-
माझी अभिव्यक्ती ही शब्दांच्या आधारे ‘दृश्यमान’ होत असते. पण सध्या व्हिडिओ या माध्यमाची चलती आहे. त्यामुळे एक-दोन मित्र मला पॉडकास्ट (खरंतर हा शब्द चुकीचा आहे. पण तो आता रुळला आहे.) सुरु करण्याचा सल्ला देत असतात. ‘त्यामुळे तुझे लेखन(?) अधिक लोकांपर्यंत पोहोचेल’ अशी सायबर-मार्केटिंग स्ट्रॅटेजी ते मला कळकळीने सांगत असतात. पण मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेंद्र कुमारांप्रमाणे मीही ‘आता माझ्या विचारातील कल्पना, समीक्षा, भाषिणी, संज्ञा यांना असे चारचौघात मिरवावे का?’ असा प्रश्न विचारुन त्यांना पडदानशीनच ठेवत असतो. गोळाबेरीज ही की सध्या व्हिडिओ या माध्यमाचा बोलबाला आहे.
तो तसा नव्हता तेव्हापासून, बहुसंख्या - विशेषत: समाजमाध्यमांवरची - ही ‘समोर येईल तेच वाचतो’ असे बाणेदार उत्तर देऊन ‘ब्लॉग वगैरे आउटडेटेड गोष्टी कोण वाचणार’ अशा आविर्भावात मला झाडून टाकत असत. आता रील्सच्या जमान्यात समोर येईल तेच ‘पाहातो’ अशी प्रगती झाली आहे. मीही अधूनमधून त्या प्रवाहात अडकत असतो हे मान्य करण्यास प्रत्यवाय नाही.
“काळे, एवढं समजतं आहे तर मग करा ना व्हिडिओ; पाहू आम्ही” असा सल्ला मिळणे ओघाने आलेच. पण आमची अभिव्यक्ती बिचारी देखणी, आकर्षक, रंगीत वगैरे नसल्याने तिला चारचौघात आणण्यापेक्षा पडदानशीन स्थितीतच तिची सोयरिक जमवण्याची खटपट आम्ही करत असतो. एकदा अक्षता पडल्या, की नंतर जावयांना नाइलाजाने संसार करावाच लागेल अशा भरवशावर आम्ही असतो.
पुलंच्या ‘म्हैस’मधल्या त्या कुण्या प्रवाशाने एका होमिओपॅथी डॉक्टर (आम्ही होमिओपॅथीला वैद्यक न मानता श्रद्धा मानतो, पण आमचे राहू द्या) सहप्रवाशाला विचारलं होतं, ‘काफीचं नि तुमचं यवडं का हो वाकडं?’ तसं काही जण विचारतात, ‘काळे, व्हिडिओचं नि तुमचं यवडं का हो वाकडं?’ हा प्रश्न उत्तराची अपेक्षा नसलेला, शेरास्वरूप अर्थात र्हेटरिकल असल्याने, आम्ही उत्तर देण्याच्या फंदात पडत नाही. पण एक-दोन मुद्दे सांगतोच आता.
वैय्यक्तिक निवड म्हणून सांगायचे तर व्हिडिओ बनवणे नि रिलीज करणे हे ‘घेतला मोबाईल नि केले शूट’ इतके सोपे असते असे मला वाटत नाही. त्यावर वेळ, ऊर्जा नि पैसा खर्च करावा लागतो. ज्याला प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा आटापिटा करायचा आहे त्याने तो जरुर करावा. मी आळशी असल्याने हा खर्च करावा का याचा ताळेबंदी विचार मी करतो. माझे लेखन हे एकतर कुठल्या एका विषयाला धरुनच होईल याची शाश्वती नाही. त्यामुळे माझा एक निश्चित प्रेक्षकवर्ग तयार होण्याची शक्यता नाही. त्यामुळे चॅनेल मोनेटाईज होण्याची शक्यता नगण्य आहे. म्हणजे हा ‘चार आण्याची कोंबडी नि बारा आण्यांचा– नव्हे बारा बंद्या रुपयांचा मसाला’ असा प्रकार व्हायचा. बरे या व्हिडिओच्या बाळंतपणात लिहिण्या-वाचण्याच्या आणि मुख्य म्हणजे फेसबुकवर टाईमपास करण्याच्या वेळात घट होणार. मग कशाला करावी ही उठाठेव?
पण वैय्यक्तिक निवडीपलिकडे व्हिडिओ या माध्यमाचा विचार करायला हवा. प्रथम हा एक व्हिडिओ पाहा.
प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांनी भारतीयांना Argumentative Indian म्हणजे ‘वादविवादप्रिय भारतीय’ असे म्हटले आहे. माझ्या मते हा निवाडा किंचित एका बाजूला सरकला आहे. मुळात आपण Opinionated म्हणजे ‘मतप्रवृत्त’ किंवा निवाडाप्रिय (Judgmental) भारतीय आहोत. अभ्यास, आकलन, आत्मसात करणे या क्रमाने जाण्याऐवजी आपली उडी थेट अंतिमोत्तराकडे जाते जे प्रामुख्याने आपल्या पूर्वग्रहांच्या आधारे निश्चित होत असते.
आता वर दिलेला व्हिडिओ पाहूनही तुमची आपापली मते, निवाडे तयार झाले असतील. प्रथम म्हणजे हा व्हिडिओ सरळ पक्षपाती आहे. तो केवळ ट्रम्पपुत्र बॅरन याची झालेली फजिती दाखवतो आहे. त्यामुळे बहुसंख्येचा निवाडा हा ट्रम्पपुत्राच्या विरोधात नि काँग्रेसवुमन क्रोकेट यांच्या बाजूने जाणार हे उघड आहे.
पाहणार्यांत काही मंडळी ट्रम्पधार्जिणी असू शकतील. टॅरिफ प्रकरणानंतर अशा अनेक भारतीयांनी बाजू बदलली हे खरे असले, तरी ‘स्वप्नभूमी अमेरिके’बद्दलचा भ्रम, ‘मुस्लिमसंहारक इस्रायलचे मायाळू काका’ म्हणून ट्रम्प यांचे अजूनही काही जणांना कौतुक असू शकते. दुसरीकडे काँग्रेसवुमन क्रोकेट या आफ्रिकन वंशाच्या नि स्त्री आहेत या मुद्द्याला ध्यानात घेत पुरुषी वर्चस्ववादी, रंगभेदी नि वंशभेदी मंडळी त्यांना प्रतिकूल असतील. थोडे राजकीयदृष्ट्या जागरुक असलेले नि अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाला धार्जिणे असणार्या मंडळींचा ट्रम्पपुत्राला पाठिंबा नि डेमोक्रॅटिक पक्षाच्या काँग्रेसवुमनना विरोध हे आपोआप ठरून गेले असेल. यातील काही मंडळी कदाचित खटपट करुन या व्हिडिओमधूनही त्यांची बाजू लंगडी ठरवण्यासाठी इतक्या पक्षपाती व्हिडिओमधूनही त्यांना काहीतरी सापडेल.
जरा चाणाक्ष असतील तर एक नक्की ध्यानात येईल की हा व्हिडिओ खोटा कथाभाग मांडणारा आहे!
व्हिडिओखालच्या डिस्क्रिप्शनच्या पहिल्या ओळीकडे लक्ष गेले असते तर लगेच समजले असते. पण हा मूळ व्हिडिओ नव्हे. मूळचा व्हिडिओ https://www.youtube.com/watch?v=PzMh1y2Cc6E इथे आहे. इथे मात्र डिस्क्रिप्शनमध्ये हा फिक्शनल असल्याचा उल्लेख नाही. परंतु - बहुधा यू-ट्यूबने दटावल्यानंतर किंवा यू-ट्यूबने स्वत:च सुरुवातील एक निवेदन वाढवण्यात आले आहे. ज्यात सुरुवातीलाच याला 'Altered or synthetic content' असे संबोधून यातील दृश्ये नि मजकूर केवळ मनोरंजनासाठी तयार केल्याचा उल्लेख आहे.
पण याच निवेदनामध्ये एक प्रचलित, पठडीबाज वाक्य आहे : Any resemblance to real events, individuals, or situation is purely coincidental and unintentional.
माझ्या मते हा शहाजोगपणाच नव्हे तर चक्क खोटारडेपणा आहे. बॅरन, मिस क्रोकेट, त्यांचे काही फुटेज हे वास्तव आहे. ते दोघेही ‘चुकून’ मूळ व्यक्तिंसारखे दिसतात हा दावाच करता येणार नाही. आणि या सार्या खटाटोपाला unintentional म्हणणे हा तर अव्वल दर्जाचा कोडगेपणा आहे. हे मनोरंजनाचा हेतूने म्हणजे शंभर टक्के हेतुत: केले आहे.
आता विचार करा, हा व्हिडिओ यू-ट्यूब, फ़ेसबुक अथवा इन्स्टाग्राम सारख्या अधिकृत माध्यमांतून न येता, व्हॉट्सअॅपसारख्या माध्यमांतून ्तुमच्यापर्यंत पोहोचला असता तर तो अशा तपासणीमधून गेलेला नसेल. आलेला व्हिडिओ अधेमध्ये आलेल्या वास्तव तुकड्यांमुळे बेमालूमपणे वास्तवाचा आभास निर्माण करतो. फक्त यातील कथनाला कळीचे प्रसंग कृत्रिम प्रज्ञेवर (AI) आधारित प्रणालींनी तयार केलेले आहेत. कल्पित-वास्तवाची सहजपणे करता येणारी ही सरमिसळ, गवगवा-भास्करांना(propganada masters) अत्यंत सोयीची पडते. आणि म्हणून व्हिडिओ हे गवगव्याचे प्रमुख साधन बनले आहे, कृत्रिम प्रज्ञेच्या उदयानंतर अधिकच.
मुळात व्हिडिओ हे माध्यम पूर्णत: कृत्रिमच आहे. एखादा घटनाक्रम ते ‘जसे आहे तसा’ कधीच दाखवत नाही. नोंदवणे ते प्रक्षेपण करणे या दरम्यान त्यावर अनेक प्रकारची संस्करणॆ होत असतात. अगदी ब्रोमाईड फिल्म्सवर चित्रिकरण होण्याच्या काळापासून पोस्ट-प्रोसेस हा त्याचा अविभाज्य भाग आहे. पूर्ण लांबीच्या चित्रपटांच्या शेवटी येणारी श्रेयनामावली पाहिली तरी त्यावर किती प्रकारच्या तांत्रिक प्रक्रिया केल्या जात असतील याचा सहज अंदाज बांधता येतो.
बाकी सार्या प्रक्रिया बाजूला ठेवल्या तरी केवळ ‘एडिटिंग’ अर्थात संपादन ही एकच प्रक्रिया विविध प्रसंगांतून, तुकड्यांतून (shots) वेगवेगळे— क्वचित परस्परविरोधी कथाभाग मांडणारे घटनाक्रम निर्माण करु शकते. कारण प्रत्यक्ष चित्रिकरणामध्ये हे प्रसंग ज्या क्रमाने चित्रित केले त्याच क्रमाने ते चित्रपटात/व्हिडिओमध्ये यावेत असे कोणतेही बंधन नसते. किंबहुना केवळ याच चित्रपटासाठी वा व्हिडिओसाठी चित्रित केलेले प्रसंग वा तुकडे वापरायला हवेत असेही बंधन नसते.
अलीकडे लोकप्रिय झालेल्या रील्स’ या प्रकारात अनेकदा अन्य आधीच लोकप्रिय झालेल्या रीलमधील प्रसंग घेऊन त्याला नवे ध्वनिसंयोजन जोडून किंवा त्यातील ध्वनिसंयोजन वापरुन नवे रील चित्रित करुन सादर केले जाते. ही मुक्त देवाणघेवाण व्हिडिओ या माध्यमाला अधिक लवचिक... आणि म्हणून अविश्वासार्ह करत नेते आहे.
काही काळापूर्वी ‘ब्रॉडचर्च’ नावाची एक मालिका पाहाण्यात आली. त्यामध्ये एका खुनाचा तपास करत असताना अंतिमत: तपास-अधिकारी स्त्रीच्या पतीवरच संशयाची सुई येऊन पोहोचते. ती आपल्या पतीला अटक करते. त्याच्या कबुलीजबाबादरम्यान ती प्रसंगमालिका पडद्यावर साकार होत जाते. परंतु नंतर न्यायालयात खटला उभा राहातो तेव्हा तो हा कबुलीजबाब नाकारतो. इतकेच नव्हे तर त्याची बाजू मांडणारी वकील स्त्री तपासअधिकार्यांनी जमवलेल्या पुराव्यांच्या आधारेच संभाव्य पर्यायी घटनाक्रमाची मांडणी करुन दाखवते. (हा भाग मात्र केवळ निवेदन-स्वरूपात समोर मांडला जातो, पडद्यावर ‘साकार’ होत नाही. ) दोन पर्यायी शक्यतांमधून कोणती वास्तवाच्या अधिक जवळची ‘असेल’ याचा निवाडा ज्युरींना करायचा असतो. त्यामध्ये आपण मांडलेली शक्यता ‘अधिक संभाव्य’ असल्याचे पटवून देण्यात आरोपीची वकील यशस्वी होते नि आरोपी निर्दोष सुटतो.
ही मालिका पाहण्यास मी एका मित्राला सुचवले होते. त्याने ती पाहिल्यावर आरोपी निर्दोष सुटलेला पाहून त्याने मला विचारले, ‘अरे पण त्याने खून केला होता ना?’ मला हा प्रश्न ऐकून गंमत वाटली. वास्तविक दोन पर्यायी घटनाक्रम समोर मांडले गेले होते. त्यातील एक ‘पाहाता’ आला, तर दुसरा केवळ ‘ऐकता’ आला होता. या दोन पर्यायांत जो पाहाता आला, तो वास्तव असल्याचे त्याने गृहित धरले होते. (अर्थात मालिका दिग्दर्शकालाही तेच अभिप्रेत होते. कारण त्यावरच पुढचा कथाभाग आधारलेला होता.)
ब्रॉडचर्चमध्ये जो संभ्रम प्रेक्षकाच्या मनात उमटतो तो बर्याच जुन्या नि प्रसिद्ध ‘राशोमोन’मध्ये उमटत नाही. तिथे एक नव्हे तर चार पर्यायी घटनाक्रम पडद्यावर ‘पाहाता’ येतात. त्यात काही समान भाग आहे तर काही तपशीलात फरक आहे. परंतु इथे काही भाग समान येत असल्याने, प्रत्येक मांडणीपूर्वी निवेदक कोण हे स्पष्ट झाल्याने आणि मुख्य म्हणजे पर्यायी वास्तवाची मांडणी चालू आहे हे पुरेसे स्पष्ट झाल्याने हा संभ्रम उभा राहात नाही.
कृत्रिम प्रज्ञेचा उदय होण्यापूर्वीपासून निव्वळ संपादक-कौशल्याच्या आधारे खोटा प्रॉपगंडा पसरवणारे तज्ज्ञ गल्लोगल्ली तयार झाले होते. VFX सारखे तंत्र अवघड वा गुंतागुंतीचा प्रसंग चित्रिकरणाऐवजी थेट संगणकावरच ‘निर्माण’ करण्यास मदत करत असे. परंतु हे खर्चिक साधन आहे. केवळ चित्रपट-निर्मात्यांच्या बजेटमध्येच बसू शकते. उलट कृत्रिम प्रज्ञेचे क्षेत्र इंटरनेट असल्याने सुरुवातीपासून ते वेगाने वाढले आहे. साध्यासोप्या माहिती-जिज्ञासापूर्तीसाठी तर ते मोफत काम करते. त्यातून त्याला आवश्यक त्या कच्च्या मालाचा पुरवठा होत जातो. मग प्रगत ‘विचाराने’ ते व्यावसायिक क्षेत्रांत साहाय्यक म्हणून काम करु लागते. आज अगदी सर्वसामान्य मोबाईलधारकही सराईतपणॆ व्हिडिओ एडिट करु शकतो. दोन-तीन वर्षांपूर्वी मला प्रथम याची चुणूक दिसली होती.
पाच-सहा वर्षांपूर्वी केलेल्या चित्रपट रसास्वाद शिबिरादरम्यान एका तज्ज्ञाने असे सांगितल्याचे आठवत होते की ‘चित्रपटाच्या चित्रिकरणाला कॅमेरा एकच असतो. एकाच वेळी एक प्रसंग वेगवेगळ्या कोनातून चित्रित करायचा तर कॅमेर्याची जागा बदलून तो दोन वेळा चित्रित करुन नंतर संपादनाच्या मदतीने एकत्र करावा लागतो.’ दोन-तीन वर्षांपूर्वी एक रील पाहाण्यात आले. यात एका मांजरीच्या पिलावर हल्ला करु पाहणार्या कुत्र्यावर त्या पिलाची आई त्वेषाने हल्ला करताना दिसते. ती प्रथम एक फटका कुत्र्याच्या तोंडावर मारते. ते कुत्रे क्षणभर गांगरते. तेवढ्यात मांजरी चपळाईने मागे वळून पिलाला झुडपाच्या दिशेने किंचित ढकलते, एकप्रकारे इशारा करते नि निमिषार्धात पुन्हा वळून कुत्र्यावर हल्ला करते.
या सार्या घटनाक्रमात मांजर उगवली कुठून आणि ते पिलू गायब झाले कुठे हे दाखवणारे तुकडे वेगवेगळ्या कोनातून चित्रित केले होते. वास्तव जगातला हा प्रसंग. अमुक ठिकाणी, अमुक वेळेला असे घडेल हे आधी ठाऊक असणे शक्यच नाही. तेव्हा दोन कोनांत दोन कॅमेरे लावून ठेवले हे अशक्य. म्हणजे इथे तंत्राचाच वापर केला असला पाहिजे असा मी तर्क केला, जो खरा ठरला. इमेजेस एडिट करणारे ज्याप्रमाणे ओरिएंटेशन, अॅंगल बदलून नवी इमेज तयार करु देतात. तसेच काहीसे यात होत असणार. असा साधा व्हिडिओ शूट करणारा मोबाईलधारी त्यासाठी फार उच्च दर्जाची प्रणाली विकत घेईल असे वाटत नाही. म्हणजे हे एडिटिंग अतिशय घरगुती पातळीवरच्या संगणकावर केले असले पाहिजे इतकाच तर्क मी करु शकतो.
या पलिकडे मला फारशी माहिती नाही, आयुष्यात मोजक्या बाबतीत डोक्यातील जिज्ञासेला मोकाट सुटू न देता पकडून दाव्याने बांधून घातले त्यात ही एक. पण एकुणात प्रचंड तांत्रिक प्रगती नि खोटेपणा, गवगवा वगैरे दुर्गुणांनी लिप्त माणूस यांची युती विश्वासार्हतेच्या मुद्द्यावर मला काही फारशी आशादायक वाटत नाही एवढे नोंदवून ठेवतो.
-oOo-
ता.क.:
तुम्ही फेसबुक-पोस्टमध्ये दिसणारा व्हिडिओचा थंबनेल पाहून उत्सुकतेने पोस्ट उघडली असेल, आणि ती तुम्हाला अपेक्षित विषयावर वा दिशेने जाणारी दिसली नसेल, तर तुम्हीही Seeing is believing चे शिकार झालेले आहात. 😀
RamataramMarquee
निवडणुका, प्रतिनिधित्व: अमेरिका आणि भारत       ट्रम्प, अमेरिका आणि जागतिक बदलाचे वारे - २ : ट्रम्प आणि इस्रायल       ट्रम्प, अमेरिका आणि जागतिक बदलाचे वारे - १       अर्ध्यावरती डाव मोडला...       वारसा, जिज्ञासा आणि ज्ञान - २ : पण याचा उपयोग काय?       पौरुषाचा कांगावा      वारसा, जिज्ञासा आणि ज्ञान - १. वृद्धत्वाची जेथ प्रचिती...       काव्य-मोतीचूर ऊर्फ काही ‘चविष्ट’ प्रेमकविता      
Indexes Menu_Desktop
| संपूर्ण सूची : |
रविवार, ९ नोव्हेंबर, २०२५
Seeing is believing
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा