दवबिंदूच्या एवढ्याशा आयुष्यात कोवळ्या सूर्यकिरणांचं इंद्रधनुष्य चमकून जावं, नदी उगम पावावी, डोंगरांनी ताठ मानेनं संसार थाटावेत, उत्तम जुळवलेले तंबोरे छेडले जात असताना त्यांतून फुलणाऱ्या गाण्यासारखी, समुद्राच्या गाजेच्या सुरावर किनाऱ्यावर येणा-जाणाऱ्या लाटांच्या फेसाच्या रंगीबेरंगी फुलांची पखरण होत राहावी, अशा असंख्य निर्मितीशी कसलाही संबंध नसताना, हे सारं वैभव वेळोवेळी भोगण्याचे योग माझ्या आयुष्यात अनेकदा येत राहिले आणि ‘अनंत हस्ते कमलावराने, देता किती घेशिल दो कराने’ अशी संधी माझ्या आयुष्यात वरचेवर मिळतच राहिली. पण त्याचबरोबर त्याबद्दलची आपली कृतज्ञता दुबळी असल्याच्या जाणिवेनं, आनंदाश्रूतच दुःखाश्रूही अधूनमधून मिसळत राहिले.
आपण लहान बाळाचा मुका घेतो, कुणावर तरी प्रेम करतो, ते आपल्या आनंदात भर घालण्यासाठी! ही नैसर्गिक श्रीमंती वाढवत आणि भोगत राहण्यासाठी! जीवनाचा हाच अर्थ आहे, श्वासोच्छ्वासाची हीच परिणती आहे, प्राणिमात्राची ही गरज आहे, हाच धर्म आहे. ‘धारयते इति धर्मः।’ मग स्वतःला सर्वश्रेष्ठ (म्हणजे जास्तीत जास्त भोग घेऊ शकणारा का?) प्राणी म्हणवून घेण्याचा गर्व माणसात कुठून, कधी आणि कां शिरला? या कलीच्या अस्तित्वाच्या जाणिवेतूनच आपल्या पूर्वजांनी आपल्या या युगाला ‘कलियुग’ हे नाव दिलं का? मग बाकीच्या युगांचं प्रयोजनच काय? बाकीची युगं हा केवळ कल्पनाविलासच आहे की त्यामागे दुसरा काही अर्थ लपलेला आहे?
मनुष्यप्राण्यातल्या या गर्वाच्या स्पर्शानं, वातावरणच कां चांदणंदेखील धुरकट होऊन जातं, फुलं कोमेजायला लागतात, तेज मावळायला लागतं, कोरडं कोरडं वाटायला लागतं. ओलावा संपत येतो, नाती ठिसूळ होऊ लागतात. आपापल्या पायांखाली मातीचे वेगवेगळे ढिगारे आणि डोक्यावर तुटक्याफुटक्या आकाशाचे तुकडे! चहूकडून त्या गर्वाने पोखरलेलं अर्थहीन अस्तित्व! एरवीही या उघड्या-नागड्या जगात तसे आपण एकटे एकटेच असतो, आपापल्या स्वर्गाची निर्मिती करण्यात स्वतःला गुंतवत राहतो. हा स्वर्ग तरी मग कसला? अनेकदा जणू बलात्कारातून जन्माला आलेला, विरजलेलं, पराभूत आयुष्य जगत राहणारा!
‘शिंग फुकिले रणी, वाजतात चौघडे / सज्ज व्हा उठा उठा, सैन्य चालले पुढे’ अशी गाणी म्हणत, ४२ सालच्या स्वातंत्र्यलढ्यातल्या त्या सैन्यात भरती झालेलं माझ्यासारखीचं तारुण्य नेत्यांमागून सीमेपर्यंत उत्साहात जाऊन पोहोचलं, प्राणपणाने लढलं. ते स्वातंत्र्य मिळाल्याच्या धुंदीत क्षणभर नाचलं-बागडलं आणि मग मागे वळून पाहताना त्याला प्रश्न पडला, ‘हेच का स्वातंत्र्य?’
अचानक सुरेश भटांची ओळ आठवली,
हेच का स्वातंत्र्य, ज्याचे गीत आम्ही गाइले ?
हेच का ते प्रेत, ज्याला रक्त आम्ही पाजिले?
युद्धानंतर दोन्हीकडच्या तरुण सैनिकांना या एकाच प्रश्नाने जाग येणार होती, तर मग ते एकमेकांशी लढले कशाला? नेत्यांच्या राज्याभिषेकाचे सोहळे दुरून फक्त पाहायला आणि धारातीर्थी पडलेल्या भाऊबंदांचे उद्ध्वस्त संसार पाहून केवळ अश्रू ढाळायला?
धर्म म्हणजे विशिष्ट वागणुकीच्या चौकटीत जगण्याची सक्ती. धर्म, राष्ट्र असल्या नावांनी मनुष्यजातीची विभागणी करताना नेहमीच चुकीचे निकष लावले गेले. खरं तर दोन्हीकडच्या नेत्यांचा धर्म एक असतो आणि दोन्ही सैन्यांचा धर्मही एकच असतो. नेत्यांच्या पदरी मान-सन्मान पडतात आणि सैन्यांच्या पदरी दुर्भाग्य! तरीही ते सैनिक शहाणे होत नाहीत, डोळे उघडून वास्तवाकडे पाहत नाहीत. लढण्याच्या धुंदीत आपण एकमेकांना, स्वधर्मीयांनाच मारत असतो, आणि ‘नेते’ नामक परधर्मीयांना सत्ताधारी बनवून स्वतःच्या पदरी हे भोग ओढवून घेतो, हेच त्यांना दिसत नाही, कळत नाही, उमगत नाही.
आपण आपला धर्म म्हणून जे काही गोंजारले, जीवनमूल्यं म्हणून ज्यासाठी जिवाचा इतका आटापिटा केला, ते सगळंच्या सगळं धिक्कारावं लागण्याएवढं मोठं दुःख दुसरं कोणतं असेल? असह्य यातना याहून मोठी कोणती असेल?
एकेकाळच्या मराठे-मुसलमानांच्या किंवा अरब-तुर्की लोकांच्या झालेल्या लढायांचा इतिहास पाहिला तर काय दिसते? अरबांच्या जीवनात किंवा व्यक्तित्वात काळा-पांढरा, लाल, निळा असे ठळक रंग फक्त असत. त्यात भेसळ किंवा छटा यांना स्थान नव्हतं. बाह्यरूप आणि अंतरंग असा भेदभाव नव्हता. खरं तरी किंवा खोटं तरी, शत्रू तरी किंवा मित्र तरी, बस्स! एक घाव, दोन तुकडे. कीस काढत बसणं, शब्दच्छल वगैरे बारकावे नव्हते. कल्पनाविश्व नावाची चीजच नव्हती. मृत्यू ही त्यांच्या दृष्टीनं नैसर्गिक गोष्ट होती, पण आत्महत्या ही संकल्पना त्यांच्या आवाक्याबाहेरची होती.
इतर प्राण्यांसारखाच एक मनुष्यप्राणी! समाज, संस्कृती वगैरे कल्पनाही त्यांच्या आवाक्याबाहेरच्याच होत्या. वनस्पती सृष्टी म्हणजे उभी असलेली जिवंत झाडं तरी किंवा सुकून जमिनीवर पडलेली, त्या झाडांची हाडं तरी. आपण खुशाल त्यांना ‘लाकडं’ म्हणतो. हीच एकेकाळी, अगदी परवा-परवापर्यंत जिवंत होती, बहरून ताठ उभी होती, श्वासोच्छ्वास करीत होती, याची जाणीवही आपल्या मनात शिल्लक राहिलेली नसते.
खरं तर प्राणिसृष्टीच्या आधीची वनस्पती सृष्टी. म्हणजे एका अर्थी हे आपले पूर्वज. पण याचं किती म्हणून विस्मरण आपल्याला व्हावं! झाडं तोडणं, पाडणं, जाळणं वगैरे कृतीमागे कोणतीही पापभावना आपल्या मनात उद्भवत नाही. याचा अर्थ इतिहासाचं आपलं ज्ञानही उथळच आहे. मनुष्यप्राण्यांची एकेकट्यांची कुटुंब, मग त्यांच्या टोळ्या, मग छोटी-मोठी राज्यं, त्यांची आपापली सत्तापिपासा आणि द्वेष-मत्सरापोटी एकमेकांशी झडलेली युद्धे वगैरेंची जमेल तेवढी सुसंगती जमवत केलेली टिपणं म्हणजे आपला इतिहास. सर्वसामान्यांच्या दृष्टीनं, शालेय शिक्षणातलाही एक दुय्यम विषय. त्याच्या खास अभ्यासानं फार तर एखाद्याला त्या विषयाचा प्राध्यापक होण्याची संधी लाभेल. पण रोजच्या जीवनात त्या ज्ञानाचा उपयोग करण्याची आपल्याला गरजच भासत नसते. माणसाच्या इतिहासाचीही आपल्याला गरज नसते, तर जीवसृष्टीच्या इतिहासाचा प्रश्नच कुठे उद्भवणार?
बुद्धिबळाच्या खेळात राजा वजिरापासून प्याद्यांपर्यंत माणसंही असतात आणि हत्ती-घोडे-उंट अशी जनावरंही असतात. राजाचं बळ खरं तर सर्वांत अधिक, पण छोटी छोटी प्यादी किंवा ती जनावरं त्याला शह देऊन अडचणीत आणू शकतात. म्हणूनच हा बुद्धिबळातला शर्यतीचा पट ज्या कुणी कल्पिला, त्याने मित्र आणि शत्रू ढळढळीत काळ्या आणि पांढऱ्या अशा दोन रंगात स्पष्ट केले आणि त्यांची त्यांची फौजही त्यांच्याच रंगात अगदी समबळाची तयार केली. खेळ संपला की क्षणापूर्वी ज्या एकमेकांच्या कट्टर शत्रू होत्या, त्या पांढऱ्या आणि काळ्या सोंगट्या, एकाच खोक्यात कशाही वेड्यावाकड्या भरून ठेवल्या जातात. मग कधीतरी पुन्हा खेळण्याची बुद्धी होईपर्यंत त्यांना पटावर नाचवली जाणारी कृत्रिम लाकडी खेळणी यापलीकडे किंमत तर नसतेच, पण प्याद्यापासून राजापर्यंतचा दर्जाही नसतो, निश्चित स्थानही नसते. कुणालाही कुणाच्याही पायाशी लोळण घेत पडून राहावं लागतं. खेळ चालू असतानाच्या त्या कुरुक्षेत्रावरच्या फौजांचं निर्जीव अस्तित्व हाच त्यांचा धर्म. सर्वांचा एकच धर्म– ‘सोंगट्या’ हाच !
काळ्या सोगट्या आणि गोऱ्या सोंगट्या हे भाऊबंद, एकमेकांचे कौरव-पांडवांसारखे शत्रू. त्यांचं एकमेकांविरुद्ध चालणारं युद्ध ‘धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे’च व्हायला हवं. विनोबांनी गीतेचं मराठीत भाषांतर करताना ‘त्या पवित्र कुरुक्षेत्री’ अशी सुरुवात केली आहे. धुऊन पुसून स्वच्छ केलेली, काटेकोर, विचारपूर्वक स्वतःवर लादून घेतलेली बंधनं, म्हणजेच आपला धर्म! तो पवित्र आहे याची ज्याने-त्याने सदैव जाण ठेवली पाहिजे, हेच यातून सूचित होतं. जगणं म्हणजे श्वास आणि उच्छ्वास यांचा मेळ आणि खेळ. तोच त्यांचा धर्म. त्या धर्माचं बंधन त्यांनी सोडणं म्हणजेच मृत्यू ओढवून घेणं.
या धर्माची व्याप्ती वाढत गेली, तशा त्यात अनेक जाती निर्माण झाल्या. पण त्या त्या जातींनाही विशिष्ट बंधनं ही होतीच. त्या बंधनात आनंदानं जगणं म्हणजेच धर्मपालन करणं. ती बंधनं मोडणं-तोडणं, विसरणं किंवा त्यातून पळवाटा काढण म्हणजे अधर्मच.
याचा अर्थ आपला धर्म म्हणजे आपल्या जीवनाला लाभलेली जन्मजात चौकट. त्या चौकटीचं खेळाचं मैदान करणारा निपजू शकतो, तसंच वैराण वाळवंटही! काटेरी कुंपणाचं मळकट जळकट ओसाड रानही सर्वसामान्यांच्या बाबतीत असे ढोबळ प्रांत अस्तित्वात येतात. त्या त्या प्रांतातली समर्थ माणसं सगळी एकाच स्वभावाची नसतात. सुस्वभावी, उदारमतवादी माणूस आपला प्रांत समृद्ध, बळकट, आनंदी करू शकतो. पण तोच स्वार्थी किंवा अविचारी असेल, तर प्रजेला दुबळी आणि दुःखीही करू शकतो. सामान्य माणसं यालाच ‘नशीब’ म्हणून ‘आलिया भोगासी असावे सादर’ अशी जगत राहतात. पण या असमर्थातही क्वचित एखादा बंडखोर जन्माला येतो. सुख-दुःखाला वाचा फोडतो, झोपी गेलेल्यांना जागे करून आपले अनुयायी तयार करतो. मग ‘अरे’ला ‘कारे’ पासून महायुद्धापर्यंत कोणत्याही थराला हा वणवा पसरत जाऊ शकतो. नेत्याची त्यागभावना, सत्त्वशीलता असे गुण, किंवा खुमखुमी, स्वार्थ, उन्मत्तपणा वगैरे दोष, कोणतीही ठिणगी अशा वणव्यांना कारणीभूत होऊ शकते. जगाच्या इतिहासात असे वणवे ठिकठिकाणी अधूनमधून भडकत गेलेले, कुवतीनुसार पसरत गेलेले आणि हळूहळू विझूनही गेलेले आपण पाहतो.
या इतिहासात अनेक कालखंड असतात. लहान-मोठे. त्या त्या काळच्या संस्कृतीचे, आता मातीमोल झालेले ढिगारे. ढिगारा म्हटलं की प्रथम कळसाकडेच लक्ष जातं. त्या त्या कळसावरचं अलिखित नाव डोळ्यांपुढे तरळू लागतं. हे ढिगारे केवळ शुद्ध मातीचेच नसतात. इतरही अनेक धातूंचे कण त्यात कमी-अधिक प्रमाणात मिसळले गेलेले असल्याचं लक्षात यायला लागतं. अगदी कथिलासारख्या सामान्य धातूपासून ते शंभरनंबरी सोन्यापर्यंतच्या अनेक धातूंचे कण. त्या त्या ढिगाऱ्यात कोणकोणते धातू किती किती प्रमाणात आहेत, याचा अचूक अंदाज करून प्रतवारी ठरवणं, क्रमवारी निश्चित करणं वगैरे कामं विद्वान संशोधक करतच असतात. पण या प्रयोगशाळेतल्या क्रमवारीतून मिळालेलं ज्ञान फक्त परीक्षतल्या प्रश्नांना उत्तरं देण्यापुरतंच मर्यादित राहत. प्रत्यक्ष जीवन जगताना आपण निवडतो ती किंवा आपल्यावर जन्मजात लादली गेलेली असते ती विचारप्रणालीच आपल्याला मार्गदर्शन करत असते. जगण्याचे हे वेगवेगळे मार्ग म्हणजेच धर्म ना? ‘धर्मनिरपेक्षता’ किंवा 'मानवतावाद' हे देखील शेवटी त्या त्या आचरणपद्धतीचे धर्मच ना?
त्या त्या धर्मासाठी त्या त्या वेळी असंख्यांनी बलिदान केलंही आणि बळी घेतलेही. या कृतीतून आपण अमर होणार, या कल्पनेतून ते मृत्यूला सामोरे गेले. असा जीवन-मरणाचा प्रश्न आला की प्राणच पणाला लागतो. कारणं वेगळी, पण परिणाम एकच– मृत्यू हाच. ओढवून घेतलेला मृत्यू, नैसर्गिक नव्हे. याला वेडाचार म्हणता येईल का? तीही माणसंच होती!
सहसा आई-वडिलांची जात किंवा धर्म, तोच मुलांचा, कुटुंबाचा धर्म मानला जातो. सुजाण झाल्यापासूनच्या वयात अनेकदा तर्हेतर्हेचे फॉर्म्स भरण्याचे प्रसंग आले. अगदी रेशनकार्डासाठीच्या फॉर्मापासून त्या त्या परीक्षेला बसण्यासाठीच्या फॉर्मापर्यंतचे अनेक. त्या त्या वेळी ‘जात’ अगर ‘धर्म’ या शब्दांपुढे मी ‘मानवता’ अगर ‘माणुसकी’ असंच लिहीत आले. आता आता माझ्या लक्षात येऊ लागलं की, त्या वेळी मी बरीचशी अप्रगल्भ होते. वय, वाचन, अनुभव जसजसे वाढत गेले तसतसं लक्षात येऊ लागलं की, मनुष्यप्राणी हा खऱ्या अर्थाने सुसंस्कृत राहिलेलाच नाही. आमची संस्कृतीची व्याख्या फार वरवरची आहे. तिला फारशी खोली नाही लिहिण्या-वाचण्यातून, ऐकण्या-पाहण्यातून जमवलेल्या माहितीचा साठा, त्यातून बनवलेली आपली मतं म्हणजे आमचं ज्ञान. आपल्या घरातली पुस्तकांची कपाटं आणि आपलं डोकं त्यानेच भरून गेलंय. ते ज्ञान कपड्यांसारखं आण्ण हवं तेव्हा वापरू शकतो. पण आपल्या रक्तात मुरून, आपला ‘स्वभाव’ बनून राहण्यासाठी यातलं कितीसं खर्ची पडलं? त्यातून आपला स्वभावधर्म कितीसा उन्नत झाला? किती प्रगल्भ, समृद्ध झाला? मानवता किंवा माणुसकी हा माझा धर्म आहे, असं अभिमानाने सांगावं असे सहचरी भाव या शब्दांना घट्ट चिकटून राहिले आहेत का? यातलं सत्य किंवा वस्तुस्थिती किती आणि अज्ञान आणि स्वतःचीच होत असलेली फसवणूक किती ?
‘कायदा पाळा गतीचा, काळ मागे लागला, थांबला तो संपला’ हे ऐकायला, गायला, अनुसरायला फार कठीण नसतं. जीवन त्या मार्गानेच जाऊ लागतं. हा टप्पा तसा बराच मोठा असतो. तो पार करताना शेवटी शेवटी लक्षात येऊ लागतं, ‘उरला दिवस अल्प, घोडे थकुन चूर’.
अजून किती अंतर काटायचं बाकी आहे? आणि झाला हा प्रवास सुखासमाधानाचा झाला की अतृप्तीचा? मागे वळून पाहत हिशोब मांडत बसायचं, की पुढला अंदाज घेऊन कमी कष्टाचा मार्ग शोधून काढायचा? असे विचार मनात येतात याचाच अर्थ, आपणही इतिहासजमा होण्याच्या मार्गाला लागलो आहोत ही जाणीव.
महात्मा गांधींनी ‘सत्य आणि अहिंसा’ हा धर्म सांगितला. त्यातलं ‘सत्य’ मी समजू शकते, पण ‘अहिंसा’ मात्र मला कळू शकत नाही. आपण श्वास घेतो, चालतो, खातो-पितो, म्हणजे जगताना नकळत का होईना, किती तरी जीव बळी पडतच असतात ना? म्हणजे इथे, ‘जीवो जीवस्य जीवनम्’ हाच खरा धर्म असावा असं पटू लागतं.
-oOo-
पुस्तक: मनातलं अवकाश.
लेखिका: सुनीता देशपांडे.
प्रकाशक: मौज प्रकाशन गृह.
आवृत्ती पहिली.
वर्ष: २००६.
पृ. २२-२७.
---
१. मूळ लेखाचे शीर्षक: धर्म
२. मूळ लेख पूर्वप्रकाशन: लोकसत्ता, दिवाळी २००४.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा