RamataramMarquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

गुरुवार, १८ सप्टेंबर, २०२५

...तुटून पडल्या गाठी

  • श्री. वि. कुलकर्णींचे ‘डोह’ एका वाढत्या वयाच्या मुलाचे आपल्या भवतालाशी असलेले नाते उलगडत जाते. त्यातही निसर्गाशी, त्यातील विविध जिवांशी त्याची होत गेलेली ओळख, अंगभूत जिज्ञासेतून त्यांच्याशी जोडले गेलेले नाते या मार्गाने काही सुंदर ललित लेख त्यामध्ये वाचायला मिळतात.

    या अनुभवसिद्ध लेखनाचा पुढचा टप्पा या अपेक्षेने ‘सोन्याचा पिंपळ’ आणले. पण एक शैली वगळता ‘डोह’शी नाते सांगत नाही. तीच लेखनशैली, तीच अनुभवसिद्धतेची मांडणी असली तरी त्यात ‘डोह’मध्ये प्रतिबिंबित झालेली जिज्ञासा कुठे नाही. त्यातून जे जिव्हाळ्याचे नाते निर्माण होते, ते ही नाही. अनुभवाचा टप्पा पार करून अनुभूतीकडे वारंवार जाण्याचा प्रयत्न होतो.

    बहुधा तोवर श्रीवि अधिक आध्यात्मिकतेकडे झुकू लागले असावेत. वास्तव जगातील एखाद्या घटकाशी नाते सांगणारे, त्याबद्दल काही उकलणारे स्वप्न नि त्याची नंतर वास्तवात आलेल्या अनुभूतीशी घातलेली सांगड हे ‘डिव्हाईस’ कंटाळा येईल इतके वारंवार वापरले आहे. माझ्यासारख्या वस्तुनिष्ठ विचाराच्या माणसाला अनुभूती-अनुभवाची इतकी वारंवार नि बिनचूक बसणारी सांगड हास्यास्पद नि कृत्रिम वाटते. (उलट आध्यात्मिक मंडळींना हे लेखन भारावून टाकेल.) अनुभवाशी प्रामाणिक न राहाता, त्यावर आपल्या दृष्टिकोनाची झूल पांघरुन, लेखनाऐवजी तो दृष्टिकोनच ठसविण्याचा आटापिटा अधिक आहे की काय अशी शंका येते.

    ललित लेख हा आता दुर्मीळ झालेला लेखनप्रकार आहे. चटकन आठवायचे म्हटले तर श्री.विं.च्या पूर्वी इरावती कर्वे, दुर्गा भागवत, व्यंकटेश माडगूळकर, शांता शेळके; त्यांच्यानंतर ग्रेस, सुनीताबाई देशपांडे, अरुणा ढेरे अशी काही मोजकीच नावे सांगता येतील. कदाचित माधव आचवलांचे नावही यात घेता येईल. ‘डोह’ हे निसर्गाशी, निसर्गजीवी अनागर समाजातील एका मुलाच्या दृष्टीकोनातून लिहिले गेलेले ललित लेखन आहे. तिथे लेखकाने अनुभूती वाचकावर सोडली आहे, आपली लादलेली नाही.

    ‘सोन्याचा पिंपळ’मधील बहुतेक लेख हे आता निसर्गाबद्दलचे कुतूहल ओसरुन जगण्याबद्दलचे कुतूहल वाढीस लागलेल्या, कदाचित जगण्यातील संघर्षाशी निगडित बाबींच्या वर्तुळात बंदिस्त झालेल्या जिज्ञासेशी संबंधित आहेत. अनुभवांची निव्वळ जंत्री मांडणे हे नेहमीच अभिव्यक्तीच्या पदाला पोहोचते असे मला वाटत नाही. दस्तऐवजीकरण आणि लेखन यात फरक असायला हवा. ‘सोन्याचा पिंपळ’मधील लेखन केवळ दस्तऐवजीकरणाच्या पातळीवर राहाते, त्यात लालित्याचा प्रतिध्वनी उमटत नाही. ज्याला ‘शब्दचित्र’ म्हणता येईल ते रेखाटण्याची जी कला ‘डोह’मध्ये साध्य झाली ती इथे अभावानेच दिसते.

    या पुस्तकातील एकच लेख मला पूर्ण समाधान देणारा ठरला. त्यातीलच एक वेचा इथे समाविष्ट केला आहे.
    ---

    आमच्या आसपास उभी असलेली प्रचंड झाडे मला माणसांप्रमाणेच पण कोणी निराळी वाटत. त्यांचेही इथे काही काम असावे म्हणून ती आलेली असावीत. प्राण्यांचे जसे ठरावीक रूप असते तसेच झाडांचेही. प्राण्यांपेक्षा झाडे मला जवळची वाटत. आणि त्यांतल्या काही झाडांना चुकून शब्द फुटेलही असे मला वाटे. मी त्या शब्दाची आतुरतेने वाट पाही. त्या झाडांजवळ वारंवार उभा राही.

    जशी निरनिराळ्या रंगरूपाची माणसे तशीच झाडेही. प्रत्येक उभ्या झाडाची दुसऱ्या उभ्या झाडाशी ओळख असावी. आणि तसलेच दुसरे झाड त्या झाडाच्या जवळच्यापैकी कोणीतरी असावे.

    SonyaachaaPimpal

    सोन्याच्या पिंपळाशिवाय आणखीही पिंपळ आमच्या गावात होते : सोन्याच्या पिंपळाच्या मठाकडे गेलेल्या फाट्याच्या खालून एक थोराड पिंपळ वर आला होता. त्याचा एक ढापा दक्षिणेकडे आणि दुसरा उत्तरेकडे गेला होता. तोही खूप जुना पिंपळ होता. त्याला पाने जवळजवळ नव्हतीच. सोन्याच्या पिंपळाच्या विस्तारातून तो वाट काढीत होता. त्यामुळे त्याला पाने असल्याचा भास मात्र होई. दोन्ही प्रचंड ढापे शेवटाला रुंद होते आणि पोकळही. एका पोकळीत घुबडांचा प्रपंच वाढत होता. दुसऱ्या पोकळीतून पक्ष्याची शीट पडून उगवलेले कडुलिंबाचे एक नेटके हिरवे रोप बाहेर आले होते. ते रोप पिंपळाच्या पोकळीतून खाली वाट काढील, जमिनीत आपली मुळे रुतवील, मोठे होईल, आणि पिंपळाचे आवरण वल्कलासारखे राहील— असे चित्र माझ्या डोळ्यांसमोर येई. तो पिंपळ वाढतही नव्हता की सगळा वाळतही नव्हता. त्याचे अंग गाळमातीच्या गडद रंगाचे होते. सगळी कामे संपलेल्या, वय झालेल्या माणसासारखे त्याचे चालले होते. त्याच्या पुढे उभे राहून, राहून, हे त्याचे चालले तरी आहे काय, असे विचारावेसे वाटे.

    त्या पिंपळाच्या पुढे देवाची बाग. बागेच्या शेवटाला बाळंभटजींच्या घराची चढण. या चढणीवरून एक दांडगा पिंपळ कोठेही फाटे न फोडता, सरळसोट वाढत गेला होता. मस्ती आल्यासारखा तो वागे. तो एकाकी, फटकून उभा होता. त्याच्या जवळपास कुठल्याही मोठ्या झाडाचा बुंधा नव्हता. दक्षिणेकडून निघून त्याने मठाच्या दिशेला उत्तरेकडे तोंड केले होते. तो मठातल्या पिंपळांना पाहत होता काय कुणास ठाऊक. त्याच्या त्या एकाकीपणामुळे, मान वर करून पाहताना, आवारातून अन्य कुठून न दिसणारे निळे आभाळ दिसे. आभाळाच्या रंगावर उंचच उंच हलणारी त्याच्या शेंड्याची पाने पाहताना कधीकधी तो वेडा तर नसेल ना, अशी उगीचच शंका येई.

    त्या आवारात सावलीतून वाढत निघालेला, वडाची पानावळ भेदून वर निघालेला एक तरुण पिंपळ होता. पिवळसर, कबरा अशा रंगांचा पातळ कोवळा थर दिल्यासारखे त्याचे अंग होते. इंदूरकर नावाचा एक सेवेकरी अनेक वर्षे त्याला तोंडाने मंत्र म्हणत ओलेत्याने प्रदक्षिणा घालीत असे. कितीतरी वेळ प्रदक्षिणा चालत. इंदूरकराने कसलीशी सिद्धी मिळवण्यासाठी प्रदक्षिणा सुरू केल्या होत्या. सिद्धी मिळाल्यावर तिचा प्रयोग मठातल्या आंब्याच्या एका मोठ्या झाडावर त्याने केला होता. आणि ते रसरशीत झाड आठ दिवसांत उभेच्या उभे वठून गेले होते, असे बोलले जात होते.

    बंगल्यातल्या पिंपळाचेही वय झालेले होते. मोडकळीला आलेल्या मोठ्या इमारतीसारखे त्याचे रूप होते. राखी रंग गडद होऊन, वाळून विटलेला. जागोजाग फांद्या चिंबलेल्या. अंगावर गाठी आलेल्या. पोपटांची खूप बिर्‍हाडे भोके पोखरून राहिलेली. प्रचंड बुंध्याच्या ढोलीत इजाटे राहिलेली.

    बंगल्यातला विनायक पोपटांची पिले आणि अंडी खायला एक साप सारखा पिंपळावर येत असल्याचे सांगे. त्याच्या दारातच तो पिंपळ उभा होता. तिथे खाली पडून सापडलेले पोपटाचे एक पिलू विनायकने वाढवले होते. त्याचा कंठ फुटलेला मोठा पोपट झाला होता. त्याचा पिंजरा दारातच टांगला होता. जेव्हातेव्हा तो पोपट पिंजऱ्यातून पिंपळावरल्या पोपटांकडे पाहून ओरडत असताना दिसे.

    बंगल्याच्या पलीकडे ब्रह्मानंदमहाराजांनी लावलेले, मठाच्या प्रवेशद्वारात उभे असलेले दोन अवाढव्य पिंपळ होते. त्यांतल्या एकाचा विस्तार बंगल्यातल्या आवारातही आलेला. वडाखाली कोणी बंदुकांचे आवाज टाकू लागले की वानरे, वाघळे भयभीत होऊन उठत आणि या दोन पिंपळांवर राहायला येत. त्यांचे बांधे डौलदार. त्यांनी मठाचे सगळे आवार आपल्या तजेल पसाऱ्यांनी व्यापून गारेगार करून सोडले होते. आणि एवढे वाढले तरी ते कधी म्हातारे होतील असे वाटतच नसे.

    आणखी एक पिंपळाची फूट दिसे ती सांगलीकरांच्या धर्मशाळेच्या दगडी तटावरून वर येताना. आठदहा पिंपळाची पाने वारंवार तिथून वर माना काढीत. ती तोडली जात तरी पुन्हा तसल्या पानांची नवी तुकडी डुलायला लागे. वरून तोडला तरी तो पिंपळ आपल्या मुळ्या दगडी तटाच्या आतवर पसरत होता. आणि त्याने तटालाच भेगलायला सुरुवात केली होती.


    पण या सगळ्या पिंपळांपेक्षा सारखा संबंध येई तो सोन्याच्या पिंपळाचाच. दारातूनच तो दिसे. त्याच्या वेळीअवेळीच्या सळसळीने दारातूनसुद्धा मी हलून जाई. सकाळच्या कोवळ्या उन्हात सळसळणारी मंजुळ पाने नदीकडून येणाऱ्या सूर्याकडे वळलेली दिसत. तो त्या वेळी तिकडे अधिक झुकल्यासारखा दिसे. पण संध्याकाळीसुद्धा तो नदीकडे बघत असल्याचा मला भास होई. दुपारच्या वेळी त्याने तापलेला सूर्य डोक्यावर घेऊन खाली सावली पसरलेली असे.

    अवतीभवती असलेली झाडे, माती, नदी, आभाळ, माणसे या सगळ्यांचे एकमेकांशी काही संबंध होते खरेच. कधी ते कळत होते, कधी नव्हते.

    पावसाळ्यात सोन्याचा पिंपळ धुऊन गेल्यामुळे अगदी सुंदर दिसे. पावसाचे थेंब त्याच्या पानांमधून येताना केवढ्या जड आवाजात वाजत. त्याच्या बुंध्याच्या कुठल्या ना कुठल्या बाजूला न भिजता उभे राहून केवढाही मोठा पाऊस पाहता येई. नदीचे पाणी वाढून वर चढू लागले की सोन्याच्या पिंपळाला आनंद झालेला दिसे. ते पाणी वाढत वाढत पिंपळाच्या तळाला येई. आणि एके दिवशी सकाळी पावसाळ्यात टाळ्या वाजवणाऱ्या पानांचा तो पिंपळ पुराच्या पाण्यात वेढून उभा असलेला दिसे. त्याचे तीन ढापे जिथून सुरू होत तिथपर्यंत पाणी लागलेले असताना दादांनी मला एकदा खांद्यावरून तिथे पोहत नेले होते. त्या तिबेळक्यात आम्ही उभे राहिलो होतो...

    त्याही आधी पुराचे पाणी आले होते. धुण्यासाठी आई पिंपळाजवळच्या - दगडी कट्टयावर आलेली. मी तिच्या बरोबर होतो. खालचे देवाचे खोल आवार बुडून पाणी कट्टयाला लागलेले. काहीतरी झाले. मी पुढे गेलो. आणि पुढच्या पाण्यात बुडालो. मरणाच्या बोलावण्याचाच अनुभव. आपण संपत आहोत याची अतिशय वेगाची जाणीव झाली. दोनदा बुडून डोके वर आले तेव्हा तशा भीतीतही दिसला तो पुढे पसरलेला प्रचंड अंगाचा, ओल्याकंच पानांचा सोन्याचा पिंपळच. मी मेलो असतो तर मरणानंतर माझ्या स्मरणात राहिले असतेच तर ते तेच माझ्याकडे बघणाऱ्या पिंपळाचे मी पाहिलेले शेवटचे दृश्य.


    माझ्या मरणाजवळचा क्षण सोन्याच्या पिंपळाने पाहिला तसाच त्याच्या-वरला एक प्रचंड आघात मी पाहिला :

    काळे ढग दाटून आलेले. गडगडाटात संध्याकाळ अधिकच काळवंडलेली. मधूनच होणाऱ्या विजेच्या लखलखाटाने आकाश फाटून जात होते. एवढ्यात सुसाट वारा आला. भोवतीची झाडे पिसाटासारखी नाचू लागली. टपोरे थेंब दणकत आले. त्या भीषण पाऊस-वादळातून घरी जाणे अशक्य झाले. पिंपळाच्या तळाशी मी जीव एकवटून उभा राहिलो.

    पिंपळाची पाने वाजत होती.

    क्षणभर पुन्हा लखलखाट झाला. आणि कडकडाटाबरोबर विजेचा प्रचंड लालपांढरा लोळ देवाच्या आवाराकडे वळलेल्या पिंपळाच्या फांदीच्या दिशेने गेला. सगळा पिंपळ भयानक हादरला. आणि त्या दणक्यात काडकाड करीत तो आवारावरला ढापा माझ्यादेखत मोडून पडला.

    मी सुरक्षित होतो हे खरेच वाटेना. तो लोळ किती माझ्याजवळून गेला होता.

    आवाजाने माणसे धावत आली.

    तो ढापा म्हणजे एक अवाढव्य झाडच होते. त्याचा शेंडा देवाच्या आवाराच्या फरशीवर कोसळलेला आणि बाकीचा वरच्या बाजूस. ढाप्याच्या धुडाने घाटाला जायचा रस्ता अडवून टाकला.

    विजेच्या झपाट्याने कितीतरी वाघळे मरून पडली होती. काही भीतीने. काही विजेच्या लोळात सापडल्यामुळे जळाल्याने. आणि आग्यामोहोळांची धूळधाण झाली होती. त्यांचे पोळे एकीकडे, कांदा एकीकडे, माश्यांचे लगदे एकीकडे विखुरले होते. जळल्याचा सगळीकडे वास सुटलेला.

    जिथून ढापा मोडलेला होता तिथे विजेच्या, जळाल्याच्या आणि जबरदस्त दणक्याच्या खुणा होत्या. जळालेल्या भागाच्या पुढचे लाकूड चिंबलेले होते. पिंपळाच्या अंगातल्या आतल्या भागातसुद्धा केवढी ताकद असावी ते तो भाग ज्या पद्धतीने उघडा पडला त्यावरून दिसत होते. मोठ्या निरुपायानेच तो भाग पिंपळापासून मोडला गेला होता.

    पिंपळाच्या वजन पेलण्याच्या ताकदीचे दादांना फार वाटे. पण विजेची ताकद खूपच मोठी दिसत होती. दादा म्हणाले, तो ढापा पिंपळाला जडच झाला होता. कोणी न दगावता तो पडला हे बरेच झाले...

    ढाप्यावर चढून आम्ही इकडेतिकडे गेलो. गौरीचे दाजी त्या पिंपळावर कुणाला चढू देत नसत. शेरडांना पाला नेण्यासाठी, खुरपी घेऊन आता कितीतरी जण आले. मेलेल्या सुंदर जनावरावर तुटून पडावे तसे वाटत होते.

    धार्मिक कार्याशिवाय पिंपळाचे लाकूड कुणी जाळायचे नव्हते. शास्त्रीबुवांनी त्याच्या खूप समिधा गोळा केल्या. ते म्हणाले, “आता मरेपर्यंत समिधा गोळा करायला नकोत.”

    ते लांबच्या लांब पडलेले ढाप्याचे धूड मोठ्या करवती आणून मधूनमधून कापले गेले. त्याचे मोठाले ओंडके ओढून बाजूला ठेवले गेले.

    जिथून ढापा तुटला होता तिथला ओला, कवकवीत मांसासारखा जोरकस भाग बरा होत आला. माणसाचा हात तुटल्यावर पुन्हा जसा दिसू लागतो तसा तो वाढू लागला. वरती पुन्हा तशा जाड सालींचे पापुद्रे धरले. तसल्या भुंड्या भागावर पाचसहा छान गुलाबी पाने येऊन उन्हात नाचू लागली. म्हणजे ही पाने पुन्हा देवाच्या आवाराकडे जायची तयारी करत होती की काय ?

    पण सोन्याच्या पिंपळाची शोभा गेली. त्याचा आवाराकडला भाग ओका ओका वाटू लागला. आवारात उभे राहून पिंपळाकडे पाहण्यातली मजा गेली.

    तरी सोन्याचा पिंपळ काही न झाल्यासारखा उभा होता.


    वर्षांमागे वर्षे गेली.
    गावाकडे जाणे कमी होऊ लागले.
    पिंपळाच्या अस्तित्वाचा मनातला गडदपणा थोडा मंद झाला की काय असे वाटू लागले.
    असे का व्हावे ?


    ... आणि अचानक सोन्याच्या पिंपळाचे स्वप्न पडले.

    नदीला मोठा पूर आला आहे. पाणीच पाणी झाले आहे. मुळे आकाशाकडे करून, फांद्या पाण्यात बुडवून सोन्याचा पिंपळ वाहत चालला आहे.

    कुठे निघाला आहे हा पिंपळ?
    तो गावाच्या हद्दीतून आता पार पलीकडे वाहत जाईल.
    गावातली सगळी माणसे कुठे गेली ? त्याला कोणी धरत कसे नाही ?
    मी उठून बसलो...
    एकाएकी माझ्या मनात दुःख दाटून आले... सोन्याच्या पिंपळाविषयी पुन्हा फार फार वाटू लागले.
    कित्येक दिवसांत त्याचे विचार माझ्या मनात आले नव्हते.
    हे कसले स्वप्न असावे ?


    दोन दिवसांनी गावाकडे गेलो.

    आई म्हणाली, “बघून येा दोन दिवसांपूर्वी खरेच तो एकाएकी उमळून पडलाय. रात्रीचा पडला म्हणून कुणी त्याच्याखाली सापडले नाही.”

    खरेच.

    स्वप्रात पाहिल्यासारख्याच त्याच्या मुळ्या वरती आलेल्या. त्याचे कलेवर अस्ताव्यस्त पसरले होते.

    माझे मन भरून आले... माझेच हे कोणीतरी गेले...

    अनेक शतकांचा साक्षी असलेला आणि जोमात असलेला पिंपळ माझ्या आयुष्यकाळातच कोसळेल असे कधी पुसटसेसुद्धा मनात आले नव्हते... आपण अवतीभवतीचे पाहत आलो हे सगळे असेच आपणांपुढे उभे असावे असे वाटे. त्याखालची वाळू हळूहळू सरकत होती.

    दादा म्हणाले, तो काही आता लगेच कोसळावा अशा अवस्थेत नव्हता. त्याची स्थिती तशी चांगली होती. आवारावर गेलेल्या ढाप्याचे वजन कमी झाल्यामुळे त्याच्यावरला ताणही कमी झालेला होता.

    त्याच्या अंतर्भागात खोलवर कुठेतरी बिघाड झाला असावा. कदाचित विजेच्या लोळाच्या दणक्यापासून तो आतून क्षीण व्हायला सुरवात झाली असावी.


    सोन्याच्या पिंपळाचे अवशेष हळूहळू नष्ट झाले.

    त्याने व्यापलेली पोकळी आणि जमीन भकास दिसू लागली.

    सूर्याचे पिवळे ऊन पिंपळातून येताना कोमट होऊन यायचे ते सरळसरळ येऊ लागले, उन्हाच्या चकचकीत भपक्याने डोळे दुखू लागले. गावाकडे तेव्हा सोन्याचा पिंपळ नसल्याच्या जाणिवेने सुने सुने वाटू लागले.

    सोन्याचा पिंपळ जाऊन अनेक वर्षे उलटली. तो दूरच दूर गेल्याची क्षीण जाणीव तेवढी उरली...

    (‘सोन्याचा पिंपळ’ या लेखामधून.)

    - oOo -

    पुस्तक: सोन्याचा पिंपळ
    लेखक: श्रीनिवास विनायक कुलकर्णी
    प्रकाशक: मौज प्रकाशन गृह
    आवृत्ती पाचवी.
    वर्ष: जून २०१२.
    पृ. ५४-६०.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा