RamataramMarquee

शुक्रवार, १६ मे, २०२५

कसे रुजावे बियाणे...

  • माझ्यासारख्या सुखवस्तू माणसांच्या जगामध्ये अन्नाचे ताट कधीही रिकामे राहात नाही. लहानपणी सठीसहामाशी लाभणारे मनोरंजनाचे भाग्यही इंटरनेटच्या कृपेने खिडक्या-दारांना धक्के मारत स्वत:हून घरात घुसते. ‘वेळ नाही’ किंवा ‘बिझी आहे’ अशी कारणे तुम्ही सांगू नयेत म्हणून, तुमच्या सोयीसाठी, दहा ते तीस सेकंदात तुमचे मनोरंजन करण्याची हमी ते देते. पाच/दहा रुपयांची चिप्सची पाकिटे विकावीत तशी मीम्स, रील्स वगैरे आणून तुमच्या मोबाईलवर वा संगणकावर ओतत असते.

    काही महिन्यांपूर्वी हे एक मीम फेसबुकवरुन माझ्यापर्यंत पोहोचले. हे मीम पाहून आलेलं हसू, ते ज्या प्रसंगावर बेतलेले आहे तो चित्रपट नि तो प्रसंग आठवला, नि क्षणात गोठून गेलं.

    SavPriRyan_Meme

    मीममध्ये पार्श्वभूमी म्हणून वापरलेला हा प्रसंग ‘सेव्हिंग प्रायव्हेट रायन’ चित्रपटातील एका लढाईतला आहे. कॅप्टन मिलरची तुकडी एका हल्ल्यादरम्यान पुरी घेरली गेली आहे. त्यांचे मोजकेच सैनिक शिल्लक आहेत. आजूबाजूला शत्रूसैनिकांची संख्या वाढते आहे, त्यांचा घेराव अधिक घट्ट होतो आहे. अविश्रांत लढ्यानंतर पुरा थकलेला कॅप्टन केशरी केलेल्या राजपुतासारखा जिवाची पर्वा झुगारून देत, आडोसा सोडून सरळ खुल्या भूमीवर येतो. एका मोटरसायकलला टेकून बसतो नि शिल्लक रहिलेल्या पिस्तुलातून समोरून रायफल फायरिंग करत असलेल्या शत्रू-सैनिकांच्या दिशेने एक एक गोळी फायर करतो आहे.

    भरीला शत्रूच्या घेर्‍यात जाणीवपूर्वक ठेवलेल्या भगदाडातून शत्रूचा एक रणगाडा पुढे येतो आहे. ते पाहून कॅप्टन शांतपणे हाताची दिशा बदलतो नि त्या रणगाड्यावर पिस्तुलाच्या गोळ्या झाडू लागतो. युद्धभूमीवर प्रत्यक्ष उतरलेल्या व्यक्तीच्या मनोऽवस्थेच्या कशा चिंधड्या उडतात नि त्यातील जाणीव कशी मरुन जाते याचे हे उत्तम उदाहरण आहे. ज्या पिस्तुलातील एका गोळीने माणूसही मरण्याची शाश्वती नाही; तिथे रणगाड्याला तिची काय तमा असणार. पण ‘समोर शत्रू आहे नि त्याच्यावर गोळीबार करायचा आहे’ एवढी एकच जाणीव शिल्लक राहिलेल्या कॅप्टनच्या मेंदूत हा गणिती विचार येण्याइतकी जाग शिल्लक राहिलेली नसते. युद्धभूमीवरील मनाच्या बधीरतेचे इतके उत्तम चित्रण दुसरे नसावे.

    या चित्रपटाची सुरुवातच एका दीर्घ प्रसंगाने होते. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात दोस्त राष्ट्रांनी ‘ऑपरेशन ओव्हरलॉर्ड’ या नावाखाली फ्रान्समधील नॉर्मन्डी या ठिकाणी आपले सैन्य उतरवले, आणि तोवर रोरावत निघालेल्या जर्मन वरवंट्याला प्रथमच मोठा दणका दिला. हे सैन्य ज्या ठिकाणी उतरले, त्या ‘ओमाहा बीच’च्या नावानेच चित्रपटातील हा प्रसंग ओळखला जातो.

    माझ्या आयुष्यात पाहिलेल्या काही अविस्मरणीय प्रसंगांपैकी हा एक प्रसंग आहे. सलग जवळजवळ दहा मिनिटांचा हा प्रसंग आहे. युद्धभूमीचे अवाक्‌ करणारे दर्शन त्यातून घडते आहे. मानवाला त्याच्यातील क्रौर्याचे हतबुद्ध करणारे दर्शन त्यातून घडते आहे. त्या चित्रपटाचे नुसते नाव कानावर पडले, तरी मला तो प्रसंग आठवतो आणि तेव्हा मनावर झालेल्या जखमा पुन्हा उकलल्या जातात.

    हसवण्यासाठी तयार केलेले मीम कधीकधी असे विषण्णही करून जाते...


    हा प्रसंग पाहणार्‍या, ‘आपला देश महासत्ता व्हायला हवा, आपला नेता जगज्जेता व्हायला हवा’ या वेडाने पछाडलेल्या आणि ‘युद्ध करुन शत्रूचा एकदाचा निकाल लावून टाका’ म्हणणार्‍या घरबसल्या देशभक्तांच्या मनातील थोडे विष तरी त्याने उतरेल अशी माझी अपेक्षा होती. पण...

    मी हा चित्रपट पाहात असताना थिएटरमधील काही ‘चित्रपट रसिक’ मंडळी ‘उडवला बघ,’ ‘अरे त्याचा हात बघ कसला उडला,’ ‘हा: हा: कोथळाच काढला,’ असे चीत्कार करून तो प्रसंगही ‘एन्जॉय’ करताना पाहिले. मूळ प्रसंगाहून मोठा हादरा त्या संवेदनाहीनतेचा होता. तेव्हापासून चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यास जाण्याचे धाडस मी करत नाही. I would rather be alone than in such a deranged company(१) .

    गेल्या काही दिवसांमध्ये भारत-पाकिस्तान संघर्षा-दरम्यान याच प्रवृत्तीचे उघडे-नागडे प्रदर्शन भारतीय चॅनेल माध्यमांसह अनेक संभावित समाजातील व्यक्तींकडूनही झालेले दिसले. ‘युद्ध हा एक खेळ आहे, तो आपल्या टीमने जिंकायचा आहे’ अशा ईर्षेने मतप्रदर्शन करणारे हे सुखवस्तू नि संभावित लोक कधी सीमेवरील आपल्याच नागरिकांचा विचार करत असतील का? या प्रश्नाचे निर्णायक उत्तर नकारार्थी मिळून गेले.

    KherInSaaraansh
    ‘सारांश’ चित्रपटामध्ये अनुपम खेर

    थोडे मागे गेलो, तर इतरांप्रती या निर्ममतेचे उत्तम उदाहरण म्हणून अनुपम खेर या गुणी नि प्रसिद्ध अभिनेत्याच्या वर्तनाकडे पाहाता येईल. खेर हे काश्मीरी पंडित. काश्मीरमध्ये हिंदूंवर झालेले अत्याचार हा इतिहासाचा एक काळा अध्याय आहे. या संदर्भात काश्मीरी पंडितांबद्दल विशेष बोलले जात असते. काश्मीर खोर्‍यातून या जमातीला परागंदा होऊन जम्मू भागात आश्रय घ्यावा लागला. साहजिकच खेर त्या मुद्द्याबाबत अधिक संवेदनशील आहेत. २०१४ नंतर त्यांची ही संवेदनशीलता त्यांनी हिंदुत्ववाद्यांच्या दावणीला नेऊन बांधली. त्यातून त्या गटातील निष्ठुरतेचा प्रादुर्भाव त्यांच्या मनातही होत गेला.

    अयोध्येत राममंदिर उभारणीनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर अयोध्या ज्या फैज़ाबाद लोकसभा मतदार-संघात येते तिथे भाजपचा पराभव झाला. खेर प्रचंड संतापले. थिल्लर समाजमाध्यमी ट्रोल्सच्या सुरात सूर मिसळून ‘अयोध्येचे लोक देशद्रोही आहेत, त्यांच्यावर बहिष्कार घाला,’ म्हणू लागले. पण ‘एरवी धर्मनिष्ठ असणारी अयोध्या भाजपविरोधात का गेली असावी?’ असा प्रश्न त्यांना पडला नाही. त्या गटात कुणालाच प्रश्न पडत नसतात, त्यांच्याकडे फक्त शिक्के असतात.

    अयोध्येमध्ये मंदिराच्या उभारणीच्या निमित्ताने जो वरवंटा फिरला, त्यात अनेक लोक बळजबरीने विस्थापित करण्यात आले. परिक्रमेच्या नव्या प्रशस्त मार्गावर गुजरातमधून आलेल्या बनियांनी बस्तान बसवले. तिथे कित्येक दशके व्यवसाय करणारे रुंदीकरणाच्या नावाखाली उखडून दूर फेकले गेले. जागा-बदलामुळे त्यांचे रोजगार कोसळले. यातून निर्माण झालेल्या वैफल्यातून जनतेने भाजपविरोधात कौल दिला, हे समजून घेण्याची खेर यांची तयारी नव्हती. ‘काश्मीरमधील पंडितांना आपल्या घरातून हुसकावून लावल्याबद्दल देशातील जनतेने संवेदनशील असावे’ अशी अपेक्षा असणारे खेर, अयोध्यावासीयांमधील तसाच प्रसंग ओढवलेल्यांच्या बाबतीत मात्र नेमके उलट— दमनकर्त्यांच्या बाजूने बोलत होते.

    शांततेच्या काळातदेखील सारासारविवेकबुद्धी– ती ही खेर यांच्यासारख्या सुखवस्तू, संभावित व्यक्तीची– परदु:ख शीतल मानून निवाडा करत असेल, तर युद्धासारख्या आणिबाणीच्या प्रसंगी सामान्यांचे तारतम्य पार रसातळाला जाते यात नवल नाही. युद्धाच्या काळात सीमावासी जनतेला जे भोगावे लागते, ते त्यापासून कैक कि.मी. दूर, देशाच्या महानगरांत सुरक्षित राहून युद्धाला व्हिडिओ गेमप्रमाणे पाहणार्‍यांना कधीच जाणवत नाही. जमिनीच्या तुकड्याच्या मालकीच्या क्षुद्र महत्त्वाकांक्षेमध्ये दोनही बाजूच्या सामान्य नागरिकांचा बळी जात असतो. याचे ‘युद्ध म्हटले की अप्रत्यक्ष हानीही (collateral damage) होणारच. त्याबद्दल खंत करण्याचे कारण नाही.’ हे निर्दय नि निर्मम समर्थन देणारी ही मंडळी, ‘स्वत: या अप्रत्यक्ष हानीचा भाग असण्याची शक्यता/संभाव्यता नगण्य आहे,’ याची खात्री असल्यानेच तसे बोलत असतात.

    यावरून मला वाजपेयी सरकारच्या काळात भारताने केलेल्या अणुचाचणीच्या वेळी अशा ‘शूर’ लोकांनी उधळलेल्या राष्ट्रप्रेमाच्या भंडार्‍याची आठवण झाली. भारताने अणुचाचणी यशस्वी केल्यावर अमेरिकेत राहणारे सुखवस्तू भारतीय मिठाई वाटत होते. पण याचा परिणाम म्हणून संध्याकाळपर्यंत अमेरिकेने भारतावर निर्बंध लागू केल्याची घोषणा झाली. पाठोपाठ ‘तात्पुरत्या व्हिसावर अमेरिकेत असणार्‍या भारतीयांचे व्हिसा रद्द करुन त्यांना परत पाठवले जाणार’ असल्याची - साधार पण - अफवा पसरली नि या राष्ट्रभक्तांच्या अंगावरचा भंडारा नि चेहर्‍यावरचा रंग दोन्ही उतरले. आता त्यांनी वाजपेयींच्या नावे बिब्बे उगाळायला सुरुवात केली.

    अर्वाचीन युद्धातच नव्हे, तर मानवाच्या इतिहासातील अगदी पहिल्या टोळी-संघर्षापासून पाहिले तर युद्धाचे मुख्य कारण होते अन्न नि पाणी यांच्या साठ्यावरील स्वामित्व. याचा अपरिहार्य परिणाम म्हणून भूमीवरील स्वामित्वाच्या लढाया सुरु झाल्या. पुढे चलनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्याची जागा संपत्ती-अपहाराने घेतली. अलेक्झांडर, तैमूरलंगापासून हिटरलरपर्यंत अनेकांनी सम्राटपद, अनिर्बंध सत्ता नावाचे काहीतरी अध्याहृत मिळवण्यासाठी युद्धे करुन नरयज्ञ मांडले(२). माणसाने युद्धतंत्र जसजसे अद्ययावत करत नेले तसतसे युद्धे ही शस्त्रांसाठी चाचणी, प्रयोग म्हणून होऊ लागली. भांडवलशाहीचा वरवंटा जगभर फिरल्यानंतर खासगी शस्त्रास्त्रनिर्मिती कंपन्यांचा धंदा व्हायचा असेल तर युद्धे अपरिहार्य ठरत गेली(३).

    या सार्‍या प्रत्यक्ष नि अप्रत्यक्ष युद्धांमध्ये सर्वाधिक संख्येने नि तीव्रतेने बळी गेले ते स्त्रियांचे नि बालकांचे. प्रत्यक्ष युद्धगर्जना आणि एसी दिवाणखान्यातून वाजणार्‍या युद्धपिपाण्या या दोहोंमागच्या मेंदूंमध्ये या दोन गटांचा विचार अस्तित्वातच नसतो. टोळीजीवन काळामध्ये संघर्ष झाले, की विजयी टोळीने पराभूत टोळीतील स्त्रिया पळवून न्यायच्या, आपल्या टोळीची लोकसंख्या वाढवण्यासाठी त्यांचा भूमी म्हणून वापर करायचा, हे ठरलेले असे. अनुवांशिकतेची समज नि आग्रह नव्हता तोवर हे घडे.

    मानवी ‘संस्कृती’ आणखी प्रगत झाली नि सम्राटांच्या महत्त्वाकांक्षी लढायांमध्ये विजयी सैन्यातील सैनिकांना ‘लूट’ म्हणून विरोधी गटातील, समाजातील स्त्रियांचा अनिर्बंध भोग नि अपहार करण्याची पूर्ण परवानगी असे. अगदी लोककल्याणकारी म्हणवणार्‍या सम्राटांच्या युद्धनियमांतही हे सहज सामावले जात असे. युद्ध लढल्याबद्दल मिळालेले हे बक्षीस वा कमाई असे. आता या ‘प्रगत’ मानवाने टोळीयुद्धानंतर पळवून आणलेल्या, परकी असून ‘आपल्या मुलांची माता’ म्हणून स्त्रियांचा असलेला दर्जा काढून घेत, त्यांना केवळ दासी वा भोगदासी पातळीवर आणून सोडले.

    युद्धाच्या छायेतील पुढच्या पिढीचे हाल सर्वाधिक विषण्ण करणारे असतात. युद्धात पालकांपैकी एखादा गमावलेल्या मुलांचे आयुष्य उध्वस्त होते. जिंकल्या युद्धाचे प्रत्यक्ष वा आभासी सेलेब्रेशन करणार्‍यांना यांच्या आयुष्याची जी धूळदाण झाली त्याची जाणीवही नसते. फारतर युद्धात गमावलेल्या यांच्या पालकांना (ते प्रत्यक्ष लढले म्हणून) चतकोर श्रद्धांजली वाहण्यापलिकडे– क्वचित त्यांना ‘शहीद’ हे विशेषण लावण्यापलिकडे अधिक काही करण्याची यांना गरज वाटत नाही. या शहीदांच्या कुटुंबाचे पुढे काय झाले, त्यांना आपण कशा प्रकारे साहाय्यक होऊ शकतो, याचा विचार ते क्वचितच करतात. खेळाची एक पायरी संपून नवी पायरी सुरु झाल्याप्रमाणे ते लोक– फिके पडू लागलेले आपल्या राष्ट्रप्रेमाचे सर्टिफिकेट ‘रिन्यू’ करण्यासाठी– पुढच्या संघर्षाची वाट पाहू लागलेले असतात.

    अशा संघर्षात सर्वात मोठे बळी असते ती पुढची पिढी. मोठ्यांच्या संघर्षात ती जिवानिशी जाते किंवा जगण्यानिशी. ‘युद्ध म्हणजे काय?’ याची समज येण्याच्या आत त्याने यांचे आयुष्य उध्वस्त केलेले असते. दरम्यान घरातल्या घरात शौर्याच्या ढेकरा देऊन त्यांना रणगर्जना समजणारे, या बळींच्या जात-धर्माची शोधाशोध करु लागतात.

    IsThisCollateralDamage

    नुकत्याच झालेल्या भारत-पाकिस्तान संघर्षामध्ये दोनही बाजूंची बालके जिवानिशी गेली, काही पोरकी झाली. आक्रमणसंधी झाल्यावर ‘आपलेच राष्ट्र जिंकले’ म्हणत झेंडे घेऊन आपल्या राष्ट्राचा तो तथाकथित विजय साजरा करणार्‍या बुद्धिमंदांना त्यांची नावेही ठाऊक नसतील, युद्धखोर माध्यमांनी ती सगळी सांगितलीही नसतील. जरी ठाऊक झालीच तरी दोन-चार दिवसांत ती विस्मृतीत जातील नि ते आपले संभावित नि सुरक्षित आयुष्य जगू लागतील.

    हा फोटो फेसबुकवर मिळालेला आहे. पहिल्या फोटोतील दोघे आहे ती भावंडे, झोया (१२) आणि झैन(१०). हे दोघे जम्मूचे रहिवासी, पाकिस्तानने सीमावर्ती भागात केलेल्या गोळीबारात मारले गेले. दुसरा फोटो आहे तो इरताझा अब्बास या सात वर्षांच्या मुलाचा; पाकिस्तानातील मुझफ्फराबादचा रहिवासी असलेला हा मुलगा भारतीय कारवाईत मारला गेला. हा फोटो ज्यांच्या वॉलवरुन मिळाला त्या लक्ष्मी यादव यांनी हे दाहक वास्तव अधोरेखित करणारी कविता पोस्ट केलेली आहे.

    या मुलांचे फोटो पाहताना मला विविध चित्रपटांतून पाहिलेले झैन, झोया आणि इरताझा आठवत होते...

    एनिमी अ‍ॅट द गेट्स (२००१)’ या चित्रपटामध्ये जर्मनीच्या पराभवाचे बिगुल ज्यातून फुंकले गेले त्या प्रसिद्ध स्टालिनग्राड लढाईच्या पार्श्वभूमीवरील रशिया-जर्मनी संघर्षाची कथा उलगडते. प्रतीकार्थाने हा लढा दोन sniper अर्थात दूरंदाजांमध्ये रंगवलेला आहे. या दोन सांडांच्या टकरीमध्ये साशासारख्या शेरडाची गठडी वळली जात आहे (४). युद्धभूमीपासून दूर असलेल्यांनाच तटस्थ मूल्यमापनाची चैन परवडू शकते. प्रत्यक्ष युद्धप्रवण भूभागावर कुणी तटस्थ राहू शकत नाही. सुरक्षित राहायचे असेल तर एक बाजू घ्यावी लागे, आणि अपरिहार्यपणे दुसर्‍या बाजूचे शत्रुत्वही.

    त्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये बारा-चौदा वर्षांचा साशा घरचा पोशिंदा झाला आहे. त्याला आपल्या घरच्यांचे पोट भरण्यासाठी हवे असलेले अन्न मिळवण्यासाठी जर्मन सैनिकासमोर मान तुकवावी लागते आहे. या अन्नाच्या बदल्यात जर्मन दूरंदाजाने त्याला आपल्यासाठी हेरगिरी करण्यास जुंपले आहे. तर दुसरीकडे, हे करत असताना ‘आपण आपल्याच देशाशी, समाजाशी द्रोह करत आहोत’ या बोचणीखाली तो उलट दिशेने हेरगिरी करुन आपली बोच कमी करु पाहातो आहे.

    SashasEnd
    साशाचा मृत्यू: 'Enemy At the Gates' या चित्रपटातून.

    पण साशाच्या दुर्दैवाने हे उघड होते. तो जर्मन दूरंदाज समजूतदारपणे साशाच्या खांद्यावर ठेवताना दिसतो... दुसर्‍या क्षणी दिसते ती फाशी दिलेल्या साशाच्या मृतदेहाची छायाकृती, पुरा मृतदेहही नव्हे. तेव्हापासून ‘साशा’ माझ्यासाठी हे नाव म्हणजे मूर्तिमंत वेदना आहे(५). पुढे फेसबुकवर या नावाच्या मांजराचा फोटो शेअर केलेला पाहिल्यावर त्या लोकरी गाठोड्याच्या जागी मला या साशाचा चेहराच दिसू लागला होता. साशासारखे अनेक जीव ही युद्धाची केवळ छाया असते, प्रकाशाची बाजू नेहेमीच राजकीय नेत्यांनी बळकावलेली असते.

    पडद्यावर प्रत्यक्ष न पाहिलेला पण छातीत बेयोनेट घुसल्याची जाणीव करुन देणारा मृत्यू म्हणजे ‘लाईफ इज ब्युटिफुल (१९९७)’ मधला ग्विदोचा. साशाचा मृत्यू निदान छायास्वरूपात तुम्हा-आम्हा प्रेक्षकांना दिसतो, ग्विदोचा मृत्यू तर केवळ भिंतीआडच्या चार फैरींनीच तुम्हाला जाणवतो... तो ही काही क्षण उशीराने. काय घडले याची उमज पडण्यास काही सेकंद जातात. त्यानंतर वास्तवाचे भान मेंदूत उतरताच संवेदनशील मनाच्या प्रेक्षकाच्या मनात युद्धभूमीवरील स्फोटाप्रमाणेच हादरा बसतो.

    साशाचा मृत्यू हा त्याने अस्तित्वासाठी नाईलाजाने स्वीकारलेल्या दुटप्पी भूमिकेचा पराभव आहे, तर ग्विदोचा आपल्या मुलाला– जुझेला, भगभगीत नि रक्ताळलेल्या जीवन-वास्तवापासून सुरक्षित ठेवण्यासाठी घेतलेल्या सोंगाचा यशस्वी(?) अंत. पण दोघेही द्वेषांध सत्तापिपासूंच्या महत्त्वाकांक्षेचे बळी.

    साशाचा मृत्यू हा जगण्यातला एका अंकुराचे वठणे आहे, तर ग्विदोचा मृत्यू एका अंकुराला जपणे आहे. ‘टर्टल्स कॅन फ्लाय (२००४)’ मधील पालकांची पाखर गमावलेल्या भावंडांचे जिणे हे या दोहोंच्या पलिकडे, सारे आयुष्य मृत्यूच्या छायेत जगावे लागणार्‍या उद्ध्वस्त, खुरट्या अंकुरांचे जिणे आहे. युद्धाच्या धुमश्चक्रीमध्ये दोन्ही हात गमावलेला चौदा-पंधरा वर्षांचा हेन्गॉव्ह, चेहर्‍यावर वाळवंट घेऊन वावरणारी बारा-तेरा वर्षांची अग्रिन ही त्याची धाकटी बहीण आणि तिच्या पाठीवरच्या झोळीत ठाण मांडून बसलेला वर्ष-दीड वर्षांचा आंधळा रिगा या तीन भावंडांचे जगणे नव्हे रखडणे आहे.

    HangkovWorking

    साशाप्रमाणे इथेही हेन्गॉव्ह त्या दोन लहानग्या जिवांचा पोशिंदा होऊन बसला आहे. दुर्दैवाचा फेरा असा, की ज्या युद्धाने त्यांनी आपले आई-वडील गमावले, अग्रिनच्या चेहर्‍यावरची स्निग्धता अकाली शोषून घेतली, त्या युद्धानेच त्यांना पोट भरण्याचे साधन उपलब्ध करुन दिले आहे. हात नसलेला हेन्गॉव जमिनीवर सरपटत जाऊन, आपल्या दातांनीच भू-सुरुंग निकामी करण्याचे काम करतो आहे, त्याबदली मिळालेल्या चार पैशांतून युद्धभूमीवर ज्याची चणचण असते, त्या अन्नाचे चार तुकडे तो मिळवू शकतो.

    ‘लाईफ इज ब्युटिफुल’मधील ग्विदोच्या मृत्यूची जाणीव जशी प्रेक्षकांना काही क्षणानंतर होते नि जबरदस्त आघात करते. तशीच स्थिती या चित्रपटाच्या अखेरीस आंधळा, जेमतेम चालू लागलेला रिगा अग्रिनला जेव्हा ‘मॉमी’ अशी हाक मारतो तेव्हा होते. तेरा-चौदा वर्षांची, ती ‘आई’ पाहून भडभडून येतं. सारं थिएटरच आपल्याभोवती गरगर फिरू लागतं. युद्धभूमीवर गेलेले, एरवी आपले ‘आदर्श’ वगैरे असणारे सैनिक मृत्यूच्या सावलीमध्ये क्रूर दैत्यामध्ये परावर्तित होतात याची जाणीव होते.

    अर्थात बहुतेक राष्ट्रांतील सुखवस्तू नागरिकांना ‘आपले सैनिक असे नाहीत’ असे गृहित धरण्याची सवय असते, त्यामुळे ते अशा बातम्या सहज कानाआड करु शकतात. हॉलिवूड, बॉलिवूड चित्रपटांनी युद्धाबद्दलच्या आपल्या संवेदना बोथट केल्या आहेत. अनुभवाच्या अभावी आणि आभासी जगात अति वावर झाल्याने संवेदनशीलतेला मूठमाती देत, युद्धाकडे एखाद्या आभासी खेळासारखे पाहण्याची सवय महानगरी, नगरी जनतेला अंगवळणी पडून गेली आहे. समाजमाध्यमांवर राष्ट्रभक्तीच्या ढेकरा प्रसवणार्‍या, इतरांवर राष्ट्रद्रोहाचा आरोप केल्यानेच राष्ट्रप्रेम सिद्ध होते अशी नकारात्मक समज असणार्‍या, सतत महासत्तेच्या मृगजळाचे वेडगळ स्वप्न पाहणार्‍या भ्रमिष्टांच्या जाणिवेत हे अंकुरांचे अस्तित्व कितपत खोल उतरु शकते मला शंका आहे.

    दुर्दैव हे की हाच युद्धातील जय-पराजयाचा तथाकथित वारसा युद्धाचे बळी असलेल्या मुलांच्या हाती पुन्हा सोपवला जातो. चक्र पुन्हा सुरु होते. ज्या युद्धाच्या, वंशविच्छेदाच्या छायेमध्ये ग्विदोने आपला जीव गमावला, त्यापासून जुझेला अनभिज्ञ ठेवण्यासाठी खोट्या खेळाचे सोंग उभे केले, त्याचे बक्षीस म्हणूनही त्याने ‘रणगाड्या’ची निवड केलेली असते. चित्रपटाच्या अखेरीस अमेरिकन सैन्याच्या आगमनानंतर, जर्मन सैन्याने माघार घेतल्यानंतर, कॅम्पमधून मुक्त झालेल्या जुझेला बाहेर येताच समोर दिसतो तो रणगाडाच; ते आपले बक्षीस आहे असा समज तो करुन घेतो. त्यावर आरुढ होऊन पुढे जात असताना वाटेत आई भेटल्यावर अत्यानंदाने ‘We won, we won.’ म्हणून चीत्कारतो.

    GiosuesAndTheTank

    ‘होय रे बाळा, तू जिंकलास हे खरे. पण तो रणगाडा हे तुझे बक्षीस नव्हे. त्याहून मूल्यवान असे काही तुझ्या पदरी पडले आहे, जे लक्षावधींनी नुकतेच गमावले आहे,’ असे त्याला सांगावेसे वाटते. पण ते समजावे हे जुझेचे वय नव्हे. माझ्या आसपास त्या समजुतीच्या वयाची माणसे असूनही ती समज रुजत नाही, तिथे जुझेला दोष कसा देता येईल?

    - oOo -

    टीपा:

    (१). पुढे PIFF मध्ये ऋतुपर्ण घोषच्या नितांतसुंदर ‘मेमरीज्‌ इन मार्च’ मध्ये ‘बायल्या(!) स्क्रीनवर आला की फिदीफिदी हसायचे असते’ या नेटाने बसलेल्या फिल्म फेस्टिवली प्रेक्षकांनी माझा तो निर्णय पक्का केला होता. [↑]

    (२) याची थोडी कमी रक्तरंजित आवृत्ती तुम्हा-आम्हा सामान्यांच्या मनात ठाण मांडून बसते, तेव्हा माणसे अनिर्बंधपणे संपत्तीच्या मागे हपापलेपणे धावू लागतात. त्यासाठी अप्रत्यक्षपणे इतर अनेक माणसांच्या मूलभूत गरजांना निर्दयपणे चिरडत, भोगता येणारही नाही इतकी प्रचंड संपत्ती गोळा करत जातात, मालकी हक्काचे केवळ आभासी सुख मिळवत राहातात. [↑]

    (३). दोन आठवड्यापूर्वी झालेल्या भारत-पाकिस्तान संघर्षाकडे फ्रान्सची राफेल विमाने, रशियाची S-400 एअर-डिफेन्स सिस्टम आणि पाकने प्रथमच वापरलेली चीनची प्रत्याघाती विमाने यांची चाचणी मानले जाऊ लागले आहे ते यामुळेच. [↑]

    (४). ते दोघे स्नायपर त्यांच्या देशांचे (जर्मनी नि रशिया) प्रतीक मानले, तर साशा हा प्रतीकार्थाने दोघांच्या संघर्षात पोळलेला पोलंड आहे असे म्हणता येईल. [↑]

    (५). या साशाचे पात्र वास्तवातील साशा फिलिपोव या मुलावर/तरुणावर बेतलेले आहे. विकीवरील या पानावर तुम्हाला साशाच्या समोर वाढून ठेवलेल्या आयुष्याची, संभ्रमाची, मानसिक नि वास्तविक संघर्षाची कल्पना येणे अवघड आहे. एकतर हे पाश्चात्त्य प्रभाव असलेले माध्यम असल्याने रशियाबद्दल दुजाभाव नि आकस असणारे तिथे अधिक वावरतात. दुसरे म्हणजे इथे साशाचे वयही विशीचे आहे, म्हणजे तत्कालीन स्थितीचा विचार करता तो पूर्ण वाढ झालेला सैनिक वा हेर म्हणून गणला जाऊ शकतो. [↑]

    ---

    लेखाचे शीर्षक मधुकर आरकडे यांच्या ‘बीज अंकुरे अंकुरे...’ या कवितेमधील ‘कसे रुजावे बियाणे माळरानी खडकांत’ या ओळीतून. ऐंशीच्या दशकात आलेल्या ‘गोट्या’ या मालिकेचे शीर्षकगीत म्हणून ही कविता लोकप्रिय झाली होती.


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा