गुरुवार, ४ एप्रिल, २०२४

वेचताना... : स्वातंत्र्य आले घरा

मंतरलेले बेट

मध्यंतरी व्यंकटेश माडगूळकरांचे ‘माणदेशी माणसे’ (पुन्हा एकदा ढापले गेल्याने) ऑर्डर करण्यासाठी ‘बुकगंगा’वर गेलो. तिथे ‘या सोबत घ्या’ म्हणून ‘मंतरलेले बेट’ नावाचे एक पुस्तक सुचवले होते. शीर्षकावरून हे बालवाङ्मयाचा भाग असावे असे वाटले. तिथे काही पाने अवलोकनार्थ ठेवलेली असतात. ती चाळता एका मुलाचे आत्मकथन आहे असे ध्यानात आले. तेव्हा आपला तर्क खरा ठरला असे वाटले. तरीही तेव्हा काही हलके-फुलके वाचण्यासाठी हवेच होते म्हणून त्याची मागणीही नोंदवली होती. एकदा डोक्याला फार ताण देणारे वाचून झाल्यावर हलके फुलके म्हणून हाती घेतले.

मुखपृष्ठावरून समजले की हा Manuel Komroff नावाच्या कुण्या अमेरिकन लेखकाच्या ‘Big City Little Boy’ या पुस्तकाचा अनुवाद आहे. त्याचे वर्गीकरण ‘कादंबरी’ असे दिलेले असले तरी (पुढे २००१ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात धराशायी झालेले सुप्रसिद्ध ‘ट्विन टॉवर्स’ जिथे उभे होते त्या) मॅनहटन बेटावरील एका लहान मुलाने आपल्या आयुष्यासंबंधी केलेल्या स्मरण-नोंदी (memoirs) असे त्याचे स्वरूप आहे.

सहज म्हणून वाचता वाचता असे ध्यानात आले की नोंद घेणार्‍याचे वय हा महत्त्वाचा, दखलपात्र मुद्दा आहे तसेच तो कालखंडही. हा कालखंड कालगणनेनुसार जसा एक महत्त्वाचा टप्पा आहे तसेच अमेरिकेच्या इतिहासाच्या दृष्टीनेही. सामाजिक, आर्थिक नि राजकीय अशा तीनही आघाड्यांवर या कालखंडात मोठी उलथापालथ घडून आली. त्या घटनेचा साक्षीदार असलेला हा मुलगा या बदलत्या काळाच्या नोंदी समोर ठेवतो आहे. लेखनाच्या वेळी वय नि अनुभवाने अधिक पुढे सरकलेल्या मॅन्युअलच्या भाषेचे नि दृष्टिकोनाचे अस्तर जरी त्याला चिकटलेले दिसत असले, तरी त्याने घेतलेल्या नोंदी नि त्यांची केलेली टिपणे महत्त्वपूर्ण अशीच आहेत.

एकोणीसावे शतक अस्तंगत होत असतानाचा हा काळ आहे. या शतकाच्या अखेरीस नियतीवादी, पारलौकिकवादी भयभीत होऊन जगबुडीच्या भाकितांचे हाकारे उठवत शिकारीच्या कळपासारखे स्वत:च भयभीत होऊन सैरावैरा धावत होते, इतरांच्याही मनात भीतीची रुजवणूक करत होते. दुसरीकडे औद्योगिक क्रांतीचा वेग वाढलेला असल्याने भौतिक आयुष्यात वेगाने बदल घडत होते. मेणबत्त्यांची जागा गॅसबत्त्यांनी घेतली होती, तारेमार्फत येणार्‍या विजेचे जाळे विणले जात होते. घोडागाड्या अस्तंगत होऊन मोटार कार्सचा बोलबाला सुरू झाल्याने रस्त्यावर घोड्याच्या लीदीऐवजी जाळलेल्या पेट्रोलियम इंधनांचा वास अधिक प्रकर्षाने जाणवू लागला होता.

राजकीय पातळीवर पाहिले तर क्यूबाच्या प्रश्नावर स्पेनने अमेरिकेशी संघर्ष उभा केला होता. आशिया, आफ्रिका खंडांतून स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले होते. ब्रिटनच्या, चीनच्या, रशियाच्या राजेरजवाड्यांच्या साम्राज्यांना हादरे बसू लागले होते. अशा काळात, एका घटस्फोटित आई-बापांचा, न्यूयॉर्कमधील केवळ दुसर्‍याच वकील स्त्रीचा हा आठ-दहा वर्षांचा मुलगा आपल्या आजी-आजोबांसोबत राहताना अनुभवलेल्या या संक्रमणाचे आपल्या बुद्धीने झालेले आकलन नोंदवत जातो आहे.

मागील शतकात झालेल्या फ्रेंच क्रांतीनंतर ‘स्वातंत्र्य’ ही संकल्पना मूळ धरू लागली होती. जगण्यातील विविध पैलूंमध्ये तिचे प्रतिबिंब कसे पडते, तिची कोणती अनुषंगे प्रकर्षाने दिसतात याचा मागोवा घेतला जात होता. सैद्धांतिक पातळीवर जरी ‘कशापासून स्वातंत्र्य’ नि ’कशाचे स्वातंत्र्य’ या दोनच पैलूंचा विचार होत असला तरी व्यावहारिक पातळीवर तिचे अनेक पदर तपासले जात होते. राजकीय स्वातंत्र्य हस्तगत केलेल्या अमेरिकेमध्ये आता आर्थिक स्वातंत्र्याची वाट महामार्गाला येऊन मिळाली होती. ‘जुन्या वाटेवरचे सारेच पांथस्थ या महामार्गाची वाट चालू शकतात, की काही मूठभरांनी या महामार्गांवर टोल नाकी उभारून विकासाची गंगा केवळ आपल्याच वावरात वळवून नेली आहे?’ असा प्रश्न सामान्यांना पडू लागला होता.(हा प्रश्न सनातन आहे, तो कधीच कालबाह्य होणार नाही.)

या कादंबरीमध्ये ‘स्वातंत्र्य’ याच शीर्षकाचे एक प्रकरण आहे. अमेरिकेसारख्या भांडवलशाहीचे माहेरघर मानल्या गेलेल्या देशातील व्यवस्थेला स्वार्थलोलुप भांडवलशहांनी बटीक केले असल्याचा हा काळ आहे. काही स्वतंत्र विचाराच्या व्यक्तींनी चिकाटीने ही काळी बाजू प्रकाशात आणली होती. त्याच वेळी अमेरिकेला सामान्यांबद्दल कळकळ असलेला एक नेता लाभल्यामुळेच तिला ‘कम्युनिस्टांचा कावा’ अथवा ‘देशद्रोही लोकांचे कटकारस्थान’ म्हणून झटकून न टाकता त्या मोकाट भांडवलशाहीवर अंकुश निर्माण करण्यात आले. त्यातून कागदोपत्री असणारे आर्थिक स्वातंत्र्य सर्वसामान्यांच्या दारी येऊ शकले.

आज एकविसाव्या शतकात अमेरिकाच काय परंतु भारतासारख्या देशांतही अर्थव्यवस्था ही सामान्यांची काळजी करण्यापेक्षा उद्योगव्यावसायिकांचीच बटीक होऊन राहिली आहे. अमेरिकेला लाभला तसा रुझवेल्ट आपल्या देशात कुठे दिसत नाही. एवढेच नव्हे तर सर्वसामान्यांच्या विकासाची व्याख्याही रुझवेल्टपेक्षा एखाद्या निक्सन, बुश वा ट्रूमनच्या व्याख्येशी अधिक मिळतीजुळती आहे.

माध्यमस्फोटानंतर जग जवळ आल्यानंतर सर्वसामान्य माणसेही मूलभूत गरजांची पूर्तता करणारी व्यवस्था मागण्याऐवजी महासत्ता मागू लागली आहेत. नि ती देईन असे आश्वासन देणार्‍या कुण्याही हुकूमशाही प्रवृत्तीच्या नेत्यासमोर मान नि खांदे झुकवून उभी राहू लागली आहे. सामान्यांच्या गरजा कोणत्या हे ही भांडवलशाही माध्यमेच सांगू लागली आहेत. अर्धपोटी जनतेला आपल्या मेंदूवरचे अदृश्य साखळदंड जाणवतही नाहीत अशी परिस्थिती आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार नि निवारा या मूलभूत गरजांपेक्षा महासत्ता, धर्मवर्चस्व, वंशवाद हे जनतेच्या मनात अधिक प्रकर्षाने उमटणारे मुद्दे आहेत. तंत्रज्ञानामार्फत आलेली मनोरंजनाची भूल माणसाच्या विचाराला वास्तव पाहूच देत नाही अशी स्थिती आहे.

अशा परिस्थितीमध्ये व्यवस्थेला पवित्र (sacrosanct) न मानता तिला जाब विचारणार्‍यांची संख्या नगण्य आहे. जे आहेत ते समाजाच्या दृष्टीने शत्रू ठरत आहेत. व्यवस्था आपल्यासाठी आहे, आपण तिच्यासाठी नव्हे याचे भान हरवलेले लोक व्यवस्थेमार्फत काहीतरी अचाट चमत्कार घडून त्या मार्फत आपले सारे दैन्य दूर होईल अशा आशाळभूत आशेने तिच्यावर आंधळी निष्ठा ठेवून आहेत. तर धनदांडगे त्या व्यवस्थेला पायतळी ठेवून वाटचाल करत आहेत. अशा परिस्थितीमध्ये हे प्रकरण मुळातून वाचायला हवे.

- oOo -

संबंधित लेखन:
स्वातंत्र्य या मुद्द्यावर या नोंदींमध्ये जे सापडते त्यातून एक प्रातिनिधिक वेचा निवडण्याची इच्छा होती. परंतु त्याची व्याप्ती नि विषय ध्यानात घेता असा वेचा सापडू शकला नाही. मग उलट दिशेने ‘काय वगळता येईल?’ असा विचार करून पाहिला. त्यातही फारसे काही सापडले नाही. अगदी थोडा भाग वगळून शिल्लक राहिलेला लेख दोन भागांत पोस्ट करायचे ठरवले. एकाचे दोन भाग करताना आणखी काही भाग वगळता आला. आता हे दोन भाग मिळून एक दृष्टिकोन मांडतात असे मला वाटते.

स्वातंत्र्य आले घरा (पूर्वार्ध) >>
स्वातंत्र्य आले घरा (उत्तरार्ध) >>

न स्त्री स्वातंत्र्यमर्हती >>
---


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा