(प्रस्तावनेतून...)
आपल्या सामाजिक, राजकीय किंवा सांस्कृतिक नेतृत्वाचा विचार करू जाता एक गोष्ट ठळकपणे जाणवते. या सगळ्या क्षेत्रात नेतृत्व फार लहान माणसांकडे आहे. त्यात पर्वतप्राय महत्तेचा माणूस कुणी दिसत नाही. आहेत त्या लहानलहान टेकड्या. त्यात पुन्हा घोटाळा असा आहे की, ह्या टेकड्यांनाही आपण हिमालय असल्याची स्वप्ने पडताना दिसतात. जुन्या काळातील डिस्ट्रिक्ट लोकल बोर्ड पद्धतीचे राजकारण मोठ्या प्रमाणावर खेळणार्या धुरंधरांना आपण स्वतः लोकमान्य आहोत असे वाटत असावे! पाचपन्नास गीते लिहिणार्यांना स्वतःला महाकवी म्हणून घेणे आवडते. चारसहा शब्द जुळवणार्यांना ज्ञानदेवांसारखे आपले कवित्व आहे असे वाटते. दोन संवाद लिहिणार्यांना आपण शेक्सपीयर किंवा बेकेट (रुचिप्रमाणे) आहोत असा सुखद भास होत असावा. एखाददुसर्या जिल्ह्यात थोडी संघटना बांधणार्यांना ह्या साठ कोटींच्या देशात आपण क्रांती घडवून आणित आहोत अशी स्वप्ने पडू लागतात. चार गावात चळवळ चालवणारांना या देशाचा जगन्नाथाचा रथ आपल्यामुळे पुढे चालला आहे असा भ्रम आहे. पंधराशे ओळींचा राजकीय लेख लिहिणारांना आपण प्रबोधनाचे उद्गाते आहोत - शक्य तर अखिल भारतीय - असा भास होतो आहे. सारांश, मोठेपणाच्या टेकड्या जागोजागी उभ्या राहिलेल्या आहेत…
...त्याचा परिणाम म्हणजे विचाराचे दारिद्र्य. घोषणा नि धोपटशब्द (क्लिशे) ह्यात मराठी इतकी अडकून कधी पडली नव्हती. शब्द जड गोळे झाले आहेत. निव्वळ अर्थशून्य पाषाण. ते फक्त मोठ्यांच्या तोंडातून परिचित लयीत, परिचित लकबीत बाहेर पडत आहेत. असे वाटते की टाळ्यासुद्धा सवयीनेच परिचित लयीत, परिचित लकबीत वाजवल्या जात आहेत. आपमतलबी तत्त्वज्ञ हौतात्म्याचे पवाडे गात आहेत. स्वतःची तितकीच फसवणूक करून घेणारा एखादा कवि 'छान झाले दांभिकांची पंढरी उद्ध्वस्त झाली. यापुढे वाचाळ दिंडी एकही निघणार नाही' असे म्हणत न लाभलेल्या आनंदाचे उत्सव मांडित आहे.
अर्थात मोठेपण नाहीच असा याचा अर्थ नव्हे. परंतु ते बरेचसे (काही अपवाद वगळता) पराभूत मोठेपण आहे. कुठे चमक दिसलीच, कुठे खिळवून टाकणारा विचार दिसला, कुठे दूरवर कोपर्यात मुळे रुजलेली चळवळ दिसलीच तर ती बहुधा या पराभूतांमुळे आहे. ही मंडळी नवीन भविष्य निर्मू शकत नाहीत. परंतु आज ना उद्या नवीन भविष्य येईल एवढा आशावाद ही मंडळी जागा ठेवून आहेत. आजच्या यशस्वी लेखकांपेक्षा, राजकारणधुरंधरांपेक्षा, सामजिक प्रबोधनाच्या मिरासदारांपेक्षा बरेच मोठे ह्या मंडळींनी अनुभवलेले आहे. पराभूत असूनही, दुर्लक्षित असूनही.
या पराभूतांच्या जयजयकार करण्याचा माझा मनसुबा नाही. शेवटी पराभव हा पराभवच असतो. त्या पराभवाला अगदी तर्कसंगत स्पष्ट कारणे असतात. पराभवांपाठीमागे व्यक्तींची व त्या व्यक्ती ज्या सामाजिक शक्तींचे प्रातिनिधित्व करतात त्या शक्तींची कमजोरी असतेच. ती कमजोरी नाकारून जयजयकार करणे ही पुन्हा फसवणूकच. कारण अगदी साधे आहे. कमजोरांचे जयजयकार होत नसतात, होऊ नयेत. त्याने फक्त हळवेपणा येतो, दुसरे काही नाही! फक्त या प्रासादशिखरस्थ कावळ्यांच्या गर्दीत काही गरूड होते-आहेत ह्याचे भान ठेवावे…
...हॅना आरंट यांनी 'मेन इन डार्क टाईम्स' या पुस्तकात अशी कल्पना मांडली आहे की 'सामाजिक किंवा सांस्कृतिक जीवनात (असे वैचारिक ) झाकोळ मधून मधून येत असतात. या झाकोळाचे एक वैशिष्ट्य असे की नेत्र दिपवून टाकणारे मोठेपण कुठेच दिसत नाही. किंबहुना मोठ्यांचे क्षुद्रत्व फार चीड आणणारे असते. पण त्याचवेळी ह्या मोठेपणाच्या भाऊगर्दीत सरळसरळ सामना हरलेली काही पराभूत माणसे ठळकपणे दिसू लागतात. त्यांचे दुर्दैव असे असते की जरा थांबून पहात रहावे असे त्यांचे मोठेपण असते खरे, परंतु यशाच्या कल्पना बदलून टाकण्याची ताकद त्यांच्यात नसते. अवतीभवतीच्या कावळ्यांच्या गर्दीत हे उदास गरुड जबरा मोह घालतात ह्या शंका नाही…
ह्या झाकोळातली ही माणसे सारखी कुठल्या ना कुठल्या तरी कक्षेच्या शोधात असतात. बरेच वेळा अखेरपर्यंत त्यांना कक्षाच सापडत नाही. मौज अशी की त्यांना कक्षा सापडत नाही हे खरे पाहता त्यांच्या समाजाचेच अपयश असते. 'मिडिऑक्रिटिज्'चा ही एक जमाना असतो. त्या जमान्यात तीव्र संवेदनशीलता आणि द्रष्टेपणा यांचा बहुधा पराभव होत असतो. हे मी त्या पराभूतांचा पाठपुरावा करण्यासाठी म्हणत नाही. ते होणे कदाचित अटळच असते. फक्त ह्या गरुडांच्या प्रकाशात बाकीच्या मिडिऑक्रिटिज् स्वच्छ नि स्पष्ट दिसायला लागतात हे महत्त्वाचे. 'खाली झेपावणे' हा दृष्टान्त ही मंडळी त्यांच्या आयुष्यात काही थोर परिवर्तन घडवून आणू शकली नाहीत हे समजावून देण्यापुरता उपयुक्त आहे. तथापि ज्या टकड्या हिमालयाचा दिमाख मिरवित असतात त्या टेकड्यांच्या तुलनेने हे 'खाली झेपावणे' तरीही आकाशगंगेच्या काठावरच असते. नंतर आलेल्या यशस्वी द्रष्ट्यांनी ह्या मधल्या पराभूतांची योग्य ती कदर करायची असते.
- oOo -
नाटक: 'उद्ध्वस्त धर्मशाळा'
लेखकः गो. पु. देशपांडे
प्रकाशकः पॉप्युलर प्रकाशन
आवृत्ती पहिली, पुनर्मुद्रण(१९९८)
पृ. ८-१०.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा