरा लक्ष ठेवा हं, माझ्या किल्ल्याकडं."

"का? तुम्ही कुठं निघालात किल्ला सोडून?"

त्या तिकडे हात वर करून ती म्हणाली, "मी जरा तिकडे जाऊन येणार आहे.' "

"बरं, लवकर या."

"आले लगेच." असे म्हणून ती चिमुरडी पोर केस उडवीत पळालीसुद्धा. नाव विचारण्यापुरता वेळही तिने मला दिला नाही.

वाळूचा किल्ला

जवळ जाऊन मी तिचा किल्ला पाहिला. सुरेख बांधला होता. चोहोबाजूला चार बुरूज होते. चौफेर भक्कम तट होता. पायऱ्या होत्या, दरवाजे होते. चौफेर खंदक होता आणि त्यात पाणीसुद्धा आणून ओतलेले होते. माझ्यासारख्याने केअरटेकर व्हावे, अशी ही वास्तू होती खरी.

माझ्या मनात आले की, आम्ही वयाने एवढे होतो तेव्हा ओढ्याच्या ओल्या वाळूत पायावर चिमणीची ओबडधोबड कोटी करायला शिकलो होतो. एवढा नीटनेटका किल्ला कोणी आम्हाला कधी शिकवला नाही. किल्ला कधी पाहिलाच नव्हता; पाहिली होती ती चिमणीची कोटीच.

अगदी किल्ल्याशेजारीच ठाण मांडून बसणे बरे दिसणार नाही, म्हणून थोडे अंतर ठेवून बसलो.

खऱ्या-खऱ्या वास्तूचे रक्षण करायचे म्हणजे चोराचिलटांकडून, उगाचच तावदानावर दगड फेकणाऱ्या विध्वंसक पोरांकडून किंवा वादळ, पाऊस, आग ह्यांसारख्या नैसर्गिक आपत्तींपासून. वाळूतच पाया खोदून वाळूने बांधलेल्या ह्या लुटीपुटीच्या वास्तूला मुद्दाम धोका द्यायला येणार कोण, आणि तिचे संरक्षण म्हणजे जोखीम ती काय?

पण, नाही म्हटले तरी जोखीम होतीच.

आत्ता जाऊन येते, म्हणून सांगून गेलेल्या मालकीणबाई परत येऊन एकवार त्यांच्या हाती हा किल्ला सुपूर्द केला की मी सुटलो !

तेवढ्यात कुणाचे तरी भले मोठे कुत्रे धावत आले. एकाएकी थांबले. किल्ल्याजवळ गेले. नाक खाली करून त्याने वास घेतला आणि इकडे-तिकडे बघितले. काही तरी कुकर्म करून, ह्या गोंडस वास्तूला कमीपणा द्यायचा त्याचा इरादा मला स्पष्ट दिसला.

आजूबाजूला दगडधोंडा नव्हताच. मी नुसताच हात उगारला आणि "हां..." म्हणून दरडावणी दिली.

कुत्रे लटकन हलले आणि तोंड फिरवून पुन्हा धुम पळाले.

एक संकट टळले. मी उठून जाऊन किल्ल्याच्या अगदी शेजारी जाऊन बसलो.

मग ध्यानात आले की, खंदकातले पाणी आटून गेले आहे. म्हणजे तिच्या हातात होती तसली रंगीबेरंगी बादली घेऊन पाणी आणणे आले. ते ओतून खंदक भरणे आले. आता बादली कुठून पैदा करावी बरे?

बीचवर दुकान होतेच. म्हटले, एक विकतच घेऊन टाकावी. अर्थात तिची होती त्यापेक्षा लहान. नाहीपेक्षा अपमान केल्यासारखे व्हायचे.

बादली घेऊन टिटवीसारखा समुद्राकडे गेलो. एक डोळा किल्ल्याकडे होताच. जवळपास कोणी नाही, हे बघून ते कुत्रे पुन्हा यायचे. बादली भरून घेऊन आलो आणि सगळा खंदक नीट पाण्याने भरला. ह्या उलाढालीत शर्टाच्या वरच्या खिशातले सिगारेटचे पाकीट खंदकात पडले. सिगारेटी थोड्याफार भिजल्या.

त्या पाकिटातून काढून वाळूवर अंथरल्या आणि ते वाळवण अन् किल्ला राखीत स्वस्थ बसून राहिलो.

आत्ता तिकडे जाऊन येते, म्हणून मालकीणबाई कुठे गुंतल्या होत्या, कुणाला ठाऊक!

आता सूर्याचा तांबडा गोळा पाण्याच्या रेषेवर अगदी वावभर अंतरावर आला होता. दोघे-चौघे कोळी लांबडे जाळे घेऊन समोरच मासे झोळीत होते. जाळे ओढून ते किनाऱ्यावरच्या वाळूत आले. त्यांनी जाळे झाडले. रुपेरी पोटे दाखवीत मासे तडफडू लागले आणि मंडईत ताजी भाजी न्यायला यावे तशी समुद्राकाठी मासे न्यायला आलेल्या गिऱ्हाइकांची, बघ्यांची, मुलांची गर्दी कोळ्यांभावती झाली. आपणही उठून जावे आणि मासे कसले, केवढे आहेत, हे पाहावे- असे मला वाटले. पण किल्ल्यापासून दूर जाणे धोक्याचे होते.

आणखी काही वेळ गेला.

हळूहळू भरती येते आहे, हे माझ्या ध्यानात आले. बापरे! म्हणजे हा किल्ला आता पाण्याखाली जाणार. छे-छे; असे होऊन उपयोगी नाही. काय बरे करावे?

वर किनाऱ्यापाशी असलेल्या तात्पुरत्या हॉटेलापुढे मोकळ्या खोक्यांचा ढीग पाहिल्याचे आठवले. धावत गेलो आणि एक खोके उचलून आणले. दुसरे आणले, तिसरे आणले. वाळूतच जरा पाया घेऊन ह्या खोक्यांची भिंत करून किल्ल्याला आडोसा केला.

फेसाळ पाणी आता अगदी जवळ आले होते. मालकीणबाईंचा अजूनही पत्ता नव्हता. तेवढ्यात हॉटेलातला झिप्रा पोरगा लुंगी सावरीत आलाच.

“काय हो, खोकी आणताय उचलून- काय विचारायची पद्धत आहे की नाही? फुकटचा माल नाही तो ! "

मी खिशातून पाकीट काढीत विचारले, "हा माल मी विकत घेतला, असं समजा. काय किंमत आहे एका खोक्याची ?"

पोरगा गडबडला.

“विक्रीची नाहीत ती. माल आणण्यासाठी लागतात हरघडी. पणजीहून माल आणावा लागतो. उपयोगाची आहेत ती आमच्या!”

"मीही ती उपयोगातच आणतोय!"

माझ्या थंडपणामुळे पोरगा आवेश सोडून खाली उतरला.

त्याने किल्ल्याकडे, पाण्याकडे बघितले. त्याचा चेहरा हसरा झाला. भरतीच्या पाण्यापासून किल्ला वाचवण्यासाठी माझी धडपड चालू आहे, हे त्याच्या ध्यानी आले. म्हणाला, “बरं. काम झालं म्हणजे जागच्या जागी आणून ठेवा!"

"अगदी अवश्य. बिनघोरी राहा तुम्ही.'

पाणी सारखे पुढे-पुढे येत होते आणि ह्या बाईसाहेबांचा पत्ता नव्हता. जाऊन येते म्हणून आपले आई-वडील बसले असतील तिकडं गेल्या असतील आणि कदाचित तिकडेच रमल्या असतील.

हातावर वळलेली सिगारेट ओठांत ठेवून कोणी भटक्या माणूस हिंडत-फिरत आला आणि किल्ल्यापाशी येऊन बघत उभा राहिला.

त्याने मला विचारले, “तू बांधलास?”

"नाही, लहान मुलीनं. मला येत नाही."

"सवय लागते.'

मी उत्सुकतेने विचारलं, “तुला येईल का बांधता ?”

"हां, ह्याच्यापेक्षा फसकलास बांधीन."

"मग मला एक बांधून दे, त्या तिकडे. पाणी तिथं येणार नाही ना?"

"नाही यायचं. चल, बांधतो."

हाताच्या बाह्या सावरून भटक्या तयार झाला. भरतीचे पाणी पोचणार नाही, अशा ठिकाणी बसून कामाला लागला. एखाद्या धंदेवाइकासारखा त्याचा हात चालला होता.

किनाऱ्यावर बरीच मुले हुंदडत होती; पण किल्ल्याच्या मालकिणीचा पत्ता नव्हता. बहुधा ती कोका-कोला किंवा आइस्क्रीम खाण्यात दंग असावी. खोक्याची भिंत काही वेळ किल्ला वाचवू शकली, पण अखेरीला किल्ला पाण्याखाली गेलाच. ती तिन्हीही खोकी मी मालकाकडे पोचवून आलो.

दरम्यान, भटक्याने किल्ला पुरा केला होता. सिगारेट वळण्यासाठी तळहातावर तंबाकू अंथरीत तो रुबाबात बोलला, "बघ बरं, तुझ्या मनासारखा झाला का ?"

"झकास झालाय."

त्याचे आभार मानून मी एक रुपयाची नोट काढून देऊ लागलो. तो म्हणाला, “छ्या! माझ्या पोरानं सांगितलं असतं, तर दिला नसता का बांधून? ठेव पैसे." आणि उलट मला सलाम करून तो निघून गेला.

मी वाट पाहत राहिलो. आता दिवस मावळला होता. हळूहळू किनारा रिकामा होत होता. ही पोर आपल्या आई-बापाबरोबर घरी निघूनही गेली असावी. आपण वाळूचा किल्ला बांधलाय आणि त्याच्या देखभालीसाठी कुणाला तरी बसवून आलोय, ही गोष्ट विसरूनही गेली असेल.

मुलांचे कसे असते, ते आपल्याला ठाऊक नाही का?

ते मघाचेच का आणखी कुठले कोण जाणे, कुत्रे पुन्हा आले आणि किल्ल्याचा वास घेऊन काही कुकर्म न करता निघून गेले. मी त्रयस्थासारखा पाहत होतो.

कुत्र्यामागोमाग लहान मुलांचे एक टोळके आले. किल्ल्याभोवती उभे राहिले. त्यांनी किल्ला नीट पाहिला.

मग ‘होऽ' करून एक पोर किल्ल्यावर नाचले. तशी सगळीच पोरे नाचली. त्यांनी किल्ल्याची नामोनिशाणीसुद्धा ठेवली नाही. आरडाओरडा करीत पोरे पळाली. मी उदासीनच राहिलो.

बघता-बघता अंधार झाला.

किनाऱ्यावर अगदी तुरळक माणसे राहिली.

ती रंगीत बादली हलवीत मी मुक्कामाकडे परतलो.

-oOo-

पुस्तक: वाळूचा किल्ला
लेखक: व्यंकटेश माडगूळकर.
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस.
आवृत्ती तिसरी, चौथे पुनर्मुद्रण.
वर्ष: २०२३.
पृ. १-५.

(पहिली आवृत्ती: १९७६. अन्य प्रकाशन)

---


यांसारखे आणखी:
    एका गोष्टीची गोष्ट
    अबोला


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा