सरदारजीनं चार आण्याचं नाणं दिलं. झिपर्याकडे पाच पैसे यावेळी असणं शक्य नव्हते आणि असते तरी त्यानं भवानीच्या वेळी ते काढले नसते. 'साब, पाच पैसा... छुटा नाय...', त्यानं आवाज केला. सरदारजीनं पुन्हा नुसती मान हालवून 'राहू दे' असं सुचवलं. आज झिपर्याचं तकदीर खरोखरंच जोरदार दिसत होतं. पहिल्याच माणसाने भवानी द्यावी आणि भवानीच्या गिर्हाईकानं पाच पैसे जादा सोडावे यापेक्षा अधिक मोठा असा शुभशकुन कोणता? झिपर्यानं ते नाणं ठोकळ्यावर ठोकलं, कपाळाला लावलं आणि खिशात ठेवलं.
नंतर तर केवळ चमत्कारच घडला. सरदारजीचं संपण्याची जणू वाटच पाहत असल्याप्रमाणे शेजारच्या माणसानं आपण होऊन आपला बूट पुढे केला. आज झिपर्याचा धंदा बरकतीला येणार अशी स्पष्ट लक्षणं दिसंत होती. बाहेर पाऊस असो वा तुफान, असा चमत्कार कधी घडला नव्हता. झिपर्यानं त्या दुसर्याच्याही बुटाला मऊसूत घोळवून मोठ्या काळजीपूर्वक चमकावून काढलं आणि वीस पैसे खिशात टाकले. कुर्ल्याला गाडी पोचत असतानाच फलाटावरच्या गर्दीनं अंग चेचून निघण्याच्या आधीच झिपर्या सफाईनं खाली उतरला आणि धोपटी सावरीत कल्याण बाजूच्या पुलावर चढला. त्याची शोधक नजर इकडे तिकडे फिरत होती... पण त्याला फार काळ शोधावे लागले नाही.
कारण त्या ढगाखाली दडपून गेलेल्या दबल्या सकाळी तेवढ्या गर्दीतही पुलावरून ऐकू येणारे बासरीचे अस्वस्थ सूर कोठून येत होते बरे? त्या खिन्न वातावरणाला सुसंगत असे? एरवी झिपर्याला लहानग्या गंजूचं बासरी वाजवणं आवडायचं. आज मात्र हे सूर भलतेच जिव्हारी लागत होते आणि नकोसे वाटत होते. गंजूच्या धोपटीमधे कायम ही लाकडी बासरी असायची. काम नसेल, करमत नसेल, सोबतीला कुणी नसेल किंवा लत लागेल तेव्हा तो कुठल्याही स्टेशनाच्या खांबाला टेकून किंवा पुलाच्या कठड्याला रेलून त्या बासरीतून सूर काढीत रहायचा. गंजू दिसायला अगदीच लहानखोर, बोटं मात्र लांबसडक. त्याला बासरी वाजवणं कुणी शिकवलं नव्हतं. तोच आपण होऊन सिनेमातल्या धून ऐकून ऐकून शिकलेला. पण गंजू काही फक्त सिनेमाची गाणी वाजवायचा असं नव्हे. लहर लागेल तेव्हा तो वाटेल तशी बोटं फिरवायचा. त्यावेळचे सूर मात्र चटका लावणारे असायचे.
सुरांचा माग काढत झिपर्यानं गंजूला गाठलं आणि त्याच्या पाठीवर थाप टाकीत तो म्हणाला, 'ओय फोतर, कायको ये पिरपिर लगाई? जैसा कोई रो रहा हय-'
गंजू ओशाळं हसला आणि त्यानं झटकन आपली बासरी धोपटीत ठेवून दिली. तोवर खुळं हसत नार्याही हजर झाला होता आणि दाम्या पूर्वेच्या बाजूनं पूल चढून वर येत होता. जवळ येताच तो ओशाळं हसला आणि सुतकी आवाजात म्हणाला, 'उस्ताद, आज आपली खैर नाय-'
'अबे नय...' झिपर्या उसन्या उत्साहानं म्हणाला. एकुण वातावरण बघून त्याचेही हातपाय थंड झाले होते. 'अबे आपलं तं तकदीर उच्चीचं हाये आज. मूर्ताचे दोन गिरायकं. पाठोपाठ. विचारावंच लागलं नाय. आज आपुन धंदा करनार-'
'ओ उस्ताद, कायकू बात मारते-' त्याच्या उसन्याही उत्साहावर पाणी ओतत गंजू बोलला. 'कयसा धंदा बननार आज?'
एव्हाना भरून आलेलं आभाळ खाली ओथंबून आलं होतं. लोंबकळणारे काळे-कभिन्न जड ढग जमिनीवर टेकता की काय असं वाटत होतं. चारी बाजूंनी सन्नाटा दाटून आला होता. उजेड कमी झाला होता.
एकाएकी ढगांचा कडकडाट झाला. विजा चमकल्या. वारे वेगात वाहू लागले आणि मुसळधार पावसाची सर लागली. पाऊस आला ते बरं झालं असं वाटलं एवढा विलक्षण कडक तणाव हवेत आला होता. आता तो तणाव एकावर एक कोसळणार्या सरींमधे विरघळून जात होता. छपरावर, जमिनीवर, गाड्यांच्या टपावर वेगानं आदळणार्या पावसाच्या टपोर्या थेंबांचा एकच नाद रोंरावत होता, एकमेकांचं बोलणंही ऐकू येत नव्हतं. काही वेळानं वाराही वेडावाकडा वाहू लागला. पुलावर सुरक्षित जागी उभे असणार्यांनाही पावसाच्या तुषारांचे चारी बाजूंनी चाबकासारखे फटकारे बसू लागले. आता अंग वाचवण्यात काही अर्थ नव्हता. त्याच पुलावरून ते चौघेही कोसळत्या आभाळाकडे बघत नखाशिखांत भिजत उभे राहिले. गंजूचे उदास डोळे आणखी खोल गेल्यासारखे वाटू लागले आणि त्याच्या नकळत त्याचा हात आपल्या बासरीकडे गेला. पावसाकडे बघत तो उगाच सूर घोळवू लागला. त्या दणक्यात कोणाला ऐकूही येत नव्हतं.
तेवढ्यात डोक्याच्या केसापासून ते पायांच्या नखापर्यंत पाणी निथळत आहे अशा अवस्थेत पोंब्या आणि असलम आले. तशा अवस्थेतही असलम विडी फुंकत खू: खू: करत होता. पोंब्यानं मात्र आल्या आल्या हर्षभरानं आरोळी ठोकली, 'अहा ऽ ऽ ऽ हा हा ऽ ऽ'... हा .... हा ... आ ऽ ऽ ऽ ऽ हा... हा. हा ... क्या पानी हय, क्या बरसाद हय... अहाहाहा... क्या बादल हय, क्या बिजली हय...'
'और बोल, क्या बंबई हय-' असलमनं त्याची नक्कल करीत आरोळी ठोकली. 'क्या जमाना हय... क्या कमाना हय... वा: वा:'
तेवढ्यात पुन्हा एक वीज कडाडून गेली.
'देखो... देखो... क्या बिजली हय...' दाम्या ओरडला.
'अहाहा ऽ हा... मार डाला', असं ओरडून एक हात कमरेवर ठेवीत आणि एक हात नागासारखा डोलवत पोंब्या आनंदानं नाचू लागला. त्याचं सर्वांग निथळत होतं आणि तो हर्षयुक्त चीत्कार काढीत नाचत होता; ताल धरीत होता - 'हुई-हुई हय-हे... हुई-हुई-हय-हे-- हुई हुई-हा-हा...'
गंजूनं बासरी काढली नि तो तालावर सूर धरू लागला. पाऊस संपण्याची वाट बघत पुलावर उभी असलेली गर्दी हे बघून करमणूक करून घेत होती.
झिपर्याही मग त्यात सामील झाला. असलमला तर सिनेमातली हजार गाणी पाठ होती. तो हातवारे करीत गाऊ लागला:
ठैर जरा ओ जानेवाले
बाबू मिस्टर गोरे काले
कबसे बैठे आस लगाये
हम मतवाले पालिशवाले
पोंब्या तसा ठोंब्या होता. पण रंगात येऊन नाचू लागला की धमाल करतो. सिनेमातले नाचणारे त्याच्यापुढे झक मारतील. ब्रेक डान्स, भांगडा, कथ्थक, रॉक, तांडव... काय वाट्टेल तो नाचाचा प्रकार तो मोठ्या लीलेनं करीत असे. आता तर पावसाची नशा चढल्यासारखा हाय हुई करीत तो धमाल वार्यासारखा नाचत होता.
ते बघून दाम्याच्याही अंगात स्फुरण आलं. तो ओरडला 'अबे, गांडू... यहाँ क्या कर रह्या... चल नीचे खुले पानी में-' ते सर्व दडदडा जिने उतरून खाली आले. जिन्याखालच्या पानवाल्याच्या कनातीखाली त्यांनी आपल्या धोपट्या टाकल्या आणि आभाळ फाटल्यागत कोसळणार्या त्या पावसात उघड्यावर ते नाचू लागले. 'हुई...हुई... हुई... हा-' असा ताल धरत नार्या, झिपर्या, असलम, पोंब्या आणि दाम्या. गंजू वळचणीला उभा राहून बासरीचे सूर काढत होता. पोंब्या आणि असलम तर व्यावसायिक नर्तक असल्यासारखे मुक्त नाचत होते. पण सर्वात गंमत येत होती नार्याची. त्याला काही धड नाचता येत नव्हतं. तो आपले फदाफदा पाय हलवीत होता आणि खुळेपणानं वर हात हेलकावीत पाऊस अंगावर घेत आनंदानं हसत होता. लोकही त्याला हसत होते. मधून मधून तोंडात बोटं खुपसून तालासाठी शीळ घालत होते. वरून पाऊस बरसत होता आणि यांचं हे असं उघड्यावरचं हुंदडणं चालू होतं. काचा गच्चं बंद करून बसलेले ड्रायव्हर्स, रिक्षावाले, आजूबाजूचे दुकानदार आणि छत्र्या न आणल्यानं दुकानांच्या आणि पुलाच्या आडोशाला अडकलेले लोक हसत कौतुकानं या मुक्त पर्जन्यनृत्याकडे बघत होते. दुरून ओरडून दाद देत होते. काही शिट्याही वाजवत होते.
पाच-सहा मिनिटं असा तुफान गोंधळ घातल्यानंतर सारी मुलं थकून पुलाखालच्या आडोशाला आली. पावसाचे वेडेवाकडे सपकारे आता संपले होते. एका स्थिर गतीनं तो आता रिपरिपत कोसळत होता. सरीचा जोर कमी होईल या आशेपोटी दुकानांच्या वळचणींना उभे असलेले लोक कंटाळून आता बाहेर पडू लागले होते. डोक्यावर रुमाल किंवा वर्तमानपत्रांच्या घड्या, ब्रीफकेसेस धरीत धावत-भिजत स्टेशन गाठू लागले होते. रस्त्यांवर छत्र्यांचे ताटवे फुलले होते. फूटपाथच्या कडांना वेगानं पाणी वाढू लागलं होतं. काही ठिकाणी तर रस्त्यावर घोट्यापर्यंत पाणी आलं होतं. गच्च भरलेल्या बसेस फरारा आवाज करीत लाल पाणी आणि पावसाचे पडदे कापीत होत्या.
मुलं आता गप्प झाली होती. गंजूनं आपली बासरी धोपटीत ठेवून दिली.
अनिर्बंध कोसळणारा पाऊस बघून आलेल्या त्याच्या उधाणाला वाट मिळून गेली होती. आता जेव्हा पाऊस एका सुरात गंभीरपणे बरसू लागला तेव्हा सारी मुलं वळचणीला उभी राहून नुसतीच मिटीमिटी डोळ्यांनी पावसाच्या रेषांकडे बघत उभी राहिली. असलमनं त्याची विडी खिशातून काढली तेव्हा ती पूर्ण भिजून गेली होती. आता अशा या पावसात आपल्या बुटांना पॉलिश करून घेण्याचा वेडेपणा कोण करणार? वळचणीला ठेवलेले सदरे आणि धोपट्याही भिजल्या होत्या. मुलं आपापले शट पिळून काढू लागली. असलमनं पावसात उड्या मारत शेजारचं विडी-सिगारेटचं दुकान गाठलं. ओल्यागार पावसात धुराचा गरम झुरका छातीत जाऊन खळखळून खोकला आला तेव्हा कुठे त्याला बरं वाटलं.
पुलाखालच्या टी-स्टॉलचा मुच्छड मालक डोळे तांबारून या मुलांकडे मिस्किलपणे बघत होता. त्याने यांचा नाच आणि आरडाओरडा पाहिला होता. आत अंधारात स्टोव्हचा फर्रर्र असा आवाज येत होता. त्यावर चहाचं आधण उकळंत होतं. आपल्या मिशीवरून पालथं मनगट फिरवीत मालक उग्रपणे विचारता झाला, 'क्यंव बच्चे लोग, चाय पिओंगे?'
'नय साब, आज तो अभी भवानी बी होनेकी हय... ये बरसात में...'
सगळ्यांना उकळणार्या चहाचं आधण दिसत होतं. चहाचा गरम वाफाळ गंध नाकपुड्या सुखवीत होता. अशा बरसत्या ओल्या हवेत चहाला कोण नाही म्हणेल? मुच्छड डाफरला, 'अबे, हम पूछ रहे है, चाय पिओंगे क्या? भवानीकी बात कहाँ आयी? एऽ महादेव... सा गिलास चाय दे आधी हिकडं. जल्दी-'
मोठ्या कृतज्ञतेनं मुलांनी तो फुकटचा गरम गरम चहा पोटात रिचवला. जेव्हा चहा अगदी हवाहवासा वाटत होता आणि खिशात नवा पैसाही नव्हता तेव्हा अचानक तो असा मिळाला यापेक्षा दुसरा चमत्कार कोणता? काही न बोलता मुलांनी आपण होऊन वळचणीवरून धो-धो कोसळणार्या स्वच्छ पाण्यानं चहाचे पेले धुवून ठेवले.
चहावाल्याची दुनियादारी बघून असलमला तर भरून आलं. त्याच्या डोक्यावरून अजून पाणी निथळंत होतं. सदरा पूर्ण ओलाच होता आणि गारव्यानं तो थरथरत होता. त्यानं फटाफट चार शिंका दिल्या. एक कोरडी विडी पेटवून पुन्हा एकदा खळखळून खोकला काढला. घशात आलेला मोठा बेडका पावसात थुंकून टाकला आणि तो फिलॉसॉफी मारू लागला.
'देख पोंब्या, मयने कहा था नं? अरे दुनिया काय ऐसी-तैसी चीज नय. अबे, अल्लानं तुमाला पोट दिलं तर पोट भरायची सोय तोच करेल. मानूस उपाशी मरत नाय बघा. कुठून तरी पोटाची सोय होतेच. कोन ना कोन, कुटं तरी मदत करतोच, काय? अल्लाने चोच दिली तो वो दानाबी देताच हय. अब आज देखो, अपना धंदा कहाँ हुवा? आपुन तरी काय करनार. पन या पावसात च्या पाजनारा अल्लानं पाठवलाच की नाय? कुठून तरी येतंच अन्न पोटाला. त्यालाच फिकीर असते. आपुन काय मरनार नय. वो उपरसे सब देखता हय. गरीबोंके तरफ जादा देखता हय. क्यों उस्ताद? देखो, एक पिक्चर याद आया. अम्मीके साथ देखा था. क्या ना उस पिक्चरका? भूल गया. यही कुर्लामें देखा था. पुराना अंग्रेजी पिक्चर था. मगर उसमे डायलाग नहीं था. इतनी हसी आ रही थी, इतनी हसी आ रही थी की बस. अम्मी तो फूटफूटकर हसते हसते रोती थी. तो उस पिक्चर का हीरो था एक गरीब आदमी. उसका एक छोटा लडका. वो दोनो मिलके खाने का मिलाने के लिए अयसी धूम मचाते हय की पूछो मत... तो कहनेका मतलब...'
असलमच्या कथेत आणि तत्त्वज्ञानात कोणाला फारसा रस होता असं नाही. सगळे गप्प राहून ऐकत होते. पण त्यांची नजर होती रस्त्यावरच्या पावसाकडे. वर अंधारून आलेल्या आभाळाकडे. आकाशात करड्या ढगांचा जाड गालिचाच पसरला होता. त्यात कुठे फट दिसत नव्हती. पावसाचा जोर कमी होण्याची लक्षणं नव्हती. आणि जरी आज नंतर पाऊस थांबला तरी धंदा होणं शक्यच नव्हतं.
-oOo-
पुस्तकः 'झिपर्या'
लेखकः अरुण साधू
प्रकाशकः मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
आवृत्ती तिसरी (जून २०१४)
पृ. ४२-४७.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा