-
हा व्हिडिओ बराच जुना आहे. Still priceless.
काही काळापूर्वी डेव्हिड अटेनबरो आजोबांचे निवेदन असलेली एक सुंदर डॉक्युमेंटरी पाहिली होती. जगाबद्दलच्या आपल्या आकलनामध्ये रंगज्ञानाचा वाटा किती मोठा आहे हे हळूहळू ध्यानात येत गेले. माणूस हा जगात सर्वाधिक लाडावलेला प्राणी आहे, त्याला इतर कोणत्याही प्राण्यापेक्षा– सजीवापेक्षा म्हणू, अधिक बौद्धिक, शारीरिक कुवतीचा वारसा मिळालेला आहे... असं त्याला स्वत:ला वाटतं! पण त्या मुद्द्याकडे मी जात नाही.
माणसाने रंगपटाचे तीन प्रमुख वा मूलभूत रंग मानलेले आहेत. चित्रकलेच्या तासाला आम्हाला लाल, निळा नि पिवळा असे सांगितले जायचे, आता संगणकाच्या जमान्यात पिवळ्याऐवजी तिथे हिरवा आला आहे. या तीन रंगांच्या मिश्रणातून आसपासचे सर्व रंग तयार होतात, वा त्यांची जाणीव होते असे म्हटले जाते. मेंदूविज्ञानाचे अभ्यासक तर रंग ही संकल्पना (वास्तव नव्हे!) केवळ तुमच्या मेंदूने तयार केलेला आभास (Illusion) किंवा आकलन (perception) आहे असे म्हणतात. प्रत्येक प्राणी-प्रवर्ग, विशिष्ट प्राणीगट आणि सर्वात शेवटी विशिष्ट एक प्राणी या प्रत्येक टप्प्यावर रंग-आकलनक्षमता वेगळी होत जाते.
हा व्हिडिओ पाहाताच आजोबांनी सांगितलेला एक तपशील चटकन आठवला. त्यात असं सांगितलं होतं की हरणाच्या दृश्यक्षमतेमध्ये लाल रंगाची जाणीवच नसते! त्याचे भवतालाचे ‘पाहणे’ हे केवळ दोनच रंग-जाणीवांच्या आधारे होत असते. वाघ या प्राण्याच्या कातडीचा रंग प्राधान्याने लाल असतो. परंतु त्यामुळे हरण त्याला ‘पाहू’ शकत नाही. त्यातच वाघाच्या अंगावरील वेडेवाकडे पट्टे हे हरणाला गवताशी, झुडपाशी साधर्म्य दाखवणारे भासतात. कदाचित यामुळेच काळाच्या ओघात ‘हरणांच्या शिकारीमध्ये यशाची संभाव्यता अधिक असते’ हे ध्यानात आल्याने वाघांनी हरणांना आपले मुख्य भक्ष्य केले असावे.
पण निसर्गात संघर्ष असतो, तेव्हा बलस्थाने दोनही बाजूंची असतात. अन्यथा एक बाजू नि पर्यायाने संघर्ष, हे दोनही संपून जातील. या हल्ला करणार्या ‘गवतापासून’ आपल्याला धोका असतो हे हरणांना जाणवू लागले असेल. त्यातून त्याचा वेध घेण्याचा प्रयत्न त्यांनी सुरु केला असेल. त्यातील ज्यांची घ्राणेंद्रिये अधिक तीक्ष्ण होती ते त्याद्वारे वेध घेऊन वाघापासून स्वत:चे रक्षण करु शकले. त्यांची संतती वाढत गेल्याने तीक्ष्ण घ्राणेंद्रियांचे हरीण आणि रंगभूलतज्ज्ञ (camouflage) वाघ यांचा संघर्ष आजही चालू आहे.
हरणांच्या नजरेची मर्यादा त्यांच्या घ्राणेंद्रियाच्या अतिरिक्त क्षमतेमुळे भरून काढली गेली. एखाद्या विशिष्ट माणसामध्ये असलेली अशी नजरेची मर्यादा मात्र घ्राणेंद्रियाच्या अतिरिक्त कुवतीने भरून काढली जाताना दिसत नाही. याचे कारण मुळात सरासरी माणसाचे घ्राणेंद्रिय तेवढे तीक्ष्ण नाही हे तर आहेच, पण माणसाच्या आयुष्यात नैसर्गिक गंधांपलिकडे असंख्य कृत्रिम गंधांचा प्रवेशही झालेला आहे. त्यामुळे माणसांमध्ये मात्र ही मर्यादा घ्राणेंद्रियांद्वारे नव्हे तर अतिरिक्त श्रवणक्षमतेच्या आधारे भरुन काढण्याचा प्रयत्न होतो. मर्यादित वा शून्य दृश्यक्षमता असणार्या माणसांची श्रवणक्षमता अधिक तीक्ष्ण असते असा अनुभवास येत असते.
एरवी माणसाचा भरवसा दृश्य बाजूवर अधिक असतो. (म्हणून आकलनप्रधान, दृश्य बाजू नसणारे लेखनही पॉडकास्ट वा व्हिडिओ माध्यमांतूनच हवे असा हट्ट समाजमाध्यमी मंडळी धरू लागली आहेत.) आता व्हिडिओमधील तो ज्येष्ठ नागरिक पूर्णत: अंध नाही. तरीही हरणाप्रमाणेच सर्वसामान्यांपेक्षा त्याला वाघ वेगळा दिसत असेल, त्याला एकाच रंगाचे दिसणारे दोन वेगळ्या खेळांचे चेंडू ओळखण्यासाठी अन्य बारकाव्यांकडे लक्ष देत त्याने त्याचे असे काही निकष तयार केले असतील. रंगीत पाहू शकणार्या सर्वसामान्यांपेक्षा वेगळी अशी - लहानशी का होईना - एक ज्ञानशाखा त्याने विकसित केली असेल. आता त्याला रंग दिसू लागल्यानंतर या ज्ञानाला तो निरुपयोगी म्हणून सोडून देईल का? आज आपण ज्या भूतकाळातील जगाला आपल्याहून मागास मानतो. त्यातील माहिती, ज्ञान नि कौशल्याचा मोठा हिस्सा हा ‘कालबाह्य झाला म्हणजेच त्याज्यही झाला’ असा चुकीचा निष्कर्ष काढून त्यांना विसर्जित करुन टाकतो, तसे तर होणार नाही?
रंगविरहित जगामध्ये त्याने जमवलेले, अनुभवलेले आनंद नि समाधान रंगीत जगात तसेच राहील, की रंगांचे जग त्याच्या आयुष्यात नवे असमाधान घेऊन येईल? मर्यादित साधनसंपत्ती नि गरजा असलेले आनंदी, समाधानी समाज टेलिव्हिजन नि इंटरनेटच्या खिडकीतून बाहेर पाहू लागले, तेव्हा नव्या शक्यतांचे मोठे भांडार त्यांना समोर दिसू लागले. त्यातील अनेक बाबी आपल्या आयुष्यात नाहीत, याचे त्यांना वैषम्य वाटू लागले. आपल्या आयुष्यातील ज्या गोष्टी आपले आनंदनिधान होत्या, त्या बाहेरील काहींच्या तुलनेत त्यांना खुज्या वाटू लागल्या. आपल्या आयुष्याबद्दल ते अधिकाधिक असमाधानी होऊ लागले. या ज्येष्ठाचे तसे तर होणार नाही?
जगण्यामध्ये नवे प्रवाह येऊन मिसळतात, नवे कौशल्य, नवे ज्ञान हाती लागते तेव्हा सकारात्मक परिणामांसोबत काही नकारात्मकही घडत असते. त्याकडे पुरे दुर्लक्ष करणे हे अज्ञानीपणाचे लक्षण आहे. माणसाने भाषा विकसित केली नि संवादाला स्थळकाळाच्या बंधनातून मुक्त केले. पण त्याने झाले असे की माणसे फार बोलू लागली...
आता हेच पाहा ना, या व्हिडिओमध्ये उपशीर्षकांतून ‘सदर व्यक्ती जन्मत: रंगांधळी आहे.’ ‘त्याच्या कुटुंबियांनी त्याला दिलेला गॉगल हा रंगांधळ्यांना रंगाची देणगी देणारा आहे.’ एवढी दोनच वाक्ये देणे पुरेसे होते. पण तिथे व्हिडिओ निर्माता बोल बोल बोलत (किंवा लिही लिही लिहित) राहिला आहे. त्यातून त्या ज्येष्ठाचा निरभ्र आनंद, त्याचे लहान मुलासारखे हर्षभरित नि मग भावनाविवश होणे झाकोळून गेले आहे. भाषेने माणसाच्या ज्ञानाचा वारशाचे आयुष्य कैकपट वाढले असले, तरी त्याने बोलभांडपणाची वॉशिंग्टनची कुर्हाडही लायक नसलेल्यांच्या हाती सोपवून दिलेली आहे.
सुदैवाने आणि यु-ट्युबकृपेने हा वरचा कचरा नसलेला मूळ व्हिडिओ सापडला. त्याची लिंक इथे देतो आहे. इथेही मुलींची अस्थानी कमेंटरी आहेच, पण ती समोर स्क्रीनवर नसल्याने पाहणार्याला अडथळा जरा कमी आहे इतकेच.या व्हिडिओमध्ये सुरुवातीलाच एक मुलगी रंगीत फुगा बापाच्या नजरेच्या टप्प्यात सरकवताना दिसते. बापाला जगण्यातील सर्वात सुंदर भेट देताना एखाद्या लहान मुलाच्या वाढदिवसाची सजावट म्हणून रंगीबेरंगी फुगे आसपास लावावेत, तसे मुलींनी तिथे रंगीत फुगे पसरुन ठेवले आहेत. ते फुगे त्यांनी दिलेल्या त्या भेटीचा अविभाज्य भागच आहेत.
-oOo-
टीप: (१). आधी अपलोड केलेला फेसबुकवरील व्हिडिओ आता काढून घेण्यात आल्यामुळे डाउनलोड करुन ठेवलेला यू-ट्यूबवर अपलोड केला आहे.
RamataramMarquee
आली माझ्या घरी ही...       me me me me meme, इलेक्शन वाले meme       आळशांच्या बहुमता...       निवडणुका, प्रातिनिधित्व: अमेरिका आणि भारत       ट्रम्प, अमेरिका आणि जागतिक बदलाचे वारे - २ : ट्रम्प आणि इस्रायल       ट्रम्प, अमेरिका आणि जागतिक बदलाचे वारे - १       अर्ध्यावरती डाव मोडला...       वारसा, जिज्ञासा आणि ज्ञान - २ : पण याचा उपयोग काय?      
Indexes Menu_Desktop
| संपूर्ण सूची : |
शनिवार, ३० ऑगस्ट, २०२५
रंगांचा उघडुनिया पंखा
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा