RamataramMarquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

सोमवार, १५ डिसेंबर, २०२५

प्रेषित आणि क्रांतिदूत

  • त्याचं खाणं संपायच्या आधीच रघू दार लोटून आत आला. रघू अठ्ठावीस वर्षांचा, श्रीमंत बापाचा वाया गेलेला मुलगा. वाया गेलेला म्हणजे जगाच्या दृष्टीने. गेली तीन वर्ष रघूनं दाढी केलेली नव्हती. भारतात आमूलाग्र क्रांती कशा पद्धतीने घडवून आणता येईल याचा तो सतत विचार करी. तेच त्याचं वेड. त्यासाठी तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत एशियाटिक सोसायटीच्या ग्रंथालयात अभ्यास करीत बसलेला असे. कास्टाला आपल्या क्रांतीचा अग्रदूत बनविणे हेही त्याचं एक ईप्सित होतं.

    मुंबई दिनांक

    गळ्यातली बॅग कास्टाच्या टेबलावर ठेवीत रघू म्हणाला,

    “घाईत असल्याचं ऐकलं.”

    “हा निघालोच, साडेअकराला केस आहे लेबर कमिशनरपुढे.”

    “मर असाच! तू असाच केसेस लढवीत मरणार. भरघोस काम तुझ्या हातून काही होणार नाही.”

    कास्टा नुसताच हसला. बाजूचा कागद उचलून त्यानं हात पुसलेला पाणी घटाघटा पिऊन टाकीत तो म्हणाला, “सकाळपासून तू काही खाल्लेलं दिसत नाही.”

    “मी एकभुक्त आहे. व्रतस्थ आहे. कोट्यवधी लोकांना एक वेळचं जेवणही पूर्ण मिळत नसताना सतत चरत राहून अंगावर चरबी वाढविणं मला पसंत नाही. ते शोषण आहे जनतेचं.”

    “तू खरोखरच रागावलेला दिसतोस. काय झालं?”

    “कुठं काय? मी कायम रागावलेला आहे.”

    “चल मग. मी कोर्टात जातो आहे टॅक्सीनं. जाताना बोलू.”

    रघूनं पिशवी खांद्यावर लटकविली आणि कास्टा निघाला. जाताना त्यानं लंचचा डवा बंद करून नीलाच्या टेबलावर ठेवला. आणि तिनं पुढं ठेवलेली फाईल घेऊन रघूबरोबर बाहेर पडला.

    टॅक्सीत बसल्यावर कास्टा म्हणाला, “हं, बोल. काय करायचं ठरवलं आहेस तू?”

    रघूने नाकपुड्या फेंदारल्या, पिवळे दात बाहेर काढले, सिगारेट पेटवली आणि अत्यंत कडू हसत तो म्हणाला, “तेच मी तुला विचारतो आहे. तू काय करणार आहेस?”

    कास्टा जरा त्रासल्यासारखा झाला. तो म्हणाला, “मी माझ्या परीनं करायचं ते करतोच आहे. तूच आयुष्य फुकट घालवतो आहेस.”

    रघूनं सिगारेटचे शांतपणे दोन झुरके घेतले. मग तो म्हणाला, “ढोंगीपणाची कीव येते. अगदी मनापासून सांग कास्टा, तू जे काय करतो आहेस ते पुरेसं आहे असं खरोखरच तुला वाटतं? पगारवाढीसाठी संप करणं, आश्वासनं मिळाली की ते मागे घेणं, लेबर कोर्टात केसेस लढविणं, ‘अॅन्टी स्मगलिंग’,‘अॅन्टी करप्शन’ च्या मोहिमा काढून स्टंट करणं आणि प्रसिद्धी मिळवणं यामध्ये तुझ्या ध्येयाची इतिकर्तव्यता झाली?”

    “हे बघ, तू मला शिकवू नये असं मी म्हणत नाही. पण आजच्या परिस्थितीत जेवढं शक्य आहे तेवढं मी अत्यंत प्रामाणिकपणं माझ्या कुवतीनुसार करतो आहे.”

    “हेच ते, हेच ते— ” रघूचा आवाज चढला. त्याचे केस पिंजारले. “आजची परिस्थिती ! आजच्या परिस्थितीत शक्य आहे तेवढंच करणार. ही परिस्थिती बदलण्याची तुझी इच्छाच होत नाही. कारण तूही या परिस्थितीचा रक्षणकर्ता बनला आहेस. आणि तुझा सगळ्यात मोठा गुन्हा म्हणजे तुझ्याबरोबर तू तुझ्या कामगारांनाही या व्यवस्थेचा रक्षणकर्ता बनवीत आहेस. खरोखर, मला तुझी कीवही येते आणि चीडही येते. तुला वाटतंय, तू तुझ्या कुवतीनुसार प्रामाणिकपणे काम करतो आहेस. हा तुझा भोंदूपणा आहे. माझी खात्री आहे की आपण करतो आहोत ते पुरेसं नाही. याची तुला जाणीव आहे. आणि आपला मार्ग बरोबर आहे की नाही याही बाबतीत तुला संभ्रम आहे. आणि एवढं असूनही तू असं बोलतोस. म्हणून तू भोंदू आहेस. म्हणून तुझी कींव येते. ढोंगीपणाच्या बाबतीत तू तर लीडर्सहून स्वतःला कमी समजू नकोस. आणि मुख्य म्हणजे तुला सर्व कळत असूनही तू स्वतःला प्रामाणिक समजतोस. व्यावहारिक लाचलुचपतीपेक्षा तुझं हे पोलिटिकल करप्शन अधिक धोक्याचं आहे. म्हणून तुझा राग येतो. तुझ्यापेक्षा सरळ सरळ भ्रष्टाचारी भांडवलदार हे कमी धोकेबाज. कारण त्यांच्याकडे सरळ बोट दाखवून त्यांना शत्रू म्हणता येतं. तुझं तसं नाही. पुरोगामित्वाचा बुरखा पांघरणारा तू प्रतिगाम्यांचा हस्तक आहेस–”

    रघूचा आवाज भलताच चढला होता. त्याचा चेहरा लाल झाला होता. आवाज चढवून मध्येच त्यानं वाक्य तोडलं आणि रागारागाने सिगारेट बाहेर फेकून दिली.

    मग तो पुन्हा कडू जहर हसला. सिगारेट पेटवीत म्हणाला, “तुला राग आला असणार. पण मला हे एकदा बोलायचंच होतं.”

    कास्टा थांबला. टॅक्सीतल्या पट्टयाला धरून बाहेरच्या रहदारीला शून्यपणे न्याहाळत राहिला. मग थोड्या वेळानं म्हणाला, “बोल ना. मी मनापासून ऐकतो आहे. तुझं बोलणं पुरे झालेलं नाही–”

    “बोलतो. तुझं असं का झालं आहे ते सांगतो. तुला सुरुवातीला बरोबर मार्गदर्शन मिळालेलं नाही. तुला आता जेव्हा कळायला लागलं तेव्हा तू एस्टॅब्लिशमेंटचा मेंबर बनून गेलेला आहेस. युनियनचे पगार, जीप, ब्लॉक, लोकप्रियता, फॅशनेबल सोसायटीतील भाषणं, कामगारांचं प्रेम आणि पुढचं राजकीय भविष्य, बाया यांनी तुला करप्ट करून टाकलं आहे. तू आता अडकून पडला आहेस. या शृंखला तोडल्याशिवाय तुला काही करता येणार नाही.”

    थोडा वेळ थांबून म्हणाला, “कडू लागतंय ना?”

    कास्टा पुन्हा काही वेळ बोलला नाही. मग हळूहळू पण निश्चयी स्वरात म्हणाला,

    “तू विश्वास ठेव अगर नको ठेवूस रघू. पण तू आत्ता बोललास तोच डायलॉग रोज दिवसातून एकदा तरी मी स्वतःशी करत असतो...”

    “ही आणखी एक थाप...”

    “ऐकून घे. मी तुझं ऐकलं. आता माझं ऐक. माझा मार्ग पूर्णतया बरोबर नाही हे मला पटतं. पण दुसरा अधिक चांगला मार्ग मला दिसत नाही. तुझा मार्ग मला पटत नाही. सध्याच्या परिस्थितीत तरी तो मला मूर्खपणाचा, आततायीपणाचा वाटतो. खर्चीक वाटतो. आणि त्यात यशाची खात्री नाही. माझा मार्ग सरळ नसला, आडवळणाचा असला, तरी तो धीमेपणाने पुढे नेणारा आहे. त्यातून वाईट तरी काही निघणार नाही. चांगलंच होईल. आणि तू काहीही म्हण, व्यक्तिगत स्वातंत्र्यासारख्या मूल्यांवरून अजून माझा विश्वास उडालेला नाही. हिंसक क्रांतीमधून निर्माण होणाऱ्या राज्यव्यवस्थेत या स्वातंत्र्याला क्वचितच वाव मिळतो. अखेर आयुष्यातल्या काही मूल्यांना जपावं लागतंच. मलाही क्रांती अभिप्रेत आहे. पण तू म्हणतोस त्या पद्धतीनं नव्हे. 

    व्यावहारिक दृष्ट्या काही ठिकाणी माझं करप्शन होत असल्याचं मलाही जाणवतं हे मी कबूल करतो. पण पोलिटिकल करप्शनचा तुझा आरोप मला मुळीच मान्य नाही. मी ज्या पद्धतीनं जातो तीच पद्धत अधिक सुरक्षित आहे. आपल्या देशात तुझ्या मार्गानं काही होणं हे जवळ जवळ अशक्य आहे. देश एवढा प्रचंड आहे, एवढी भांडणं, एवढा भेद, भाषा, धर्म, जाती, इतकी विलक्षण गुंतागुंत आहे की देशात तू म्हणतोस तशी एकसंध संपूर्ण क्रांती करता येईल हे मला शक्य वाटत नाही. मी संभ्रमात होतो, विचार करण्याचं टाळत होतो. पण आता तुझ्याशी बोलताना वाटतं आहे, मीच बरोबर आहे. आणि तू तरी आतापर्यंत काय साधलं आहेस? मी निदान लोकांबरोबर तरी आहे. लायब्ररीच्या बाहेर तू कधी पडला आहेस ?–"

    “थोडक्यात म्हणजे तू आता पक्का बूर्झ्वा झाला आहेस. तुझी सहानुभूती खोटीच होती म्हणायची–”

    “भलतंच बोलू नकोस. तेव्हा मला तुझं बरचसं पटत होतं. आता नाही–”

    “बरोबर तेच. कारण तेव्हा तुलाही कधी कधी पोटाची भ्रांत पडत होती. पोटाची भ्रांत असणाऱ्यांना मूल्यं सुचत नाहीत. आणि श्रद्धा असणाऱ्यांना क्रांतीच्या यशाची नेहमीच खात्री वाटते. तुला आता पोटाची चिंताही नाही. आणि त्यामुळे श्रद्धा असण्याचीही गरज नाही. किंवा काहींची श्रद्धा असते, पण आपल्या आयुष्यात क्रांती यशस्वी होऊन तिची फळं आपणाला चाखायला मिळतील की नाही अशी शंका असल्यानं स्वतःला क्रांतिकार्यात झोकून द्यायला ते तयार नसतात. अशातला तू असावास असं दिसतं– ”

    “भलतेच आरोप करू नकोस.”

    “तू असंबद्ध बोलतोयस. आत्ताच्या तुझ्या बोलण्याचा मथितार्थ हाच. खरोखर घर सोडून भणंग झाल्याचं जेवढं समाधान मला वाटतं आहे तेवढंच समाधान आमच्या पार्टीनं मला काढून टाकल्याचं आत्ता मला वाटत आहे. आमची पार्टीही आता पूर्ण बूर्झ्वा बनत चालली आहे. पार्टीतच राहिलो असतो तर तुझ्यासारखाच बनलो असतो. घर आणि पार्टी या दोन्ही संस्था सोडल्यानं मी आता स्वतंत्र विचार करू शकतो. आणि त्यामुळेच मला आता माझाच मार्ग अधिक योग्य वाटू लागला आहे. तू मला अंडरएस्टिमेट करू नकोस. मी एकटा नाही. माझ्यासारखेच अनेक तरुण या मुंबईत, महाराष्ट्रात आणि देशातही आहेत. आणि मी त्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न करीत आहे. 

    पार्टीनं काढून टाकल्याचं मला समाधान व्हायला आणखी एक कारण आहे. तुझी कामगार चळवळ म्हणा की आमचा स्वतःला क्रांतिकारक म्हणवून घेणारा पक्ष म्हणा, हे माझ्या दृष्टीनं खऱ्या क्रांतीचे सगळ्यात धोकेबाज शत्रू आहेत. तुझी चळवळ किंवा तुझ्या-आमच्या पक्षासारखे पक्ष हे जर नसते तर समाजाच्या दोन टोकांतील दरी वाढत जाऊन केव्हा तरी नैसर्गिकपणे क्रांतीचा स्फोट झाला असता. तुमच्या चळवळीमध्ये ही दरी कमी करण्याची ताकद नाही. ही दरी वाढवण्याचा वेग थोडासा कमी होतो एवढेच. पण त्यामुळे तुम्ही क्रांती थोपवून धरता. दूर लोटता. निदान या गुन्ह्यात मी सहभागी नाही. याचं मला समाधान आहे. आणि जेव्हा माझ्यात ताकद येईल तेव्हा माझं पहिलं काम राहील तुम्हाला नष्ट करणं–”

    रघूच्या आवाजात यावेळी मघासारखा आवेश आणि संताप नव्हता. तो हळूहळू, एकेका शब्दावर जोर देऊन शांतपणे बोलत होता. आवाजात चढउतार नव्हता. पण त्यामुळेच त्याच्या बोलण्याला एक कठोर धार आली होती. त्याचा एकेक शब्द कास्टाला कापीत होता. त्याच्या अंगावर शहारे आणीत होता. रघू पाचसहा महिन्यापूर्वी भेटला होता. त्यानंतर एकदम अताच. या काळात त्याच्यात खूपच बदल झालेला दिसत होता. त्याच्या प्रत्येक शब्दामागे निश्चय, अभ्यास आणि श्रद्धायुक्त आत्मविश्वास दिसून येत होता. कडवेपणा जाणवत होता. त्वेष दिसत होता. रघूविषयी आतापर्यंत वाटत असलेला आपलेपणा एकदम गळून पडल्यासारखं कास्टाला वाटू लागलं. थोडी भीतीही वाटू लागली. रघू आपल्याला नष्ट करणार म्हणजे काय करणार? कास्टा हसला आणि म्हणाला,

    “तू जोवर प्रत्यक्ष जनतेमध्ये काम करायला सुरुवात करत नाहीस ना रघू, तोवर तुझे विचार असेच एकांगी आणि संकुचित राहातील. लोकांच्या खांद्याला खांदा घासू लागलास, राजकारण अधिक जवळून बघू लागलास की तुझी दृष्टी अधिक विशाल होऊ शकेल. काही गोष्टी कराव्याच लागतात आणि काही गोष्टी टाळताच येत नाहीत हे तू अनुभवाने शिकशील.”

    रघू एवढ्या मोठ्यानं हसला की कास्टा दचकला. भयंकर मोठा विनोद ऐकल्यावर हसतात तसा तो पोट धरून, मान वर करून, गदगदून हसला. कास्टाला रघूचं ते हसणं वेडसरपणासारखं वाटत आहे तेवढ्यात स्वतःला सावरून रघू म्हणाला, “एक्झक्टली. त्यालाच मी करप्शन म्हणतो. तुम्ही त्याला दृष्टीचं विशाल होणं असं नाव देता. व्वा! कास्टा, तू कसा एखाद्या भांडवलदाराच्या बगलबच्च्याच्या पोपटासारखा बडबडलास. तुझ्याकडून हे अपेक्षित नव्हतं. म्हणून मला हसू आलं. माफ कर. आय मीन नो इन्सल्ट.” असं म्हणून तो डोळे पुसू लागला.

    टॅक्सी केव्हाची थांबलेली होती. आणि कास्टाला भयंकर अस्वस्थ वाटू लागलं होतं. दार उघडून तो बाहेर आला आणि त्यानं टॅक्सीचं बिल चुकतं केलं. एकाएकी रघूविषयी त्याच्या मनात आदर आणि प्रेम उसळून आलं. रघूला आपण फसवतो आहोत. पण तो फसू शकत नाही. त्याबद्दल आपल्याला काय वाटतं? राग की द्वेष ? कास्टाला काही कळेना त्यानं रघूला विचारलं,

    “आता कुठं जाणार?”

    रघूनं आळस दिला. खांद्यावरची बॅग सारखी केली आणि अगदी सहज म्हणाला,

    “लायब्ररीत.”

    “जेवण वगैरे झालं की नाही?”

    “नाही. तुझ्याकडे पैसे मागायला आलो होतो. पण आता मागावेसे वाटत नाहीत.”

    “नॉन्सेन्स–”

    “क्रांतीला अप्रत्यक्षपणे अशा रीतीनं मदत केल्याचं ढोंगी समाधान तुला लाभेल. त्यात तुझंच नुकसान आहे.”

    “यू आर रास्कल, अ बास्टर्ड.”

    रघू मनापासून हसला. मोकळेपणानं, निरागस हसला. फक्त हसला. कास्टानं काही नोटा त्याच्या शर्टाच्या खिशात कोंबल्या, त्याला त्यानं विरोध केला नाही. “ही लाच आहे असं मानू नकोस.”

    रघूनं नुसतीच त्याच्या खांद्यावर थाप मारली.

    कास्टा म्हणाला, “पुन्हा केव्हाही मोकळ्या वेळी ये... सविस्तर बोलू. ये.”

    “बोलण्यात आता रस वाटत नाही.”

    “पण येच. तुझ्याशिवाय दुसरं असं बोलणारं कुणी भेटत नाही.”

    “बघू. येऊ.”

    रघू निघून गेला आणि कास्टा अस्वस्थपणे लेबर ऑफीसमध्ये शिरला. केस चालू व्हायला थोडा वेळ होता. पण अजून कुणी कांमगार देखील आले नव्हते. त्यामुळे तो अधिकच अस्वस्थ झाला. चिडला. कामगारांचा त्याला राग आला. स्वतःचाही राग आला. रघूनं आपल्याला एवढं फटाफट तोंडावर बोलावं आणि आपण ते नुसतं ऐकून घ्यावं? रघूला खरं म्हणजे बोलण्याचा काय अधिकार ! 

    उलट त्याला बोलण्याचा आपल्याला हक्क आहे. लायब्ररीतल्या बंद खोलीत, ढीगभर पुस्तकांच्या सहवासात, मऊ गादीच्या खुर्चीवर बसून रघू विचार करतो. त्यामुळे त्याच्या विचारांना व्यवहाराचा स्पर्शही झालेला नाही. त्याचं दारिद्र्य नकली आहे. बाप श्रीमंत. याचीच प्रतिज्ञा घरी जेवायचं नाही ही. आणि हा रघू आपल्याला ताडताड बोलून आरामात लायब्ररीकडे निघून जातो. आपण ते मुकाट्याने ऐकतो. आणि घाम पुशीत इथं येतो. केस उशिरा लागलेली. एकाही कामगारानं अजून तोंड दाखविलेलं नाही. त्यांच्या नोकरीची फक्त आपल्यालाच चिंता. ते साले बेफिकीर. इथं आलो ते काय लोणी खाण्यासाठी? आणि रघू आपल्याला बोलतो. आणि आपण ते मुकाट्याने ऐकून घेतो !

    आणि रघू आपल्याला नष्ट करणार म्हणजे काय करणार? कास्टाला हसू आलं. पण तो दचकलासुद्धा. रघू फॅनॅटिक आहे. तो वाटेल ते करील. मनात येण्याचा अवकाश. बापाच्या संपत्तीवर सहज पाणी सोडणारे रघूसारखे फार कमी लोक असतात. तो काय आपल्याला ठार मारणार? कास्टाला पुन्हा हसू आलं आणि त्यानं तो विचार झटकून टाकला. पण रघूशी झालेलं बोलणं काही त्याला झटकता येईना. पुन्हा पुन्हा त्याचे ते शब्द त्याच्या डोक्यात घुमत होते, “तू भोंदू आहेस, ढोंगी आहेस... पुरोगामित्वाचा बुरखा पांघरणारा तू प्रतिगाम्यांचा हस्तक आहेस.”

    कास्टाला विचित्र अस्वस्थ वाटत होतं. रघूचा भयंकर राग येत होता. पण लगेच आपल्याला रघूचा राग येतो की स्वतःचा असाही संभ्रम त्याला पडत होता.

    - oOo -

    पुस्तक: 'मुंबई दिनांक'
    लेखक: अरुण साधू
    प्रकाशक: मॅजेस्टिक प्रकाशन
    आवृत्ती सातवी (२००७)
    पृ. १२२-१२७


    टीप: मोबाईलच्या लहान पडद्यावर वाचण्यास सुलभ व्हावेत म्हणून मजकुरात अथवा वाक्यांच्या क्रमात कोणताही बदल न करता, काहीही न वगळता, भर न घालता मूळ लेखातील एक-दोन मोठे परिच्छेद लहान परिच्छेदांत विभागले आहेत.

२ टिप्पण्या:

  1. छान आहे. शक्य असल्यास एक शब्द दुरुस्त करा <>

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. आणि आपला मार्ग "वरोबर" आहे कि नाही याही बाबतीत तुला संभ्रम आहे.

      हटवा