-
मघाचा पाऊस सारखा कोसळत होता. सूर्य दिसत नव्हता, ऊन पडत नव्हते. गडद भरून आलेले आभाळ सारखे सांडत होते. जंगलातील झाडांची खोडे शेवाळ्याने हिरवीगार झाली होती. ओढे-नाले खळाळत होते. जिकडे-तिकडे पाणीच पाणी झाले होते.
कधीमधी जोरात पडणारा पाऊस दमगीर होऊन हळूहळू येऊ लागे. थेंबांचा आकार लहान होई. सतत चाललेला घोष मावळल्यासारखा वाटे आणि निळे- पांढरे धुके लोळत येई. दऱ्या भरून जात, झाडे दिसेनाशी होत. डोंगरांची उंच शिखरे झाकून जात. निळे-पांढरे धुके सर्वत्र पसरून जाई. वारा भरारे, धुके निघून जाई. ओलीचिंब होऊन ठिबकणारी झाडे, फोफावलेल्या रानवेली, नाना जातींची झुडपे, मातीचा तांबडा रंग घेऊन धावणारे ओहळ, सर्वत्र पसरलेली हिरवळ दिसू लागे. ती क्षणभर दिसते-न दिसते तोच पुन्हा सडासडा धारा येत. झाडांचे शेंडे वाकत. गवताची पाती जमिनीला टेकत. नकोसा वाटणारा घोष जमिनीपासून आभाळापर्यंत भरून राही.
गेले आठ दिवस असा कोसळणारा पाऊस! त्याने आज सकाळी भांगा दिला. आभाळ स्वच्छ झाले. ताजे ऊन पडले. ओहळ चमकू लागले. हिरवे गवत टवटवीत झाले. आवाज थांबला. उबदार ऊन सर्वत्र पडले.
दरीतल्या एका डेरेदार झुडपाखाली अंग गोळा करून बसलेले आठ ल्हावे हुशार झाले. मुरून बसलेले मोकळे झाले. पंख फडफडवून त्यांनी चोचीतल्या चोचीत आवाज केला. झाडाच्या काळ्या सावलीतून बाहेर पडून ते चमकदार उन्हात आले. पाणी ठिबकून ओले झालेले पंख त्यांनी चोचींनी साफ केले आणि ते फिरू लागले. गवता-झुडपांच्या गिचमिडीतून निघून डोंगराच्या सपाट भागावर तुरुतुरु धावत आले आणि किडा-मुंगी, कण-कण टिपू लागले. उन्हाने चमकणाऱ्या त्या हिरव्यागार हिरवळीवर रंगदार लाव्हे इकडून तिकडे धावू लागले. गवताच्या पात्यावर चमकणारे थेंब ओघळून खाली पडले. लहान गवती किड्यांची धांदल उडाली.
कसे सुरेख ऊन पडले होते! आभाळ निळे झुळझुळीत दिसत होते. वारा अगदी शांत होता. सूर्य वर-वर चढत होता. डोंगरावरून खाली धावणारे पाणी मंजूळ आवाज करीत होते. गवताच्या पात्यांवर चमकणारे बारीक थेंब एकाएकी नाहीसे होऊ लागले होते. ओलीचिंब झालेली झाडे सुकत चालली होती. खोडे, दगडगोटे कोरडे होत होते. पाऊस बिलकूल थांबला होता.
आठ लाव्हे खूप हिंडले. चुकामूक झाली की, आखूड शीळ घातल्यासारखे ओरडावे, त्या ओरडण्याच्या अनुरोधाने सर्वांनी एकत्र यावे आणि पुन्हा माना खाली घालून किडा-मुंगी शोधावी.
असे ते बरेच हिंडले. त्यांचे खाऊन झाले. चिखलाने मळलेल्या आपल्या चोची त्यांनी दगडावर, गवतावर घासून स्वच्छ केल्या. काळे पांढरे ठिपके असलेले पंख अवघडले होते, ते उघडले, झाडले आणि पुन्हा मिटले. तांबडेलाल पाय, एकेकदा एक असे तणावून सैल केले. छाती उभारून तांबड्या डोळ्यांची उघडझाप करीत इकडे-तिकडे बघून घेतले. सर्वत्र शांतता होती. दूर खळाळणाऱ्या पाण्याशिवाय कसलाही आवाज नव्हता. ओले गवत जवळजवळ कोरडे झाले होते. भिजल्या जमिनीचा गारवाही थोडाफार बसला होता.
एक तुरुतुरु अगदी उघड्या जमिनीवर आला. खाली बघून त्याने पायाने जमीन सारखी केल्यासारखे केले आणि तो जमिनीवर दबला. मान आत घेऊन आणि डोळे मिटून ऊन खाऊ लागला. बाकीचेही आता बसण्यासाठी चालले होते. झुडपाच्या आडोशाला जाण्यासाठी काही जण चालले होते. काही अजूनही गवतावर टोचा मारीत हिंडत होते. त्यांपैकी एकाने मान उंच करून बसलेल्या लाव्ह्याकडे बघितले आणि उतरणीच्या खाली जायचे सोडून घशातल्या घशात आवाज करीत तो त्याच्यापाशी आला. जागा साफसूफ करून शेजारी मुरला. इतका शेजारी की, त्याचा धक्का बसून पहिल्याने डोळे उघडले. अंगाची हालचाल केली आणि मग एकमेकांच्या पंखाला पंख लावून ते दोघेही गुडुप बसले. काही वेळाने आडोशाला, कुणाच्या दृष्टीस न पडावे अशा बेताने बसणारे बाकीचे लाव्हेही आले आणि या दोघांशेजारी येऊन बसले. अगदी उघड्यावर, उतरणीच्या हिरवळीवर ऊन खात मुरून बसले. दिसेनासे झाले. ओंजळभर गोटे एका जागी पडले आहेत, असे दिसू लागले. कुठेही हालचाल दिसेनाशी झाली.
सूर्य वर चढत होता. ओहोळाची खळखळ लांबून ऐकू येत होती आणि गारवा कुठच्या कुठे गेला होता.
चढण चढून तीन पोरे वर येत होती. त्यांचे चेहरे थकल्यासारखे दिसत होते. अंगातले कपडे भिजून चिंब झाले होते. पुढे होते ते किडकिडीत पोर चलाख होते. काखेत दोन छत्र्या मारून आणि एका हातात बूटजोडी घेऊन ते वर चढत होते. त्या बूटजोडीचा मालक त्यांच्या मागे होता. गरगरीत चेहरा, गोरा रंग आणि काळेभोर केस यांमुळे तो बऱ्या घरचा असावा, असे वाटत होते. उघड्या पायांनी चालताना त्याला फार कष्ट पडत असावेत, असे वाटत होते. पाठीला लटकविलेली बंदूक सांभाळीत तो पुढच्यामागून चालला होता आणि त्याच्यामागे आठ-दहा वर्षांचे एक पोर होते. तो बहुधा त्याचा लहान भाऊ असावा. पावसात भिजून काकडला होता, तरी रानात फिरण्याचा आनंद त्याच्या तोंडावर दिसत होता.
पायांचा आवाज न करता, न बोलता-सवरता ही तिन्ही पोरे चढ चढून वर आली. खेडुत पोर एकाएकी थांबला. मागून येणाऱ्या बंदूकवाल्याला त्याने इशारा दिला. धांदलीने तो जवळ आला, तसा हा कुजबुजला, “लाव्हरी आहे बघा. नीट नेम धरून मारा.”
डोळे मोठे करून बंदूकवाला बघू लागला. मागचे पोर धडपडून वर येऊ लागले, पण डोळे वटारून किडकिडीत पोराने त्याला चूप केले.
बंदूकवाल्याला पुढे बारा-पंधरा हातांवर पडलेल्या ओंजळभर गोट्यांशिवाय काही दिसेना. तोंडातल्या तोंडात तो विचारू लागला, “कुठं? कुठाय?”
तेव्हा किडकिड्या पोरानं खसकन त्याच्या दंडाला धरले. चाहूल लागायच्या आत या माणसाने जर बार घातला नाही, तर पाखरे उडून जाणार, या जाणिवेने ते अगदी अधीर झाले होते. ओंजळभर गोट्यांकडे बोट दाखवून ते म्हणाले, “ते दिसतंय का पडलेलं? हां, ते ठोका बेशक!”
मग दुनळी रोखली गेली आणि फाडकन आवाज झाला. जंगलातली शांती फाटली. ओंजळभर गोटे जागच्या जागी थरथरल्यासारखे वाटले. बारीक पिसे चहुफेर उडाली. कडेला असलेला एक लाव्हा जखमी होऊन समोरच्या उत्तरणीखाली असलेल्या झुडुपाच्या आडोशात जाण्यासाठी धावू लागला, पण ते चलाख पोर पुढे झाले. छत्र्या-बूट टाकून धावले आणि झुडपात शिरून दिसेनासा होईतोवर त्याने लाव्हा पकडला. चेंडूसारखा जमिनीवर आपटला आणि तो ओरडला, “शाबास! शाबास!”
बंदूकवाल्या गोऱ्या पोराने हात वर केले आणि 'हो!' असा आनंदी आवाज केला. लहान पोर थयथया नाचू लागले. वरचेवर 'शाबास शाबास' म्हणत किडकिडे पोर पुढे झाले आणि त्याने लाव्हे उचलले.
“एक... दोन... तीन... चार!” मोठ्यांदा ते ओरडले.
“आठ आहेत... आठ!”
सकाळपासून फिरून-फिरून थकलेल्या तिन्ही पोरांचे चेहरे उजळले. बंदूकवाल्याने बूट चढविले. किडकिड्या पोराने भिजून चिंब झालेल्या कोटाच्या खिशात लाव्हे भरले. लहान पोराने मारल्या जागी विखुरलेल्या रंगीत पंखांतली चार पिसे गोळा करून हातात घेतली आणि ओरडत-ओरडत, मोठमोठ्याने बोलत ते तिघेही चढण उतरू लागले.
- oOo -
पुस्तक: काळी आई
लेखक: व्यंकटेश माडगूळकर.
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस.
आवृत्ती आठवी, चौथे पुनर्मुद्रण.
वर्ष: २०२२.
पृ. ९६-९९.
(पहिल्या दोन आवृत्त्या अन्य प्रकाशन).---
RamataramMarquee
रमतारामाच्या विश्रांतीस्थळी:   
वारसा, जिज्ञासा आणि ज्ञान - १. वृद्धत्वाची जेथ प्रचिती... काव्य-मोतीचूर ऊर्फ काही ‘चविष्ट’ प्रेमकविता       चला दोस्तहो, खाण्यावरती बोलू काही       मूषकान्योक्ती       सुजन गवसला जो       क्रिकेटमधील उपेक्षितास दाद       बाबेलचा दुसरा मनोरा       Will He...?       To Dumbo, with Love       पहलगाम आणि आपण      
सोमवार, २६ मे, २०२५
उघडीप... आणि झाकोळ
संबंधित लेखन
काळी आई
पुस्तक
व्यंकटेश माडगूळकर
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा