शुक्रवार, २२ जुलै, २०१६

राडीनोगा

मांबा हा आफ्रिकेतला सर्वात भयानक साप मानला जातो. जगातल्या अतिविषारी सापांत त्याचा क्रम बराच वरचा आहे. पूर्ण वाढ झालेल्या 'मांबा'ची लांबी १० फुटांपेक्षा जास्त असते. अतिशय चपळ असलेला हा नाग तितकाच आक्रमकही असतो. तो अतिशय सावध असतो नि आसपास जराशी हालचाल झाली की तो झटकन आक्रमक पवित्रा घेतो. फणा उभारलेली, उघड्या तोंडातून जीभ बाहेर येते आहे, त्यातून येणारे त्याचे फुस्कारे हे दृश्य भल्याभल्यांच्या जीवाचा थरकाप उडवते. यास्थितीत तो कुठल्याही दिशेस हल्ला करू शकतो. या वेळची त्याची झेप भयावह असते. घोड्यावर बसलेल्या माणसावरही हल्ला करण्याची क्षमता या झेपेत असते. मांबाचं विष चेताहारी असतं. या विषाचे दोन थेंब शरीरात गेलं की ३० सेकंदात माणूस मरतो.

'मांबा'चा आफ्रिकन जनमानसावर इतका प्रचंड पगडा आहे, की कुणीही माणूस कुठलाही साप बघितला की त्याला 'हिरवा' किंवा 'काळा' मांबा दिसला असं सांगतो. 'हिरवा' नि 'काळा' हे रंग वेगळे असले तरी दोघांचं विष तितकंच विषारी असतं. फक्त काळा मांबा हिरव्या मांबापेक्षा अधिक भयानक दिसतो. पण त्यामुळं आफ्रिकेत वावरणारे 'सापपकडे' अशा मांबाच्या वार्तेकडे दुर्लक्ष करतात.

निसर्गपुत्र

या वेळी कुणीतरी बोशियरला मांबाची बातमी दिली. हा मांबा एका वाळवीच्या वारुळात अडकला होता. मांबा नि इतर साप हे बरेचदा अशा वारुळात विश्रांती घेतात. खाणं किंवा जोडीदार यांच्या शोधात ते बाहेर पडतात नि मग आपल्या ठराविक बिळात परततात. त्यामुळं बोशियर 'नक्की काय आहे?' हे बघायला त्या माणसाबरोबर निघाला.

त्या वारुळाला असंख्य बिळं होती. त्या बिळांमधे स्थानिक लोकांनी दगड भरले होते. आत जर एखादा मोठा साप असेल, तर तो बाहेर पडणं अशक्यच होतं. त्या वारुळाशेजारीच एक स्थानिक आफ्रिकन माणूस उभा होता.रानांवनांत खूप पावसाळे काढलेल्या त्या वृद्धानं त्या सापाचं वर्णन बोशियरला ऐकवलं. या सर्पराजाला आपण नेहमी बघतो, असंही त्यानं सांगितलं. तो मांबाच होता याबद्दल निदान त्या आफ्रिकन माणसाच्या मनात शंका नव्हती. हा मांबा अतिशय चिडका नि आक्रमक होता; नि असा मांबा त्या आफ्रिकनानं उभ्या आयुष्यात बघितलेला नव्हता. हे बोलणं चालू असताना इतर आणखी माणसं जमू लागली.

जवळच्याच तंबाखूच्या मळ्यांत काम करणारे सुमारे शंभराहून अधिक आफ्रिकन शेतमजूर, त्यांच्या पाठोपाठ गोर्‍या मळेवाल्यांचे ट्रक नि गाड्या येऊ लागल्या. या मंडळींनी त्या वारुळापासून दूर सुरक्षित अंतरावर मोक्याच्या जागा पकडून काय घडतंय ते पहायला सुरवात केली. ज्याच्या शेतात हे वारुळ होतं त्या मळेवाल्यानं आपल्या सर्व शेजार्‍यांना निरोप पाठवून हा तमाशा बघायचं आमंत्रण दिलं होतं.

"जगातला सर्वात विषारी साप पकडलेला बघण्यासाठी एवढे प्रेक्षक कुठेच हजर नसतील याची मला खात्री वाटते." असं नंतर बोशियर म्हणाला. बोशियरच्या आणि त्या वारुळाच्याही जवळ एक शस्त्रास्त्रांनी भरलेली मोटर उभी होती. या मोटरीत शॉटगन, पिस्तुलं आदी हत्यारांची रेलचेल होती. जर बोशियरनं साप पकडला तर काही प्रश्नच नव्हता. पण जर चुकून साप बोशियरला चावलाच तर "आम्ही तुला गोळ्या घालून तुझी वेदनांतून सुटका करू नि सूड म्हणून त्या सापालाही गोळ्या घालू." असं आश्वासन त्या मंडळींनी बोशियरला दिलं होतं. त्यांची समजूत घालून त्यांना दूर पिटाळण्यात बोशियरचा बराच वेळ खर्च झाला.

मग बोशियर जमलेल्या प्रेक्षकांकडे वळला. त्याला एका स्वयंसेवकाची मदत हवी होती. बोशियर वारुळ खणत असताना या स्वयंसेवकानं काठी घेऊन त्याच्या शेजारी उभं रहायचं होतं. या मागणीबरोबर तो जमाव शांत झाला. मग त्या सापाला वारुळात अडकवणारा म्हातारा हळूहळू पुढे आला. 'आपण कुठल्याही परिस्थितीत पळून जाणार नाही' असं त्यानं मान्य केलं. तो काठी घेऊन उभा राहिल्यावर बोशियरनं कुदळीनं ते वारुळ फोडायला सुरुवात केली. वाळवीच्या वारुळाचे दोन भाग असतात. त्यातलं बाहेरचं, माती लिंपून घट्टं केलेलं आवरण बोशियरनं फोडलं नि त्याचा पुढचा घाव आतल्या चिकण मातीच्या ओलसर ढेकळात घुसला. ते ढेकूळ बोशियरनं पाडताच वारुळाचा आतला भाग स्पष्ट दिसू लागला. धुरळा बसल्यावर त्या आतल्या भागात वेटोळं घालून बसलेलं ते प्रचंड मोठं धूड, त्याचं बाणासारखं डोकं, काळीभोर चंदेरी किनार असलेली बुबुळं यावरून हा साप मांबाच होता हे स्पष्ट होत होतं. बोशियरनं त्याच्या जंगली आयुष्यात बघितलेल्या मोठ्या सापांत हा मांबा 'सर्वात मोठ्या सापांपैकी एक' होता.

हे पाहताच बोशियरनं कुदळ खाली ठेवली आणि त्या मळ्याच्या मालकाला ढोसून तो साप बघायला जवळ आणलं. साप आपली दुहेरी जीभ बाहेर काढत हे सर्व पहात होता. "तो अतिशय दुष्ट साप होता. माझ्या मनात सापाबद्दल अशी भावना कधीच येत नाही; पण हा साप पाहताच तो घातकी नि दुष्ट आहे याची जाणीव अंगावर शिरशिरी उभी करून जात होती."

त्या शेतकर्‍यानं तो साप बघितला आणि त्याला कापरं भरलं. "हा साप पकडणं अशक्य आहे. मी त्याला गोळी घालतो!" तो बोशियरच्या कानात कुजबुजला. बोशियरलाही तसंच वाटत होतं. पण तरीही त्याला ते पटंत नव्हतं. त्यानं त्या मळेवाल्याला परत ट्रकजवळ सोडलं; आणि तो पुन्हा त्या वारुळाजवळ आला. मांबा बोशियरच्या हालचाली एकटक बघत होता. त्या सापाच्या नजरेत एक अनामिक भयकारी शक्ती होती. अशी विखारी नजर त्यापूर्वी बोशियरनं कधीच बघितली नव्हती. बोशियरचा आत्मविश्वास डळमळीत झाला.

मग बोशियरनं धीर एकवटून हातातली काठी सापाच्या दिशेनं पुढं सरकवली. साप झटक्यात मागे सरकला. त्याने जबडा वासला नि फुत्कार टाकला. त्या जबड्याच्या निळ्या आवरणावरचे ठिपके बोशियरला स्पष्ट दिसत होते.

"यावेळी माझ्या शेजारी उभ्या असलेल्या त्या वृद्धाकडं बघितलं. तो सुद्धा मोहपाशात अडकावा तसा त्या सापाच्या दृष्टीने स्थिरावला होता. ती सापाची नजर होतीच तशी जबरदस्त. पण समोरच्या सापाचं काहीतरी करणं भाग होतं. त्यामुळे काठीनं त्या सापाचं डोकं दाबून ठेवायाच प्रयत्न करायचं बोशियरनं ठरवलं. दोन तीनदा त्या काठीशी झटापट केल्यावर तो मांबा वारुळाच्या आतल्या भागात निघून गेला. मांबा आत जात असताना बोशियरनं त्याचं शेपूट धरायचा प्रयत्न केला, पण तो कात टाकण्याचा काळ होता; त्यामुळं बोशियरच्या हातात मांबाची मूठभर कात सुटून आली, नि साप आतल्या भागात निघून गेला.

बोशियरनं कुदळ हातात घेतली. आपल्या हातातली काठी त्या म्हातारबुवांच्या हाती दिली नि पुन्हा एकदा तो वारुळ खणण्याचा उद्योग सुरू केला. बराच वेळ अशी उकरा उकर केल्यावर बोशियर त्या वारुळाच्या गाभ्यापर्यंत पोचला. त्याचे वेळी मांबानं डोकं वर काढलं नि त्या धुरळ्यातच तो बोशियरच्या दिशेने झेपावू लागला. बोशियरनं घाई घाईनं त्या वृद्धाच्या हातातली काठी खेचून घेतली. बोशियरच्या आयुष्यातलं सर्पाशी सर्वात घातक युद्ध आता सुरू झालं होतंं. बोशियरच्या डोक्याच्या उंचीची फणा काढून तो मांबा बोशियरच्या दिशेनं झेपावत होता. प्रचंड संतापानं तो फुत्कार सोडत होता. प्रचंड जबडा वासून आपले दात दाखवत तो मांबा बोशियरवर झडप मारायचा. ती झडप चुकवायला बोशियर मग झटकन बाजूला उडी मारायचा. बोशियरला आता तो मांबाच फक्त दिसत होता. आजूबाजूला जमलेले लोक हे सर्व बघताहेत हे बोशियर पूर्णपणे विसरला.

असं होता होता बोशियरला हवी ती संधी मिळाली. त्या मांबानं मारलेली झडप उडी मारून बोशियरनं चुकवली नि त्यावेळेला मांबा तसाच जमिनीवर विसावला. तात्काळ बोशियरनं हातातली काठी त्या मांबाच्या मानेवर दाबली. डोकं उचलायचा मांबाचा प्रयत्न त्यामुळं अयशस्वी ठरला. बोशियरनं मांबाचं मुंडकं आता जमिनीवर दाबून धरलं नि काय घडतंय हे कळायच्या आता त्याची मान पकडली.

मांबा आता भयंकर खवळला. त्यानं शेपटीचे तडाखे बोशियरला हाणले. शेपटीनं बोशियरला विळखे घातले. तो इतकी जोरदार धडपड करत होता, की बहुधा हा मांबा आपल्या हातून सुटणार असं बोशियरला वाटू लागलं. त्यानं खरं म्हणजे दोन्ही हातांनी मांबाची मान पकडली होती, आपली सगळी ताकद एकवटून गच्च पकडली होती. कारण मांबा सुटलाच तर बोशियरचा अवतार त्या क्षणी संपणार होता याची बोशियरला कल्पना होती.

"आता आपला शेवट जवळ आला," असे विचार बोशियरच्या मनात येऊ लागले त्याच सुमारास त्या मांबाचं अंगं लुळं पडलं. तो दमला. त्यानं पराभव मान्य केला याचंच ते चिन्ह होतं. बोशियरनं त्या मांबाला एका कॅन्वासच्या थैलीत बंद केलं.

हळूहळू एक एक करुन ते प्रेक्षक बोशियरजवळ येऊ लागले. आता बोशियरची वाहवा होत होती. एक आफ्रिकन म्हातारी 'त्या सापाचा आत्मा अतिशय दुष्ट होता नि तो साप सामान्य नव्हता' असं सांगत असतानाच जवळच्या झाडीतून एक मनुष्य तिथं आला, नि 'एवढी गर्दी का जमलीय?' म्हणून विचारणा करू लागला.

आता काठी सांभाळणार्‍या वृद्धानं सभेची सूत्र हाती घेतली. त्या दिवशी सकाळी वारूळावर दगड ठेवून ते त्यानं स्वतः कसं बंद केलं इथपासून कथनाला सुरुवात झाली. हळूहळू हे कथन 'साभिनय' बनलं. कधी तो म्हातारा बोशियर बनायचा तर कधी मांबा. त्याच्या भोवती जमलेल्या लोकांचं वर्तुळ बनलं. मात्र या कथेत बोशियरनं साप हवेत असतानाच त्याची मानगूट पकडली होती. त्या बरोबर जमलेल्या सर्वांनी एकच प्रचंड जयजयकार केला नि ते सर्व एक सुरात 'रा ऽऽ डी ऽऽ नो ऽऽ गा ! रा ऽऽ डी ऽऽ नो ऽऽ गा !' असं ओरडू लागले. राडीनोगा याचा अर्थ 'सापांचा बाप'. त्या दिवसापासून बोशियर 'राडीनोगा' या नव्या नावानं ओळखला जाऊ लागला.

संपूर्ण आफ्रिकेच्या जंगलात 'राडीनोगा'ची कीर्ती पसरली. त्याच्याभोवती जिवंतपणीच दंतकथांचं वलय निर्माण झालं. एकदा तर 'राडीनोगा रागावलाय' या बातमीनं एका गावचा संपूर्ण बाजारच त्या दिवशी बंद करण्यात आला होता.

- oOo -

पुस्तकः निसर्गपुत्र (मूळ पुस्तकः 'द लायटनिंग बर्ड')
लेखक/अनुवादकः लायल् वॉटसन/निरंजन घाटे.
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस.
आवृत्ती दुसरी.
वर्ष: २००२.
पृ. ३१-३३


संबंधित लेखन

४ टिप्पण्या:

  1. झाडीतून बाहेर आलेला मनुष्य कोण होता ?

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. कुणी विशेष नाही. केवळ पासिंग रिमार्क आहे तो. ती व्यक्ती कोण हे फारसे महत्त्वाचेही नाही, त्याचा रोल फक्त वातावरण निर्मिती पुरता आहे. मुद्दा आहे तो माणसाला देवत्व मिळणे.

      हटवा
  2. जी ए कुलकर्णी यांची आठवण आली.

    उत्तर द्याहटवा
  3. धन्यवाद, खूप शोधल नेटवर, हे पुस्तक मी लहानपणी वाचल होत

    उत्तर द्याहटवा