-
प्रास्ताविक:
‘वेचित चाललो...’ वर माझा प्रघात असा आहे की एखादा वेचा इथे घेतला, की त्यावरचे वा तो ज्यातून घेतल्या त्या पुस्तकावरचे माझे भाष्य, आकलन हे ‘वेचताना’ शीर्षकाखाली समाविष्ट करतो. इथे बनगरवाडीबाबत अपवाद करतो आहे.त्या कादंबरीच्या आकलनाबाबत नव्हे तर एक पुस्तक म्हणून झालेल्या प्रवासाबाबत खुद्द माडगूळकरांनीच ‘प्रवास: एका लेखकाचा’ मध्ये तपशीलवारपणे लिहिले आहे. कादंबरीचा जन्म, तिचे भाषेच्या नि भौगोलिक सीमा ओलांडून जाणे, त्याभोवतीचे अर्थकारण नि व्यवहार आदी सारी अनुषंगे एकत्रितपणे त्यामध्ये समाविष्ट आहेत. ‘वेचताना’ सदरामध्ये तेच प्रकाशित करतो आहे.
हा निवडण्याचे आणखी एक औचित्य म्हणजे ‘वेचित...’साठी मी बनगरवाडीमधून निवडलेला शेकू नि त्याच्या पत्नीशी संबंधित वेचा हा विविध देशांतून अनुवादित स्वरूपात वापरला गेला असल्याचा उल्लेख त्यामध्ये सापडला. जे आपल्याला वेचावसं वाटलं ते देश-भाषांच्या सीमापार आणखी काही जणांना वेचावसं वाटलं हे सुखावणारं आहे. तो वेचा का निवडला, त्यात नक्की काय सापडले, यावर पुन्हा कधीतरी लिहिन.
---
बनगरवाडी ही लहानशी कादंबरी ‘मौजे’च्या चोपन्न सालच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली. तेव्हाच्या पद्धतीप्रमाणं वाचकांना ती आवडल्याची पत्रं आली. विशेष म्हणजे, डॉ. इरावतीबाई कर्वे ह्यांचं कार्ड आलं. त्यात त्यांनी म्हटलं होतं, ‘बनगरवाडी इंग्रजीत करून प्रसिद्ध करा. तुम्हाला परदेशांतही नाव मिळेल.’
‘बनगरवाडी’ पुस्तकरूपानं प्रसिद्ध होताच पंचावन्न डिसेंबरच्या ‘नवभारत’ मासिकात प्रा. त्र्यं. शं. शेजवलकर यांचं ‘कथावाङ्मयातील एक उच्चांक’ हे समीक्षण प्रसिद्ध झालं.
‘काळाच्या ओघात मागे पडलेला हा मेंढपाळवर्ग महाराष्ट्राच्या संस्कृतीचे एक मूळ अंग आहे. ह्या अंगाच्या कदाचित आता मरू घातलेल्या शेवटच्या पिढीचा हा इतिहास वर्णरूपाने माडगूळकरांनी संग्रहित केला आहे. तो प्रतिनिधिभूत वठल्यामुळे वाङ्मयात चिरस्थायी व्हावा, अशी कल्पना आहे.
‘माडगूळकरांसारखे स्थानिक जनतेशी भाषेतून समरस झालेले स्वप्रदेशाभिमानी लेखक पुढे येतील, तर महाराष्ट्रतिहासाला जिवंत केल्याचे श्रेय त्यांना मिळेल. कारण लोकांचा इतिहास, समाजातील अगदी खालच्या स्तरांचा चित्रेतिहास, हाच हिंदी जनतेचा खराखुरा इतिहास होय.
राजवंशाचा इतिहास हा जनतेवर चरणाऱ्यांचा इतिहास, तो खरा इतिहास नव्हे. मात्र ही गोष्ट कोणा लेखकाने माडगूळकरांचे अनुकरण, नक्कल करून साध्य होण्यासारखी नाही. त्याला मूळचाच पिंड त्याच्यासारखा स्वाभाविकपणेच तयार झालेला असला पाहिजे. जातिवंत स्वदेशाभिमान्यांचे हे काम आहे. शिक्षणाचा येथे काहीही उपयोग नाही व हे काम येरागबाळ्याचे नाही.’
‘बनगरवाडी’ लिहिण्याआधी ज्यांना आता ग्रामीण म्हणून ओळखतात, अशा काही कथा मी लिहिल्या होत्या. कादंबरी कशी लिहावी, हे मला माहीत नव्हतं. ह्याबाबतचं माझं भांडवल म्हणजे वाचन. बऱ्याच मराठी आणि काही इंग्रजी, काही इतर भाषांतून मराठीत भाषांतरित झालेल्या कादंबऱ्या वाचल्या होत्या.
‘मौजे’चे संपादक श्री. पु. भागवत ह्यांनी वारंवार पत्रं पाठवून मला कादंबरी लिहायला लावली. दोन वह्या मी लिहिल्या; पण आपण वाट चुकलो तर नाही ना, असंच वाटत राहिलं.
'मौजे'चे सहसंपादक आणि माझे मित्र ग. रा. कामत पुण्याला एकवार इराण्याच्या हॉटेलमध्ये भेटलो. चहाचे कप पुढं आणि बोटांत सिगारेटी धरून बरंच बोललो. मी जे काही लिहिलं होतं, ते कामताला सांगितलं आणि म्हणालो, “मी एवढं लिहिलं आहे. पुढं कुठं, कसं जायचं; कळत नाही. शेवट सुचत नाही.”
कामत म्हणाला, “व्यंकटेश— अरे, ह्यालाच ‘कादंबरी’ म्हणतात. तू असाच पुढं लिहीत राहा. शेवट येईल.”
–आणि खरोखरच तसंच झालं. आधी काही आखणी केली नव्हती, तरी अचानक दुष्काळ आला. पाऊस पडला नाही. सगळं गाव उठून जगायला बाहेर पडलं.
‘मौज’ दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली ‘बनगरवाडी’ नंतर पंचावन्न सप्टेंबरमध्ये पुस्तकरूपानं प्रसिद्ध झाली.‘बनगरवाडी’च्या वाट्याला खूप कौतुक आलं. अठ्ठावन्न साली महाराष्ट्र सरकारचं पहिलं पारितोषिक मिळालं. पुस्तकाला मिळालेली पारितोषिकं लेखकांना समारंभपूर्वक देण्याची पद्धत सुरुवातीच्या काळात पडलेली नव्हती. शेतकऱ्याला तगाई द्यावी, तशीच पारितोषिकाची रोख रक्कम शिक्षण खात्याच्या कचेरीत दिली जाई; पण ह्या पारितोषिकांना खूप मोल होतं.
माझ्यापाशी वडीलबंधूंकडून आलेलं कार्ड अजून आहे. सुंदर अक्षरांत लिहिलेल्या ह्या कार्डाचा मजकूर असा आहे :
१९-३-५८
अनेक आशीर्वाद,
‘बनगरवाडी’ला बक्षीस मिळाल्याचे आज वृत्तपत्रातून प्रकाशित झाले आहे. तुझ्या यशाने माडगूळकरांचे घराणेच उजेडात आले आहे. ईश्वर तुला उदंड आयुष्य देवो. तुझ्या ग्रंथांना जागतिक प्रतिष्ठा लाभो, हे आशीर्वाद.
अण्णा
श्री. राम देशमुख ह्यांना ‘बनगरवाडी’ आवडली. तिचं त्यांनी इंग्रजीत भाषांतर केलं. आमच्या चर्चा झाल्या. सगळ्यांत अवघड होतं, नाव ठेवणं. ते लवकर सुचलं, रुचलं नाही. मराठीच्या बाबतीत मी ह्या कोड्यात अडकलोच नव्हतो. आधी वाटलं होतं, ज्या गावावरून ही कादंबरी सुचली, त्या गावाचंच नाव द्यावं– लेंगरवाडी. लेंगरे आडनावाचे धनगर ह्या वाडीत होते. ऐनवेळी हे नाव बदलून बनगरवाडी ठेवलं. ह्या नावाचीही एक लहान वाडी माणदेशात आहे, बंडगर आडनाव असलेल्या धनगरांची.
देशमुखांनाही बरीच नावं सुचली. त्यांपैकी एक मला आठवतं– ‘बा, बा, ब्लॅक शीप.’ शेवटी नक्की झालं : ‘दि व्हिलेज हॅड नो वॉल्स.’
कोणा इंग्रजी प्रकाशकाची माझी ओळख नव्हती, म्हणून मी देशमुखांनाच विनंती केली, “तुम्हीच प्रकाशक निवडा. त्याच्याशी बोला. करारही करा. मला मराठीत पंधरा टक्के रॉयल्टी मिळते. तेवढी इंग्रजी भाषांतराचीही मिळावी. आपण दोघं प्राप्तीचा वाटा अर्धा-अर्धा वाटून घेऊ.”
एशिया पब्लिशिंग हाउसनं सेंड्रिक बार्को ह्या प्रतिभावान चित्रकाराकडून मुखपृष्ठ घेऊन हार्डकव्हरमध्ये हे पुस्तक अठ्ठावन्न साली प्रसिद्ध केलं. त्यावर ठिकठिकाणी चांगली परीक्षणं आली. कोणा परीक्षण-लेखकाला तुर्जिनेव्हच्या स्पोर्ट्समन्स स्केचेस्ची आठवण आली, तर कोणाला जवाहरलाल नेहरूंच्या डिस्कव्हरी ऑफ इंडियाची. शेकू आणि त्याची मुंडा हात बायको ह्यांनी एका बैलाची उणीव असताना नांगरट कशी केली, हा उतारा इंग्रजी क्रमिक पुस्तकात डॅनिश अँथॉलॉजीत, अमेरिकन क्रमिक पुस्तकात, ‘ट्रेझरी ऑफ मॉडर्न एशियन स्टोरीज,’ ह्या संग्रहात समाविष्ट केला गेला.
अठ्ठावन्नमध्ये प्रसिद्ध झालेल्या ह्या भाषांतराच्या पुढं सहासष्ट साली आणि सत्त्याहत्तर साली अशा दोन पेपरबॅक आवृत्त्याही प्रसिद्ध झाल्या. सत्त्याहत्तर साली आवृत्ती निघाल्याचं मला कळलं नाही; देशमुखांनाही नाही.
दरम्यान, डॅनिश मिशनरी संस्थेनं कोपनहेगनला डॅनिश आवृत्ती एकोणसाठ साली प्रसिद्ध केली, एक कॉपी मला आली. दिसायला छानच होती.पुण्याला एकवार मला संध्याकाळी घरी फोन आला, “डु यू नो कोलगेट टूथपेस्ट?”
“येस, आय डू.”
“वेल देंट्स द युनिव्हर्सिटी इन यूएसए, कोलगेट. व्हेअर आय अॅम वर्किंग अॅज ए टीचर. आय हॅव रीसेंटली रेड युअर बुक, द व्हिलेज हॅड नो वॉल्स. आय लाइक्ड इट्. आर यू इन्टरेस्टेड इन पब्लिशिंग इट् इन यूएसए?”
“वेल, शुअर आय अॅम.”
मग ह्या प्रोफेसरांनी मला आपलं नाव, गाव, पत्ता दिला आणि अमेरिकेला परत गेल्यावर मी तुम्हाला लिहितो, असं सांगितलं.दीड-दोन महिन्यांतच प्रोफेसरांचं पत्र आलं. त्यात त्यांनी लिहिलं होतं की, तुमचं पुस्तक इथंही मिळतं !
करारपत्र माझ्याकडं नव्हतं. देशमुखांच्याकडं होतं. त्यात हे पुस्तक आम्ही इंग्लंड-अमेरिकेतही विकू, असं होतं की काय, ते मला माहीत नाही.
पुढं लवकरच श्री. जयसिंगे वारले. एशिया पब्लिशिंग हाउस बंद झालं. माझे पुण्याचे प्रकाशक आणि पुस्तक-विक्रेते मला म्हणाले, “तुमच्या पुस्तकाच्या प्रती मुंबईला स्वस्तात मिळाल्या, त्या घेऊन आलोय. आठ प्रती आहेत. उद्या घरी पाठवतो.”
त्या प्रती सत्याहत्तर सालच्या पेपरबॅक आवृत्तीच्या होत्या. ‘दि व्हिलेज हॅड नो वॉल्स’ आता दुर्मीळ आहे.
श्री. बाळकृष्ण केसकर यांच्या सहीचं पत्र आलं. नॅशनल बुक ट्रस्टतर्फे ‘बनगरवाडी’चं सर्व भारतीय भाषांत भाषांतर करून एन.बी.टी. ते प्रसिद्ध करू इच्छित होती. सर्व भाषांतील हक्कांबद्दल मला रु. दोन हजार फक्त मिळणार होते.गुजराती, हिंदी, उर्दू, तमिळ, तेलुगू, कन्नड, पंजाबी, बंगाली, उरिया अशी ही सर्व भाषांतरं हळूहळू अशी काही वर्ष घेऊन प्रसिद्ध झाली. संपली. एन.बी.टी.चे लोक सांगतात, उत्तम खपलेलं असं हे भाषांतर आहे.
आजवर कोणत्याही भाषेतल्या भाषांतराचं पुनर्मुद्रण झालेलं नाही.
एन.बी.टी.चं हिंदी भाषांतर प्रसिद्ध होण्याआधीची गोष्ट.आकाशवाणीच्या चाकरीत असताना काही कामानिमित्त मी दिल्लीला गेलो. सहज साहित्य अकादमीच्या कचेरीत गेलो. श्री. प्रभाकर माचवे भेटले. गप्पा होता-होता ते म्हणाले, “तुमची ‘बनगरवाडी’ हिंदीत प्रसिद्ध झालेली आहे, ती मी वाचली.”
मी चकित.
“कुठं वाचलीत?”
“श्रीपतराय काढतात, त्या मासिकानं एका अंकात सबंध भाषांतर प्रसिद्ध केलंय; तुम्ही पाहिलं नाही? थांबा, मी देतो.”
त्यांनी मला ‘उपन्यास’चा अंक दिला. जबलपूरच्या सरवटे नावाच्या भाषांतरकारानं भाषांतरित केलेली ‘बनगरवाडी’ छापलेली होती.
मी माचव्यांना म्हणालो, “दोन वर्षांनी मला हे कळतंय.”
मुन्शी प्रेमचंदांचे चिरंजीव श्रीपतराय ह्यांना मी अलाहाबादला अनेक पत्रं पाठवली. उत्तर आलं नाही.
कोर्ट-कचेऱ्या करण्याची माझी इच्छा नव्हती. शिवाय, मला ते परवडलंही नसतं.तात्पर्य– पुस्तकाचं इंग्रजीत भाषांतर झालं, म्हणजे पुस्तकाचं आणि पर्यायानं लेखकाचं कल्याण होतंच, असं नाही. अनेकदा मनस्तापच होतो.
अठ्ठावन्नच साल असावं. माझे वडीलबंधू तेव्हा राजकमल कलामंदिरात चित्रपटकथालेखक म्हणून काम करीत होते. ते मला म्हणाले, “अरे, तुझ्या कादंबरीचे चित्रपटाचे हक्क राजकमलला हवे आहेत.”मी गप्प राहिलो. मला मनोमनी वाटलं की, हा विषय काही राजकमलनं करावा, असा नाही.
अण्णा पुन्हा बोलले, “मी तिथं आहे. कदाचित दिग्दर्शन माझ्याकडंही येईल.”
रीतसर पत्रव्यवहार झाला. दोन हजार रुपयांना मी चित्रपटाचे हक्क राजकमलला दिले.
— आणि एके दिवशी अण्णांनी राजकमल सोडलं.
वर्षांमागून वर्ष गेली. राजकमलनं ‘बनगरवाडी’चं काही केलं नाही.
दरम्यान, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे अल्काझी पुण्याला माझ्या घरी आले. काही बोलणं झाल्यावर मला म्हणाले, “तुमच्या ‘बनगरवाडी’वर चित्रपट करावा, असं माझ्या मनात फार आहे.”
मी म्हणालो, “तुम्हाला असं वाटलं, हा माझा बहुमानच आहे. पण ‘बनगरवाडी’चे हक्क मी राजकमलला दिले आहेत.”
फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये व्याख्याते म्हणून आलेल्या श्री. मृणाल सेन यांचा एकदा निरोप आला - त्यांना ‘व्हिलेज हॅड नो वॉल्स’ची प्रत हवी आहे. माझ्याकडे एकच प्रत होती. त्यांचा कलकत्त्याचा पत्ता घेतला आणि मुंबईहून प्रत मिळवून त्यांना पाठवून दिली.पुढं त्यांच्याकडून मला काही कळलं नाही.
काही वर्षं गेल्यावर राजकमलनं मला कळवलं की, आम्ही ‘बनगरवाडी’वर चित्रपट करणार नाही. हक्क परत करू.
आता चित्रपटाचे हक्क माझ्याकडेच आहेत.
हायडेलबर्ग युनिव्हर्सिटीच्या लेटरहेडवर, चांगल्या मराठी अक्षरात लिहिलेलं पत्र मला जून चौऱ्याऐंशीत आलं.श्री. माडगूळकर यांस,
स.न.वि.वि.काही दिवसांपासून ‘बनगरवाडी’ जर्मन भाषेत भाषांतर करण्याची माझी कल्पना होती. लवकरच मी भाषांतर संपवीत आहे.
एक लहान प्रकाशक भाषांतर प्रसिद्ध करायला तयार आहे, असे दिसते. हे पुस्तक मराठीतूनच भाषांतर करायला पाहिजे. कारण जर्मन भाषा इंग्रजीतून फार निराळी आहे. मी धनगरांच्या भोवती खूप वेळ राहिल्यामुळे मला थोडसं ठाऊक आहे. तुम्ही मला भाषांतर प्रसिद्ध करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती.
‘बनगरवाडी’च्या आधाराने मी जर्मनीत मराठी साहित्याची ओळख करू शकणार आहे.
आपला,
गुन्थर सोन्यायमर.मी परवानगी दिली.
मागेही एकवार सुरेख बंगाली लिपीच्या आकारातल्या मराठी अक्षरात मला भांडारकर इन्स्टिट्यूटमधून पत्रं आलं होतं. हे हिकिमूरा नावाचे जपानी गृहस्थ संस्कृतचा अभ्यास करण्यासाठी पुण्यात येऊन राहिले होते. त्यांनी ‘बनगरवाडी’ वाचली होती. फार आवडल्यामुळं त्यांना तिचं जपानीत भाषांतर करायचं होतं. मला भेटायचं होतं.माझ्या घरी आम्ही भेटलो. संभाषण इंग्रजीतून.
बोलता-बोलता त्यांनी मला ‘जरा’ आणि ‘झरा’ ह्यांत काय फरक म्हणून विचारलं, तेव्हा मी त्यांना ‘दि व्हिलेज हँड नो वॉल्स’ची प्रत दिली आणि सांगितलं की, तुम्ही फक्त मराठीवरून भाषांतर करू नका. आधार म्हणून देशमुखांनी केलेलं भाषांतर वापरा.
त्यांनी प्रयत्न सोडून दिला असावा, कारण नंतर मात्र काही कळलं नाही.
सोन्थायमरांनी जर्मनीहून मला पत्रानं विचारलं की, ‘मुरमुटी’ म्हणजे कोणतं झाड आणि ‘डालपाटी’ म्हणजे काय? मुरमुटी ह्या कमी पावसाच्या प्रदेशात दिसणाऱ्या झाडाचं शास्त्रीय नाव मलाही माहीत नव्हतं. पण, हे झाड कसं दिसतं, त्याला फुलं कशी असतात, पानं कशी असतात, त्याचं खोड कसं असतं, हे मला माहीत होतं. ‘अकासिया’ जातीचंच हे एक झाड असावं, हे मी त्यांना कळवलं.श्री. सोन्थायमर ह्यांना डालपाटी ह्या शब्दाचा अर्थ कुठल्याही शब्दकोशात सापडला नव्हता. साहजिकच आहे. फार प्रादेशिक अशा शब्दाचा अर्थ कोशात नसतोच. कोशात प्रतिशब्द आढळतात, अर्थ आढळत नाही.
मी अनेक रेखाटनं केली. डालपाटीखाली कोंबड्या, कोकरं कशी डालतात, बायका रानात जाताना तान्ह्या मुलांना डालपाटीत घालून डोक्यावरून कशा नेतात, हे मी चित्रांतून सांगण्याचा प्रयत्न केला.
डॉ. सोन्थायमरना ते कळलं. त्यांनी जर्मनमध्ये कोणता शब्द वापरला, वाचकांना हे कसं पोहोचतं केलं, हे मला माहीत नाही.
जर्मन भाषांतराची देखणी प्रत माझ्याकडं आली. प्रकाशकाचं करारपत्रही आलं.
पण करारपत्रातील अटी ह्या प्रकाशकानं पाळल्या नाहीत. मला रॉयल्टी मिळाली नाही.
डॉ. सोन्थायमर भारतात आले, तेव्हा त्यांनी आपल्या पदरचे बाराशे रुपये मला दिले. ते म्हणाले, त्या प्रकाशकाला कळवा की, तू काही रॉयल्टी पाठवली नाहीस; पण भाषांतरकारानं मला बाराशे रुपये दिले.
भाषांतरकाराचा हा चांगुलपणा मी प्रकाशकाला कळवला. डॉ. सोन्थायमर ह्यांचं भाषांतर उत्तमच झालं असलं पाहिजे. कारण, पुढं मला एका जर्मन कॅमेरामननं अॅडव्हान्स देऊन कळवलं की, मी तुमच्या पुस्तकावर टी.व्ही. सीरियलसाठी प्रयत्न करतो आहे. सहा महिने हक्क इतर कुणाला देऊ नका.
सहा महिने झाले. त्या जर्मन कॅमेरामनच्या प्रयत्नांना काही यश आलं नाही.
डॉ. इरावतीबाई कर्वे आणि डॉ. शेजवलकर ह्यांनी भविष्य वर्तवलं होतं, त्यानुसार मला जागतिक वाङ्मयात स्थान मिळालं नाही, तरी ‘बनगरवाडी’ काहीशी भारताबाहेरही माहीत झाली.ऑस्ट्रेलियातल्या ‘सिडनी हेरॉल्ड’मध्येही तिचं चांगलं परीक्षण प्रसिद्ध झालं.
काही महिन्यांपूर्वी श्री. राम कोलारकर माझ्याकडं आले होते. त्यांनी फार तपशीलवार अशी एक हकिगत सांगितली. म्हणाले, “शिवाजीनगर स्टेशनकडून मी विद्यापीठाकडे जाणाऱ्या रस्त्यानं चाललो होतो. दुपारची वेळ होती. पायांत वहाणा होत्या. अंगठा तुटला, तो लावून घ्यावा, म्हणून रस्त्यावर दिसलेल्या चांभाराच्या खुंटाकडं गेलो. जुनी पायताणं, रापी, टोच्या, कातड्यांचे तुकडे ह्यांच्या पसाऱ्यात बसलेल्या चांभाराकडं कोणी गिऱ्हाईक नव्हतं. झाडाच्या सावलीत बसलेला चांभार फावल्या वेळात वाचत बसला होता. मी अंगठा लावण्यासाठी चप्पल काढून पुढे ठेवली, तेव्हा त्यानं पुस्तक पालथं ठेवलं आणि कामाला लागला. हा काय वाचतो आहे, याचं मला कुतूहल होतं. पालथं घातलेलं पुस्तक उचलून मी पाहिलं, तर तो तुमची बनगरवाडी होती!”
म्हणजे, मानववंशशास्त्रज्ञ ते रस्त्याकडेचा चांभार असा पस्तीस वर्षांत ह्या पुस्तकाचा प्रवास झाला.
लेखकाला जास्ती काय पाहिजे असतं?
- oOo -
पुस्तक: प्रवास: एका लेखकाचा
लेखक: व्यंकटेश माडगूळकर
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस
आवृत्ती चौथी, तिसरे पुनर्मुद्रण.
वर्ष: २०२१.
पृ. ३५-४२.---
‘बनगरवाडी’ या पुस्तकातील उपरिनिर्दिष्ट वेचा: बाईल
RamataramMarquee
वारसा, जिज्ञासा आणि ज्ञान - १. वृद्धत्वाची जेथ प्रचिती... काव्य-मोतीचूर ऊर्फ काही ‘चविष्ट’ प्रेमकविता       चला दोस्तहो, खाण्यावरती बोलू काही       मूषकान्योक्ती       सुजन गवसला जो       क्रिकेटमधील उपेक्षितास दाद       बाबेलचा दुसरा मनोरा       Will He...?       To Dumbo, with Love       पहलगाम आणि आपण      
Indexes Menu_Desktop
संपूर्ण सूची : |
रविवार, १० ऑगस्ट, २०२५
वेचताना... : बनगरवाडी
Labels:
अनुभव,
पुस्तक,
प्रवास: एका लेखकाचा,
बनगरवाडी,
वेचताना,
व्यंकटेश माडगूळकर
संबंधित लेखन
अनुभव
पुस्तक
प्रवास: एका लेखकाचा
बनगरवाडी
वेचताना
व्यंकटेश माडगूळकर
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा