RamataramMarquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

शनिवार, २६ जुलै, २०२५

वेचताना... : लंकेचा संग्राम

  • इंटरनेट नि समाजमाध्यमे, डिजिटल माध्यमांतून होत असलेला माहिती नि मनोरंजन यांचा भडिमार यांच्या प्रपाताआड वाहून गेलेली वाचनवृत्ती पुनरुज्जीवित करण्यासाठी, वाचनाची बैठक बसवण्यासाठी सोप्या गोष्टीस्वरूप साहित्यापासून सुरुवात करावी असा विचार केला. अमेजनने अमीशच्या नागा-त्रयी अथवा शिवा-त्रयीची शिफारस केली. पुराणकथेची निव्वळ फेरमांडणी असावी असा विचार करुन विकत आणली.

    आज सुदैवाने म्हणावे की दुर्दैवाने ठाऊक नाही, पण तो निर्णय चुकला नाही. दुर्दैवाने यासाठी की गोष्टीस्वरूप लेखन वाचण्याचा, त्यायोगे मेंदूला फार ताण न देण्याचा हेतू असफल झाला. सुदैव अशासाठी एक धाडसी फेरमांडणी वाचण्याचे समाधान हाती लागले.

    ज्यांना आपण सरसकट इतिहास मानतो अशा पुराणकथांबाबत भारतीय समाजमन दिवसेंदिवस अधिकाधिक उत्कलनशील होत चालले आहे. त्याचवेळी बंदिस्त, प्रवाहकुंठित तळ्यासारखी शेवाळलेली मानसिकता त्याभोवतीचा वेढा अधिकाधिक आवळत चालली आहे. ‘पुराणकथाच नव्हे तर अगदी अर्वाचीन इतिहासाचे तपशीलही राजकीय कारणांसह अनेकविध कारणांनी बदलत जात केवळ भूतकालाधारित दंतकथांच्या पातळीवर उतरतात’ हे मान्य करण्याची तिची तयारी नाही. उलट अनेक काल्पनिकांना, दंतकथांना ‘खरा इतिहास’ म्हणून रुजवत आपल्या स्वार्थांची कणसे त्यावर भाजून घेण्याची अहमहमिका या देशात वेगाने वाढते आहे.

    LankechaSangram

    अशा वेळी अमीश यांनी या अधेमध्ये परस्परांच्या प्रतिबिंबाचे तुकडे दाखवणार्‍या पुराणकथांचे काही सुटे तुकडे घेऊन त्यांच्यामध्ये काही तर्कसंगत अशा वाळू-सिमेंटचा भराव घालून एक उत्तम इमारत उभी केली, असे माझे मत झाले. यातून या पुराणकथांमधील काही विसंगत वाटणार्‍या, अनाकलनीय भासणार्‍या घटना प्रसंग वा धारणांना कार्य-कारणभावांची संगती प्रदान केली.

    ढोबळ मानाने सांगायचे तर “जन्मजात शारीर व्यंग अथवा प्रमाण मानवी शरीरवैशिष्ट्यांहून थोडे वेगळेपण असणार्‍यांची ‘नागा’ अशी वेगळी वर्गवारी तत्कालीन समाजव्यवस्थेमध्ये करुन त्यांच्यावर लादले गेलेले समाजबाह्य जीवन, आणि त्या समाजातूनही काही श्रेष्ठ व्यक्तिंचा झालेला उदय” अशी पूर्वकल्पना (premise) घेऊन त्याआधारे विविध पौराणिक कथानकांची केलेली मांडणी, असे अमीश यांच्या लेखनाचे स्वरूप दिसले.

    अभिनव पूर्वकल्पना नि त्याआधारे परिचित कथानकाची केलेली फेरतपासणी, मांडणी या दोन मुद्द्यांवर अमीश यांच्या या लेखनाने मला प्रभावित केले. दुर्दैवाने बांधणीच्याबाबत मात्र मी समाधानी नव्हतो. परंतु पुढील पुस्तके विकत घेण्यापासून घेण्यास परावृत्त व्हावे इतपत ती समस्या गंभीर नव्हती. त्यामुळे त्यानंतर त्यांची रामचंद्र-त्रयी (राम, सीता नि रावण या तीन पात्रांवरील पुस्तके) विकत आणली. ही देखील त्यांच्या मूळ पूर्वकल्पनेला आधारभूत मानून पुराणकथेचे पुनर्लेखन करतात. एकुणात या दोनही त्रयींनी पुराणकथांतील अद्भुत, अतर्क्य, दैवी, चमत्कारप्रधान भागाला फाटा देऊन त्यांची वास्तवदर्शी, तरीही काल्पनिकेचे आवश्यक ते रंग मिसळून नवी मांडणी केली आहे.

    इरावती कर्वे यांनी कृष्णाचे ‘वासुदेव’ हे जन्मनाम नव्हे तर पदनाम असल्याचा उहापोह ‘युगान्त’मध्ये केलेला आहे. इंद्र हे देखील पदनाम असल्याचा उल्लेख वेदांतून केला गेला आहे असा उल्लेख मध्यंतरी वाचण्यात आला होता. त्याच धर्तीवर ‘महादेव’ नि ‘विष्णू’ ही दोन पदनामे असून त्यावर विविध लायक व्यक्तिंची ‘निवड’ होत असे. त्या त्या देवांचा – वा भूतकाळात ते स्थान भूषवणार्‍या काही श्रेष्ठींचा– वारसदार म्हणून मिरवणार्‍या जमाती अस्तित्वात होत्या आणि त्यांच्या परस्पर-सहकार्यासोबतच वर्चस्व-संघर्षाची, कुरघोडीची राजकारणेही समाजव्यवस्थेवर नि राज्यव्यवस्थेवर प्रभाव पाडत होती, हा अमीश यांच्या पूर्वकल्पनेचा उत्तरार्ध. याला काही तथ्यांचा आधारही असावा. किंबहुना वर म्हटले तसे अनाकलनीय घटना, प्रसंग वा निरीक्षणे यांची उकल करणारी ही कल्पना काहीशी विटांमधील जागा भरून काढत त्यांना सांधणार्‍या वाळू-सिमेंटच्या थराचे काम ती करते आहे.

    राम-चंद्र मालिकेचा विशेष उल्लेख करायचा म्हणजे अमीश यांनी सीतेच्या पात्राला दिलेला उठाव. वाल्मीकी रामायणात दिसते तशी उद्धाराची वाट पाहाणारी करूण, अबला ही सीतेची पुरुषप्रधान मानसिकतेच्या लेखकाने लिहिलेली भूमिका बाजूला सारून एक सक्षम योद्धा, राजकारणी अशी तिची पूर्वायुष्याची मांडणी केली आहे. इतकेच नव्हे तर विष्णुपदाची तीच खरी वारस आहे असे मानणारी एक जमात तिची निवड व्हावी या दृष्टीने प्रयत्नही करत होती इतपत सीतेचे व्यक्तिमत्व स्वयंपूर्ण आहे असा लेखकाचा दावा आहे.

    नुकतेच वाचून संपवलेले ‘लंकेचा संग्राम’ हे या मालिकेतील चौथे पुस्तक(१). या पुस्तकाने मात्र निराशा केली. कदाचित तो कथाभाग इतका मर्यादित विस्तार-वकुबाचा आहे की त्यात लेखनकौशल्याला फार वाव नसावा. सारे काही युद्धाभोवती केंद्रित झाल्याने राजकीय डावपेचांच्या वर्णनापलिकडे फारसे काही करता येण्याजोगे नाही. यातही अनेक तपशील पुढे सांधेजोड नसल्याने उगाचच माहितीची भरताड स्वरूप दिसतात.

    एक उल्लेखनीय बाब म्हणजे वाल्मीकी रामायणातील काही तर्कविसंगत तपशील वास्तववादी बदलांनी घट्ट केले आहेत. उदा. समुद्रावर बांधलेल्या पुलाचा अभियंता हा वानरसेनेतील कुणी नल नव्हे तर ‘नलतर्दक’ या नावाने ओळखला जाणारा शत्रुघ्नच होता असा या कथानकात उल्लेख आहे. चार भावांच्या विविध कौशल्यांचा उल्लेख वाल्मीकी रामायणात आहे. परंतु त्यामध्ये वनवासकालापासून पुढे भरत-शत्रुघ्नांना भूमिकाच नाही– शत्रुघ्नाला तर संपूर्ण रामायणातच नाही.

    ते वानरांना अरण्यजीवी जमात म्हणून समोर ठेवते. ‘सगळं काही देव ठरवतो आणि वाघाची शिकार हरीण करते’ यावर विश्वास ठेवणार्‍या जडबुद्धी मंडळींना बाजूला सारून आपण शक्यतांकडे पाहिले तर, अशा जमातीमध्ये पूल बांधण्याचेच काय नागरी वसतीस्थाने बांधण्याचे कौशल्य असण्याची शक्यता नाही. अशा कामाला नेमक्या प्रशिक्षणाची गरज आहे, ज्यात वैज्ञानिक माहितीचाही समावेश होतो. निव्वळ निरीक्षणाने, आकलनाने होणारे हे काम नव्हे. तेव्हा शत्रुघ्नासारखा (राजकुमार असल्याचा फायदा असल्याने) प्रशिक्षित असा अभियंता असणे हे अधिक तर्कसंगत आहे. हे नि असे अनेक बदल प्रचलित समजांपेक्षा अधिक सुसंगत कथानक समोर ठेवतात.

    अशा समाधानकारक बाबी असल्या तरी या भागात रंजकतेच्या बाजूने लेखक उणा पडला आहे. त्याचा तोटा असा की यापूर्वी जे बांधणीतले दोष झाकले जात होते, ते अधिक ठळकपणे दिसू लागतात नि खटकू लागतात.

    कालविपर्यास हा अमीश यांच्या लेखनात वारंवार आढळणारा दोष. खाली शेअर केलेल्या वेच्यामध्ये कॉन्स्टॅन्टिनोस या ग्रीक लेखकाचा उल्लेख आहे. ज्या विधानासंदर्भात त्याचा उल्लेख अमीश यांनी केला आहे, तो ध्यानात घेता जी व्यक्ती आढळते ती अर्वाचीन आहे. हा ग्रीक कवी– ज्याचे नाव Christianopoulos असे आहे– बहुलैंगिकता-समर्थक (LGBTQ+) कार्यकर्ता आहे/होता. अमीश यांनी त्याच्या नावे जी म्हण (“त्यांनी आम्हाला पुरलं, पण त्यांना कुठे माहीत होतं की आम्ही रोपाची बीजं होतो”) उद्धृत केली आहे, ती त्याने १९७८ मध्ये त्यासंदर्भात वापरली आहे. हिचे मूळ मेक्सिकन (“Quisieron enterrarnos, pero no sabían que éramos semilla”) आहे असे दिसते. कथानकामध्ये येणारा अठरा-एकोणीसाव्या शतकातील जर्मन तत्वज्ञ शोपेनहावरचा उल्लेख, इराण या राष्ट्राचा उल्लेख हे ही असेच कालविपर्यास करणारे.

    एक मोठा दोष, जो दोनही मालिकांतील सर्वच पुस्तकांतून पुनरावृत्त होत आला आहे आणि तो आहे मोजमापांचा. मेट्रिक गणनापद्धतीचा (MKS system) वापर एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात सुरु झाला. पण या पुस्तकांतून मीटर, किलोमीटर आदी अत्यंत अर्वाचीन मोजमापांचा सर्रास वापर दिसतो. अमीश यांनी जो काळ गृहित धरला आहे, त्या काळात इम्पिरिअल मोजमापेही (CGS system) नव्हती. नव्या वाचकांना अपरिचित होतील म्हणून प्राचीन मोजमापे वापरली नसतील, हे आपण निवेदनापुरते मान्य करु. परंतु एखाद्या पात्राच्या तोंडी त्यांचा उल्लेख ही अक्षम्य चूक आहे. माझ्या मते तत्कालीन मोजमापे कथानकात वापरुन सूचीमध्ये (पात्र-सूची दिलेली आहेच) त्यांबद्दल माफक माहिती देता आली असती.

    एके ठिकाणी निवेदनामध्ये ‘वरचे दोन परिच्छेद वाचायला तुम्हाला लागला त्याहून कमी वेळात... ’ असा उल्लेख दिसला. तृतीयपुरुषी निवेदनात मध्येच हा प्रथमपुरुषी निवेदक घुसला. या नि अशा अनेक दोषांमुळे ‘मांडणी उत्तम पण बांधणी ढिसाळ’ असे सारांशाने म्हणावे लागेल.

    यात रामाच्या तोंडी चक्क ‘भारतमाता’ वगैरे उल्लेख आहे. वर्तमान राजकीय सोय म्हणून दिलेला तडका असावा. मुळात देशाला मातृसमान मानणे (motherland) ही संकल्पनाही पाश्चात्त्यांकडून आलेली आहे. अमीश यांनी गृहित धरलेल्या (इ.स. पूर्व ३४००) रामायणकाली ती अस्तित्वात असल्याचची शक्यता धूसर आहे. परंतु तिचा वापर मात्र कल्पकतेने केला आहे हे मान्य केले पाहिजे.

    राम-रावण युद्धाची व्याप्ती महाभारत युद्ध वा ऋग्वेदपूर्व कालातील दाशराज्ञ युद्धाइतकी नव्हती हे उघड आहे. त्या दोन युद्धांना सत्तेच्या प्रभुत्वाचे महत्त्वाचे परिमाण होते. त्यात सहभागी झालेल्या राजांचे हितसंबंध या ना त्या स्वरूपात युद्धास उभ्या असलेल्या दोन प्रमुख राज्यकर्त्यांच्या हितसंबंधांमध्ये गुंतलेले होते. त्या युद्धांतून त्यांनाही काही साध्य करायचे होते.

    राम-रावण युद्ध मात्र एका राजपुत्राच्या स्वाभिमानासाठी नि त्याच्या पत्नीच्या स्वातंत्र्यासाठी लढले गेले आहे. राम वा रावण या दोनही राज्यकर्त्यांशी कोणताही मित्र-शत्रू संबंध नसलेल्या नेत्यांच्या अधिपत्याखालील सैन्ये केवळ तेवढ्याच कारणाने उभ्या राहिलेल्या युद्धात लढण्यास येतील हे पटण्याजोगे नाही. सुग्रीवाचा नि विभीषणाचा अपवाद आहे कारण त्यांना रामामुळे आपापली सत्ताकांक्षा साध्य करुन घेता आलेली आहे. त्यामुळे या युद्धाचे महत्त्व उंचावायचे तर त्याला काहीएक उदात्त, व्यापक परिमाण देणे अपरिहार्य होते. ‘लंकेचा संग्राम’मधील रामाने आपल्या युद्धाला ‘भारतवर्ष विरुद्ध लंका’ अशा स्वरुपात मांडले आहे. ‘भारतमाता’ असा उल्लेख करताना या नेत्याने सैनिकांच्या भावनेलाही हात घातला आहे.

    ‘ते’ विरुद्ध ‘आपण’ ही सोपी, शत्रूलक्ष्यी मांडणी राजकारण, समाजकारण, अर्थकारण या तीनही क्षेत्रांमध्ये आजही भलतीच परिणामकारक आहे. इतर कोणत्याही मांडणीपेक्षा उत्तम असे गुंतवणूक-परतावा गुणोत्तर असणारी मांडणी आहे. अर्वाचीन भारतातही तिचा वापर बेबंदपणे होताना दिसतो. तीच संकल्पना बीजरूपाने अमीश यांच्या रामानेही वापरलेली दिसते. इथे निवडलेल्या वेच्यामध्येही रावणही हाच दृष्टिकोन उलगडून सांगतो आहे.

    थोडा वैय्यक्तिक विचार मांडायचा तर, भूतकाळातील ‘राज्ये’(!) आणि अर्वाचीन ‘देश’ यांचा परस्परसंबंध मी मानत नाही! राज्ये, राष्ट्रे, देश हे इतिहासाच्या प्रत्येक कालखंडात उदयाला येतात, विखंडित होतात, विलीन होतात वा लयालाही जातात. त्या त्या वेळेस त्यांच्या भौगोलिक सीमा बदलत जातात. एवढेच काय ते वास्तव आहे! ‘अमका प्रदेश मूळचा तमक्या देशाचा’ ही विधाने सोयीची तेवढीच तथ्ये निवडून केलेली एक दिशाभूल असते. वर्तमानातील राजकारणाच्या सोयीसाठी अस्मितेचे राजकारण खेळणारे धूर्त राजकारणी भूतकाळातील सोयीचा कालखंड निवडून आपल्या दाव्यांना आधार देत असतात. पण हा विस्ताराने मांडण्याचा मुद्दा आहे. तूर्त सोडून देतो.

    अमीश यांची ही सारी पुस्तके मी अनुवादित स्वरूपात वाचली आहेत. या अनुवादांबद्दलही थोडे बोलले पाहिजे. आज मराठी अनुवादांची स्थिती जशी आहे ती पाहाता ‘ते होत आहेत’ यातच समाधान मानण्यापर्यंत माझी अधोगती आधीच झालेली आहे. परंतु तरीही Eka च्या अनुवादांबाबत मी असमाधानी आहे. एकतर अनुवादकांवर - बहुधा तरुण पिढीतील - असलेला हिंदीचा प्रभाव स्पष्टपणे त्यात प्रतिबिंबित होतो. त्यामुळे व्याकरणाबाबत फार बोलावे असे काही नाही. त्रिभाषा सूत्र लादल्यानंतर मराठी भाषा आपले व्याकरण त्यागून चक्क हिंदी व्याकरणाप्रमाणेच चालू लागेल यात मला शंका नाही.

    पण रामचंद्र-त्रयीच्या पहिल्या तीन भागांच्या अनुवादांमध्ये अनुवादकाने विचारपूर्वक काम केल्याच्या काही खुणा चटकन दिसतात. उदाहरणार्थ आज आपण ‘रामाचे, रामाने’ अशी रूपे वापरतो. परंतु अनुवादकाने डोळसपणे ‘रामचे, रामने’ अशी रूपे वापरली आहेत. सामान्यनाम नि विशेषनाम यातील हा फरक नेमका ध्यानात घेतल्याबद्दल मी दाद दिली. पण चौथ्या भागात गाडी परत ‘रामा’वर आलेली आहे.

    या चौथ्या पुस्तकात मूळ लेखकाच्या पावलावर पाऊल टाकून काही दोषांची अत्यंत बेफिकीर पुनरावृत्ती दिसते. नशील्या, गैर, राजेशाही, खुनी असे अरेबिक-फारसी उगम असणारे हे शब्द सर्रास वापरले जातात. या मालिकेतील ‘ताईत’ याचे काही पानांनतर अचानक ‘नौका’ होतं, ते ही त्या ‘का’ला दोन काने देऊन! आणि हे चुकून नव्हे, कारण हा अचाट शब्द किमान तीन ते चार वेळा येतो. असा काही शब्द अस्तित्वात आहे का, आणि ताईताशी समानार्थी आहे का मला ठाऊक नाही.

    मूळ वाक्यात बहुधा ‘brother' असे संबोधन असलेल्या एक-दोन ठिकाणी ‘भावाऽऽऽऽ’ (अगदी अवग्रहासकट!) हा अनुवाद वाचल्यावर ‘अयोध्या पश्चिम महाराष्ट्रात कुठे होती की काय?’ अशी शंका मनाला चाटून गेली. अनुवादिकेने पुराणकथांशी संबंधित एकही पुस्तक पूर्वी वाचले नसावे का? त्यासाठी वापरलेल्या प्रासादिक भाषेची तिला ओळख नसावी? सर्रास वापरले जाणारे ‘बंधो’ अथवा ‘बंधुराज’ हे साधे संबोधन का आठवले नसावे?

    अनेकदा अतिअवघड असे संस्कृत शब्द वापरणे, मध्येच एकदम परभाषिक शब्दांचा वापर असा अनुवादिकेचा यादृच्छिक कारभार आहे. की संगणकीय अनुवादक वापरुन केवळ डागडुजी करुन हा अनुवाद तुमच्या-आमच्या माथी मारला आहे? ‘बाजार महत्त्वाचा, भाषेचे एवढे काय’ या बाण्याने राजकारणीदेखील उदासीन झाले आहेत, तिथे व्यावसायिकांना त्याची काय पत्रास राहाणार?

    अशा निराशाजनक परिस्थितीतही अमीश यांच्या काही संवादांना मात्र दाद द्यावीशी वाटते. अधेमध्ये येणारे चिंतनही काही नवे देऊन जाते. इथे ‘वेचित...’ वर दिलेला वेचा हे रावण, कुंभकर्ण नि सीता यांच्यात अशोक वाटिकेत झालेला संवाद आहे. यात खुद्द रावणच युद्धाची आवश्यकता प्रतिपादित करतो आहे. त्याचा दृष्टिकोन पाहाता लंकेच्या संग्रामाची अपरिहार्यता इतर कुणी अधिक समर्पकपणे मांडली नसती असे वाटून गेले.

    युद्धाची अपरिहार्यता रावण दोन मुद्द्यांवर प्रतिपादित करतो आहे.

    पहिला मुद्दा ‘नायकाच्या निर्मितीसाठी प्रथम एका खलनायकाची निर्मिती व्हावी लागते’ हा आहे. मानवी इतिहासाच्या नि वर्तमानाच्या प्रत्येक कालखंडात, प्रत्येक भूभागावर, प्रत्येक क्षेत्रात (राजकारण, समाजकारण, साहित्य, कला... आदी) नित्य प्रत्ययाला येणारा अनुभव आहे. अशी ‘शत्रूलक्ष्यी मांडणी’ हा जनमानसामध्ये बस्तान बसवण्याचा हुकमी एक्का मानला जातो.

    “त्यांच्या उत्पादनात ‘केमिकल’ (घातक म्हणण्याची तसदीही घेतली जात नाही, केमिकल म्हटले की घातक हा शत्रूलक्ष्यी मुद्दा आधीच बस्तान बसवलेला आहे) आहे म्हणून आमचे पवित्र उत्पादन वापरा”, “ ‘त्या’ जाती/धर्माचे लोक समाजाचे/देशाचे द्रोही आहेत. त्यांच्यावर अंकुश ठेवायचा असेल तर आमचे नेतृत्व स्वीकारा/ आमच्या मार्गाने चला”, “त्या अमक्याचे नेतृत्व स्वीकारलेत तर तुमचा समाज ‘खतरे में’ असेल.’ ही अशा दाव्यांची वर्तमानात सतत निनादत राहिलेली उदाहरणे. या सार्‍यांमध्ये इतर कुणावर आधी खलवृत्तीचा शिक्का मारला जातो नि त्यानंतर त्याचा निर्दालक, संहारक नि पर्यायाने तुमचा त्राता म्हणून आपले मार्केटिंग केले जाते. सर्वधर्मीय ग्रंथांतून देवांबरोबरच सैतान, इब्लिस, मार, राक्षस आदिंची पखरण असते ती या देवांनी त्यांच्यावर मिळवलेल्या विजयांच्या मिथ्यकथा रचता याव्यात म्हणून.

    दुसरा मुद्दा आहे तो सत्तेच्या प्रत्येक साधनाला– विशेषत: संघटनाला– कालबाह्यता (expiry date) असते. त्या पलिकडे त्या साधनाचा भस्मासुर होऊन निर्मात्याच्या मानगुटी बसू नये यासाठी ती वेळीच ओळखून तिच्या विसर्जनाची तरतूद वेळीच करता यायला हवी. रावण आपल्या सैन्याच्या पराभवाची अपेक्षा करतो आहे याचे कारण आज ना उद्या हे हत्यार आपले नेतृत्व झुगारून देईल नि निर्नायकी स्थितीत असे संघटन सर्वसामान्यांसाठी धोकादायक ठरू शकेल, याची त्याला जाणीव आहे.

    राजकारणामध्येही अनेकदा डोईजड होणार्‍या सहकार्‍याला, संघटनेला वेसण घालण्याची खबरदारी चाणाक्ष नेते घेत असतात. SA (Sturmabteilung किंवा Storm Troopers) संघटनेच्या कारवायांच्या आधारे जर्मनीमध्ये शासनयंत्रणा डळमळीत झाल्याची भावना हिटलरने निर्माण केली आणि नाझींना सत्तेपर्यंत पोहोचवले. परंतु हिटलर सत्तेत आल्यानंतर या संघटनेतील इतरांनाही सत्तेची स्वप्ने पडू लागली. त्यांची प्रवृत्ती पाहाता ते सत्तेसाठी सहकार्‍यांनाही सहज दगा देतील याची जाणीव हिटलरला होती. त्याचवेळी या संघटनेच्या हिंसक कारवायांमुळे सामान्य जनतेमध्ये नि प्रशासनामध्ये तिच्याबद्दल प्रतिकूल मत होते, जे हिटलरला गैरसोयीचे ठरू लागले. हिटलरच्या महासत्तेच्या स्वप्नात सहभागी होऊ इच्छिणारे लोकही या स्थानिक पुंडगिरीबाबत नाखूष होते. या सार्‍याचा विचार करुन अखेर हिटलरने सत्तेच्या बळाचा वापर करुन स्वत:च ही संघटना मोडून काढली.

    हा दृष्टिकोन केवळ हिंसा हे साधन मानणार्‍या संघटनेबाबतच असतो असेही नाही. मुत्सद्देगिरीच्या साधनांबाबतही ही सावधगिरी बाळगली जात असते. काँग्रेस शासनाच्या तथाकथित भ्रष्टाचारलिप्ततेची भुमका उठवून देण्यासाठी उभा केलेला अण्णा आंदोलनाच्या डोलार्‍याला, तंबूला, ‘सिव्हिल सोसायटी’ या नावाने उभ्या केलेल्या तथाकथित ‘एनजीओ’च्या जाळ्याच्या दोर्‍यांनी तोलून धरत उभे केले गेले होते. अपेक्षित ते साध्य होऊन सत्तेवर आलेल्या मोदींनी हे हत्यार आपल्यावरच उलटू नये याची खातरजमा करण्यासाठी, एनजीओंना परदेशांतून येणार्‍या देणग्यांवर सुरुवातीलाच फास आवळला; अनेक एनजीओंच्या मागे परकीय चलन कायद्याचा भंग केल्याबद्दल चौकशीचा ससेमिरा लावून इतरांना योग्य तो संदेश दिला.

    एकुणात ‘शत्रूलक्ष्यी मांडणी’चा हत्यार म्हणून लोकप्रिय असलेला वापर यावर अधिक विस्ताराने लिहिण्याचे बर्‍याच काळापासून माझ्या डोक्यात घोळत होते. दशानन रावणाच्या या आशीर्वादाने त्याला चालना मिळेल अशी आशा आहे.

    -oOo-

    टीपा:

    (१). ‘हे या मालिकेतील शेवटचे पुस्तके असेल’असा उल्लेख आधीच्या पुस्तकांतून आला होता. परंतु यात अखेरच्या भागामध्ये राम, भरतादि बंधूंच्या आश्रमातील नावांचा उल्लेख केलेला आहे. ही नावे - माझ्या मते - दाशराज्ञ युद्धाकडे अंगुलिनिर्देश करतात. अमीश यांना त्या कथानकावर आधारित काही लिहायचे झाल्यास हा सुटा धागा जोडून घेता येईल म्हणून हे केले गेले असावे असा माझा कयास आहे. इथेच ‘मेलुहा’चा उल्लेख होतो, ज्यातून कालानुक्रमे पुढच्या कथानकाची- ज्याची त्रयी आधी प्रकाशित झालेली आहे- मुहूर्तमेढ रोवली जाते.

    या तर्काला पुष्टी देणारा आणखी एक पुरावा, आणखी एक सुटा धागा लेखनामध्ये सापडला. युद्धाची तयारी चालू असताना कथानकाची गती नि विस्तार या दोन्हीला एकाच वेळी छेद देणार वशिष्ठांचे एक स्वप्न अमीश यांनी वर्णिले आहे. यात वशिष्ठ, विश्वामित्र आणि त्यांची आश्रमातील मैत्रिण नंदिनी यांचा संवाद आहे. ज्यात विश्वामित्र समाजातील श्रेष्ठींच्या स्तरात सातत्याने उलथापालथ होण्याची, होत नसल्यास ती घडवण्याची आवश्यकता प्रतिपादन करत आहेत. हे स्वप्न खंडित होतानाच वशिष्ठांना अचानक काहीतरी साक्षात्कार झाल्याचे दिसते नि ते ‘विश्वामित्राच्या पुढच्या चालीच्या भयाने शंकित होऊन’(!) आपला एक दूत तातडीने चौकशीसाठी रवाना करतात. याचा इथून पुढे कुठेही संदर्भ येत नाही. हे ही भविष्यातील विश्वामित्र नि वशिष्ठ यांच्यातील संघर्षाकडे– म्हणजे दाशराज्ञ युद्धाकडे - अंगुलिनिर्देश करणारे आहे. मेलुहा त्रयी नि रामचंद्र त्रयी यांच्या कथानकांना जोडून घेणारा, हा मधला दाशराज्ञ युद्धाचा कालखंड अमीश यांच्यासाठी एखाद्या कादंबरीचा विषय असू शकतो.

    यावर ‘दाशराज्ञ युद्ध’ याच शीर्षकाची एक मराठी कादंबरी दोन-अडीच दशकांपूर्वी वाचण्यात आली होती. लेखकाचे नाव मात्र विसरलो आहे. [↑]

    ---

    ‘लंकेचा संग्राम’मधील एक वेचा: सोन्याची लंका, रामराज्य आणि समाज


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा