शनिवार, १५ जुलै, २०२३

विकेंद्रीकरण: एक आकलन

प्रास्ताविक: आज १५ जुलै, गुरुवर्य कुरुंदकरांची जयंती.

माझ्या आयुष्याच्या ज्या वळणावर स्थैर्य समोर दिसते आहे, भविष्याच्या खिडकीतून पैसा, घर, संपत्ती, गाडी, उच्च पद, परदेशवारी इ. इ. साचेबद्ध जगणे समोर दिसते आहे अशा वळणावर कुरुंदकर मला सापडले. विचारांचे इंद्रिय जागे करणारे, एखाद्या मुद्द्याच्या अनेक बाजू बारकाईने तपासून त्यांचे गुण-दोष मांडणारे; अखेर त्यातील एक निवडावी लागते तेव्हा 'ती का निवडली' याचे विवेचन करतानाही त्यातील दोषांना नाकारण्याच्या दांभिकपणा न करण्याचे बजावणारे गुरुवर्य कुरुंदकर हे पहिले. त्यानंतर आणखी काही जणांची यात भर पडली तरी अग्रपूजेचा मान कुरुंदकरांचाच. त्या अर्थी माझ्या आयुष्यांत नि मोडक्यातोडक्या विचारांत त्यांचे स्थान अतिशय मोलाचे आहे.

शिवछत्रपतींप्रमाणेच अल्पायुषी ठरल्याने त्यांचे कार्य अपुरे राहिले असले, तरी मिळालेल्या आयुष्यात त्यांनी वैचारिक साहित्यात जी भर घातली ती अनमोल आहे. डावे नि उजवे यांनी - वेगवेगळ्या कारणासाठी - त्यांना दूर ठेवल्याने सुदैवाने त्यांचा देव बनला नाही. पण कुठल्याच कळपात सामील न होता आपल्या जिज्ञासेला स्वतंत्रच ठेवू पाहणार्‍या, आपल्या धडावरचे डोके वापरू इच्छिणार्‍या व्यक्तीला कुरुंदकर हे वाटाडे म्हणून नक्कीच सहाय्यभूत होतील. आज त्यांच्या स्मृतींचे स्मरण म्हणून हा एक वेचा..

---

विकेंद्रीकरणाचा आग्रहाने पुरस्कार करणाऱ्या जगातील सर्व विचारवंतांचे स्वरूप उदात्त अर्थाने धार्मिक होते. ख्रिश्चन धर्मात असणारी प्रेमाची, सेवेची, संयमाची, त्यागाची आणि साधेपणाची मोहिनी जशी युरोपीय विचारवंतांच्या मनावर होती, तशी संयमवैराग्याच्या कल्पनेची मोहिनी गांधीजींच्याही मनावर होतो. सर्वच धार्मिक विचारवंत भूतकाळात केव्हा तरी एकदा सत्ययुग होऊन गेले, असे कळत-नकळत गृहीत करीत असतात. त्या सुखमय समाधानी सत्ययुगाकडे पुन्हा एकदा जाण्याची या विचारवंतांना ओढ लागलेली असते. सर्व प्रकृतीचा जन्मदाता परमेश्वर असल्यामुळे प्राकृतिक अवस्था मनाच्या समाधानाला व नीतिमत्तेच्या उभारणीला पोषक आहे, असा यांचा ग्रह झालेला असतो.

लॉकच्या 'सामाजिक करारा'त राजसंस्थेच्या उदयापूर्वी जीवन सुखी व समाधानी गृहीतच केलेले होते. रूसोनेही प्राकृतिक अवस्थेतील जीवनात असणारे स्वाभाविक सुख व समाधान गृहीत केलेले होते. हे एका प्राकृतिक अवस्थेचे आकर्षक रंग मनामध्ये आकार धारण करू लागले, म्हणजे यांत्रिक सुधारणेला दूर असणारे खेडे आकर्षक वाटू लागते. ग्रामीण जीवनात वास्तविकतः नसलेला पण यांच्या कल्पनेने रंगविलेला साधेपणा, भोळेपणा, प्रेमळपणा त्यांना साद घालीत असतो. जे जीवन प्रकृतीला जितके जवळ असेल, तितके ते भौतिक संस्कृतीला, तसेच मानसिक संस्कृतीला दूर असेल. प्राकृतिक जीवनात प्रेरणा आणि वासना बलवान असल्यामुळे स्वार्थ व आक्रमण अधिक निर्भयपणे आविष्कृत होत असेल, यांची या मनाला कल्पनाही सहन होत नाही. ग्रामीण भागात अनेकदा सामूहिक रीया पूर्वनियोजित सार्वजनिक खून होतात, हे सत्य मान्य करण्याची या मनाची तयारी नसते.

जागर

माणूस हा मूलतः चांगला आहे, तो मूलतः नीतिमान व सद्गुणी आहे, ही गांधीजींच्या विचारातील आनुषंगिक कल्पना नाही. 'मूलतः सद्गुणी' ही भाषाशैली अधिक प्राकृतिक म्हणजे अधिक चांगुलपणा असणारी, अधिक नैतिक या गृहीताचा आविष्कार असते. येथून तेथून सर्वांचा आत्मा एक असून अज्ञानाचे कवच फोडले, की मूळ गाभा सच्चिदानंदरूप आहे, हे आत्म्याचे धार्मिक तत्त्वज्ञान एक वैज्ञानिक सत्य म्हणून मान्य करावे. म्हणजे मग माणसाचे मूलभूत चांगलेपण एक वादरहित सिद्धान्त वाटू लागते, आणि मग प्रकृतीकडे अधिक जवळ सरकण्याची कल्पना समर्थनीय होते. लॉक, रूसो यांनी कल्पिलेले 'करारा’पूर्वीचे जीवन आणि गांधीजींच्या कल्पनेतले रामराज्य दोहोंचेही स्वरूप राजकारणातल्या रोमँटिसिझमचे आहे. कवितेतल्या रोमँटिसिझमचीही रूसोतच जन्मभूमी होती.

गांधीजींच्या अनुयायांचे नेहमीच दोन गट राहिले. एक गट काँग्रेस पक्षाच्या राजकारणात अग्रभागी होता. याही गटाने विकेंद्रीकरणाच्या कल्पनेला तोंडाने सतत होकार भरला. पण या मंडळींना विकेंद्रीकरणाची कल्पना मनातून कधीच पटलेली नव्हती. युरोपच्या समाजजीवनाच्या अभ्यासामुळे केंद्रीकरणाचे धोके या मंडळींना दिसत होते. पण मनातून कुठेतरी केंद्रीकरणाच्या गरजाही जाणवत होत्या. भांडवलदारांना प्रचंड उत्पादन करून प्रचंड नफा मिळवायचा असतो, हा भाग खोटा नव्हे. विज्ञान नवनवी विकसित यंत्रे अस्तित्वात आणते, हेही खोटे नव्हे. पण या दोन्ही बाबी एकत्र आल्या, तरी केंद्रीकरण समाजीवनात साकार होऊ शकत नाही.

मार्क्सने कितीही जरी सांगितले, तरी Surplus (सरप्लसची ) निर्मिती उत्पादनप्रक्रियेत नसते, ती उत्पादनाच्या जोडीला चालू असणाऱ्या खपाच्या प्रक्रियतेही असते. भांडवलदार प्रचंड उत्पादन करून प्रचंड नफा मिळविण्याची जिद्द मनात धरू शकतो. कारण हे उत्पादन खपणार आहे, याची त्याला खात्री असते. खपाची हमी- वेगळ्या शब्दांनी सांगायचे, तर बाजारात असणारी मालाची मागणी- केंद्रीकरणाचा खरा आधार असते. अशी मागणी नसती, तर वैज्ञानिक शोध प्रयोगशाळेत शुद्धज्ञान म्हणून पडून राहिले असते. उत्पादनाला बाजारात मागणी असते. कारण अधिक उत्पादन ही समाजाची गरज असते. सामाजिक गरजेच्या पोटी अर्थव्यस्था केंद्रित होत जाते, आणि ही गरज सर्वच समाजात असते. मागासलेल्या समाजात ज्या वेळी पहिल्यांदा हक्क प्राप्त होऊ लागतात, त्या वेळी मागणीचे स्वरूप नेहमीच वाढलेले असते.

आधुनिकीकरणाशिवाय देश संघटित व केंद्रित करता येणार नाही. देश संघटित आणि केंद्रित करायचा असेल, तर उत्पादनव्यवस्थेचे केंद्रीकरण टळणार नाही, हेही या जाणत्या नेत्यांना दिसत होते. युरोपमध्येही राष्ट्रवादाच्या जाणिवा आणि केंद्रीकरणाच्या जाणिवा हातात हात घालून वाढले्ल्या दिसतात. लक्षावधी चौरस मैल अस्ताव्यस्त पसरलेला एखादा भूप्रदेश एकराष्ट्रीयत्वाच्या जाणिवेने केंद्रित करायचा असेल, राष्ट्र म्हणून संघटित व्हायचे असेल, तर केंद्रीकरण वाढले पाहिजे. आधुनिक उत्पादनही वाढले पाहिजे. ही गरज सर्वांना दिसत होती. प्राचीन भारताच्या इतिहासात भारतीय समाजाचा फुटीरपणा, विस्कळितपणा हाच ठिकठिकाणी पराभवाला कारणीभूत झालेला आहे. विकेंद्रीकरणामुळे जीवनातला विस्कळितपणा वाटतो, फुटीरपणा वाढतो. हे घट्ट देण्यास कोणत्याच जागरूक नेत्याची तयारी नव्हती. आणि केंद्रीकरणामुळे व्यक्तिस्वातंत्र्याचा जो संकोच होतो, तोही या नेत्यांना नको होता. या दोन्हींचा समतोल कसा साधता येईल, या दृष्टीने काँग्रेसपक्षाच्‍या राजकारणात अग्रभागी असणान्या मंडळींनी सदैव प्रयत्न केला. इतिहासात नडलेला फुटीरपणा नको, आपण बलवान संघटित राष्ट्र झाले पाहिजे, पण केंद्रीकरणातील व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच- म्हणजे नवी गुलामी - नको, ही विचार करण्याची दिशा तेव्हाही बरोबर होती, आजही बरोबर आहे, असे मला वाटते.

गांधीजींच्या अनुयायांचा दुसरा गट पूर्णपणे मनाने गांधीजींशी समरस झालेला असा होता. राजकीय वस्तुस्थितीचे आकलन या गटाला कधीच झाले नाही, याविषयी तक्रार करण्याचे कारण नाही. कारण ही मंडळी एका स्वप्नातच जगणारी होती. अजूनही त्याच स्वप्नरंजन संपलेले नाही. काव्यात काय, अगर राजकारणात काय, रोमँटिक मंडळींचा एक गट असतोच. संस्कृतीच्या ध्येयजीवनात रोमँटिसिझमचे महत्व अमान्य करून चालणार नाही. प्रेरक ध्येयवाद, चोखंदळ सौदर्यदृष्टी, व्यक्तीचे हक्क, व्यक्तीची प्रतिष्ठा आणि व्यक्तिस्वातंत्र्य यांचा उद्घोष व पुरस्कार रोमँटिसिझम नेहमीच करीत असतो. ते त्याचे एक सामर्थ्यस्थान आहे. या सामर्थ्यस्थानाबरोबर त्याच्या काही मर्यादा आहेत. राजकीय तत्त्वज्ञान व्यवहार्य आणि शक्य असावे लागते; नसता त्या तत्त्वज्ञानाला व्यवस्थित कार्यक्रमच प्राप्त होत नाही, हे रोमँटिक मंडळींना समजावून सांगणे फार कठीण आहे. सार्वजनिक जीवनात निर्भेळ विकेंद्रीकरण हक्कांची जागृती झाल्यानंतर शक्य नसते. समाज विविध उत्पादनाची वाढ मागत असताना त्यातून केंद्रीकरण अटळ असते, व फुटीरपणा, विस्कळितपणा राष्ट्र म्हणून अस्तित्वाला हानिकारक असतो, हे या स्वप्नाळूंना कुणीही झाले, तरी समजावून कसे सांगणार? जेथे भूदानाची चळवळ ही चिनी आक्रमणाविरुद्ध भारताच्या संरक्षणाची सर्वात मोठी व्यवस्था आहे, या ठिकाणापासून विचार मांडण्यास आरंभ होतो, तेथे वस्तुवाद बोलून काय उपयोग ?

केंद्रीकरणातील धोके सर्वाच्याच डोळ्यांसमोर उघड होते. विकेंद्रीकरणाची कल्पना स्वयंसिद्ध व निर्भेळ चांगली, असे समजून तिचा खोटा जयघोष करणे कुणालाही इष्ट नसले, तरी संपत्तीचे केंद्रीकरण अनंतकाळ चालू ठेवणे, तसे ठेवता येणे शक्य नसते. ९९ टक्के जनतेला सातत्याने दरिद्री ठेवावे, व एक टक्काही नसणार्‍या काही मूठभरांच्या हाती सर्वांची पिळवणूक करण्याच हक्क कायमचा द्यावा, ही कल्पना हितसंबंध गुंतलेल्यांच्याखेरीज इतर कुणी मान्य करणे शक्य नव्हते. आशिया-अफ्रिकेत राष्ट्रीय स्वातंत्र्याचा प्रश्न हा नुसता स्वातंत्र्याचा प्रश्न नाही, तो भाकरीचाही प्रश्न आहेच, असे पं. नेहरू वारंवार म्हणतच असत. स्वातंत्र्यलढ्याच्याच काळात राष्ट्रीय स्वातंत्र्याला समाजवादी आशय देण्याची प्रक्रिया चालत आलेली होती. पण हा झाला ध्येयवादाचा भाग. जे देशाला स्वातंत्र्य मिळवू निघाले होते, त्यांच्यासमोर देश या नावाची कोणतीही केवळ अमूर्त कल्पना नव्हती, तर देशाच्या स्वातंत्र्यात सर्व हाडामाणसांच्या स्वातंत्र्याचा आशय गृहीतच होता.

पण ध्येयवादाला वास्तवाच्या गतिसूत्राची अजून एक बाजू आहे. अर्थशास्त्रदृष्टयाच पिळणुकीवर आधारलेली समाजरचना एका मर्यादेनंतर रुद्धगती होत असते. एकीकडे कारखाने वाढतात, आणि प्रचंड संपत्ती काही जणांच्या हातात केंद्रित होते. दुसरीकडे प्रचंड मानवसमूह दरिद्री व उद्ध्वस्त होतो. सर्व समाजाचे शोषक व शोषित या दोन गटांत विभाजन होते, असे आपण म्हणतो. मध्यमवर्ग ही संक्रमणकाळाची निर्मिती असून तो मावळत जातो, व आर्थिक संघर्ष निर्णायक अवस्थेला येऊन पोहोचतो, ही सर्वच समाजवाद्यांची एक लाडकी कल्पना आहे. पण प्रत्यक्षात असे कधी घडू शकत नाही. संपत्तीचे केंद्रीकरण होण्यासाठीसुद्धा उत्पादनाची विक्री व्हावी लागत असते. भांडवलशाही समाजाच्या आरंभावस्थेत एकीकडे संपत्ती वाटते, तर दुसरीकडे दारिद्र्य वाढते, ही गोष्ट खरी आहे. पण कोणत्याही अर्थव्यवस्थेत हे शाश्वत काळ टिकणार सत्य असू शकत नाही. कारण काही काळानंतर दारिद्र्याच्या विकासाबरोबर समाजाच्या क्रयशक्तीच र्‍हास होऊ लागतो व र्‍हास मंदीच्या फटक्याच्या रूपाने दिसू लागतो. म्हणून भांडवलशाही समाजव्यवस्थेलासुद्धा दुसर्‍या टप्प्यात स्वतःवर काही बंधने लादून घ्यावी लागतात. जनतेच्या क्रयशक्तीचा विकास करण्याची जबाबदारी स्वतः जगण्यासाठी म्हणून का होईना, पण भांडवलशाहीला घ्यावीच लागते.

- oOo -

पुस्तक: जागर.
लेखक: नरहर कुरुंदकर.
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस.
आवृत्ती तिसरी.
वर्ष: १९९४.
पृ. ९५-९९.

या वेच्यामध्ये मी लहानसा बदल केला आहे. यात दोन ते तीन दीर्घ परिच्छेद होते. मोबाईलसारख्या लहान स्क्रीनवर हा सलगपणे वाचणे जिकीरीचे ठरते.त्यामुळे या परिच्छेदांचे मी दोन-तीन लहान परिच्छेद केले आहेत. मूळ मजकुरात वा वाक्यांच्या क्रमवारीमध्ये काही बदल केलेला नाही वा भरही घातलेली नाही.

---


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा