-
रावणाने डोळ्यांवर हात ठेवत सूर्याकडे नजर केली. आणि तो हसला.
‘काय झालं हसायला?’ कुंभकर्णाने विचारलं..
रावण आणि कुंभकर्ण सीतेच्या कुटीबाहेरच्या पडवीत उभे होते. तिची वाट बघत. त्यांनी नुकतीच न्याहारी केली होती. न्याहारी करून झाल्यावर पूजेसाठी सीता पुन्हा आता कुटीत गेली होती..
‘असंच... दुःखात बुडालेला सूर्य पाहतोय,’ रावण उत्तरला.
कुंभकर्ण खट्याळ हसत म्हणाला. ‘मला कळत नाही दादा, की कुठला तू जास्त त्रासदायक आहेस माझ्यासाठी. पूर्वीचा तू, जो माझं कधीच ऐकायचा नाही की आताच हा नवीन तत्त्वज्ञानी तू, जो कोड्यात बोलतो !’.
रावण कुंभकर्णाच्या पोटात एक गुद्दा देत म्हणाला.‘अरे हलकट कुत्र्या!’ कुंभकर्ण रावणाला घट्ट मिठी मारत आणखी मोठ्याने हसू लागला. डोळ्यांतून पाणी येईपर्यंत एकमेकांना घट्ट मिठी मारत ते दोघे हसत राहिले. आणि मग त्यांच्या डोळ्यांतून त्यानंतर सुद्धा अश्रू वाहत राहिले. ते अश्रू दुःखाचे होते. वाया गेलेल्या, सरलेल्या वर्षांबद्दलचं दुःख.
तेवढ्यात कुणीतरी घसा खाकरला. मग ते दोघे थांबले. त्यांच्यापासून थोड्या अंतरावरच सीता ही गंमत पाहत उभी होती.
दोन्ही भावांनी आपले डोळे पुसले आणि ते खाली बसले. सीतासुद्धा त्यांच्यासोबत बसली.
‘तुम्ही दोघे ठीक आहात ना?’ सीतेने विचारले..
कुंभकर्णाने दोघांच्या वतीने उत्तर दिले. ‘एवढे आनंदात आम्ही कधीच नव्हतो.’
रावण पुन्हा हसला आणि त्याने आपल्या भावाच्या खांद्यावर एक गुद्दा दिला.
‘मग, आज कशाविषयी बोलणार आहोत आपण?’
रावण किंचित पुढे झुकून म्हणाला. ‘आता काही तात्त्विक चर्चा करायच्या नाहीत!’
‘रुद्रदेवाची शपथ, खरंच! पुरे झाल्या तात्त्विक चर्चा!’ कुंभकर्ण खळखळून हसत म्हणाला.
‘बरोबर !’ रावण सुद्धा खुदूखुदू हसत उगारला.
कुंभकर्ण मान मागे टाकून गडगडाटी हसला. काहीवेळ सीता सुद्धा या खुळचटपणात सामील झाली.
मग काही वेळाने रावण म्हणाला. ‘आपण आपली पुढची योजना आखली पाहिजे.’
‘हो,’ सीतेने दुजोरा दिला..
रावण पुढे म्हणाला. ‘तुझी सुटका करण्यासाठी गुरु विश्वामित्र कुणाला तरी धाडतील.’
‘हो, ते बहुधा तसं करतील.’
‘आणि तुझा पती जिवंत आहे. तो सुद्धा येईल.’
‘हो, तो येईल.’
‘आणि तू काय करशील? तू त्यांच्यासोबत पळून जाशील?’
आपण खरंच काय करणार आहोत हे आपण यांना सांगू शकत नाही हे सीता जाणून होती. ‘अं...’
‘खरं सांग. तू वेदवतीची मुलगी आहेस.’
‘खरं तर... म्हणजे असं की...’
‘ठीक आहे,’ सीतेचं बोलणं मध्यातच थांबवत रावण म्हणाला. ‘मीच सांगतो तुझं उत्तर काय आहे ते.’
सीता शरमल्यासारखी हसू लागली. तिला आता रावण पुढे काय बोलणार याचा अंदाज आला होता.
‘गुरु विश्वामित्रांचा काय विचार आहे हे मला केव्हाच कळलं होतं,’ रावण म्हणाला. ‘त्यांना एक खलनायक उभा करायचा होता, ज्याची मग नंतर विष्णू अवतार हत्या करील. म्हणजे मग भारताचे विद्रोही आणि निरंकुश लोक त्या विष्णूला पुजतील.’
‘अं...’
‘बोलू दे मला,’ हात उंचावत रावण म्हणाला. ‘जगात हाताळायला सर्वात कठीण लोक म्हणजे भारतीय लोक. ते सतत बंड करत असतात. त्यांना कायदा मोडायला आवडतं, मग त्यातून हाताला काही नाही लागलं तरी चालेल. भारतीयांना कुणा नेत्याचे आदेश पाळायला आवडत नाही. पण मग तो नेता जर असा कुणी असेल ज्याला आपण देवासारखं पुजतो, तर मग गोष्ट वेगळी असते. त्याचा आदेश मग आपण जगाच्या अंतापर्यंत आणि त्यापुढेही पाळू. पण तुम्ही एखाद्या माणसाला देव कसं काय मानू शकता? एखादा सर्वगुणसंपन्न माणूस सुद्धा त्यासाठी पात्र नसतो. त्याचे अनुयायी बनण्याची लोकांची मनापासून इच्छा असली पाहिजे. लोकांचा आदर आणि निष्ठा त्याने कमावलेली असायला हवी. आणि लोक ज्याचा तिरस्कार करतात त्या राक्षसाचं डोकं जर त्याने छाटलं तर मग सोन्याहून पिवळंच, नाही का?’
‘रावणा... यावर काय बोलायचं मला माहीत नाही... पण गुरु विश्वामित्र... त्यांच्या योजना...’
रावण गालातल्या गालात हसला. ‘नाही, ठीक आहे... मी समजू शकतो. माझ्या आयुष्याला फारसा अर्थ नाहीये. कदाचित माझ्या मृत्यूला तरी काहीतरी अर्थ प्राप्त होईल.’
सीता गप्प होती. आणि कुंभकर्णही.
‘पण तुझा पती रामाच्या इथे येण्याने आणि तुझी सुटका करण्याने भारतीय जनमानसातली जोशाची आग धगधगती राहणार नाही. त्यासाठी एक मोठं युद्ध व्हायलाच हवं.’
‘पण...’
‘मी काय म्हणतो ते ऐक. तू आणि तुझा पती मिळून भारतभूमीत खूप सारे बदल घडवून आणणार आहात. तुम्ही लोकांकडून खूप त्याग करवून घेणार आहात. या मातृभूमीसाठी. जेणेकरून भारतमातेचं भविष्य सुरक्षित होईल. आणि लोक तुम्हाला पुजत असतील तरच ते तुमच्यासाठी त्याग करतील. आणि ते तुम्हाला तेव्हाच पुजतील जेव्हा तुम्ही काहीतरी भव्यदिव्य कराल.’
रावण पुढे बोलण्याआधी काहीवेळ थांबला.
‘भारताला खरंच काय उपयोगी पडेल तर ते आहे,' रावण बोलू लागला, 'तुम्ही त्यानंतर काय कराल ते. तुम्ही ज्या सुधारणा घडवून आणाल. त्यासाठी तुम्ही लंकेच्या राज्यकारभाराचा अभ्यास करावा असं मी सुचवतो. आम्ही लंकेत जे काही केलंय त्यापासून तुम्हाला खूप काही शिकता येण्यासारखं आहे. रस्ते, पायाभूत सुविधा...’ मग पुढे बोलण्याआधी रावणाने कुंभकर्णाकडे पाहिले. ‘पण मी हे मान्य करतो की आमच्या आरोग्यविषयक सुविधांमध्ये आणखी सुधारणा होऊ शकते... सिगिरियामध्ये ज्या घातक साथीच्या रोगाने धूळदाण उडवून दिलीय ती रोखण्यात आम्हाला अजूनही यश आलेलं नाहीये.
पण, मी बांधलेल्या रस्त्यांमुळे माझी लंकेची प्रजा माझे गुण गाते असं तुला वाटतं? किंवा मी बांधलेल्या जलवाहिन्यांमुळे? उद्यानांमुळे? शाळांमुळे? अजिबात नाही... तर आजही ते कराचपाच्या युद्धात मी जो विजय मिळवला त्याच्या कथा उत्साहाने सांगतात ! आणि तुम्हा दोघांच्या बाबतीतही तसंच आहे. तुम्ही जर यशस्वी झालात तर मग त्या विष्णूनिर्मित संपन्न काळाला ते ‘रामराज्य’ किंवा ‘सीताराज्य’ असं नाव देतील. आणि तो काळ कायदा आणि सुव्यवस्था, सुखसोयी, शांती आणि सुलभतेचा असेल; रस्ते, कालव्यांच्या रूपात जलसिंचन, रुग्णालये, शाळा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शासनसंस्थेची यंत्रणा.
पण मी सांगतो ते लक्षात ठेवा, जेव्हा रामाची किंवा सीतेची गोष्ट लिहिली जाईल– कदाचित ते त्याला रामायण किंवा सीतायन असं नाव देतील तेव्हा त्यात या रामराज्याचा अगदी तुटकच उल्लेख असेल. एखादा सुंदर कालवा कसा बांधला गेला यावर कुठलाही कथाकार आपली कल्पनाशक्ती खर्च करून, उत्साहाने वीस पानं नाही लिहिणार. ती गोष्ट वाचण्यात कुणाला रस असणार आहे?
तुमच्या धाडसाची गोष्ट मात्र कथाकारांना उत्साहाने सांगावीशी वाटेल. तुमची प्रेमकहाणी, तुमचा संघर्ष, तुमचा वनवास आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लंकेत तुमचं माझ्याविरुद्धचं युद्ध. कारण एका सामान्य माणसाला तर हेच सगळं ऐकायला आवडेल. आणि त्याचसाठी तुम्ही लोकांच्या लक्षात राहाल. त्याच कारणामुळे लोक तुमचे अनुयायी बनतील. कारण बहुतांश लोक निर्बुद्ध असतात...’
कुंभकर्ण अस्वस्थपणे चुळबूळ करू लागला.
‘शांत हो, कुंभकर्णा, इतका अस्वस्थ होऊ नकोस,’ रावण म्हणाला. ‘लोकांचं आयुष्य ज्या गोष्टींनी खरोखर सुकर होतं त्याची लोकांना पर्वा नसते. उदाहरणार्थ शाळा आणि रुग्णालयं. एकदा का या गोष्टी प्राप्त झाल्या की ते या गोष्टींना गृहीत धरतात. त्यापेक्षा एखादी जादुई, चमत्कारी गोष्ट त्यांना जास्त भुलवते, जसं की एखादा नायक आणि खलनायक यांच्यातल्या मोठ्या युद्धाची कहाणी. सामान्य माणसं ही मुळातच मूर्ख असतात.’
‘रावण महाशय... काहीही बोलताय तुम्ही,’ सीता म्हणाली. ‘तू असं नाही बोलू शकत...’
रावणाने सीतेला हटकले. ‘तुला स्वतःला नैतिकदृष्ट्या श्रेष्ठ ठरवण्यासाठी तू राजकीयदृष्ट्या योग्य असं काहीही म्हण. पण तुला हे माहीत आहे की मी बोलतोय ते खरं आहे.’
सीता गप्प झाली.
‘म्हणून मग त्यांना जर युद्धाची गोष्ट हवीच असेल, तर करूयात आपण युद्ध. एक मोठं युद्ध.’
‘अं...’
‘त्याने आणखी एक उद्देश साध्य होईल. माझं सैन्य नष्ट होईल.’
‘काय?’
‘लंकेचं सैन्य नष्ट व्हायलाच हवं. भारताच्या भल्यासाठी.’
यावेळी मात्र कुंभकणनि मान हलवत भावाच्या म्हणण्याला दुजोरा दिला.
‘का?’ सीता विचारू लागली. ‘तुला स्वतःच्याच निष्ठावंत सैनिकांची हत्या का करायचीय? तेही ते फक्त तुझा आदेश पाळत असतील तरीही.’
‘नाही, तू माझ्या सैन्याला नाही ओळखत. ते फक्त आदेश पाळत नाहीत. त्यांना हिंसेतून आनंद मिळतो. तसेच सैनिक गोळा केले आहेत मी; त्यांच्यात राग आहे ठासून भरलेला. ते त्रासलेले, दुखावलेले आत्मे आहेत. ते जगाचा तिरस्कार करतात आणि त्यांना जग जाळून टाकायचंय.
माझी लंकेची प्रजा, सामान्य नागरिक चांगले आहेत. आणि त्या प्रजेचं रक्षण करायला आमच्याकडे कर्तबगार शिपायांचं दल आहे. पण माझं सैन्य... माझं सैन्य म्हणजे भूतकाळातल्या माझं प्रतिबिंब आहे... ते दयामाया नसलेले राक्षस आहेत. आणि त्यांना नियंत्रणात ठेवायला मी नसलो तर अराजक माजेल. निःशस्त्र माणसांना, लहान मुलांनाही लुटीच्या काही पैशांसाठी जिवंत जाळणारी रानटी माणसं आहेत ती. त्यांनी मुंबादेवीत तसंच केलं होतं.
हाताला लागणाऱ्या, लंकेबाहेरच्या कुठल्याही स्त्रीवर बलात्कार करणारे लुटारू, केवळ मजेसाठी म्हणून जाहीरपणे मुंडकी छाटणारे खाटीक. अधर्म असला तरी नफेखोरीसाठी माणसांना गुलाम म्हणून विकणारे नराधम. प्रचंड धाडसाने कत्तली करू शकतात ते, नक्कीच. पण त्यांच्यावर धर्माचा अंकुश नाही. मी असे सैनिक गोळा केले. अशा पुरुष आणि स्त्रियांचा मी पारखी होतो. आणि त्यांच्यासारखाच होतो.
समीची: आपल्याला वाटेल आपण तिला चांगलंच ओळखतो, पण तिला कुणीच ओळखलं नव्हतं. मी तिची भरती का केली? कारण तिच्या अस्तित्वाच्या मुळापर्यंत ती दुखावलेली होती. त्याला कारणं होती तशीच. तिच्या लहानपणी प्रचंड यातना सोसल्या होत्या तिने. तिच्या क्रूर पित्याप्रती असलेला तिचा राग दिशाहीन होऊन संपूर्ण जगाप्रतीच्या रागात परिवर्तित झाला होता. कधीही शांत न होणारा राग. हा राग तिच्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला नरकयातनेसमान बनवतो; आणि हाच राग तिला अभूतपूर्व नरसंहार करायला भाग पाडतो. पण ती माझ्या आदेशाशिवाय कधीच संहार नाही करणार.
माझ्याकडे असे दोन लाख सैनिक आहेत, सीता. ते समाजविघातक लोक आहेत. त्यांच्यापासून फक्त भारतालाच नव्हे तर माझ्या लंकेलाही धोका आहे. ते अधर्मी सैनिक असल्याने त्यांच्यापासून धर्माला धोका आहे. ते भारतावर विजय मिळवू शकतील इतके शक्तिशाली सध्या नाहीयेत. कारण आम्हाला एका घातक साथीच्या रोगाने ग्रासलंय. पण ते भारतात आणि लंकेत दशकानुदशकं अराजक माजवतील. तुम्ही मग एका अधिक चांगल्या भारताचं निर्माण कसं कराल? लंकेच्या सैन्याचा निःपात झालाच पाहिजे. आणि तसं करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे युद्ध. शेवटपर्यंत युद्ध.’
सीता काहीच बोलली नाही. रावण जे म्हणाला ते ऐकायला भावनाहीन, निर्दय वाटत असलं तरी तर्कशुद्ध होतं.
‘तुझा पती शेवटपर्यंत लढेल?’ रावणाने विचारलं.
‘तो नक्कीच शेवटपर्यंत लढेल... पण तू सुद्धा शेवटपर्यंत लढणार आहेस अशी त्याची खात्री पटली तरच. तू जिंकण्यासाठी लढत नाहीयेस अशी शंका त्याला आली तर तो युद्ध थांबवेल, कारण लढायला कचरणाऱ्या शत्रूशी युद्ध करणं हा अधर्म आहे. त्याचे विचारच तसे आहेत.’
रावण रागीट मुद्रा करत म्हणाला. ‘पण त्याला हे कसं कळेल? कोण सांगणार त्याला?’
त्याने कुंभकर्ण आणि सीतेकडे पाहिलं. दोघंही याबद्दल कुणाशीही बोलू शकत नव्हते.
‘पण मी खरंच कचरत कचरत लढणार नाही,’ रावण म्हणाला. ‘मी सर्व ताकतीनिशी लढेन. तुझा पती जिंकेल ?’
सीता हसली. तिच्या त्या हसण्यात कमालीचा आत्मविश्वास होता. ‘रामाला फक्त स्वतः रामच हरवू शकतो. तो तुम्हाला हरवेलच रावण महाशय.’
रावण रुंद हास्य करत म्हणाला. ‘मग ते एक महान युद्ध असेल.’
‘पण...’ बोलता बोलता सीता गप्प झाली. तिचा प्रश्न तिच्या ओठांतच अडकला.
रावणाला ते समजलं. पण तो तिच्या प्रश्न विचारण्याची वाट पाहू लागला.
‘पण तुला हे युद्ध स्वतःवर का ओढवून घ्यायचंय?’
रावण मंदहास्य करत म्हणाला. ‘तू ते विधान नाही ऐकलंयस का, “त्यांनी आम्हाला पुरलं, पण त्यांना कुठे माहीत होतं की आम्ही रोपाची बीजं होतो”?
सीतेने मान हलवत म्हटलं. ‘हो, ऐकलंय ना मी. सुंदर विधान आहे ते. उत्तेजना देणारं आणि विद्रोही, कुणी म्हटलं आहे ते?’
‘आपल्या पश्चिमेला असलेल्या ग्रीक बेटांवरच्या कुणीतरी म्हटलंय तसं. मला वाटतं त्या व्यक्तीचं नाव होतं कॉन्स्टंटिनोस*. पण माझ्या मते त्या विधानात ज्ञानाच्या दिशेने केलेल्या प्रवासाचं अर्धवट वर्णन आहे.'
‘कसं काय?’
‘त्यात असं गृहीत धरलंय की बीज आपणहूनच उगवतं. पण तसं नसतं ना. ते बीज सुपीक मातीत रोवलं नाही तर ते एखाद्या निर्जीव दगडासारखं पडून राहील. बीज मातीत रोवणं गरजेचं असतं. रोप उगवण्यासाठी बीजाचा आधी नाश व्हावा लागतो. मगच त्याच्या उध्वस्त छातीतून एक उत्कृष्ट झाड जन्माला येतं. तोच बीजाचा हेतू असतो. स्वधर्म. कारण झाड जोपर्यंत जगतं, तोपर्यंत झाडाने जन्म घ्यावा म्हणून मरण अनुभवलेल्या बीजाचे गुण गायले जातात. पण बीज तर आधीसुद्धा मृतच असतं. जमिनीच्या वर मृत आणि जमिनीच्या खाली उध्वस्त. पण जेव्हा ते स्वतः उध्वस्त होऊन झाडाला जन्म देतं तेव्हा ते अविनाशी बनतं. कुठलीही जिवंत वस्तू जशी अविनाशी बनते तसंचः मागाहून आलेल्यांच्या आठवणीत वसून. त्या बीजाचा त्याग त्याला अविनाशी बनवतो.’
सीता गप्पच राहिली.
‘वेदवती मेली तेव्हा मीसुद्धा मेलो. इतकी वर्ष मी हे माझं शव घेऊन फिरतोय. या शवाचा देखील आता मृत्यू झाला पाहिजे. हीच योग्य वेळ आहे त्याची. राम आणि सीतेची आख्यायिका उदयाला यावी म्हणून मी स्वतःचा नाश करून घेऊ शकतो. आणि जोपर्यंत हे जग तुमची आठवण ठेवील, तोपर्यंत ते माझी सुद्धा आठवण ठेवील. मी सुद्धा अमर, अविनाशी होईन.’
सीतेने मान खाली केली. तिचे डोळे भावनावेगाने भरून आले होते.
- oOo -
पुस्तक: लंकेचा संग्राम (War of Lanka)
लेखक: अमीश त्रिपाठी (अनुवाद: अन्योक्ती वाडेकर)
प्रकाशक: Eka
आवृत्ती पहिली.
वर्ष: २०२३.
पृ. ४९-५५.
RamataramMarquee
रमतारामाच्या विश्रांतीस्थळी:   
वारसा, जिज्ञासा आणि ज्ञान - १. वृद्धत्वाची जेथ प्रचिती... काव्य-मोतीचूर ऊर्फ काही ‘चविष्ट’ प्रेमकविता       चला दोस्तहो, खाण्यावरती बोलू काही       मूषकान्योक्ती       सुजन गवसला जो       क्रिकेटमधील उपेक्षितास दाद       बाबेलचा दुसरा मनोरा       Will He...?       To Dumbo, with Love       पहलगाम आणि आपण      
शुक्रवार, १८ जुलै, २०२५
सोन्याची लंका, रामराज्य आणि समाज
संबंधित लेखन
अन्योक्ती वाडेकर
अमीश त्रिपाठी
पुस्तक
लंकेचा संग्राम
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा