जगप्रसिद्ध चित्रकार पाब्लो पिकासो ह्यालाही असा शिकारखाना पाळण्याची हौस होती. त्याच्याकडे पिवळ्या रंजन रंगाचे, कुलूकुलू बोलणारे कनारी पक्षी होते. कबुतरे होती. ‘टुर्टलडव्हज्' जातीची पाखरे होती. आपल्या मित्रांच्या हेतूबद्दल पाब्लोला जसा संशय असे, तसा या मित्रांबद्दल नसे.
म्युझियममधल्या कोपऱ्यात सापडलेले एक जखमी घुबड त्याला कोणा मित्राने आणून दिले. ह्या घुबडाचा एक पंजा दुखावलेला होता. काही दिवस मलमपट्टी केल्यावर तो बरा झाला. मग या घुबडासाठी सुरेख पिंजरा आणून इतर पक्ष्यांबरोबर पाब्लोने त्यालाही पाळले.
घरातली सगळी माणसे ह्या दिवाभीताशी प्रेमाने वागत. येता-जाता त्याच्या पिंजर्याशी जाऊन बोलत. पण घुबड फार माणूसघाणे होते. ते सर्वांकडे रखारखा बघत असे. सगळे पाळीव पक्षी स्वयंपाकघरात होते. पाब्लो किंवा फ्रान्सवाद (विकासची तरुण मैत्रीण) की कोणी स्वयंपाकघरात गेले की, कनारी चिवचिवाट करत, कबुतरे घुमू लागत, टुर्टलडव्हज् हसू लागत; पण हे घुबड मात्र ढम्म बसून असे. कधी त्याचा आवाज उमटलाच, तर गुरगुरणे असे.
ह्या माणूसघाण्या घुबडाच्या अंगाला फार घाण येई. उंदराशिवाय ते कशालाही चोच लावीत नसे. पाब्लोच्या स्टुडिओत पुष्कळ उंदीर घुडगूस घालीत. बिचारी फ्रान्सवाद रोज अनेक सापळे स्टुडिओत लावून ठेवी आणि उंदीर सापडला रे सापडला की, ह्या उर्मट घुबडाला आणून घाली. आता कोणताही प्राणी - अगदी प्राणिसंग्रहालयातील वाघसुद्धा खाद्य पुढ्यात आले की त्याच्यावर लगेच तुटून पडतो. पण हे घुबड खाद्याकडे आणि ते आणून घालणार्या फ्रान्सवादकडेही संपूर्ण दुर्लक्ष करी.
घुबडाला दिवसा दिसत नाही, असा एक समज आहे. पण तो काही खरा नाही. ह्या घुबडाला छान दिसत असे. पण दिसून न दिसल्यासारखे दाखविण्यातच त्याला प्रौढी वाटे. फ्रान्सवाद जरा कुठे स्वयंपाकघराबाहेर गेली रे गेली की, दरम्यानच्या काळात घुबडाला घातलेला उंदीर नाहीसा होई.
काही तासांनंतर केसाची लहानशी गुठळी घुबडच बाहेर टाकी; ती पाहून समजावे की, उंदराचे काय झाले.
पाब्लोला बघून घुबड गुरगुरले की, हा साठ वर्षे उलटून गेलेला जगप्रसिद्ध चित्रकार त्याला उलट चार इरसाल शिव्या मोजी. का, तर हा आपल्यापेक्षा वरचढ आहे. हे घुबडाला कळावे. आपण एक असभ्य झालो तर हा दहा होईल, याची खात्री त्याला पटावी. अशा शिव्या मोजल्यानंतर पिकासो आपले बोट बळेच घुबडापुढे धरी. घुबड चावा घेई. पण चित्रकाराची बोटे चांगली टणक होती, त्यांना इजा होत नसे.
पुढे काही दिवसांनी घुबडाने चावणे सोडून दिले. पाब्लोने त्याच्या डोक्यावर खाजवले, तरी ते गप्प राहू लागले. बोट पुढे केले की, चावण्याऐवजी त्याच्यावर बसू लागले.
या घुबडाचे एक सुरेख शिल्प पिकासोने केले. हे नुसते घुबडाचे शिल्प नाही, तर ’त्याच’ घुबडाचे आहे.
कबुतरे घुमायची, पण टुर्टलडव्हज् खरेच हसायची, राखी, फिक्कट गुलाबी रंगाची ही लहान पाखरे होती.
पाब्लो आणि फ्रान्सवाद स्वयंपाकघरात जेवणाच्या टेबलावर येऊन बसली की, बऱ्याच वेळा पाब्लोला लहर यायची. एखाद्या फिलॉसॉफरसारखे त्याचे स्वगत भाषण सुरू व्हायचे. मग ही पाखरे मालकाचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत राहत. बोलता-बोलता पिकासो मुद्द्यावर आला की, ही टुर्टलडव्हज् एकदम फिदीफिदी हसणे सुरू करीत.
पिकासो म्हणे, “ही पाखरे तत्त्ववेत्त्याच्या कामाची आहेत. मनुष्यप्राण्याच्या सगळ्या वचनांना एक मूर्खपणाची बाजू पण असते. माझं सुदैव म्हणून ही पाखरं इथं आहेत. ज्या-ज्या वेळी आपण फार विद्वत्तापूर्वक बोललो असा गर्व मला होतो, तेव्हा ही माझी टर उडवतात आणि गर्वहरण करतात."
-oOo -
पुस्तक: डोहातील सावल्या.
लेखक: व्यंकटेश माडगूळकर.
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस.
आवृत्ती दुसरी, पुनर्मुद्रण.
वर्ष: २०२०.
पृ. ३७-३९.
(पहिली आवृत्ती: १९७५. अन्य प्रकाशन)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा