सोमवार, २० मार्च, २०१७

समुद्रपक्षी

'भाभीजी कॉफी घेणार?'
'जरूर अनंत! लेकीन एक शर्त आहे.'
'व्वा! आमची कॉफी प्यायला आम्हालाच शर्त?'
'हां!'
'चालेल, बोला.'
'मला भाभीजी नको म्हणूस.'
'काय म्हणू मग? दीदी?'
'नाही. उज्ज्वला! उज्ज्वलाच म्हण!'
'त्यापेक्षा भाभीजीच बरं वाटतं. सोपं वाटतं.'
'मग उज्जू म्हण.'

'तो हक्क माझा नाही भाभीजी.'
'मग मला नको तुझी कॉफी. थँक्स!' ती पाठ वळवत म्हणाली.
'प्लीज भाभीजी!'
'उज्ज्वला!'
'ओ के भाभीजी... उज्ज्वला!'
'थँक्स अनंत. आता दे कॉफी.'

एम. टी. आयवा मारू

मी मेसचा फोन फिरवला. स्टुअर्ड शास्त्रो अजून तिथेच होता. त्याला कॉफी आणायला सांगून आम्ही विंगमधे आलो. वारा छातीवर घेत उभे राहिलो. माझ्या बाजूला ती उभी होती. किती जवळ. तिचा गंधही माझ्या श्वासांना जाणवत होता. मला तिचा स्पर्श आठवत होता. अगदी पहिल्या दिवशी शिडीवरून वर चढवतानाचा स्पर्श- माझ्यापासून दूर पळणारा. आयवा मारू शिंतावमधे त्या चिनी टँकरवर धडकली तेव्हा माझ्या मिठीत बिलगलेला, बावरलेला निष्पाप स्पर्श. त्या चिनी स्टोअर्समधे मी बियरच्या धुंदीत असताना मला सांभाळणारा प्रेमळ, वत्सल स्पर्श. आज आवेगाने माझ्या दंडात रुतणारा, संतापलेला असहाय स्पर्श. सार्‍या आठवणींची धुंदी नकळत मनावर चढली होती. माझ्या उघड्या डोळ्यांसमोरही समुद्राऐवजी तिची लालहिरवी नजर दिसत होती. ती चुकवत मी मागे वळलो. अन् पाठीमागे ट्रेमधे दोन मग घेऊन उभा असलेला शास्त्रो आम्हा दोघांकडे बघत मिश्किल हसत म्हणाला, 'कॉफी सर!' कॉफी देऊन शास्त्रो गेला. कॉफीचा गरम मग् हाताच्या ओंजळीत घेऊन आम्ही दोघे उभे होतो. गोठल्या बोटांतून ऊब हलकेच शरीरात पसरत होती. हवीशी वाटत होती.

'ह्या थंड हवेत किती बरं वाटतं हा मग् असा हातात धरायला!' काहीतरी बोलायचं म्हणून मी म्हणालो.

'माझ्याही मनात अगदी तेच आलं होतं. सागरतळाशी ह्यापेक्षाही खूप थंडी असेल नाही, अनंत?'

तिच्या प्रश्नाचा रोख न उमजून मी तिच्याकडे बघत राहिलो.

'सहज विचार आला मनात, सागराच्या तळाशी लोखंडी साखळ्यांच्या वजनानं जखडलेल्या सेनगुप्ताचा(१). त्याच्या शरीराचा कुठला लचका तोडत असतील ते मासे आता?- तिच्या थंड आवाजानं माझ्या अंगावर काटा आला. मी तिच्या चेहर्‍यावर राग शोधला. पण ती शांत होती. तिच्या हिरव्या डोळ्यांत नेहमी पसरलेली लालसर आग सुद्धा आज थंड होती.

'विसरत का नाही सेनगुप्ताला तुम्ही?'

'तुम्ही नाही तू. शक्य आहे विसरणं? तू विसरलास लगेच त्याला?'

'नाही! नाही विसरलो. पण जगात तेवढंच घडलं आहे असं समजून त्याच आठवणीभोवती घुटमळतही राहिलो नाही. जे अटळ असतं त्यापुढे आपले मानवी प्रयत्न अपुरे पडतात. अशा वेळी अशा गोष्टींना बगल देऊन पुढे जावं. ज्या वादळाला तोंड देता येईल अशाच वादळाशी झगडावं. नाहीतर पाठ फिरवून वादळ थकेपर्यंत झोडपून घ्यावं, दर्यावर्दी माणसाचं जीवन हे असंच असतं!'

'तू...' तुझ्या जीवनाचा शेवटही असाच व्हावा असं वाटतं तुला?'

'तो विचारच येत नाही माझ्या मनात. येऊच देत नाही मी'

'का? घाबरतोस?'

'नाही भाभी! ह्या कोस्टवरच्या वान्डा, अ‍ॅनासारखी जीवघेणी वादळं सतत उफाळत असतात सागरावर. ती भेटेपर्यंत मिजास चालते या पोलादी जहाजांची. एकदा गाठ पडली त्या वादळांशी की ही पोलादी जहाजेसुद्धा कागदी खेळण्यांसारखी चुरगळून जातात. तिथं माझ्यासारख्या मानवी जीवांची शाश्वती असते कुठं? बंदरात जहाज बांधताना करकरणारे दोरखंड पाहिलेत तुम्ही? विंचवर गुंडाळलेले ते दोरखंड खेचत जहाज किनार्‍याला लागताना त्या अजस्र विंचच्या कंट्रोल्सवर उभ्या असलेल्या माणसानं जर विचार केला, तो दोरखंड तुटल्यावर स्वतःचं काय होईल याचा, तर तो उभा राहू शकेल तिथे? अशा वेळी एखादा तटतटलेला दोरखंड तुटून मागे झेपावतो तेव्हा क्षणार्धात एखाद्या मानवी देहाचे दोन तुकडे करतो. टॅक्समधून येणारा विषारी वायू, इंजिनरूमच्या फनेलमधून उडणार्‍या आगीच्या ठिणग्या, महाकाय क्रेन्सच्या तारा, प्रत्येक क्षणाला धगधगणारा बॉयलर ह्यांच्याबद्दलच्या विचारांना मनात क्षणभर जरी थारा दिला तर जगता येईल अशा जहाजांवर? नाही भाभीजी. क्षणाक्षणाला सामोर्‍या येणार्‍या ह्या मृत्यूला अवास्तव महत्त्व देण्यात काय अर्थ आहे? सेनगुप्ताचा मृत्यू दुर्दैवी होता. पण मृत्यू नेहमीच दुर्दैवी वाटतो आपल्याला. शतकानुशतके आपण मृत्यूची दुर्दैवाशी सांगड घालत आलोय. दुर्दैव हीसुद्धा आपल्या मनात जोपासलेली एक भावना असते फक्त. सागरावर खलाशांच्या मनात अशीच एक भावना जोपासलेली असते. अतिशय सुंदर भावना! त्या कल्पनेनं मृत्यूचं क्रौर्यही सौंदर्यानं शृंगारलं जातं. पुनर्जन्मावर विश्वास आहे तुझा? सागरावरल्या प्रत्येक खलाशाचा विश्वास असतो पुनर्जन्मावर. ह्या उफाळणार्‍या, उसळणार्‍या सागराला वेठीवर आणता आणता हे सागरपुत्र सागरावरच शेवटचा श्वास घेतात. लोखंडी साखळ्यांच्या मिठीत सागर त्यांना तळाशी जखडून ठेवतो खोलवर, अन् सुस्कारा सोडतो. पण तिथेच सारं संपत नाही. सागरतळाशी जखडलेलं शरीर तसंच सोडून खलाशाचं मन उसळून वर येतं तेव्हा त्याला शरीर मिळतं समुद्रपक्ष्याचं. सी-गल् चं. श्वेत पंख पसरून तो पुन्हा एकदा झेपावतो. सागराशी मांडलेली झुंज चालूच राहते. पांढर्‍या पंखांपाठी धावणार्‍या लाटा थकत राहतात. विरत राहतात. समुद्राच्या पोटात तोंड झाकून लपतात. पण तो समुद्रपक्षीही कधीतरी थकतोच. स्वतःला लाटांच्या स्वाधीन करतो. त्याची पांढरीशुभ्र पिसं भिजून, चिंबून सागरतळाशी विश्रांती घेतात. पण अखंड पेटलेली आग घेऊन त्याचं मन परत उसळतं, खलाशाचं शरीर लेवून एखाद्या जहाजावर पाय रोवून उभं राहतं. परत झगडण्यासाठी.'

बोलता बोलता मी थांबलो. उज्ज्वलाच्या स्वप्निल डोळ्यांत माझे शब्द साचले होते. मला ते टिपावेसे वाटले. तिचे भाबडे ओठ मोहक दिसत होते.

'खरंच अनंत? खरं सांगतोयस तू?' तिने स्वप्निलपणे विचारलं.

'खरंच, खरं सांगतोय. खरंच आहे हे. प्रत्येक मृत खलाशी पुन्हा सी-गल् च्या रूपानं जन्माला येतो. अन् प्रत्येक सी-गल् पुढच्या जन्मी खलाशीच होतो-' तिच्या विश्वासाला शब्दांचा आधार देत मी म्हणालो. ' रोज सागर पेटवून देण्याचा प्रयत्न करणारा सूर्य जेवढा खरा आहे, रोज सूर्याचा पराभव करणार्‍या निशेचे स्वागत चांदण्यांच्या पायघड्या पसरून करणारा चंद्र जेवढा खरा आहे, तेवढाच सागराशी चाललेला हा खलाशांचा झगडाही खरा आहे! उघड्या आभाळाखाली झगडता झगडता ह्या खलाशांच्या अंगातही भिनतो जळत्या सूर्याचा आवेश अन् प्रेमिक चंद्राचा रंगेल स्वभाव. त्यांच्या जीवनाचा उद्देश फक्त एकच असतो, झुंजण्याचा. त्यात शरीराच्या अस्तित्वाचं भान कधीच विसरलं जातं!'

'किती सुंदर बोलतोस तू अनंत!' ती गंभीर होत म्हणाली. मग दाताखाली टपोरा ओठ चावत माझ्याकडे रोखून बघत थांबली. 'ऐकताना खूप सुंदर वाटतं. पण विचार केला की तू निर्माण केलेला हा आभास तुझ्याच शब्दांच्या फोलपणात विरुन जातो. श्वेत पंख पसरून झेपावणारे सी-गल् चे देखणे शरीर असू दे किंवा स्नायूंनी तटतटलेले, लाटा पेलणारे खलाशाचे मानवी शरीर असू दे. ते शरीरच मनाला अस्तित्व देतं. सागराच्या शिंतोड्यातं आणि मनाच्या आसवांत ह्या मर्त्य शरीरालाच भिजावं लागतं. शरीराशिवाय उरलेल्या मनाला स्मशानातलं खुरटं झाड शोधत फिरणार्‍या भुतापेक्षा अधिक महत्त्व कसं देता येईल्?शरीराशिवाय मनाला अस्तित्व नाही अनंत. तुझे सुंदर शब्द या मर्त्य शरीराचेच सत्य अस्पष्टपणे मांडतात. चंद्राचा रंगेल स्वभाव घेऊन तुम्ही खलाशी प्रेमाची पुंगी प्रत्येक बंदरात वाजवता ते लुसलुशीत सुंदर देहाभोवतीच ना? त्या दिवशी 'आयवा मारू'वर जमलेले सारे पागल चांद माझ्याभोवती उभे होते ते तलम वस्त्रांतून दिसणार्‍या माझ्या मांसल मर्त्य शरीराने भारावूनच ना?'

बोलता बोलता तिचा आवाज चढत होता. 'उज्ज्वला!' मी हाकारले. पण ती थांबत नव्हती. भान विसरून बोलत होती. तिचा आवाज कांपत होता. डोळ्यात पाणी दाटत होतं. न थांबता ती बोलत होती. 'खरं काय ते तुला ठाऊक आहे अनंत. पण मान्य असलेलं सत्य ऐकण्याची तुझी तयारी नाही. तुम्हा खलाशांसाठी सत्य आहे फक्त शरीर. तुम्हाला प्यास असते फक्त शरीराची. सागर तुम्ही पार करता फक्त किनारा गाठण्यासाठी. त्या किनार्‍यावरल्या शरीरांसाठी. माझ्यासारख्या मांसल पुष्ट शरीरांसाठी.' ती बेभान होऊन बोलत होती.

'उज्ज्वला!'

'तुला ऐकायचं नाहीय. कारण तुलाही हे पटतंय ना अनंत?'

पण तिचे ओठ परत विलग झाले. काहीतरी क्रूर सत्य बोलण्यासाठी उघडले. मी आवेगाने पुढे झालो.

'थांब ज्वाला!' मी माझ्या हाताचा तळवा तिच्या ओठांसमोर आडवा नेत म्हणालो. भरल्या डोळ्यांनी माझ्याकडे बघत ती थांबली. ओठ मिटले, किंचित पुढे होत त्या ओठांनी माझ्या तळव्याला स्पर्श केला. त्या थरथरत्या ओठांची आग माझ्या शरीराला भाजून गेली. मी पटकन हात मागे घेतला. ती तशीच माझ्याकडे बघत म्हणाली, 'मला ज्वाला म्हणालास तू! हो ना? मला नेहमी वाटायचं कुणीतरी मला ज्वाला म्हणावं. कुणीतरी माझ्या मनातला जाळ ओळखावा. पण नेहमीच मी उज्ज्वला राहिले... फार तर... उज्जू!'

बोलता बोलता ती जवळ आली होती. मान उंचावून माझ्या डोळ्यांत डोकावत थांबली होती. तिच्या डोळ्यांतला जाळ मला सहन होत नव्हता. मी डोळे मिटले. गर्रकन वळून ती निघून गेली. पण ती तसाच उभा राहिलो. काय झालं मला आठवत नव्हतं. जाणवत होतं फक्त त्या आगलोळात भाजलेलं अंग. आम्हाला दोघांच्या शरीरांनी एकमेकाला सांगितलेलं सत्य. कोरड्या घशाने मी तहानलो.

- oOo -

पुस्तकः 'एम. टी. आयवा मारू'
लेखकः अनंत सामंत
प्रकाशकः मॅजेस्टिक प्रकाशन
आवृत्ती: दुसरी (१९९३)
पृष्ठे: १३१ - १३५.
---

टीपा:
(१). सेनगुप्ता या खलाशाचा जहाजावर असताना अपघाती मृत्यू होतो. जहाजावरील प्रथेप्रमाणे त्याचे 'समुद्री दफन' केले जाते.

---

---
संबंधित लेखन:
वेचताना... : एम.टी. आयवा मारू >>
---


संबंधित लेखन

1 टिप्पणी: