RamataramMarquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

बुधवार, ६ ऑगस्ट, २०२५

बाईल

  • एका ठरावीक वेळेला शाळा भरवणे, सोडणे, हे बनगरवाडीच्या शाळेबाबत नेहमीच जमत नसे. साऱ्या जगाला उन्हाळ्यात सुटी तर इथे सुगीला सुटी. मन मानेल तेव्हा शाळा. मोटारसर्व्हिस जशी जागा भरल्यावर सुटते तसे मास्तराने शाळा भरल्यावर शिकवावे. त्यामुळे मास्तराचे क्षेत्र शाळेपुरते मर्यादित राहू शकत नव्हते. कुणी पत्र लिहायला सांगत, कुणी अर्ज लिहायला सांगत. घरी जाण्यासाठी मी जेव्हा रविवारच्या सुटीत निघत असे, तेव्हा माझ्या कोटाचे खिसे पोस्टात टाकण्यासाठी दिलेल्या पत्रांनी भरलेले असत. ही कामे जेव्हा बिनतक्रार मी करू लागलो, तेव्हा कोणी काहीही विचारायला यावे असे झाले. नवराबायकोच्या भांडणापासून तो मेंढरांच्या चोरीपर्यंत सर्व तक्रारी मास्तराकडे येत. मास्तर शिकलेला, शहाणा माणूस. त्याला कायदा कळत असला पाहिजे, बरे-वाईट कोणते हे कळण्याची बुद्धी त्याच्यापाशी असली पाहिजे !

    त्यामुळे शाळा नाही तरी या उलाढाली करण्यात वेळ जाऊ लागला. मुले कमी आहेत, अशी तक्रार खात्याकडून आली तर “शाळा नवीन आहे, सुगी सुरू आहे–" इत्यादी कारणे दाखवून मी गावाची शाळा संभाळू लागलो. शाळा म्हणजे कोर्ट, चावडी, पोलीसठाणे, म्युनिसिपालिटी– सर्व काही ! आणि मास्तर म्हणजे जज्ज, पोलीस अधिकारी, पाटील-कुलकर्णी, आणि स्टँपव्हेंडरसुद्धा ! पण वाडीचे भांडण वाडीबाहेर सहसा जात नसे. सारा निकाल तिथे चावडीपुढे दहा माणसे जमून दिला जाई. मास्तर आणि कारभारी, काकुबा, शेकुबा, असली वृद्ध मंडळी न्याय देत. दहा जणांनी सांगितल्या गोष्टीच्या पुढे अपराधी जात नसे. केलेला दंड, सांगितलेला न्याय तो मानी. नाही पटला तर अपील करण्याची मुभा त्याला असे. हे अपील म्हणजे धनगरांचे महादैवत बोलवावे लागे. धनगरांची बरीच मोठी जातकुळी एकत्र येई आणि मग न्यायदान होई. पण असे कुणी करीत नसे. कारण महादैवत बोलवायचे तर त्याला जेवण करावे लागे आणि एवढे मोठे जेवण म्हणजे बराच खर्च करावा लागे.

    वाडीत लग्नेसुद्धा एकदम करण्याची पद्धत होती. दर वर्षी एक मुहूर्त बघायचा आणि त्याच दिवशी गावातली सगळी लग्ने उरकून घ्यायची. यामुळे सर्व गाव जेवू घालण्याचा भार एकावर पडत नसे. जी दहावीस लग्ने उभी राहत, त्यांच्या प्रत्येकाच्या वाटणीला दहावीस पाने येत. या लग्नाच्या दिवशी एखाद्या गरजूचे पैशाअभावी अडत असले, की सर्व गाव एकत्र जमा होई आणि ‘अमकातमका अडला आहे, त्याला धक्का देऊ या’ असा विचार पक्का होई. सर्व जण त्याचा भार उचलत आणि त्या गरजूचे लग्न होऊन निघे.

    दादूच्या धमकीला न जुमानता मी बेधडक गावात मिसळलो होतो. वाडीच्या लोकांचे पान मास्तराविना हलत नाही अशी परिस्थिती झाली होती.

    बनगरवाडी

    वाडीत शेतकरी असे फार थोडे होते. मृगाच्या पावसाने जमिनीत गवताचे कोंब उठले. चांगले माजले. पेरण्याआधी कुळवाची एक पाळी घालून शेतकऱ्यांनी त्या भाकड गवताचा मोड केला. आणि मग पुष्यनक्षत्राचा पाऊस झाला. रानात चांगला चिखल झाला. लोक वापसा येण्याची वाट बघू लागले. तो आला. चिखल वाळला. बैलांचे पाय रुतू नयेत, टिपणीची भोके लिपू नयेत, इतपत रान फडफडीत झाले. ओल खोल राहिली, आणि वरून जमीन हाडकली. मग पेरणीची गडबड सुरू झाली. बाजरीच्या, कडधान्याच्या पेरण्या सुरू झाल्या. बियाण्यांची ओटी घेऊन आणि टिपण जुंपून भल्या सकाळी लोक रानाकडे जाऊ लागले.

    या पेरणीच्या धामधुमीत शेकू माझ्याकडे आला. हा फारसा गावात दिसत नसे. त्याच्या दोनतीन एकरांच्या तुकड्यात राबणे एवढेच त्यास माहीत होते. सकाळच्या प्रहरी अंगावर धोतर पांघरून तो माझ्याकडे आला. त्याचे हात दिसत नव्हते. ते धोतर त्याने अशा रीतीने पांघरले होते की त्याचे वाळलेले तोंड आणि चालूनचालून राठ झालेली ओबडधोबड नखे असलेली पावलेच दिसावीत.

    मी बसलो होतो. आयबू बसला होता.

    शेकू उभ्या उभ्याच म्हणाला,
    “मास्तर, एक बैल बगून दे की मला. पेरनी थटली गा !”

    मी शाळामास्तर होतो. माझ्यापाशी बैल कुठून असणार? पण हे शेकूला सांगण्यात अर्थ नव्हता. तो म्हणाला,

    “तू मागितलास म्हंजे मिळेल. माझ्यापाशी एकच हाय. एक मेला. दुसरा मिळाला तर पेरीन. न्हाई तर वरीसभर उपाशी मरन्याची पाळी हाय.”

    मी म्हणालो,
    “पण कुणापाशी आहे ते सांग, म्हणजे त्याला मागीन.”

    “जेच्यापाशी हाय त्येची पेरनी हाये. आपला खोळंबा करून कोन देनार? मी सर्व्यांशी मागून आलो.”

    “मग मी कुणापाशी मागू?”

    “ते तू काय बी कर, पण माजी नड भागव. सगळं गाव म्हणतं, मास्तर येळला येतो, अडचण वळकतो. मग माझ्याएकीच का असं?”

    इतका वेळ आयबू गप होता. तो शेकूकडे तोड फिरवून म्हणाला, “तू येडा काय रे शेकू? मास्तरापाशी बैल कुठला? ते काय शेतकरी का हेडे? उगाच काहीबी मागायला याचं? जा घरी ”

    आयबूनं झिंजाडताच शेकू खाली आला. आपले चुकत तर नाही ना, अशी शंका त्याला आली.

    “घरी जायाचंच, पर बगा की मास्तर जमलं तर !” तो नरम येऊन बोलला.

    आयबू नेटाने उठला. त्याने शेकूच्या बाव्हट्यांना धरून पायऱ्या उतरायला लावले आणि म्हटले,

    “शानाच हायेस शेकू ! मास्तरनी बैल काय कडुसरीला लावलाय?”

    आणि काकुळती येऊन काही पुटपुटत शेकू गेला.

    परत येऊन आयबू म्हणाला, “त्येचं काय मनावर घेऊ नका मास्तर. ते उगीच भोळसट हाय !”

    पण मला राहून राहून वाटले की ‘ग-म-भ-न’ लिहायला शिकविणे एवढेच आपण करतोय, पण यांची गरज वेगळी आहे. आयबूला कुटुंब पाहिजे. आनंदाला भाकरी पाहिजे. शेकूला बैल पाहिजे.

    दोन दिवस शेकू चोहीकडे फिरला, पण त्याला बैल मिळाला नाही. तो घरी जाऊन मटकन बसला. बायकोला म्हणाला, “काय चालंना माझं.”

    शेकूची बायको गावातील सर्व धनगरणीपेक्षा मुंडा हात उंच होती. तिच्या अंगात ताकदही चांगली होती. शेतीची सर्व कामे ती पुरुषाच्या बरोबरीने करत असे.

    डोक्याला हात लावून नवरा बसला तेव्हा ती म्हणाली, “कुणाकडे मागितला?”

    “सर्व्या गावभर फिरलो-बैल कोन देत न्हाई.”

    “मग हो?”

    “ह्या साली पोटानं मरायचं. उपाशी पाय घासून मरायचं.”

    नवऱ्याचे हे बोलणे त्या बाईने ऐकले. त्याचे तेल संपत आल्या दिव्यासारखे डोळे बघितले आणि ती धीराने म्हणाली,
    “उद्या पेरायचं !”

    “बैल गं?”

    “मी आनते.”

    “कुटून आनतीस?”

    “वाटेल तथनं आनीन.”

    “तरी पन-”

    “तुमाला का पंचाईत? मी बैल आनीन. सकाळी उठून रानात जा म्हंजे झालं !”

    बायको कुणाचा बैल आणणार याविषयी विचार करीत सकाळी शेकू उठला आणि टिपण खांद्यावर घेऊन, एक बैल एका हातात धरून रानात गेला. गावाकडे तोंड करून बांधावर बसला. बायको येण्याची वाट बघू लागला.

    तासभर गेला आणि शेकूची बायको येताना दिसली. तिच्यापाशी बैल नव्हता. शेकूचे तोंड उतरले. बायकोने पैज मारली, पण तिलाही बैल मिळालेला नाही. आता पेरणी होत नाही. सर्वांची झाल्यावर बैल मिळेल, पण त्याचा काय उपयोग? पेरले तरी पीक मागास होणार. नीट साधणार नाही. वर्षापुरते धान्य नाही आले तर उपासमार होणार. गाव सोडून रोजगारासाठी गावोगाव भटकावे लागणार.

    असा विचार मनात येऊन तो कष्टाळू धनगर दुर्मुखला आणि त्याची दणकट बायको रानात आली.

    “का ग, मिळाला न्हाई बैल?”

    “न मिळायला काय झालं? जुपा टिपन !”

    “पर बैल कुटाय?”

    “हाय मी. एका बाजूला बैल जुपा, एका बाजूनं मी रेटीन !”

    बायकोच्या या बोलण्याने शेकू थरारून गेला. काय बोलावे हे त्याला कळेना.

    “छ्या, असं ग कसं?”

    पण त्या बाईने मनाची तयारीच केली होती. तिच्या शरीरावर तिचा विश्वास होता.

    “कसं न्हाई आन् काय न्हाई. टिपन जुपा !”

    नवरा जागचा हलत नाही, खाली मान घालून बसला आहे, बघताच ती उठली आणि तिने बैल जोडला. एकीकडचे जू आत होऊन आपल्या खांद्यावर घेतले आणि ओरडून ती म्हणाली, “हां, आवळा.”

    मग मनाचा धोंडा करून तो दुबळ्या शरीराचा नवरा उठला आणि चाड्यावर मूठ धरून त्याने इशारा केला. बैल हलला. बाई हलली. टिपणीचे फण ओल्या मातीत घुसले, आणि जमीन फाडत चालले. शेकूने बाजरीची मूठ सोडली. पोकळ बांबूतून दाणे खाली उतरले आणि त्यांनी जमिनीवर उड्या घेतल्या.

    अंगच्या बळाने शेकूची बायको बैलाबरोबर टिपण ओढीत राहिली.

    सकाळपासून दुपारपर्यंत शेकूने पेरले. मग धापा टाकणाऱ्या बायकोने आणि त्याने बसून मुकाट्याने भाकरी खाल्ली. शेकूला काही बोलणे झाले नाही. बायको काहीतरी बोलली. पुन्हा दोघांनी मिळून रासणी केली. म्हणजे कुळव फिरवून उपडे बी मातीखाली झाकून टाकले. संध्याकाळ होईपर्यंत दोन एकर रान या तिघांनी पेरून टाकले. सूर्य मावळला तेव्हा दमगीर होऊन तिघेही परत घराकडे आली.

    ही बातमी गावात कळली, तेव्हा सर्वानी नवल केले. त्यात कौतुकाचा, आश्चर्याचा, क्वचित कुचेष्टेचाही भाग होता.

    रात्री शाळेकडून घराकडे जाताना शेकूच्या घरापुढे मी क्षणभर उभा राहिलो. आत चिमणीच्या प्रकाशात शेकूची बायको भिंतीला लागून पालथी पडली होती, आणि तिच्या पाठीवर उभा राहून शेकू तिचे अंग तुडवीत होता. त्याने दोन्ही हातांनी भिंतीचा आधार घेतला होता आणि सावकाशपणे तो एकएक पाऊल उचलून बायकोची दुखरी पाठ तुडवीत होता.

    - oOo -

    पुस्तक: बनगरवाडी
    लेखक: व्यंकटेश माडगूळकर
    प्रकाशक: मौज प्रकाशन गृह
    आवृत्ती सत्तावीसावी, पुनर्मुद्रण.
    वर्ष: २०२२.
    पृ. ३७-४१.

    ---

    संबंधित लेखन: वेचताना...: बनगरवाडी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा