बुधवार, १५ मार्च, २०१७

वेचताना... : रारंग ढांग

कोणतीही व्यवस्था असो - मग ती राष्ट्र असो, धर्म असो की जात - तिच्या संदर्भात बाबत चिकित्सेला, बदलांच्या आग्रहाला नि मुख्य म्हणजे टीकेला वाव फार कमी असतो. त्यातही तिच्या संदर्भातील जी संरक्षण व्यवस्था असते ती तर जन्मतःच पवित्र असते, परिपूर्ण असते. तिच्यात अंतर्भूत असलेल्या न्यूनांबद्दल, तिने केलेल्या अन्यायाबद्दल तोंड उघडायला परवानगी नसते. कारण मुळात तिच्यात असं काही असू शकतं हेच बहुसंख्येला मान्य नसतं. एरवी अनेक विषयांबाबत एकमेकांच्या जिवावर उठणारे दोघे या मुद्द्यावर मात्र ठामपणे एकत्र येतात.

रारंग ढांग

त्यांच्यावर टीका करणारा बहुधा अन्य व्यवस्थेचा समर्थक किंवा तिचा भाग असतो म्हणून तो टीका करू धजतो, कारण त्याच्यापुरता त्याच्या पाठीशी एका गटाचे बळ उभे असते. 

व्यक्तिगत पातळीवर पाहिले तर त्यांचे वस्तुनिष्ठ विश्लेषण, आकलन आणि त्यांआधारे केलेली  टीका ही कायम आक्रमक विरोधाची, मुस्कटदाबीचीच धनी असते. मान राखून, त्यांच्या चुकांबाबत अधिक क्षमाशील राहून, दंड करण्याबाबत अपवाद करतही टीका शक्य आहे, नव्हे तिच्यात सुधारणा व्हावी म्हणून आवश्यक आहे, हे आपण का मान्य करत नाही हे एक कोडंच आहे. संपूर्ण पावित्र्य किंवा संपूर्ण विध्वंस या दोन टोकांवरच राहण्याचा विकृत आग्रह कशासाठी?

राष्ट्र ही संकल्पना अतिशय पावित्र्याच्या पातळीवर नेऊन ठेवलेली - अलीकडे तर तिचे अनेक देव्हारे, देवळे गल्लोगल्ली उभी राहू लागली आहेत - आणि तिच्यात अंतर्भूत असलेली संरक्षण व्यवस्था किंवा सैन्य ही तर केवळ फुलं वाहण्यासाठीच असते असे 'संस्कार' या देशात तिच्यातील कमतरता, भ्रष्टाचार, वशिलेबाजी, कंपूबाजी याबाबत ब्र उच्चारता कामा नये असा अलिखित दंडक असतो. अलीकडे तर थेट 'देशद्रोहा'चे सर्टिफिकेट दिले जाते. 

अशा परिस्थितीत अगदी राजकारणाबाबत बोटचेपी आणि समाजकारणाबाबत सावध नि सुरक्षित विद्रोहाची माफक भूमिका घेणार्‍या मराठी साहित्य विश्वात याबाबत फार लिहिले जात नाही हे अपेक्षितच आहे. त्यांचा सारा विद्रोह 'सर्वव्यापी' वगैरे असलेल्या हिंसेचे नि लैंगिकतेचे पैलू तपासण्यात जातो, यातून कोणत्याच गटाला न दुखावता विद्रोहाचे मेडल पदरी पाडून घेता येते हा फायदा !

प्रभाकर पेंढारकर लिखित 'रारंग ढांग' आणि दिनानाथ मनोहर यांची 'रोबो' या दोन कादंबर्‍या हे माझ्या वाचनात आलेले दोन सन्माननीय अपवाद. या दोनही कादंबर्‍या प्रामुख्याने पवित्रतेच्या पातळीवर नेऊन ठेवलेली व्यवस्था आणि व्यक्ती यांच्यातील संघर्षाची मांडणी करतात.

'रारंग ढांग' ही कादंबरी एक 'सिविलियन' एंजिनियर आणि 'बॉर्डर रोड ऑर्गनायजेशन' ही लष्कराची सह-संस्था यांच्यातील संघर्षाचे चित्र उभे करते आहे. एक तत्त्वनिष्ठ, बुद्धिमान पण त्याचबरोबर एककल्ली भासावा असा विश्वनाथ टोकाचा संवेदनशीलही आहे. तो आपल्या कामाकडे निव्वळ रोजगार म्हणून न पाहता एक बांधिलकी म्हणून पाहतो आहे. आणि म्हणून व्यवस्थेने ठरवून दिलेल्या उतरंडीबाबत त्याला प्रश्न पडतात.

भारतीय लष्कराची जडणघडण अजूनही ब्रिटिश काळातीलच आहे. जेव्हा अधिकारी हे प्रामुख्याने ब्रिटिश, गोरे लोक तर इतर सर्व 'नेटिव' असत. त्यामुळे अधिकार्‍यांची मेस वेगळी नि इतर 'सिपाही' लोकांची वेगळी ही 'परंपरा' अजूनही चालत आलेली. तेव्हा सिपाही लोक तर बोलूनचालून नेटिव, महामूर संख्येने उपलब्ध असलेले; तेव्हा कामाच्या शिस्तीपुढे त्यांच्या हालअपेष्टांची, गरजांची पर्वा करण्याची आवश्यकताच नव्हती. गुलामासारखे त्यांना राबवून घेणे, तो पडला तर दुसरा आणावा इतके सोपे होते सारे.

आज स्वातंत्र्यानंतर या दोनही काडरमधे भारतीयच असल्याने परिस्थिती इतकी वाईट नसेल कदाचित, पण 'डोण्ट गिव मी रीझन्स, जस्ट गेट इट डन' ही ऑर्डर हाताखालच्या मंडळींना देणे हे अधिकार्‍याला भूषणच असते. त्याच्या हाताखालच्या अधिकार्‍याने उतरंडीत त्याच्या खाली असलेल्याबाबत तेच करणे अपेक्षित असते. ऑर्डर देण्याच्या या उतरंडीत सर्वात तळाशी असलेल्यांचे आयुष्य कसे असते याबाबत बोलणे म्हणजे द्रोह मानला जातो. 

नेमके याच घटकाचे जिणे डोळे उघडे ठेवून पाहणारा, कान उघडे ठेवून ऐकणारा आणि बुद्धी शाबूत ठेवून त्यावर विचार नि कृती करणारा एखादा अधिकारी येतो तेव्हा त्याची दोन ध्रुवांत होणारी ओढाताण आणि शेवटी आपली बुद्धी आणि सदसद्विवेकबुद्धी जिवंत ठेवून घेतलेला निर्णय आणि त्याचा अपरिहार्य शेवट अशी या कादंबरीची एकुण वाटचाल आहे.

या कादंबरीचा नायक विश्वनाथ हे एक अस्सल पात्र आहे. हिंदी चित्रपटांतून वा रोमँटिक कादंबर्‍यातून असते तसे सर्वगुणसंपन्न मुळीच नाही. उलट छानपैकी करड्या रंगाचे आहे. त्याचा स्व जिवंत आहे त्याचबरोबर अहंकारही, सदसद्विवेक जिवंत आहे तशीच अधिकाराची जाणीवही. बुद्धिमत्तेसोबत तो एककल्लीदेखील आहे नि त्यामुळेच एका गटात काम करण्यास तो लायक नाही. 

पण यात त्या मजुरांच्या झोपेचं त्याने केलेलं विश्लेषण वास्तवदर्शी असले तरी अत्यंत सुखवस्तू मनाने केलेले आहे (हे पेंढारकरांनी जाणीवपूर्वक लिहिले की ते त्यांचेच मत आहे हे ठाऊक नाही.). श्रमजीवींच्या झोपेचे इतके उदात्त वगैरे विश्लेषण त्या कष्टाची जाण आणि अनुभव नसलेले सुखवस्तू मनच करू शकते. असे असूनही, त्याच्यापुरता एक लहानसा का होईना बदल तो घडवून आणतो, त्यासाठी आपले करियर पणाला लावतो आणि निसर्गच सर्वशक्तिमान असलेल्या प्रदेशात माणूसपणाची एक यादगारी निर्माण करून जातो.

अधिकारांच्या उतरंडीत जिला 'मिडल मॅनेजमेंट' म्हणतात ती नेहमीच 'ओझ्याचं गाढव' म्हणून वावरताना दिसते, मग भले ती एखादी आयटी कंपनी असो की 'रारंग ढांग' या कादंबरीतील बीआरओ. वरचे अधिकारी अशक्यप्राय अशी टार्गेटस आखून देतात नि हाताखालच्याने त्यातील समस्यांची, ते पुरे होण्यात असलेल्या अडचणींची कल्पना देऊ केली की 'यू शुड पुश योर सबॉर्डिनेट्स, यू मस्ट बी अ ग्रुप पर्सन, डेलिगेट योर रिस्पॉन्सिबिलिटिज, गेट इट डन फ्रॉम देम, वी मस्ट डिलीवर धिस' म्हणून मोकळे होतात. उतरंडीत सर्वात खाली असलेल्यांना तर काय 'काम करा' म्हटले की करत राहण्याखेरीज गत्यंतर नसतेच. तरीही कामे पुरी होत नाही इतकी ती अवाढव्य असू शकतात. 

मग वरचे अधिकारी सर्व हाताखालच्यांना 'फायर' करून आपला अधिकार पुन्हा एकवार बजावतात. 'मिड्ल मॅनेजमेंट'वाला काम पुरे न झाल्याने अधिकार्‍यांच्या शिव्या खातो, तसंच हाताखालच्यांना क्षमतेपेक्षा अधिक राबवून घेतल्याने त्यांचीही लाखोलीही. वर एखाद्या कामात काही सर्वात तळाच्या थरात काही अघटित घडलेच तर अधिकारी 'पूर्वकल्पना न दिल्याचे' खापर पुन्हा या 'मधल्या'वरच फोडतात नि मोकळे होतात. कादंबरीतील 'बीआरओ'ची परिस्थिती नेमकी अशीच आहे. आणि अशा परिस्थितीतही विश्वनाथसारखा मधला माणूस दोन्ही बाजू समजून घेत असतानाच करारीपणे आपले स्वतंत्र विचार नि कृती दोन्हीशी बांधील राहतो.

इथे निवडलेल्या उतार्‍यामध्ये प्रामुख्याने विश्वनाथचे सत्तेबाबतचे विचार येतात. त्याचबरोबर तळाच्या कामगारांची परिस्थितीही त्यात येते. एका बाजूने विंडप्रूफ जॅकेट, सुरक्षित बरॅक, थंडी घालवण्याची 'अधिकृत' सोय म्हणून मद्याची सोय इ. सारे सारे उपलब्ध असलेला विश्वनाथ; तर दुसरीकडे पोटामागे पाठ लावून आलेले, कामाच्या ठिकाणच्या टाकाऊ वस्तूंमधून निवार्‍याची जेमतेम सोय केलेले, त्याच भयानक प्रतिकूल वातावरणात दिवस कंठणारे गुरखा मजूर; यांच्या जगण्यातील विरोधाभास, पवित्र, टीकेसाठी अनुल्लंघनीय मानल्या गेलेल्या व्यवस्थेची अवस्था दर्शवतो आहे.

संपूर्ण कादंबरी अतिशय चित्रमय आणि ओघवत्या शैलीत लिहिलेली आहे. एखाद्या चित्रपटाची पटकथा म्हणून सहज वापरता येईल इतकी शब्दचित्राच्या स्वरुपात आहे. एक वदंता अशी आहे की हिंदी-मराठी चित्रपट/नाट्य क्षेत्रातील एका दिग्गज दिग्दर्शकाने त्यावर चित्रपट काढण्याची परवानगी मागितली होती, पण बीआरओ किंवा लष्कराने ती नाकारली!

-oOo-

या पुस्तकातील एक वेचा: सत्ता


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा