बुधवार, ७ मे, २०२५

तो एक मित्र

  • तो माझा मित्र वयाने माझ्यापेक्षा थोडा मोठा होता आणि व्यवसायाने वकील होता. तो बरीच वर्षे त्या व्यवसायात असल्यामुळे त्याचा जम देखील बरा बसला होता. पण कोर्टातील दिवस संपल्यावर आपल्या कागदपत्रांची जुनाट, पोटफुगी बॅग इतक्या आनंदाने बाजूला फेकणारा दुसरा वकील मी पाहिला नाही. घरी आल्यावर दोन कप कडक चहा घेऊन खिडकीपाशी उभे राहून एक सिगरेट ओढून झाली की तो खरा जिवंत होत असे. मग पाच-सात जुनी इंग्रजी मासिके टेबलावर पसरून पाय देखील टेबलावर चढवून बसला की त्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागे. याचे एक कारण म्हणजे त्याचा व्यवसाय जरी भडवा असला (हा त्याचाच शब्द) तरी मनाने मात्र तो एक हावरा वाचक होता.

    म्हणजे नेमून दिलेली अथवा कुणी तरी ऐसपैस गौरवलेली पुस्तके दडपणाने वाचून त्यावर चिकट समाधान मानणाऱ्यांपैकी तो होता असे नव्हे. त्याची शिक्षणाची कारकीर्द तर ऐषआरामात सरकत पुढे गेलेल्या गाडीप्रमाणे होती. तो कोणतीच परीक्षा पहिल्या खेपेला उत्तीर्ण झाला नाही. (त्या बाबतीत त्याच्या धाकट्या भावानेच त्याचे रेकॉर्ड मोडले. कॉलेजची पहिल्या वर्षाची परीक्षा त्या वेळी कॉलेजच घेत असे आणि ज्यात नापास व्हायला असामान्य बुद्धिमत्ता लागत असे, त्या दिवसांत या भावाने सगळ्या विषयांत शून्य मार्क मिळवून एक पराक्रम प्रस्थापित केला होता.) ‘डेक्कन’ कॉलेजमध्ये असलेले अनेक विद्यार्थी बेनसाहेबांविषयी सतत बोलत. पण इतक्या वर्षात त्याच्या तोंडून मात्र मी ते नाव एकदा देखील ऐकले नाही.

    त्याच्या आठवणी होत्या त्या दर आठवड्यांला हॉस्टेलमध्ये होणाऱ्या चमचमीत मेजवान्यांच्या, आठवड्याला मुंबईला जाऊन तेथे भटकण्याच्या आणि तेथे पाहिलेल्या इंग्रजी चित्रपटांच्या. इंग्रजी चित्रपटांच्या बाबतीत तो खरेच घनपाठी होता. अर्न्स्ट लुबित्श या दिग्दर्शकांविषयी बोलणारा तोच एकटा मला भेटला. विशेषतः त्याच्या ‘शॉप राऊंड द कॉर्नर’ या चित्रपटांविषयी तो बोलत असता त्याच्या सिगरेटवर एक इंच राख जमत असे. मध्येच ती त्याच्या शर्टावर पडे, ती झटकत तो ती अनाघ्रात सिगरेट एका बशीत चिरडत असे.

    गार्बो तर आयुष्यभर त्याची प्रेयसीच राहिली. चार्ल्स लॉटनचे नाव काढले की तो जास्तच खुलत असे व त्याच्या भरात मला आग्रहाने एक सिगरेट देत असे. “अरे, चेहरा असा धबडा नि जाड ओठ असलेला हा माणूस; पण तो पडद्यावर आंला की चेंगीझखानाप्रमाणं सारं बळकावून बसतो आणि आता तुम्हाला गुळगुळीत नाजूक चेहऱ्याचे भुक्कड नायक लागतात समोर ! ती बेटी डेव्हिस बघ ! ती रस्त्यात दिसली तर बावचळलेलं एखादं मिसरूड पोरदेखील तिच्याकडे वळून पाहणार नाही. ती स्वतःच म्हणत असे, “आय हॅव नो मोअर सेक्स अपील देंन अ पेंग्विन !” पण ‘डार्क व्हिक्टरी’ किंवा ‘ऑल धिस अँड हेवन’मध्ये तिला पाहा तरी !...” असे तो आपल्याच तंद्रीत बोलत राहत असे. त्या वेळी जर मी उठून बाहेर गेलो असतो तरी ते त्याच्या ध्यानात आले नसते. 

    लॉटनच्या ‘हंचबॅक ऑफ नोत्रदाम’ चित्रपटानंतर कुणी तरी त्याच कथेवर आणखी एक चित्रपट काढला होता. तो पाहिल्यावर हा मित्र दोन-तीन दिवस अतिशय हिंस्र झाला होता. “लॉटन नंतर दुसऱ्या कुणा टिकोजीला आणून चित्रपट काढतात हे भडवे ! उद्या ‘क्वीन खिस्तिना’मध्ये गार्बोला काढून तिच्या जागी कुठल्या तरी खंबायटी घाटकरीण गंगू तमाशमैनेला नाचवा म्हणावं ! सगळ्यांना पकडून धडाधड गोळ्या घातल्या पाहिजेत एकेकाला !”

    कुसुमगुंजा

    सॅम्युएल गोल्डविनने एकदा म्हटले होते की, चित्रपटाची सुरुवात भूकंप अथवा ज्वालामुखीचा स्फोट होऊन सौम्यपणे व्हावी व नंतर मात्र उत्कटता वाढत जाऊन क्लायमॅक्स व्हावा! त्या प्रमाणे या मित्राच्या बाबतीत शिक्षेची सुरुवात मुळी धाडधाड गोळ्या घालणे, शिरच्छेद करणे, समुद्रात बुडवणे अशी होत असे. 

    कित्येकदा तो नव्याने वर्गात आलेल्या पोराला मास्तराने सारखे प्रश्न विचारावे त्याप्रमाणे माझ्यावर प्रश्नांचा भडिमार करीत असे : “तुझा तो ‘योलांडा अँड दी थीफ’ मधला प्रेयसीला भेट देण्यासाठी आणलेला पंखा पाण्यात रस्त्यावर पडतो नि त्याच्यावरून तिची गाडी निघून जाते. हा फ्रेड अस्टेअरचा प्रसंग आठवतो ? ‘टेल्स ऑफ मॅनहॅटन’ मध्ये लॉटन संगीत चालन करीत असता त्याचा कोट मागे उसवत जातो नि सारे श्रोते त्याच्यामागे हसतात, हा प्रसंग ? ‘मि. डीड्‌स गोज टु टाऊन’ मध्ये गॅरी कूपर शेवटी एक सणसणीत ठोसा मारतो तो ? आणि एमिली ब्राँटेच्या जीवनावर असलेल्या ‘डिव्होशन’ या चित्रपटात तिच्या मृत्यूच्या वेळी आभाळातून एक काळा घोडेस्वार टापा वाजवत येतो आणि अंगावरील क्लोक पसरून त्यात तिला झाकून टाकतो, तो प्रसंग ? आणि ‘कार्मेन’ मधलं ते पहिलं धुंद नृत्य ?...”

    एकामागोमाग त्याचे प्रश्न येत. म्हणजे जरी माझ्या मनात असते तरी काही मला त्यांची उत्तरे देणे शक्य झाले नसते. पण खरे तर ते प्रश्न नव्हतेच व त्यांना उत्तरांची गरज वा अपेक्षा नव्हती. त्याच्या मनात आठवणींचाच एक चित्रपट सुरू झालेला असे व त्या ठिकाणी माझी उत्तरेच काय– खुद्द मी देखील पूर्णपणे फालतू होतो. शिवाय ते सारे किंवा बहुतेक सारे चित्रपट मी पाहिले होते, इतकेच नव्हे तर पुष्कळसे चित्रपट आम्ही एकत्रच पाहिले होते; पण हे त्याला सांगायची सोय नव्हती. कारण आपणाला आवडलेले हे चित्रपट जणू पूर्णपणे त्याच्याचसाठी खासगी असल्याप्रमाणे मी त्यात नाक (किंवा डोळे म्हणा) खुपसल्याबद्दल तो कदाचित माझ्यावरच उखडला असता !

    मध्येच काही वेळ खवचटपणे तो एका चित्रपटाचा उल्लेख करीत असे : ‘द ट्रेल ऑफ द लोनसम पाइन.’ खवचटपणे. कारण हा एक चित्रपट त्याने पाहिला होता व मला पाहायला मिळाला नव्हता. या नावाचे एक प्रसिद्ध गीत आहे आणि तो चित्रपट तर बराच गाजला होता. चित्रपट जरी नाही तरी त्या गीताचे शब्द तरी मिळावे म्हणून मी चौकशी केली होती. ‘युसिस’मध्ये माहिती मिळाली नाही. पण त्या चित्रपटाच्या नावाचेच मला फार कुतूहल वाटत आले आहे. त्या एकाकी पाइन वृक्षाजवळून जाणारी ती वाट कुठून येते, कुठून जाते ? त्या वाटेवर काय घडले असेल? दोन प्रेमिकांची भेट त्या वृक्षाखाली झाली असेल का? त्यांचे संकेत तेथेच ठरले असतील ? जे घडणार नव्हते ते घडवण्याचा प्रयत्न संपल्यावर त्यांच्यापैकी कुणी तरी त्या ठिकाणी येऊन आठवणी कुरवाळत तेथे बसले असेल; आणि आपल्या एकाकीपणाबरोबर त्या दोघांचेही एकाकीपण सहन करीत तो पाइन वृक्ष त्या वाटेवर उभा असेल ? काय आहे कुणास ठाऊक, पण ते नाव मात्र मनात रुतून बसले आहे. एवढा जुना चित्रपट आता पाहायला मिळायची शक्यता जवळ जवळ नाहीच. ते आता कायमचे राहूनच जाणार, पण त्यामुळे या मित्राला खवचट आनंद मिळत राहणार हे मात्र खरे !

    काही वेळा त्याला हिंदी चित्रपटांविषयी बोलण्याची लहर येत असे. अशावेळी त्याचा इसाळ ऐकण्याजोगाच नव्हे, तर पाहण्याजोगा देखील असे. त्या आवेशात तो अनेकदा सिगारेटच काड्याच्या पेटीवर खरडत तोंडातील सिगरेट पेटवण्याचा प्रयत्न करीत असे. त्याच्या हातवाऱ्यांनी टेबलावरील पुस्तके खाली पडत. अॅशपॉट झालेली बशी कोसळून थोटके सगळीकडे पडत, काही वेळा अशीच फुटत असे. असे बऱ्याच वेळा घडत असावे. कारण बशी फुटल्याचा आवाज झाला की त्याची बायको हातात एक नवी बशी घेऊन बाहेर येत असे आणि काचा नि थोटके कोपऱ्यात एकत्र करून शांतपणे परत जात असे. अशा प्रसंगी मी सारे काही निमूटपणे ऐकून घेत असे. कारण मला त्या चित्रपटांची काहीच माहिती नसे.

    “आणि ते तुझे नायक आणि त्या गावावरून ओवाळून टाकलेल्या पौष्टिक नायिका ! हे सगळेच नायक येरवड्यातून आलेले दिसतात. तिथल्या तुरुंगातून अगर वेड्यांच्या इस्पितळातून कंबर लचकत चालणारे, शर्ट अर्धवट उघडे टाकून केसाळ छातीचं भुक्कड पुरुषपण दाखवत हिंडणारे ते तुझे सोंगाडे ! आणि त्या नायिका तर कशा उधळलेल्या म्हशींप्रमाणं दणादण धिंगाणा घालतात ! कुठं वाहणारं किंवा वरून पडणारं पाणी दिसलं की, त्यात त्यांना बुचकळून त्यांची मांसाची गाठोडी पडद्यावर दाखवायला निर्माते-दिग्दर्शक पायांच्या बोटांवर तयार ! आणि हे सारं कशासाठी, माहीत आहे ? ‘गल्ला गोळा करण्यासाठी’ असं तू म्हणशील, तर तू अगदी साडेतीन शहाणा आहेस ! अरे सारं जग किती मलिन, पापी झालं आहे हे दाखविण्यासाठी बरं का हे सारे स्नानयज्ञ ! एका मांसबंबाळ नागडधुय्या स्त्रीचं चित्र काढायचं, नि त्याखाली लहान अक्षरात लिहायचं, असला हा सारा बनेलपणा आहे. तू साऱ्या नट्यांना गोळा करून काफती-वेशीला मसणात पाठव, सगळ्या नटांना परत येरवड्याला पाठव आणि कुणी जर आमरण उपवास करणार असतील, तर त्यांना मोसंब्याचा रस देऊन त्यांचे उपोषण कुणी थांबवील तर आधी त्याला गोळी घाल. हरामखोर लेकाचे!”

    बाबा रे, त्या सगळ्या चित्रपटांचे राहो; त्यातील एकाही चित्रपटाशी माझा कसलाच संबंध नाही, इतकंच नव्हे तर त्यांतील बहुतेक मी पाहिले देखील नाहीत. असा बचाव त्याच्या सरबत्तीपुढे निष्फळ ठरला असता आणि ‘तुझे नायक, तुझी नृत्ये, तुझ्या पटकथा’ असे सगळे काही माझ्यावर लादले गेलेच असते. मला एकदा आरोपीच्या अदृश्य पिंजऱ्यात ठेवून तर्जनी उपडून हवेत भोके पाडीत त्याने माझ्यावर टोचा मारायला सुरुवात केली, की तो काय पाऊल मागे घेणार? तेव्हा एकदा मी त्याला सौम्यपणे म्हटले, “ते सारं ठेव आता बाजूला, पण एक गोष्ट मात्र कर. कृपा करून ‘हरामखोर’ आणि ‘दहा हजार वर्षे’ हे शब्द वापरू नकोस. आता त्यावर अत्रे यांचा कॉपीराइट आहे. शिवाय तुला, मला, इतरांना ते पेलायचे नाहीत.”

    यावर त्याचा चेहरा सोललेल्या कांद्याप्रमाणे स्वच्छ गुळगुळीत झाला आणि तो मनमोकळेपणाने हसला. कारण अत्रे म्हणजे त्याचे एक दैवत होते. “अरे बाकीचे कसले ऊ-पिसवा पुढारी ! त्यांना सगळ्यांना फाशी दे एकदा! पण हा माणूस कसला सह्याद्रीसारखा होता म्हणतोस ! कळसूबाईनं आधीच एक शिखर निवडलं होतं म्हणून गोष्ट निराळी; नाही तर तिनं या शिखराचा विचार केला असता!”

    त्याच्याजवळ तासभर बोलून मी जायला उठलो की तोपर्यंत, ‘त्याला समुद्रात बुडव’, ‘याला काँग्रेस-विहिरीत फेकून दे’, ‘त्या साऱ्यांना गोबीच्या वाळवंटात नेऊन गळ्यापर्यंत पुरुन टाक,’ ‘या साऱ्यांना हत्तीच्या पायाखाली दे’, ‘त्याचा कडेलोट करू,’ ‘त्या भडव्यांना सुळावर चढव’ असली कामे तो माझ्या गळ्यात अडकवीत असे. त्यापैकी मी किती कामं प्रत्यक्ष केली याची तो चौकशी करीत नसे, ही एक चांगली गोष्ट होती म्हणायचे! पण प्रामाणिकपणे सांगायचे म्हणजे त्यापैकी काही कामे करण्यास मला खरेच फार आनंद वाटला असता !

    (‘एक मित्र- एक कथा’ या कथेमधून)

    -oOo-

    पुस्तक: कुसुमगुंजा
    लेखक: जी. ए. कुलकर्णी
    प्रकाशक: परचुरे प्रकाशन मन्दिर
    आवृत्ती दुसरी (जुलै २००८) (पहिली आवृत्ती जुलै १९८९)
    पृ. ८८-९२.


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा