गुरुवार, २८ जुलै, २०१६

माय

भगीरथ खूप लहान असतानाच त्याची माय चंडी चेटकीण* होऊन गेली होती. मग या झपाटलेल्या चंडीला लोकांनी गावाबाहेर हाकलून दिलं. कारण अशा लहान मुलांवर करणी करणार्‍या चेटकिणीला मारून टाकता येत नाही. तिला मारलं तर गावातली पोरं जगत नाहीत. मोठ्यांवर चेटूक करणार्‍या डाइनीला जाळून मारून टाकतात, पण अशा 'बॉएन' चेटकिणीला मात्र जिवंत ठेवावं लागतं.

कथा पंचदशी

म्हणूनच चंडीची रवानगी रेल्वेलाईन पलीकडच्या माळरानावर झाली होती. दूरवर एका लहानशा कुडाच्या झोपडीत ती एकटीच रहायची.

भगीरथ मोठा झाला त्याच्या दुसर्‍या मायजवळ. ही यशी नावाची बाई त्याच्याबाबत अगदीच निर्विकार होती. ती ना त्याच्यावर प्रेम करे, ना द्वेष. स्वतःची माय काय चीज असते ते भगीरथला कधी कळलंच नाही. त्यानं फक्त माळरानावरच्या एका छातिम (सप्तपर्णी वृक्ष) वृक्षाखाली एक कुडाची झोपडी तेवढी पाहिली होती आणि त्या झोपडीत चंडी चेटकीण राहते असं ऐकलं होतं.

ही चंडी कुणाची जन्मदात्री असू शकते, असं वाटणंही शक्य नव्हतं. दुरून तिच्या लहानशा झोपडीवर झेंड्यासारखी लाल कापडाची चिंधी उडताना दिसायची. कधी कधी भर चैत्राच्या रणरणत्या दुपारी ती आपल्याच नादात हातातल्या टिनाच्या डबड्यावर काठीनं ढणढण आवाज करत तळ्याकडे जाताना दिसायची. तिच्या मागोमान एक कुत्रं.

चेटकिणीनं कुठंही जाताना टिनाचा आवाज करत जायचं असतं, कारण तिची नजर कुणावरही पडली तरी ताबडतोब ती त्याच्या अंगातलं सगळं रक्त शोषून घेते म्हणे!

म्हणूनच तर तिला एकटं राहावं लागतं. तिच्या टिनाचा आवाज ऐकू आला की सगळे आबालवृद्ध रस्ता सोडून निघून जातात.

एक दिवस, फक्त एकच दिवस, भगीरथनं मलिंदरला, म्हणजे त्याच्या बापाला त्या चेटकिणीशी बोलताना पाहिलं होतं.

"भगीरथ, वर बघू नको, खाली पहा." बापानं धमकावलं होतं.

चेटकीण त्या तळ्याच्या दलदलीतून धपाधप पावलं टाकत तळ्यापलीकडच्या काठाशी येऊन उभी राहिली. भगीरथनं ओझरतं पाहिलं, तळ्यातल्या पाण्यातलं त्या बाईचं प्रतिबिंब - लाल पातळ, रापलेला चेहरा आणि डोक्यावर जटांचा जुडा - आणि तिची ती वखवखीत नजर, जणू भगीरथला डोळ्यांनीच गिळून टाकेल की काय!

नाही, भगीरथनं तिच्याकडं डोळे उचलून पाहिलंच नाही.

भगीरथनं जसं त्या तळ्यातल्या पाण्यात तिचं प्रतिबिंब पाहिलं तसंच तिनंही त्याचं प्रतिबिंब पाहिलं होतं. शहारून भगीरथनं डोळे गच्च गिळून घेतले होते, बापाचं धोतर घट्ट धरून ठेवलं होतं.

"कशाला आली इथं?" भगीरथचा बाप तिच्यावर खेकसला होता.

"डोक्याला लावायला थेंबभर तेल नाही गंगापुत्र, घरात रॉकेल नाही, फार भीती वाटते ते मला एकटीला अंधारात."

चेटकीण रडत होती, पाण्यातल्या छायेत तिच्या डोळ्यातलं पाणी टिपकत होतं.

"का बॉ? या शनवारचा शिधा नाही भेटला?"

दर शनिवारी पाळीपाळीनं डोमपाड्यातला एकएक जण टोपली घेऊन जात असे. त्या टोपलीत तांदूळ, डाळ, मीठ, तेल ठेवून ती टोपली झाडापाशी ठेवायची आणि झाडाला साक्षी ठेवून 'यावेळचा शिधा दिला गं' असं ओरडून तिथून पळ ठोकून परत यायचं अशी पद्धत होती.

"भेटला, पण कुत्र्यानं खाऊन टाकला."

"पैसे पायजे का पैसे? घे पैसे-"

"पण मला कोण काय विकत देणार?"

"मीच घेऊन देईन विकत, पण जा आता. चालती हो इथनं-"

"मी एकटी नाही राहू शकत गंगापुत्र."

"मग चेटकीण कशाला झाली? चल नीघ म्हणतो ना-"

भगीरथच्या बापानं तिला हाकलण्यासाठी मूठभर चिखलाचा गोळा उचलला.

"गंगापुत्र, हा बेटा-"

एक गलिच्छ शिवी हासडत भगीरथच्या बापानं चिखलाचा गोळा तिला फेकून मारला - मग पळून गेली ती चंडी चेटकीण.

"बापा, तू चेटकिणीशी बोलला?"

भगीरथ खूप घाबरून गेला होता. चेटकिणीशी बोलणारं माणूस मरून जातं ना. भगीरथला वाटलं, आपला बाप आता मरणार. बापाच्या मरणाच्या कल्पनेनंही त्याच्या अंगातून वीज चमकून गेली. बाप मेला तर ती सावत्र आई आपल्याला घरातून हाकलून देईल हे नक्की.

"अरे बापू, ती चेटकीण असली तरी तुझी माय आहे."

- oOo -

पुस्तकः कथा पंचदशी
लेखक/अनुवादकः महाश्वेता देवी/वीणा आलासे
प्रकाशकः पद्मगंधा प्रकाशन
प्रथमावृत्ती (जानेवारी २०१२)
पृ. ६४-६६
---

*इथे चेटकीण हा शब्द वापरला आहे, तर याच कथेवर पुढे अमोल पालेकरांनी या कथेवर 'मातीमाय' नावाचा चित्रपट काढला त्यात 'लाव' असा शब्द वापरला आहे.

याच कथासंग्रहात समाविष्ट असलेल्या 'रुदाली' या कथेवर त्याच नावाचा हिंदी चित्रपटही निर्माण करण्यात आला आहे.


संबंधित लेखन

४ टिप्पण्या: