रविवार, ७ एप्रिल, २०२४

स्वातंत्र्य आले घरा (पूर्वार्ध)

नव्या शतकाच्या सुरुवातीला कामगार वर्गातील जागृती आम्ही पाहिली. या काळात माणूस, यंत्र आणि संपत्ती यांच्या परस्परांशी असलेल्या नात्याची जाणीव आम्हाला होऊ लागली, सत्य परिस्थिती समजू लागली; समजलेले सत्य कडू होते. आम्हाला माहीत असलेले शांत जीवन या सत्यामुळे उधसले. त्याने आम्हाला अस्वस्थ केले.

मंतरलेले बेट

वर्तमानपत्रात त्रासदायक घटनेची बातमी नाही, असा आठवडा जाईना. पिट्सबर्गला संपाचा प्रयत्न, कापडाच्या गिरणीत लहान मुले राबविल्याबद्दल निषेध, कोळशाच्या खाणीतील मजूरवर्गात आणि त्यांच्या कुटुंबांत पसरलेल्या क्षयरोगाबाबतचा वृत्तांत, असले लेख नियमाने प्रसिद्ध होत आणि सगळे वातावरणच दूषित झाले आहे, असे वाटे.

‘कामगार’, ‘भांडवल’, ‘औद्योगिक क्रांती’, ‘संप’, 'रोजगार' असले शब्द जिथे-तिथे कानी पडू लागले. आमच्या दुकानांतसुद्धा. अर्थातच हॅडले या गृहस्थांना सर्व प्रश्नांबद्दल काही बोलायचे असे. त्यांच्या बोलण्यावर आजोबा असे काही भडकत की, त्या दोघांचे वाद माझ्या कायमचे स्मरणात राहिले. बरे, त्या दोघांची खडाजंगी माझ्या पथ्यावरच पडली. या सर्व प्रश्नांबाबत माझ्या मनात अगत्य निर्माण झाले.

आता मजा अशी की, आजोबा आणि हॅडले या दोघांचे बहुतेक सर्व प्रश्नांबाबत एकमत होई. त्यांच्यात मतभेद होई, तो सुधारणा कोणत्या पद्धतीने व्हावी याबाबतीत. आठ-नऊ वर्षांच्या कोवळ्या मुलांनी कापडाच्या गिरणीत बारा तास मशीनशी काम करणे मुळीच योग्य नाही, हे आजोबांना मान्य होते. याहीपुढे जाऊन ते म्हणत की, अमेरिकेत लहान मुलांकडून असे कामच करून घेऊ नये. कामगार स्त्रियांना संरक्षण देणारा कायदा असावा आणि लायक कामगारांना जीवनमानास आवश्यक इतके वेतन मिळाले पाहिजे, हेही त्यांना मान्य होते. अशा मुद्द्यांवर आजोबांचे आणि हॅडले यांचे एकमत होई. पण उपाययोजनेबाबत त्या दोघांच्यात मतभेद होई. आजोबा म्हणत, “उद्योगपतींना योग्य वेळी या समस्यांचे आकलन होईल, आणि ते आवश्यक त्या सुधारणा करतील.”

हॅडले या मुद्द्यावर वाद घालीत. ते म्हणत, “कामगार वर्ग संघटित होऊन त्यांची युनियन झाली तरच धडगत आहे. एरवी हे उद्योगपती जागे व्हायचे नाहीत, त्यांची मने हलायची नाहीत. संपत्तीच्या लोभाने आंधळे झालेले लोक हे! त्यांना काय? संघटनेची शक्ती त्यांना दाखविली पाहिजे. संघटनेशिवाय तरणोपाय नाही. संघटित होऊनच केवळ भागणार नाही, इंचाइंचावर लढा दिला पाहिजे, फार वर्ष जावी लागतील हे व्हायला.”

आणि काय चालले आहे याची जाणीव आजोबांना व्हावी, म्हणून हॅडलेसाहेब औद्योगिक क्रांतीवर बोलत. यंत्राच्या आगमनामुळे कामगार कसा उखडला गेला आहे, त्यामुळे काय समस्या उभ्या राहिल्या आहेत, याचे अत्यंत काळजीपूर्वक विवरण करीत. या समस्या लवकर सुटणाऱ्या नाहीत, कारण इथून पुढे तर यंत्रांना फार महत्त्व येणार आहे, असे सांगत. त्यांच्या मते उद्योगपती लोभी असले तरी त्यांना दोष देता येणार नाही. परिस्थितीचा फायदा कोणीही घेणारच. माणूसस्वभाव जमेला धरला तर मॉर्गन, रॉकफेलर्स, कार्नेजी आणि फ्रिक हे उद्योगपती खुशीने शरणागती पत्करणार नाहीत. कामगारांनी लढा हा दिलाच पाहिजे.

‘लढा’ हा शब्दप्रयोग आजोबांना पसंत नव्हता. कशाही परिस्थितीत शांतात राखलीच पाहिजे, असे त्यांचे म्हणणे होते.

आता लढ्याबद्दल माझे मत वेगळे होते. शिवाय हॅडले बोलत, त्यापैकी बऱ्याच गोष्टी मला काही वावग्या वाटल्या नाहीत. मी आता कळता झालो होतो, हायस्कूलमध्ये जाऊ लागलो होतो. रोज सकाळी मला आठवण होई की, मला स्वतंत्र करील असे सत्य कुठे तरी दडलेले आहे. त्याचा शोध घेतला पाहिजे. मग मी शोधू लागलो, पुष्कळ वाचन करू लागलो.

लहानपणी मला चित्रांची पुस्तके फार आवडत, डोरीची चित्रे असलेले डान्टेचे ‘इन्फर्नो’ होते, तसली. या पुस्तकातील मजकूर मी कधी वाचला नाही, पण नरकयातनांची चित्रे बघत तासन् तास घालिवले. उलट आता मी पुस्तकांतले शब्द वाचू लागलो. चित्रे असली तरी ती माझ्या कामाची नव्हती. माझ्या वाचनाला पद्धत अशी काही नव्हती. ‘हुकु चुचु टोला’ असे चाले. हाती पडेल ते सगळे मी वाचून काढी, वर्तमानपत्रे, नियतकालिके, पुस्तके – सगळे !

‘काउंट ऑफ मॉन्टे क्रिस्टो’ शेवटी तळघरातून कसा निसटला, हे मी वाचले. आणि न्यूयॉर्कमधले घरकामाचे गडी महिन्याला सोळा डॉलर मिळवितात हेही माहीत करून घेतले. डॉन क्विक्झोट आणि यांकी यांच्यासमवेत आपल्या बायकांचे रक्षण करीत आणि पवनचक्क्यांवर हल्ले चढवीत, मी जुन्या स्पेनमधून प्रवास केला. शेरलॉक होम्सबरोबर मी रहस्यभेद केले, आणि जे गुल्ड व जिम फिस्क या दोन करोडपतींनी लबाडी करून सोनेबाजार आपल्या फायद्यासाठी कसा राबविला; आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेत कशी घबराट निर्माण झाली हेही जाणून घेतले. अमेरिकेतील कामगार आपले कामाचे तास दहा, बारा किंवा जास्त तासांवरून आठ तासांवर आणण्यासाठी मागणी करीत आहेत यासंबंधी मी वाचन केले. कामगार कामावर असताना झालेल्या अपघाताबद्दल नुकसानभरपाई मिळावी म्हणून काही संघटना झगडत आहेत, यासंबंधीही वाचले. ‘ट्रेझर आयलंड’, ‘डॉक्टर जेकेल अँड हाइड’ आणि ‘दि कॉल ऑफ वाइल्ड’ ही पुस्तकेही मी वाचून काढली. बेकारी भत्ता आणि म्हातारपणाबद्दल पेन्शनची मागणी करणाऱ्या ‘एक्सट्रीमिस्ट्स’ संबंधी, कामगार संघटना करणाऱ्या ‘एजिटेटर्स’ संबंधी ‘क्रॅकपॉट्स’ आणि ‘होपलेस आयडियालिस्ट्स’ संबंधीही वाचन केले. मी ‘डेव्हिड हर्म’ वाचले आणि जे. पी. मॉर्गन या माणसाने सिव्हिल वॉरच्या वेळी दोष असलेल्या बंदुका सरकारला विकून नफा कसा मिळविला हेही वाचले.


मी माझ्या कल्पित कथांत सत्यकथा मिसळल्या. सगळ्यांतले थोडेथोडे वाचले आणि तरीही वाचण्याचे पुष्कळ बाकी राहिले. गाजलेल्या अशा जुन्या शेकडो पुस्तकांबरोबरच चालू अस्थिर काळाचे दर्शन घडविणारी रोज नवी-नवी अशी पुस्तके सारखी बाहेर पडत होतीच की. १९०१ मध्ये ‘हिस्टरी ऑफ टम्मानी हॉल’ हे न्यूयॉर्क सिटी पोलीसमधल्या अनाचाराला वाचा फोडणारे गुस्ताव मेयर्सचे पुस्तक प्रसिद्ध झाले.

त्याच वर्षी सॅन फ्रान्सिस्कोमधल्या फ्रॅन्क नोरीस नावाच्या एका तरुण लेखकाने ‘दि ऑक्टोपस’ हे पुस्तक प्रसिद्ध केले. अमेरिकेतील रेल्वेमार्गामुळे शेतकऱ्यांची नरडी कशी दाबली जात आहेत, याचा स्फोट या पुस्तकात केला होता. या पुस्तकामुळे रेल्वेची चौकशी सुरू झाली. १९०३ मध्ये याच लेखकाने ‘दि पिट्’ नावाचे पुस्तक लिहिले. शिकागो धान्य-बाजारात चाललेल्या लबाडीचा स्फोट या पुस्तकात केला होता. शिकागो धान्य बाजाराचीसुद्धा चौकशी सुरू झाली. या चौकशीमुळे मोठी खळबळ उडाली. चौकशीत बाहेर आलेल्या गोष्टीमुळे लोकांत विलक्षण घबराट झाली.

१९०४ साली इडा टरवेल नावाच्या बाईने ‘स्टँडर्ड ऑइल कंपनीचा इतिहास’ प्रसिद्ध केला. त्यातही कंपनीच्या कारभारात अनाचार कसा आहे, हे तिने लोकांपुढे मांडले. न्यूयॉर्कमधल्या लिंकन स्टीफन्स या तरुण पत्रकाराने ‘शेम ऑफ दि सिटीज’ हे पुस्तक लिहून सर्व देशभर असलेल्या नगरपालिकांतून कसा भ्रष्टाचार चालला आहे हे दाखवून दिले. १९०६ साली ‘द जंगल’ या पुस्तकाने सर्वत्र खळबळ उडवून दिली. अॅप्टन सिंक्लेअरने या पुस्तकात शिकागोमधल्या मांसधंद्यात चाललेला भ्रष्टाचार उघड केला होता. लगेच याही प्रकरणाची चौकशी झाली. देशाबाहेरच्या वर्तमानपत्रांतूनसुद्धा या चौकशीच्या बातम्या झळकल्या.

ही सगळीच पुस्तके मी काही वाचली नव्हती, पण त्याच्यासंबंधी वर्तमानपत्रांत आलेला मजकूर वाचला होता. शिवाय आमच्या दुकानात येणारा प्रत्येक माणूस या पुस्तकांवर चर्चा करी– मिस्टर हॅडले आणि त्यांच्याबरोबर पोलीस, बंबवाले, इतर गिर्‍हाइकेही. नाना मते मांडली जात, अंत नसलेली चर्चा होई. छापलेल्या शब्दांत केवढे सामर्थ्य असते, याची जाणीव मला आयुष्यात प्रथमच होत होती.

पुढच्या काही वर्षात आणखी अशी पुस्तके प्रसिद्ध झाली. कथालेखनाने लोकप्रियता मिळविलेल्या जॅक लंडन या लेखकाने १९०७ साली ‘दि आयर्न हिल’ हे पुस्तक लिहिले. पुढे येणाऱ्या पंचवीस वर्षात अमेरिका कशी असेल याचे चित्रण त्याने या पुस्तकात केले होते. सगळा देश मक्तेदारीच्या कह्यात गेला आहे, लोकशाही संस्था आणि घटनेने दिलेली स्वातंत्र्ये धुडकावून लावली गेली आहेत, असे हे चित्र होते. या पुस्तकाचा लोकांच्या मनावर फार खोल ठसा उमटला; त्यांना सत्य परिस्थितीची जाणीव झाली. परिस्थिती भीतीदायक होती.

१९१० मध्ये ‘हिस्टरी ऑफ दि ग्रेट फॉरच्युन्स’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले. गुस्तोव मेयर्सच्या या पुस्तकाने सेज, व्हेन्डरबिल्ट फ्रिक, कार्नेजी, हिल या नावांविषयी असलेल्या आदराच्या फाडून टिरगाण्या केल्या. पानापानांतून सत्यकथा देऊन या पुस्तकाने सिद्ध केले होते की अनाचार, बनवाबनवी, बेकायदेशीर कृत्ये, लबाडी केल्यामुळे यांचे नशीब फळफळले होते.

या पुस्तकांबरोबरच इतर पुस्तकेही प्रसिद्ध झाली. पण काळाचे प्रतिबिंब असलेल्या पुस्तकांबद्दलच लोक बोलत. अमेरिकन जीवनाचा एक हिडीस भाग या पुस्तकांनी लोकांना दाखविला होता. आता करोडपतींबद्दल आदर राहिला नव्हता. शंकास्पद मार्गांनी पैसा केलेल्या कॉर्नेजीसारख्या माणसाने ‘सार्वजनिक वाचनालया’ला देणगी म्हणून दिली, तर त्या गोष्टीकडे आम्ही संशयाने बघू लागलो. आम्हाला अमेरिका स्वतंत्र झालेली हवी होती. अमेरिकन जनतेची मालकी असलेली अमेरिका आम्हाला हवी होती. मूठभर लबाड लोकांची मालकी असलेली अमेरिका नव्हे.

पुस्तके लिहून अनाचाराला वाचा फोडणाऱ्या या काळात सत्ता हातात ठेवणाऱ्या मोठमोठ्या उद्योगधंद्यांच्या विरुद्ध लोकमत गेले होते. लोक आणि उद्योगधंदे या दोन्हींचे नाते जोडले जाईल, असे काही लोकांना हवे होते. अशा परिस्थितीत मोठ्या उद्योगधंद्यांसंबंधी लोकांच्या मनात असलेला आदर पार नाहीसा झाला. विश्वास उडाला तो उडालाच. मग काही मोठ्या धंदेवाल्यांनी जनता-संपर्क अधिकारी नेमले आणि लोकांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला.

या काळात कामगार अधिक स्पष्टवक्ते बनले. त्यांच्या संघटना निर्माण झाल्या. शक्तिशाली बनत गेल्या. या यंत्रयुगात आपल्याला कुठे जागा आहे, हे माणूस शोधत होता. उद्योगधंद्यांशी आपले चांगले नाते असावे, अशी त्याची धडपड होती. आर्थिक सत्ता बळकावून बसलेले लोक ती हातची सोडायला तयार नव्हते, त्यामुळे अनेक जोरदार झगडे झाले.


या सगळ्यामुळे आमचे आजोबा मात्र अस्वस्थ झाले होते. त्यांच्या मते अशा चळवळींमुळे समाज बिघडतो. पण मिस्टर हॅडलेंचे मत उलटे होते. ते म्हणत, हे सगळे बऱ्यासाठीच चालले आहे. उद्योगधंदे, यंत्रे वाईट नाहीत; त्यांच्यामुळे माणूस रगडला जाणार नाही, एवढी काळजी मात्र घेतली पाहिजे. माणसांनी जर यंत्रांना आपल्यावर स्वार होऊ दिले, तर भाषणस्वातंत्र्य, धर्मस्वातंत्र्य, लेखनस्वातंत्र्य यांचा उपयोग काय?

आजोबांना हे बोलणे मुळीच पसंत नव्हते, पण मला मात्र मिस्टर हॅडलेंचे म्हणणे पटे. कारण पुष्कळशा गोष्टी मी वाचल्या होत्या. शिवाय अगदी आमच्याच शेजारी स्वातंत्र्य गमावून बसलेली दोन माणसे माझ्या पाहण्यात आली. हे घडले ते आजोबांच्या पायामुळे.

- (पूर्वार्ध समाप्त) -

पुस्तक: मंतरलेले बेट.
लेखक: व्यंकटेश माडगूळकर.
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस.
चवथी आवृत्ती, चवथे पुनर्मुद्रण.
वर्ष: २०२३.
पृ. ८७-९१.

       << उत्तरार्ध

---
संबंधित लेखन:
वेचताना... : स्वातंत्र्य आले घरा >>
न स्त्री स्वातंत्र्यमर्हती>>
---


संबंधित लेखन

२ टिप्पण्या: