नोरा फातेही या अभिनेत्रीने स्त्रीस्वातंत्र्याबद्दल अनुदार भूमिका घेत दिलेल्या मुलाखतीच्या निमित्ताने आज लोकसत्तामध्ये गायत्री लेले यांचा ‘ट्रॅड वाइफचा आभासी ट्रेंड?’ हा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्याच सोबतीला एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस (या काळाचे महत्त्व वेचताना...: स्वातंत्र्य आले घरा या लेखामध्ये अधोरेखित केले आहे.) अमेरिकेमध्ये सुरु झालेल्या स्त्री-स्वातंत्र्य नि स्त्री-हक्क यांच्या चळवळीबाबत एका पौगंडावस्थेतील मुलाने केलेले हे टिपण, मॅन्युअल कॉमरॉफ यांच्या ‘बिग सिटी, लिट्ल बॉय’ या स्मरण-नोंदींमधून (memoirs). पुरुषी अहंकार, नव्या कल्पनांची टवाळी, अधिक्षेप, त्याकडे मनोरंजन म्हणून पाहाणे वगैरे टप्पे पाहता भारतीय समाजालाही ही निरीक्षणे बरीचशी चपखल बसतील.
---
चित्रपटाप्रमाणेच आणखीही एक नवा करमणुकीचा प्रकार आला– ‘सफ्रेजेट्स’. सफ्रेजेट्स या बाया होत्या. पुरुषांच्या बरोबरीने राजकीय हक्क स्त्रियांना असलेच पाहिजेत, असा आग्रह असलेल्या बाया. आतापर्यंत बायकांनी नोकरीधंद्यात हलके-हलके शिरकाव करून घेतलाच होता. त्यांची प्रगती सावकाश पण नेमकी होत होती. पुरुषांच्या बरोबरीला त्या आल्याच होत्या. फक्त मतदानाचा हक्क तेवढा अद्याप त्यांना मिळालेला नव्हता.
काही प्रांतांनी स्त्रियांना मतदानाचा हक्क दिला होता. पण आमच्या इथे लोकमत विरुद्ध होते. पुरुष आणि बायकांमधला आणि पुन्हा बायका-बायकांमधला झगडा अनेक वर्षे चाललेला होता. जवळजवळ सगळी पुरुषमंडळी आणि बहुतेक बायका म्हणत की, ‘बायकांना मतदानाचा हक्क पाहिजे. ही ओरड मूर्खपणाची आहे’. वरचा वर्ग या चळवळीची चेष्टा करी. अगदी खालचा वर्ग सरळसरळ विरुद्धच होता. मध्यमवर्गापैकी बरेच लोक म्हणत की, या मागणीत आम्हाला तरी काही रास्त दिसत नाही. पण या प्रत्येक वर्गात थोडे, अगदी थोडे लोक असे होते की, ते या मागणीला पाठिंबा देत आणि स्त्रियांच्या हक्कासाठी नेकीने झगडत.
या बायांनी पूर्वी पन्नास वर्षांपूर्वी सुरू झालेल्या सफ्रेजेट्स चळवळीतल्या बायांशी हातमिळवणी केली. आपले म्हणणे पुढे मांडण्याची एकही संधी या बाया सोडत नसत. स्पष्टच सांगायचे तर, हा एक तापच होऊन बसला होता. बघावे तेव्हा, बघावे तिथे यांचे काहीतरी चालू असे. कुठे पिकेटिंग कर, कुठे पत्रके वाट, मोर्चे ने, सभा घे, रस्त्यांच्या कोपऱ्यावर उभे राहून व्याख्याने झोड; काही ना काही चालूच.
मी काही वेळा त्यांच्या सभा ऐकत असे. त्यांचे बोलणे मुद्देसूद आणि पटण्यासारखे असे. पण सभेला जमलेले श्रोते ऐकून न घेता हुटाहूट करीत. गमतीची गोष्ट अशी की हुटाहूट करणारे, हुल्लड माजविणारे प्रेक्षक म्हणजेही स्त्रियाच असत.
सगळे या चळवळीच्या विरुद्धच होते. राजकीय पुढारी म्हणत, बायकांचे काम घर सांभाळणे आहे. चर्च म्हणे, स्त्रियांना मतदानाचा हक्क असणे ही गोष्ट नीतिबाह्य आहे. स्त्रियांना हा हक्क मिळाला तर त्यांचे घरसंसारावरचे लक्ष उडेल आणि कुटुंबसंस्थेवर आघात होईल.
पण जग विरुद्ध गेले तरी बायांनी धीर सोडला नाही. त्या झगडत राहिल्या. दरवर्षी लोकांना कळावे म्हणून त्या साउथ अॅव्हेन्यूवरून मिरवणुका काढीत. देखावा मोठा बघण्याजोगा असे. बघ्यांची तुफान गर्दी होई. चळवळीच्या म्होरक्या बाया भाड्याने आणलेल्या घोड्यांवर स्वार होऊन मिरवणुकीच्या आघाडीवर राहत. त्यांच्या मागे स्त्रियांचे पायदळ असे. नाना तऱ्हेचे फलक, निशाणे, खुणा हातात धरून हे पायदळ चालत असे. पण या मिरवणुकीचा खरा बघण्याजोगा भाग म्हणजे भेदरट नवरे, भाऊ, मुलगे आणि मित्र यांचा दटावून आणलेला घोळका; तो पिछाडीला असे.
अशी मिरवणूक आली रे आली की, रस्त्याच्या दुतर्फा उभे राहिलेले बघे, हुर्यो करून अंड्यांचा, भाजीपाल्याचा मारा मिरवणुकीवर करीत. पण बाया लक्ष देत नसत. त्यांचा लढा उच्च ध्येयासाठी होता आणि तो देताना अशा फालतू गोष्टी घडणारच. पण पिछाडीला असलेल्या बाप्यांना ध्येयाबद्दल आस्था नसावी. कारण एकाएकी होणाऱ्या अंड्यांच्या मारामुळे अवसान जाऊन त्यांचा घोळका मिरवणुकीतून बाजूला पळत असे.
ही मंडळी भिऊन पळू लागली म्हणजे सगळ्या जमावाचा अगदी तोल सुटे.
या बाया हक्कासाठी झगडत असताना दुसऱ्या बाया अब्रूरक्षणासाठी झगडत होत्या. विजेच्या शोधामुळे बायकांची अब्रू धोक्यात आली आहे, असे त्यांचे म्हणणे होते. युरोपातल्या कुणा शास्त्रज्ञाने ‘एक्स-रे’ शोधून काढला होता. ही काही यंत्र अमेरिकेत आली होती. त्यांच्यावर घेतलेले फोटो वर्तमानपत्रात छापलेले सर्वांनी बघितले होते. ‘क्ष’ किरणांमुळे ‘आतले’ दिसते हे माहीत झाले होते.
साहजिकच अशी एक जोरदार अफवा परसली की अशी यंत्रे ज्याच्याकडे आहेत ते लोक खिडकीशी बसून रस्त्यावरून आल्या-गेल्या स्त्रियांची, कपड्याआतली अंगे बघतात हे फार वाईट आहे, स्त्रियांचे रक्षण केले पाहिजे.
आगबंबवाले, पोलीस आमच्या दुकानात येऊन म्हणत, “छे, छे, विज्ञानानं भलताच टप्पा गाठला.”
“माझं म्हणणं आहे , हा ‘क्ष’ किरणांचा शोधच मुळी बुडवून टाकावा.”
“अहो, ही काय नीती झाली! या फाजील यंत्रापासून जनतेचं रक्षण केलं पाहिजे.”
मग नवीन प्रकारच्या काचोळ्या बाजारात आल्या. काचोळ्या बनविणारा एक कारखानदार पुढे येऊन म्हणाला की, अमेरिकेतील स्त्रीजातीच्या अब्रूचे रक्षण आम्ही करू. जाहिरात करकरून त्याने एक ‘क्ष’ किरणालासुद्धा दाद न देणारी काचोळी शोधून काढली. या पद्धतीच्या काचोळ्या घालून बिनधोक रस्त्याने चालावे, ‘क्ष’ किरणच काय पण आणखी त्यापलीकडचे किरण आले, तरी ते मुळी या काचोळ्यांतून आरपार जाणे शक्यच नाही, अशी हमी या कारखानदाराने दिली
- oOo -
पुस्तक: मंतरलेले बेट.
लेखक: व्यंकटेश माडगूळकर.
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस.
चवथी आवृत्ती, चवथे पुनर्मुद्रण.
वर्ष: २०२३.
पृ. ५८-६०.
---
संबंधित लेखन:
वेचताना...: स्वातंत्र्य आले घरा >>
स्वातंत्र्य आले घरा (पूर्वार्ध) >>
स्वातंत्र्य आले घरा (उत्तरार्ध) >>
---
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा