भर दुपारच्या प्रखर प्रकाशातून सरपटत गुहेत शिरणारी रानमांजरी बछड्याला दिसली. त्या क्षणी त्याच्या पाठीवरले सारे केस लाट उठल्याप्रमाणे पिंजारत उभे राहिले. समोर मूर्तिमंत भीती उभी आहे हे कळायला अंतःप्रेरणेची गरज नव्हती. आणि ते अपुरं वाटलंच तर दात विचकत तिचं फिस्कारणं आणि मग कर्कश आवाजात ओरडत किंचाळणं कोणाच्याही काळजाचं पाणी करायला पुरेसं होतं.
डिवचल्या गेलेल्या आत्मविश्वासाने करडा बछडा आईशेजारी उभा ठाकला, आवेशाने रानमांजरीवर भुंकला. पण त्याच्या प्रतिष्ठेची पर्वा न करता लांडगीने त्याला पाठी ढकललं. अरुंद, बुटक्या प्रवेशद्वारातून आत उडी घेणं रानमांजरीला शक्य नव्हतं. वेड्या रागाने ती सरपटत आत आली आणि लांडगीने झेप घेत तिला खाली चिरडलं. पुढे काय झालं ते बछड्याला नीट दिसलंही नाही. कर्णकर्कश भुंकण्याने, ओरडण्याने, आक्रोशाने गुहा भरून गेली. रानमांजरी तिच्या नखांनी, दातांनी बोचकारत, चावत होती तर लांडगी फक्त दातांनी प्रतिकार करत होती. एक भयंकर झटापट सुरू झाली होती.
एका क्षणी करडा छावाही झेपावला. रानमांजरीच्या मागच्या पायात त्याने दात रुतवले. हिंस्रपणे गुरुगुरतच तो तिच्या पायाला लटकला. त्याच्या वजनामुळे रानमांजरीच्या हालचालींचा वेग मंदावला. त्यामुळे आपली आई वाचली हे त्याला कळलंही नाही. बाजू बदलल्या. पण त्यामुळे तो त्या दोघींच्या वजनाखाली चिरडला. त्याची पकड सुटली. पुढल्याच क्षणी दोन्ही आया एकमेकांपासून दूर झाल्या. परत एकमेकाल भिडण्याआधी रानमांजरीच्या दणकट पंज्याचा फटका बछड्याच्या खांद्यावर बसला. हाडापर्यंत फाडत, मांसाच्या चिंध्या करत तिने बछड्याला गुहेच्या भिंतीवर भिरकावलं. त्या नंतरच्या गर्जनांत बछड्याच्या केविलवाण्या कर्कश किंकाळ्याही मिसळू लागल्या. पण ती झटापट एवढा वेळ चालली होती की रडणं आवरून परत एकदा शौर्याने झेपावण्याची संधी त्याला मिळाली. झटापट संपली तेव्हा परत एकदा रानमांजरीच्या मागल्या पायाला लटकत मिटल्या दातांतून तो हिंस्रपणे गुरगुरत होता.
रानमांजरी ठार झाली, पण लांडगी देखील खूप थकली होती. पहिल्यांदा तिने तिच्या बछड्याला कुरवाळलं, त्याचा जखमी खांदा चाटला. बरंच रक्त वाहून गेल्यामुळे अधिक काही करण्याएवढं त्राण तिच्यात उरलं नव्हतं. सारा दिवस आणि रात्र ती तिच्या वैर्याच्या प्रेताशेजारी न हलता पडून राहिली. पाणी प्यायला फक्त नदीवर जायची. तेव्हाही तिच्या हालचाली अगदी हळू व्हायच्या. वेदना तिच्या चेहर्यावर स्पष्ट दिसायची. परत बरं वाटेपर्यंत ते दोघं रानमांजरीचा फडशा पाडत होते. हळूहळू लांडगीच्या जखमा भरल्या. परत एकदा शिकारीसाठी ती बाहेर पडू लागली.
बछड्याचा खांदा अजून अवघडलेला होता. खांद्यावरल्या खोल जखमेमुळंए तो खूप दिवस लंगडत होता. पण आता जग बदललं होतं. आता त्याच्या मनातला कणखरपणा, त्याच्या चालीतील आत्मविश्वास स्पष्ट प्रकट होत होता. रानमांजरीबरोबरच्या लढतीआधी हा कणखरपणा त्याच्यात नव्हता. आता आयुष्याकडे अधिक हिंस्रपणे पाहण्याची ताकद त्याच्यात आली होती. तो लढला होता. वैर्याच्या मांसात त्याने दात रुतवले होते. आणि तो अजून जिवंत होता. आता त्याच्या प्रत्येक पावलात आव्हा होतं. त्या आव्हानाला उद्धटपणाचा पुसटसा रंगही होता. तरी अनेक रहस्यं, घाबरवणार्या अनाकलनीय घटनांची गुंतागुंत निर्माण करणार्या अज्ञाताचं त्याच्यावरलं दडपण जराही कमी झालं नव्हतं.
िकारीला निघालेल्या आईला सोबत करायला त्याने सुरुवात केली. ती सावज कसं पकडते, त्याला ठार कसं करते हे बघता बघता तो ही त्यात भाग घेऊ लागला आणि शिकारीच्या जगातला कायदा त्याला समजला. या जगात दोन प्रकारचे जीव असतात. काही त्याच्यासारखे आणि इतर 'बाकी सारे'. त्याच्यासारख्यांत तो स्वतः आणि त्याची आई होती. दुसर्या प्रकारात हलणारे, चालणारे इतर सारे प्राणी होते. या दुसर्या प्रकाराचंही त्याने वर्गीकरण केलं होतं. त्याच्यासारखे प्राणी शिकार करून ज्यांचं मांस खातात ते शाकाहारी किंव लहान लहान मांसाहारी प्राणी आणि दुसरे, त्याच्यासारख्यांची शिकार करून खाणारे किंवा त्याच्यासारख्यांकडून मारले जाणारे. आणि मग या वर्गीकरणातून कायदा निर्माण झाला. जीवनाचं उद्दिष्ट मांस होतं. जीवन म्हणजेच मांस होतं. जीवन जीवनावर जगत होतं. जगात खाणारे होते आणि खाद्य ठरणारे होते. कायदा होता 'खा किंवा खाद्य व्हा.' त्याने हा कायदा इतक्या स्पष्टपणे शब्दबद्ध केला नाही, त्याचे नियम अथवा तत्त्वे ठरवली नाहीत. त्याने त्या कायद्याचा विचारही केला नाही. त्या कायद्याचा विचारही न करता तो कायदा जगू लागला.
हा कायदा त्याचा चारही बाजूंना कार्यरत असलेला त्याला दिसत होता. त्याने रानकोंबडीची पिल्लं खाल्ली होती. ससाण्याने त्यांच्या आईलाही खाल्लं. ससाण्याने त्यालाही खाल्लं असतं. मोठं झाल्यावर त्याने ससाण्याला खायचा प्रयत्न केला होता. त्याने रानमांजरीचं पिल्लू खाल्लं होतं. स्वतः खाल्ली गेली नसती तर रानमांजरी त्याला खाणार होती. आणि हे असंच सतत चालू होतं. आजूबाजूला जगणारा प्रत्येक जीव जीवनाचा एक भाग होता. ठार मारणं हा त्याचा जीवनधर्म होता. मांस हेच त्याचं अन्न होतं. जिवंत मांस, वेगाने त्याच्या पुढे धावणारं किंवा हवेत उडणारं, कधी झाडावर चढणारं, नाहीतर जमिनीत दडणारं, काही वेळा सामोरं येऊन त्याच्याशी लढणारं, बाजी पलटून त्याच्या पाठी धावणारं.
करड्या बछड्याने माणसासारखा विचार केला असता तर 'वखवखलेली भूक' एवढाच आयुष्याचा सारांश त्याने काढला असता आणि अनेक प्रकारच्या भुकांनी व्यापलेली जागा म्हणजे जग, असं म्हटलं असतं. पाठलाग करणारी भूक आणि पळणारी भूक, शिकार करणारीम तशी सावज झालेली, खाणारी आणि खाद्य होणारी, आवेशपूर्ण आणि बेशिस्त, आंधळी आणि गोंधळलेली, वखवखून केलेल्या कत्तलीने अंदाधुंदी माजवणारी, दैवाधीन, निर्दय, अनियोजित, अविरत, कधीच न संपणारी भूक!
पण बछड्याचं डोकं माणसासारखं चालत नव्हतं. एवढा सारा गुंतागुंतीचा विचार करणं त्याला शक्य नव्हतं. एका वेळी एकच हेतू त्याच्या मनात यायचा. एका वेळी एकाच आसक्तीमागे धावणं त्याला कळत होतं. मांसाचा कायदा सोडला तर इतरही अगणित कायदे पाळणं त्याच्यासाठी आवश्यक होतं. त्यांच जग आश्चर्यांनी भरलेलं होतं. त्याचं उसळतं चैतन्य , त्याच्या शरीराचं झेपावणं हा एक आनंदानुभव होता. मांसामागे धावण्यात चित्तथरारक अनुभव होता. हर्षनिर्भर आत्मानंद होता. त्याचा राग आणि त्याच्या झटापटी त्या आनंदाचाच भाग होता. भीती आणि अद्भुत रहस्ये त्याचं आयुष्य घडवीत होती.
त्याच्या आयुष्यात सुख आणि समाधानही होतं. पोटभर मिळवणं, आळसावून उन्हात लोळणं अशा गोष्टी त्याच्या परिश्रमांचा, धडपडीचा मोबदला होता. खरंतर त्याचे परिश्रम, धडपड मोबदल्यासाठीच होती. त्याच्या आयुष्याचं कारणंच ते होतं. आणि कारणासाठी जगणं कुणालाही आनंदच देतं. त्यामुळे आजूबाजूला वैरभावाने भरलेल्या जगाबद्दल बछड्याची काडीएवढीही तक्रार नव्हती. अतिशय जिवंतपणे, स्वाभिमानाने आणि आनंदाने तो त्याचे जीवन जगत होता.
- oOo -
कादंबरी: 'लांडगा' ('व्हाईट फँग' या इंग्रजी कादंबरीचा अनुवाद)
लेखक/अनुवादक: जॅक लंडन/अनंत सामंत
प्रकाशकः मॅजेस्टिक प्रकाशन
आवृत्ती पहिली (१९९९)
पृ. ६७-७०.
---
संबंधित लेखन:
वेचताना... : लांडगा >>
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा