बुधवार, १५ मार्च, २०१७

सत्ता

रात्र काळोखी होती. चांदण्याही चमकत नव्हत्या. आकाशात ढग आले असावेत. हवेत गारवा होता. विश्वनाथनं विंडप्रूफ जॅकेटची बटनं लावली. रस्ता पायाखालचा होता. अधूनमधून टॉर्च लावला की प्रकाश विझल्यावर काही क्षण दिसेनासं होई. स्वतःच्याच विचारात विश्वनाथ चालला होता.

गार वारा आला तसं जॅकेटची कॉलर वर करण्यासाठी विश्वनाथ थबकला. त्याच्या लक्षात आलं की, काही दिवसांपूर्वी गुरख्यांच्या भांडणाचे आवाज ऐकून येथूनच तो त्यांच्या विवराकडे गेला होता. आता ते काय करत असतील? विश्वनाथच्या मनात आलं की, आवाज न करता जाऊन काय चाललं आहे हे पाहून यावं.

रारंग ढांग

विवराच्या तोंडाशी गार वार्‍यापासून आडोसा मिळवण्यासाठी गुरख्यांनी पत्र्याचे तुकडे, लाकडी खोकी आणि फाटकी पोती लावली होती. त्यातून विश्वनाथनं आत डोकावलं. मिट्टं काळोख होता. कोपर्‍याची चूल विझलेली. तेव्हा निखार्‍यांचे लाल ठिपकेही आता दिसत नव्हते.

विश्वनाथनं हलकेच टॉर्च लावला. काळोखाचा काळा पडदा बाजूला व्हावा तसं त्याला आतलं दृश्य दिसू लागलं. तेवढ्या जागेत, दाटीवाटीनं गुरखे झोपले होते. चादरी गुंडाळलेली एकेक मुटकळी जागा सापडेल तशी पडलेली होती. जमिनीवर एक जाड टारपोलिन अंथरलेलं होतं. त्याखालून दगड अंगाला टोचत असतील काय? माहीत नाही. पण थकव्यासारखी उशी नाही. श्रमासारखी गादी नाही. दमलेल्या, श्रमलेल्या माणसांची झोप किती गाढ असते! कसली हालचाल नाही की अस्वस्थ तळमळ नाही. ही निद्रा त्यांच्याभोवती हलकेच एक गहिरं आवरण तयार करते. पोखरणार्‍या काळज्या, जाळणार्‍या चिंता ती त्यांच्या आसपास फिरकू देत नाही. ही गाढ झोप, गरिबांची संपत्ती. कोणत्याही जोखडापासून ही तात्पुरती मुक्तीच!

जगात आधुनिक विज्ञानानं अनेक शोध लावले आहेत. पैसे मोजले की सुरेख वेष्टनामध्ये बांधून हव्या त्या सुखसोयी घरी आणता येता. बाहेर कडक उष्णता असताना शय्याघरातलं वातावरण सुखद थंड ठेवता येतं. पण आपल्याला हवी ती स्वप्नं पाहण्याचं साधन अद्याप बाजारात विक्रीला आलेलं नाही.

ह्या थकूनभागून झोपी गेलेल्या गुरख्यांना स्वप्नं पडत असतील काय? असली तर त्यांना काय दिसत असेल? कित्येक मैल दूर असलेली त्यांची घरं, वाट पाहणारी पत्नी, मुलं?

टॉर्च विझवून त्यात अंधारात तसाच उभा राहिला. अचानक त्याला महिनाभरापूर्वीचा प्रसंग आठवला. त्याच्या हातात रमच्या बाटल्या. त्याचे पाय धरणारे, माफीची याचना करणारे गुरखे. आणि त्याचे स्वतःचे कठोर शब्द-

"बहादूर, या बाटल्या इथं कुठून आल्या? मला उत्तर हवंय बहादूर."

मेजर बंबांनी त्याच्याकडून कॅमेरा मागताना असाच प्रश्न केला होता. त्यांनाही फोटो का काढले याचं 'एक्स्प्लनेशन' हवं होतं. त्या वेळी आपण आतून किती भडकलो होतो! आणि आपल्याही तोंडून तसाच प्रश्न कसा आला? हा ह्या खाकी कपड्यांचा आणि खांद्यावरच्या स्टार्सचा मनावर होणारा परिणाम आहे काय?सत्तेची जाणीव किती विलक्षण असते! आपल्या शब्दाला लोक घाबरतात, तत्परतेने मान तुकवतात. तसं ते न करतील तर त्यांना जीवनातून उठवण्याची शक्ती आपल्या हाती आहे.

त्या प्रसंगानं विश्वनाथला पहिल्यांदाच त्याच्या अधिकाराची जाणीव करून दिली. आणि त्याच्याबरोबर त्याला बहादूरच्या डोळ्यातील अश्रू दिसू लागले. "साहेब, आम्ही उपाशी मरू..." ते शब्द आत्ता बोलल्यासारखे फिरून त्याला ऐकू आले तसा त्याच्यासमोर प्रश्न उभा राहिला, 'ही सत्ता त्याला कोणी दिली?' आणि त्या प्रश्नाचं उत्तरही, वामनानं पाहता पाहता विराट रूप घ्यावं तसं त्याच्यासमोर उभं राहिलं.

ही सत्ता त्याला त्यांच्या भुकेनं दिली. दारिद्र्यानं आणि अगतिकतेनं दिली. मुलाबाळांच्यावरील मायेनं आणि त्यापोटी निर्माण झालेल्या असहायतेनं दिली.

प्रचंड आसुडाचा फटका बसावा तसा वीज कडाडल्याचा आवाज झाला. एकदम दचकून विश्वनाथ भानावर आला. गुरख्यांची झोपमोड होण्यापूर्वीच तो हलकेच तिथून निघाला आणि झपझप पायवाट उतरु लागला.

तो रस्त्यावर पोहोचेतो थंडगार, टप्पोरे थेंब पडू लागले आणि त्यामागून पाऊस कोसळू लागला.

- oOo -

पुस्तकः 'रारंग ढांग'
लेखक: प्रभाकर पेंढारकर
प्रकाशकः मौज प्रकाशन गृह
आवृत्ती अठरावी (२०१४)
पृ. ७६-७७.


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा