माणूस हा प्राणिकुलातील एकमेव विचारशील प्राणी आहे असे म्हटले जाते... पण ते केवळ मानवी अहंकाराने लिप्त असलेले विधान आहे असे माझे मत आहे! अन्य प्राण्यांचा विचार माणसांच्या विचारवाटेवर जात नसल्याने, माणसाला जाणवत नाही इतकेच. म्हणजे कदाचित हे विधान मानवी अज्ञानाचे निदर्शकही असू शकेल.
पण एक गोष्ट आहे जी निर्विवादपणे मानवजातीची निर्मिती आहे, आणि ती म्हणजे विनोद! अगदी ’परिहासविजल्पिता’पासून ’अति झालं नि हसू आलं’ पर्यंत विनोदाच्या अनेक छटा माणसाच्या आयुष्यात सापडतात. चिंपांझीमध्ये माणसाच्या बुद्धिमत्तेचे अनेक पैलू दिसतात. (अन्य काही मर्कटकुलातही!). पण त्यांच्यातही एक चिंपांझी काही हातवारे करुन दुसर्याला काही सांगतो आहे, आणि ते ऐकून दुसर्याची हसून हसून पुरेवाट झाली आहे असे दिसत नाही. त्यांच्या काही कृती या माफक परपीडेतून मनोरंजन करण्यापर्यंत पोचल्या असल्या, तरी भाषिक अथवा कृतीप्रधान विनोदापर्यंत अजून तरी पोचलेल्या दिसत नाही...
बघा, विनोदाबद्दल बोलता बोलता गंभीर होत गेलो. आजचा विषय विनोदाचा असल्याने आणि सुरुवात मर्कटकुलाच्या चावटलीलांपासून झालेली असल्याने प्रथम हा वात्रट वानर पाहा.
ते दोनही वाघ अजून बच्चे आहेत हे त्याला माहित असल्याने आणि झाडावर आपण सुरक्षित आहोत याची खात्री असल्याने या परपीडेतून तो आनंद घेतो आहे. दुबळी, भेकड माणसेही जात-धर्मादि कळपात सुरक्षितता शोधून बाहेरील एकट्या-दुकट्याला टोचून आपले शौर्य दाखवण्यात धन्यता मानतात याची जाताजाता आठवण करुन देतो.
हे माकड स्वत: जरी या कृतीचा आनंद घेत असले, तरी ते वाघबच्चे मात्र पीडित आहेत. विनोद हे मनोरंजनाचे असे साधन असते ज्यात सर्वांनाच तो आनंद घेता यायला हवा. यातून मग माणसाने कृत्रिम मनोरंजनाचा शोध लावला. उपस्थितांपैकी कुणाचाही थेट संबंध असलेल्या, नसलेल्या भौगोलिक, पर्यावरणीय, सामाजिक, सांस्कृतिक, कौटुंबिक अशा पार्श्वभूमीवरचे किस्से छोटे विनोद म्हणून, गोष्ट म्हणून, नाटक म्हणून सादर करत त्यातील आनंद वाटून घेण्याची पद्धत सुरु झाली.
पण असे हेतुत: केलेले विनोद वा मनोरंजनच का, काही वेळा हेतू संघर्षाचा नि त्यातून मनोरंजन निर्माण होणे ही गंमतही घडते. सुरुवातीला उल्लेख केलेली ’अति झालं नि हसू आलं’ ही म्हण अशाच स्वरुपाच्या घटनांमधून निर्माण झालेली आहे. नाटक, चित्रपटादि मनोरंजनाच्या माध्यमांतून विनोदाचा हा प्रकारही अनेकदा हाताळला जातो.
हा पहिला व्हिडिओ आहे ’हंगामा’ नावाच्या बॉलिवूड चित्रपटातला. ’संशयकल्लोळ’ या प्रसिद्ध मराठी संगीत नाटकाच्या कथानकावर बेतलेल्या चित्रपटातला हा प्रसंग मात्र सर्वस्वी नवा आहे.
Film: Hungama (2003).
हा प्रसंग पाहिला की मला हटकून फेसबुकसारख्या सोशल मीडियामधून सुरक्षित अंतरावरून शौर्य दाखवणार्यांची आठवण होत असते. तिथे अत्यंत अश्लाघ्य भाषेत परस्परांवर गरळ ओकणारे समोरासमोर आले की कमालीचे सहिष्णु होतात.
वास्तविक समोरचा दोन ठोसे देण्याइतक्या अंतरावर आला, की त्यांची सुरक्षिततेची जाणीव पळून जाते नि मूळ भित्रा स्वभावच उघडा पडत असतो. पण दोनही बाजू आपला भेकडपणा मान्य करण्याऐवजी ’त्या फेसबुकवर ना, आपल्यातलं जनावर जागं होतं. समोरासमोर आपण कसे गुण्यागोविंदाने राहतो.’ म्हणून आपल्या दोषांचे खापर तिसर्यावरच फोडून ’हिंदी-चीनी भाई भाई’ चा नारा लावतात.
भेकडपणासोबतच आलेला हा अप्रामाणिकपणा! हे हत्यार समाजकारण आणि अर्थातच राजकारणातही पुरेपूर वापरले जाते. ’आम्हाला आमच्या नेत्याबद्दल आक्षेप नाही, पण त्याच्या भोवतालची चौकडी/बडवे यांच्या कारवायांमुळे आम्ही पक्ष सोडत आहोत.’ हे असेच एकाच वेळी स्वार्थी, भित्रे आणि अप्रामाणिक विधान...
अरेच्या, हा आणखी एक फाटा फुटला. पुन्हा मूळ मुद्द्याकडे येऊ. वरील प्रसंगात नंदू (आफताब शिवदासानी) आणि जीतू(अक्षय खन्ना) यांच्यात झालेल्या ’बांधावरच्या’ किंवा ’नळावरच्या’ भांडणासारखाच आणखी एक प्रसंग मला सापडला तो अलीकडे गाजलेल्या ’द बिग बॅंग थिअरी’ या मालिकेत.
’वय वाढून बसलेली बुद्धिमान बालके’ असे ज्यांचे वर्णन करता येईल अशा चौकडीभोवती ही मालिका फिरते. यातील हावर्ड आणि राज या तिशीच्या दोन वैज्ञानिकांमध्ये (हावर्ड हा फक्त एंजिनियर आहे, वैज्ञानिक नाही - इति शेल्डन) ’आपण दोघे सुपर हीरो झालो, तर मुख्य हीरो कोण आणि त्याचा दुय्यम साथीदार कोण?’ या मुद्द्यावर जुंपली आहे. या मुद्द्याचा सोक्षमोक्ष थेट कुस्ती खेळूनच लावण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यांचा हा सामना पाहा. फेसबुक वा एकुणात सोशल मीडियावरील भांडणांची आठवण होते की नाही सांगा.
Series: The Big Bang Theory
Episode: The Alien Parasite Hypothesis
2010.
पश्चातबुद्धीने (post-facto) यांना ’लुटुपुटूचे’ म्हणता येईल. असे हे सामने एका प्रकारे मानवी आयुष्यात उपयुक्तही ठरतात. माणसाच्या मनात स्नेह, प्रेमादि गुण आहेत तसे द्वेष, हिंसेसारखे दुर्गुणही. अशा लुटुपुटूच्या लढायाच या दुर्गुणांचा निचरा करण्यास मदत करतात. (गॉसिप अथवा गावगप्पा हे एकप्रकारे सामाजिक बंध बळकट करण्यास मदत करतात असा एक दावा आहे त्याचप्रमाणे.)
ज्या देशात खेळांना भरपूर प्रोत्साहन दिले जाते त्या देशात अशांतता माजण्याचे प्रमाण कमी राखता येते असे म्हटले जाते. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत खेळांना, विशेषत: बास्केटबॉल, फुटबॉल (हा आपल्याकडील फुटबॉलपेक्षा सर्वस्वी वेगळा, पायाला चेंडूचा क्वचित स्पर्श होणार खेळ), रग्बी आदि मैदानी खेळांना अधिक प्रोत्साहन दिले जाते. त्यातून तरुणांच्या अंगातील रग, बंडखोरी, वर्चस्ववादी वृत्ती यांचे शमन व्हावे अशी अपेक्षा असते. सोविएट युनियनच्या उदयानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळांमध्ये त्या देशाचा बोलबाला झाला तो नेमक्या याच धोरणामुळे. असे लुटुपुटूचे वाग्युद्ध हाच हेतू मर्यादित प्रमाणावर साध्य करीत असते.
जयवंत दळवींच्या ’सारे प्रवासी घडीचे’ मध्ये कोकणांतील त्या गावातील लोकांबद्दल दळवी म्हणतात,
सर्वांगाने उघडा राहून फक्त वितीची काष्टी कमरेला लावणारा आमचा शेतकरी कुणाच्या समोर कमरेच्या आकड्याला अडकवलेल्या कोयत्याला हात घालणार नाही. क्वचित त्याने हात घातला तरी कुणी घाबरणार नाही. कोयता हातात धरला तरी तो उगारणार नाही. उगारला तरी मारणार नाही आणि तोल सुटून त्याने मारला तरी तरी तो लागणार नाही! संताप व्यक्त करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आई-बहिणींचा उद्धार करणार्या शिव्या द्यायच्या. देण्यासारखे असे त्यांच्यापाशी एवढेच!
गांधीवधानंतर सर्वत्र जाळपोळ झाली. ब्राह्मणेतरांनी ब्राह्मणांची घरे लुटली. पण आमच्या इकडे तसे काही घडले नाही. "गांधीला मारले ते वाईट झाले. वैर होते तर मरेपर्यंत शिव्या नसत्या का देता आल्या? ठार कशाला मारले." इतकीच प्रतिक्रिया आमच्या गावात झाली.१
थोडक्यात संतापाचे, रागाचे, त्राग्याचे शब्दांनी विरेचन करुन आयुष्याची गाडी पुन्हा सौहार्दाच्या मार्गावर नेण्याची पद्धत तिथे आहे. मानसिक हिंसेचे अशारीर विरेचन हे शिव्यांचे महत्व न जाणता उलट 'शिवी दिली' म्हणून परस्परांचे गळे कापणारा समाज सुसंस्कृत कसा म्हणता येईल? असो.
अखेरीस 'शब्देविण संवादु' मनोरंजनातही संवेदनशीलता बेमालूम मिसळून देणार्या चार्ली चॅप्लिन नामक बादशहाचा उल्लेख अपरिहार्य आहे. हे त्याचं मानाचं पान त्याला देऊ करतो.
Film: City Lights (1931).
हा प्रसंग त्याच्या ’सिटी लाईट्स’मधला आहे. हा प्रसंग इतका गाजला की त्याची नक्कल पुढे अनेक चित्रपटांतून केलेली दिसते. आपल्याकडे 'बॉम्बे टु गोवा’(१९७२) मधील मेहमूद आणि युसुफ खानची तथाकथित बॉक्सिंग मॅच आठवून पाहा. त्या नकलेमध्ये ग्लोव्हज् मध्ये दगड भरण्याचा प्रसंग चार्लीच्याच ’द चॅम्पियन’ या चित्रपटातून उलचलेला आहे.
इथे आर्थिक गरज भागवण्यासाठी, नाईलाजाने चार्ली बॉक्सिंगच्या रिंगणात उतरलेला आहे. त्याअर्थी हा संघर्ष लुटुपुटूचा मुळीच नाही. त्यातून त्याच्या मनातील कोणत्याही दुर्गुणाचे विरेचन होणारे नाही, उलट सद्भावाच्या पोषणासाठी त्याला त्या संघर्षाला सामोरे जाणे भाग पडले आहे. आणि अननुभवी असलेल्या, बॉक्सिंग म्हणेज ठोसे मारणे यापलिकडे काहीही ठाऊक नसलेल्या चार्लीची ही ’बाउट’, बॉक्सिंगसारख्या हिंसक खेळालाही विनोदाची एक झालर जोडून देते आहे...
- oOo -
१. पुस्तक: ’सारे प्रवासी घडीचे’
लेखक: जयवंत दळवी.
प्रकाशक: मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस.
पंधरावी आवृत्ती (जुलै २०१४).
पृ १३२.