पाईप ओढायला लागलो त्याला आता वर्षाचा काळ लोटून गेला. जाणीवपूर्वक ही सवय मी स्वतःला जडवून घेतली आहे. मी एकांतप्रिय माणूस आहे. त्याहीपेक्षा दिवसभराची वर्दळ एकदा शांत झाल्यावर आरामखुर्चीत बसून पाईप ओढणे आताशा मला आवडू लागले आहे. या सवयीचा उगम माझ्या मनोवृत्तीतच आहे. कुठलेही मानसिक किंवा शारीरिक दडपण असह्य झाले की, प्रत्येक माणूसच मुक्तीचा मार्ग शोधीत असतो. माझे तसे नाही. मुक्ततेचा जो नाग मी कवटाळतो तोच मुळी माझ्या वृत्तीचे एक इंद्रिय म्हणून माझ्या जीवनात स्थायिक होऊन जातो. मग माणसे असोत की वस्तू! एखादा अनाथ मुलगा आपल्याकडे वार लावून जेवीत असावा, आणि अचानक आश्रित म्हणून आपल्याच घरी कायमचा राहून जावा, तसाच हा प्रकार आहे. पण या प्रक्रियेत माझ्या बाबतीत एक गंमत नेहमीच घडून आली आहे. वस्तू व व्यक्तीच्या संबंधाचा जिथे नेमका व अटळ शेवट होतो तिथूनच माझ्या मनाला पालवी फुटू लागते! मग मानसिक संयोजनात मोठे चढउतार निर्माण होतात. त्याला इलाज नसतो. एकवेळ खूप चतुराई वगैरे दाखवून दुसऱ्यांनी रुजवलेली मुळे काढणे सोपे आहे. पण आपल्या आत्मभोगाच्या पाताळात उगवणारी ही सृष्टी नाहीशी करणे कठीण आहे !
अशा वेळी मी पाईप ओढत बसतो. मायक्रोपोलो, थ्री नन्स, विल्स, किंवा हेन्री प्रिन्सचा तंबाखू, माझ्या डोळ्यांसमोर असलेल्या दाट चिंचेच्या झाडाकडे निघून जातो, दुसऱ्या धुराच्या फेरीत त्या झाडाच्या गर्द निळाईचे तरंग माझ्याकडे परत येतात. दोन्हीही धुरांच्या निळसर लाटा सगळ्या खोलीभर पसरतात, आणि त्यावर तरंगणारे एक पावसाळी रेस्टॉरन्ट मला दिसू लागते. धुराच्या मादक लाटांवर त्याला अधांतरी तरंगते पाहणे, ही बाहेरच्या जगाचा आधार नसल्याची जाणीव मला फार प्रिय आहे ! रेस्टॉरन्टच्या काचांवर ओघळणाऱ्या पावसातून जळत्या मेणाप्रमाणे गळणारे माणसांचे चेहरे, त्यांच्या हालचाली माझ्यापासून खूप जवळ असूनही तितक्याच दूर असतात. ही सगळी पाईपची किमया, की माझ्या सुप्त मनाचे दर्शन याचा मला बोध होत नाही.
अशाच एका रेस्टॉरन्टमध्ये मी त्याला पाहिले. त्याचे नाव मला ठाऊक नाही, त्याचे गाव मला ज्ञात नाही. रोज संध्याकाळी रेस्टॉरन्टमध्ये तो नेमाने यायचा. पावसाळी संध्याकाळ त्याला कदाचित खूप भावत असावी! टेबलावर पत्ते पसरून तो रमीचा डाव मांडायचा. तोंडात इटालियन पाईप. नसलेल्या समोरच्या प्रतिस्पर्ध्याशी तो बोलायचा, त्याच्याशी उच्छाद मांडताना कधी कधी त्याच्या समोरची काळीभोर कॉफीही निवून जाई. काळोखाला झिडकारून उजव्या अंगाला कलणाऱ्या आल्प्सच्या बर्फशिखराप्रमाणे त्याचे डोळे हसायचे. डावाची एक लय साधून समेवर येताच, मोठ्याने एका इंग्रजी कवितेच्या ओळी तो म्हणायचा; आणि तावदानावर वितळून गोटलेले पावसाचे मेण आपल्या हाताने पुन टाकायचा ! रोजच्या सरावाने एकदा त्या ओळी माझ्या हातात आल्या-
I strove with none for none was worth my strife,
Nature I loved and next to nature Art.
I warmed both hands before the fire of life,
It sinks and I am ready to depart.
त्या ओळींनी तात्काळ माझा ताबा घेतला; पॉलग्रेव्हच्या गोल्डन ट्रेझरीत कर्त्याचे नावही सापडले. डब्ल्यू. एस. लँडोर! एनसायक्लोपीडियात त्याच्या विषयीची माहिती मिळाली. अतिशय मनस्वी व्यक्तित्वाचा हा मनुष्य होता. शाळा-कॉलेजातून अनुचित वर्तनाबद्दल काढून टाकल्याची माहितीही तिथे होती. त्याच्या बुद्धिमत्तेविषयी अपेक्षा बाळगणाऱ्या अधिकार्यांनी त्याला परत येऊ देण्याची सवलतही देऊ केली होती; ती मात्र त्याने उद्दामपणाने झिडकारून लावली होती. लँडोरचे इंग्रजी वाङ्मयातील कर्तृत्व प्रसिद्धच आहे. मी झपाटून गेलो होतो, तो कवितेमागील उद्दाम आशयाच्या दिव्य स्पर्शाने ! आशयाचे असे दिव्य स्पर्श सगळ्याच व्यक्तित्वांच्या कुंडलीत जमून येत नाहीत; चंद्रजान्हवीचा स्वामी एखादा ज्ञानेश्वर, भगव्या उदासीचा एखादा रामदास, मूरलँडसच्या ओसाडीत शिल्पबद्ध झालेली एखादी एमिटी ब्राँटे...
मी जगात कोणाशीही भांडलो नाही; तसा प्राणसखा शत्रू मला सापडलाच नाही. निसर्ग व कला यांच्यावर मी प्रेम केले... जीवनाच्या शेकोटीवर हातांना उब मिळविली. शेकोटी विझते आहे आणि आता निघावयास मी सिद्ध आहे... शब्दांतून व्यक्त होणाऱ्या या सरळ अर्थाच्या पलीकडेच मला खरा अर्थ दिसू लागला. पावसाळी रेस्टॉरन्टमध्ये स्वतःलाच प्रतिस्पर्धी करून डाव मांडणारा तो पाईपवाला तर लँडोर नसेल ना ? अशीही कल्पना चाटून गेली. पाईपवाल्याच्या व लँडोरच्या काळात शंभर वर्षांची खिंड उभी होती. पण तसे नसावेच. अँडोरची कविता गुणगुणताना भिंगुरटीप्रमाणे तो स्वतः लँडोर झाला असावा! आणि लँडोर आता, देहातून गेहात, गेहातून विश्वात पसरला असावा !
हृदयस्थ प्रदेशाचे आकाश हाताशी लागले की, आपोआपच जगातील बाह्य संघर्षाची ठिकाणे कोसळून पडतात. संघर्ष व लढाईतील पहिले व शेवटचे प्रतिस्पर्धी आपणच आहोत हे कळून येते. स्वतःला जिंकल्यावर मग कुणाला जिंकायचे ? संतानी हेच अचूक हेरले होते. पण ही लढाई साधी नाही-
किंबहुना पांडवा
हा अग्निप्रवेशु नित नवा
भ्रातारेविण करावा
तो हा योगु
अंतर्दृष्टीचे खरेखुरे चैतन्य लहरू लागल्यावर त्याला समांतर जाणारी कला व निसर्ग आपले सांगाती होऊन जातात. जाणे-येणे ही केवळ उपाधी ठरते. येताना आवाज होत असला तरी जाताना साज झिडकारून देण्याची शक्ती प्राप्त होते ! लँडोरने हा पायासारखा प्राणवेधी आशय नेमका चिमटीत पकडला आहे. असे काही गवसले म्हणजे एखादा सार्त्र अवघड्से नोबेल पारितोषिकही मोठ्या सहजतेने नाकारून जातो !
आपल्या वाढदिवसाच्या प्रसंगी शुभचिंतन करावयास आलेल्या मित्रांना उद्देशून लँडोरने ही कविता म्हटली. मित्रांना त्याच्या मनस्वी औद्धत्याचे मोठे वैषम्य वाटले असेल! माझ्या पाईपच्या धुरावर तरंगणारे ते पावसाळी रेस्टॉरन्ट व माझ्या मनाला अनाहूतपणे फुटणारी पालवी मात्र इतःपर माझ्या तक्रारीचा विषय राहिली नाही.
-oOo-
पुस्तक: चर्चबेल.
लेखक: ग्रेस.
प्रकाशक: पॉप्युलर प्रकाशन.
आवृत्ती दुसरी (पुनर्मुद्रण).
वर्ष: २०००.
पृ. ७९-८२.
हे स्फुट पुस्तकामध्ये 'डब्ल्यू. एस्. लँडोरची कविता' या शीर्षकाने समाविष्ट केलेले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा