सोमवार, २० मार्च, २०१७

वेचताना... : एम.टी. आयवा मारू

'एम.टी. आयवा मारू' हे नाव वाचलं तेव्हा पहिली प्रतिक्रिया बुचकळ्यात पडण्याची झाली. मराठी कादंबरीचे हे कसले नाव, कुठली भाषा ही? एम आणि टी ही तर इंग्रजी मुळाक्षरे असावीत असा तर्क करता येत होता, पण पुढचे दोन शब्द बिलकुल लागेनात. त्यामुळे नावावरून हे आपले काम नाही असे गृहित धरून त्या कादंबरीच्या नादी लागू नये असे ठरवले.

एम. टी. आयवा मारू

कारण तो काळ होता तो 'मृत्युंजय', 'छावा', 'श्रीमान योगी' वगैरे कादंबर्‍या भरात असण्याचा. आवृत्यागून आवृत्या निघणार्‍या या कादंबर्‍या नुसत्या वाचल्याच पाहिजेत असे नव्हे, तर त्यांच्या हार्ड-बाउंड प्रती आपल्या टिचभर दिवाणखान्यातल्या शोकेस मधे ठेवणे ही फॅशन असण्याचा काळ होता. महाभारत आणि रामायण या दोन महाकाव्यातील एकेका व्यक्तीला वेठीला धरून 'मृत्युंजय' किंवा 'राधेय'च्याच आवृत्या अनेक लेखक अहमहमिकेने बाजारात आणत होते. इतके सारे वाचनीय असताना या असल्या अगम्य नावाच्या कादंबरीच्या वाट्याला जाणार कोण?

पण त्या कादंबरीचे नि आमचे ऋणानुबंध जबर असावेत. प्रत्येक वेळी पुस्तकांच्या दुकानात गेल्यावर किंवा प्रदर्शनाला भेट दिल्यावर ही नेमकी समोर येऊन 'हिंमत असेल तर उचल मला' असे आव्हान देत असे. एक-दोनदा उचलून थोडी चाळली, पण त्यातील एक दोन प्रसंगाचे धावते वाचन केल्यावर माझ्या 'मृत्युंजय'संस्कारित मनाला धक्का बसून तो नाद सोडला होता. 

पण मग भूपात वर्ज्य असलेल्या 'शुद्ध मध्यम'ने जशी कुमारांची पाठ सोडली नाही (अखेरीस 'ये बाबा आत' असे म्हणत कुमारांनी 'चैती भूप' या नवीन रागाची रचना केली) तशीच ही कादंबरी माझ्या नजरेआड व्हायचे नाव घेईना. शेवटी कुमारांचे स्मरण करून तिला एकदाची घरी आणली. दरम्यान एम. टी. म्हणजे मोटर टँकर किंवा मालवाहू जहाज इतपत समजले होते. मग सुरुवातीच्या काही पानांतून 'आयवा मारू' हे नाव जपानी आहे नि त्याचा अर्थ 'प्रेम आणि एकरूपता यांच्या भावुक चेतनेचे जहाज' हे समजले. 

एका दैनंदिनीच्या स्वरूपात लिहिलेली ही कादंबरी वाचायला सुरुवात केली नि एक वावटळ, एक तुफान आपल्याला घेऊन वेडेवाकडे उडवत अनिश्चित दिशेला घेऊन जात आहे अशी भावना निर्माण झाली. अशा वावटळीत पाय जमिनीवर नाहीत, धुळीने आसमंत भरल्याने दृष्टीचा असून उपयोग नाही, दिशांचे भान उरलेले नाही; केवळ ते तुफान नेईल तिकडे निमूट जायचे इतकेच हाती असल्याची जाणीव झाली. मग स्वतःला त्या प्रवाहात सोडून दिले. एक संपूर्ण रात्र या तुफानाने गिळंकृत केली!

कादंबरी सुरुवातीला पकड घेते ती अपरिचित जग समोर आणते म्हणून. जहाजावरचे जग हे तर तुम्हा आम्हाला सर्वस्वी अपरिचित असतेच, पण त्या पलीकडे या जहाजाचा सारा प्रवास पूर्वेकडील देशांतील शिंताव, बतान यासारख्या अपरिचित आणि आज एक बलिष्ठ व्यापारी केंद्र म्हणून उदयाला आलेल्या पण तेव्हा केवळ स्मगलिंगच्या संदर्भातच ज्याचे नाव ऐकू येई त्या हाँगकाँग बंदरातून. जगण्याचे मॉडेल पाश्चिमात्यांकडून घेणार्‍या आणि म्हणून तिकडची बित्तंबातमी राखणार्‍या नि पौर्वात्य जगाबाबत उदासीन असणार्‍या माझ्यासारख्या भारतीयाला सुरुवातीला पकडून ठेवले ते त्यातील नव्या वातावरणाने. 

एखादी रहस्यकथा, गूढकथा जशी अपरिचित जगात नेऊन तुमचे मनोरंजन करते तशी अपेक्षा प्रथम निर्माण झाली. पण काही पानातच हे रसायन पारंपरिक मराठी साहित्याप्रमाणे अमूलचे फ्लेवर्ड दूध नसून पेल्यात फेसाळणारे, आकर्षक दिसणारे, कडवट चवीचे, मोहात पाडणारे आणि अखेरीस थेट मस्तकात शिरून ते भणाणून सोडणारे तीव्र मद्यस्वरूप आहे हे ध्यानात आले. पण तोवर उशीर झाला होता. 'एकच प्याला' आधीच मस्तकात गेला होता, त्यामुळे अपरिहार्यपणे दुसरा उचलला जाणारच होता.

जहाजावरचे जग, तेथील सर्वस्वी अपरिचित नीतिनियम, त्यावर काम करणारी विविध देशांतील माणसे, त्यांच्या पारंपरिक संस्कृतींचा, विचारांचा जाणारा छेद, त्यातून उमटणारे संघर्ष, जमिनीवरील नीतिमत्तेच्या कल्पनांचा तिथे होत गेलेला पालापाचोळा, व्यावसायिकतेच्या आणि गुंतवलेल्या एक एक पैशाची पुरेपूरच नव्हे तर जास्तीत जास्त किंमत वसूल करण्याच्या लालसेपुढे माणसांना कःपदार्थ मानण्याची भांडवलशाही मालकांची वृत्ती, खलाशांचे हेवेदावे, दूरवर अथांग पाण्याशिवाय काहीच दिसत नसल्याने आसपास माणसे असूनही घेरुन राहणारे एकांताचे भय, मग त्यावर केविलवाणी मात करण्यासाठी जमिनीवर पाय ठेवताच जगण्यातील शक्य ते सर्व ओरबाडून जगण्याची निर्माण झालेली अभिलाषा, आणि या सर्वांपलिकडे व्यापून राहिलेले नीतिच्या रूढ कल्पनांपलिकडे नेणारे लैंगिक आणि अलैंगिक आकर्षण... इतक्या सार्‍या पैलूंना राक्षसी आवेगाने कवेत घेत आयवा मारू धावत जाते, जाताना वाचकाला विचार करण्याची क्षणभर देखील फुरसत देत नाही.

चित्रपटात किंवा कथा/कादंबरीमधे एखादे पात्र लेखकाच्या व्यक्तिमत्वाशी मिळते जुळते असले, तर त्याला लेखकाचा 'ऑल्टर ईगो' किंवा 'साहित्यिक प्रतिरूप' म्हटलं जातं. त्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून लेखक स्वतः व्यक्त होतो आहे असे समजले जाते. त्याच चालीवर उज्ज्वला उपाध्याय हा 'आयवा मारू'चा ऑल्टर ईगो किंवा समूर्त, सजीव व्यक्तिमत्व आहे. ते 'आयवा मारू' नावाच्या आत्म्याचे 'माध्यम' आहे असेही म्हणता येईल. 

कादंबरीच्या शेवटाकडे जाताना लेखकालाही हे अभिप्रेत होते याची सूचना मिळते. आणि कदाचित म्हणूनच या कादंबरीची प्रत्यक्ष नायिका असलेल्या 'आयवा मारू'चा उल्लेख स्त्रिलिंगी आहे(१). तिचे नि 'आयवा मारू'चे व्यक्तिमत्व अनेक अर्थांनी एकसारखे आहे. ते आवेगी आहे, उद्दाम आहे, वर्चस्व गाजवणारे आहे, आव्हान देणारे आहे. जे हवेसे वाटते त्याकडे आवेगाने झेपावणारे आहे, आणि जे जे आपला वापर करु पाहतात त्यांचा सणसणीत सूड उगवणारे आहे.

ज्या नात्यांच्या आधारे जगण्याचा पाया घालावा, नि यथावकाश वाढत्या वयाची वाटचाल करताना त्यावर एक एक वीट चढवत जगण्याची इमारत बांधत न्यावी, त्या मूलभूत नात्यांची विकृत बाजू समोर आल्यानंतर, व्यक्तिमत्व घरापासून सुटे होत आपली वाट आणि आपल्या घाटांच्या शोधात बाहेर पडण्याच्या वयातच सणसणीत आघात होऊन जगण्याचा पायाच हादरून जावा आणि मग जगण्याच्या पारंपरिक गृहितकांना तिलांजली देत रिकाम्या झोळीने पण त्या विकृत अनुभवांचे कुबड वागवत असल्यामुळे सरळ जाऊ पाहात असतानाही चाल तिरकीच होत जावी असा अनुभव उज्ज्वलाला येत जातो.

ही स्त्री म्हणजे एक वादळ आहे. जगण्याच्या पूर्वार्धात प्रथम परावलंबित्व आणि नंतर असहाय्यता अनुभवणारी ही स्त्री एका टप्प्यावर ते जोखड फेकून देते नि मनस्विनी होते. तिची ती मनस्विता, जगण्याचा शोध घेताना तिची गाठ 'आयवा मारू'च्या सेकंड लेफ्टनंट दीपकशी पडते आणि त्याच्या माध्यमातून 'आयवा मारू'शी. आपल्या देहसौंदर्याची नि स्त्रीत्वाच्या ताकदीची पुरेपूर जाणीव झालेली ती स्त्री मग आपल्या परीने त्या पुरुषसत्ताक समजल्या जाणार्‍या राज्याची अनभिषिक्त राणी होऊन बसते. त्या निसरड्या वाटेवरून जाताना भरकटते आणि 'आयवा मारू'च्या प्राक्तनालाच सामोरी जाते.

साहित्यिक लैंगिकता हा आजही बंडखोर वगैरे विचार मानला जातो. त्यावर आधारित साहित्य हे व्याख्येनुसारच विद्रोही किंवा धाडसी वगैरे मानलं जातं. ऐंशीच्या दशकात खांडेकरी आदर्शवाद, फडकेप्रणित रोमँटिकता, पुलं प्रणित मध्यमवर्गीय जाणिवांचे पट फाडून जेव्हा भाऊ पाध्येंसारख्या लेखकाने समाजाच्या उपेक्षित जगाचे वास्तव लख्खपणे मांडलं तेव्हा होता तो खरा विद्रोह. आज तीस वर्षांनंतरही केवळ विषयनिवडीबद्दल विद्रोहाचे सर्टफिकेट अपेक्षित ठेवणारे लेखक या त्या ऐंशीच्या दशकातल्या लेखनाच्या आवृत्या काढत असतील, नवा काही विचार, नवे काही मूल्यमापन, नवी काही दिशा, नवी मांडणी समोर ठेवत नसतील, तर त्यांना बंडखोर, विद्रोही न समजता, केवळ विद्रोहाच्या महामार्गावरचे प्रवासीच म्हटले पाहिजे. त्यांच्यात आणि महाभारतातील एकेका पात्राला वेठीस धरून 'मृत्युंजय'च्या आवृत्तीस्वरूप कादंबर्‍या लिहिणार्‍यांत फार फरक नसतोच.

अशा लेखकांसाठी उज्ज्वला उपाध्याय हे पात्र एक वस्तुपाठ आहे. ते अर्थातच काळे-पांढरे नाही, एकसंध, एकसाची नाही. वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या स्वरूपात ती समोर येते. याला बदल म्हणता येईल किंवा वेगळे पैलू. प्रथम मान खाली घालून जगणारी उज्ज्वला सूडाच्या भावनेने पेटून उठते नि पुरुषी वर्चस्ववादी प्रवृत्तीवर आघात करू लागते. दीपकशी भेट तिला सहजीवनाचे दार उघडून देते तेव्हाही तिचे व्यक्तिमत्व एका बाजूने ते हवेसे वाटणे, तर दुसर्‍या बाजूने त्या व्यवस्थेवरच्या सूडभावनेने पेटलेले असे दुभंग होताना दिसते. 

एकदा देहसौंदर्याच्या नि स्त्रित्वाच्या सहाय्याने पुरुषांना अंकित करणे लीलया जमू लागल्यावर अनंत (हा लेखकाचा ऑल्टर ईगो)च्या बाबतीत हे शक्य होत नाही, म्हणताना ती पराभवाच्या भावनेने पेटून उठते. काही करून त्याला अंकित करायचे या पारंपरिक मानसिकतेसोबतच लैंगिकतेचे नवनवे खेळही तिला मोहवत असतात. एकाच वेळी अप्राप्य प्रेम/स्नेह आणि दुसरीकडे प्रमाथी देहभोग आणि चिरफाळत जाणारे नाते, एका बाजूने पुरुषांना - अगदी गोर्‍या युरपियनांसह - सहज नमवण्याच्या ताकदीचा अहंकार, तर दुसरीकडे सूडासाठी उगारलेले अस्त्र उलटून आपलाच घात करताना उघड्या डोळ्याने दिसत असतानाही त्याला परत घेता येत नसल्याची हतबलता, ती फरफट!

असे प्रमाथी आणि झपाटून टाकणारे, एकाच वेळी सहानुभूती आणि धिक्काराचे धनी असलेले व्यक्तिमत्व मराठी साहित्यात फारच क्वचित उभे केले गेले असेल. तिचा प्रवास हा एकरेषीय नाही. मनस्विता आणि देहस्विता यांच्या हिंदोळ्यावर ती हेलकावे घेताना दिसते. पौगंडावस्थेत आलेल्या अनुभवांतून पुरुषांवर सूडात्मक वर्चस्व गाजवण्याची तिची वृत्ती अधेमधे अचानक एखाद्या गोषाच्या पडद्याप्रमाणे दूर होत कुण्या सेनगुप्ताप्रती निर्माण झालेली वत्सल भावना, माणसांतल पुरुष पाहता पाहता अचानक भेटलेल्या कुण्या संवेदनशील मित्राप्रती निर्माण झालेला ओलावा, पण तेवढ्यावर न थांबता पुन्हा एकवार त्याच्या प्राप्तीच्या जिद्दीने त्या नाजूक नात्याने पुन्हा एकवार देहलालसेच्या दिशेने घेतलेला हेलकावा... अशा प्रमाथी आणि परस्परविरोधी भावनांच्या कल्लोळात ती जगते आहे. रोकड्या जगाच्या पसार्‍यात अतिसंवेदनशील व्यक्तीसाठी जे भागधेय लिहून ठेवलेले असते तेच तिच्याही वाट्याला येते. पण हे ओघाने नव्हे, तिने त्याविरूद्ध मांडलेल्या संघर्षाच्या, आकांताच्या अखेरीसच.

अशा वादळी व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंब पुरेपूर उमटले आहे असा वेचा शोधणे हे आव्हान होते. ते स्वीकारले खरे, पण अपेक्षेप्रमाणे पेलले नाही. अखेर माझ्या मध्यमवर्गीय जाणिवेला अनुसरून उज्ज्वलाचा अनंतसोबतचा एक संवाद निवडला आहे, ज्यात परोक्ष भावाने ’आयवा मारू'देखील उपस्थित आहे. यात अनंतने उच्चारलेले शब्द आणि त्याच्या मनात उमटणार्‍या उज्ज्वलासंदर्भातील स्मृती, त्याचे विचार आणि निरीक्षण यांच्याकडे बारकाईने लक्ष द्या. लेखक वाचकाशी शब्दांतून बोलतो किंवा व्यक्त होतो हे तर खरेच, पण तो मांडणीतूनही भाष्य करतो याचे हे एक उत्तम उदाहरण म्हणावे लागेल.

-oOo-

टीपा:
(१).विविध देशांतून आलेल्या विविध खलाशांच्या सामायिक संवादाची भाषा असलेल्या इंग्रजी भाषेत शिप म्हणजे जहाज याचा साहित्यिक उल्लेख बहुधा 'she' या सर्वनामाने होतो. हे दुसरे कारण असावे.

(२).’पेंग्विन बुक्स’ तर्फे या अफलातून कादंबरीचा इंग्रजी अनुवाद देखील प्रकाशित झाला आहे. ज्यांनी तिला 'मराठी कल्ट नॉव्हल' किंवा स्वतःचा असा एक पंथ स्थापणारी कादंबरी म्हटले आहे. वाचकांचा एक मोठा गट तिचा चाहता झाला, त्याने तिची पारायणे केली, हे खरे असले तरी मराठी लेखकांनी मात्र तिची परंपरा मानली नाही. खुद्द अनंत सामंत यांनीच लिहिलेल्या एखाद्या कादंबरीचा अपवाद वगळता ’आयवा मारू’चा पंथ तिच्यापाशीच उगम पावला नि तिच्यापाशीच संपला असे दुर्दैवाने म्हणावे लागते.

---

या पुस्तकातील एक वेचा: समुद्रपक्षी


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा