गुरुवार, ९ मे, २०२४

जिज्ञासामूर्ती

संशोधनकार्यात दोन दृष्टिकोन असतात: एक म्हणजे, सृष्टीवरच्या प्राणिमात्रांचं जीवन नैसर्गिकच राहावं, मात्र त्याचं गणित समजलं तर आपलं स्वतःचं जीवन अधिक समृद्ध होईल, म्हणून शोधकार्याला महत्त्व देणारे सत्प्रवृत्त संशोधक असतात. लुई लीकी हा अशांपैकी एक. रॉबर्ट यर्क्स हा अर्थातच दुसऱ्या प्रकारच्या संशोधकांत मोडतो.

आपल्या अगतिक समाजजीवनाच्या सीमा ओलांडून, मनुष्यप्राण्यांपासून दूरच्या रानावनांत, घनदाट जंगलात, डोंगर कपारीत वास्तव्याला जावं आणि तिथल्या प्राणिमात्रांच्या नैसर्गिक जीवनप्रवाहात तीळमात्रही ढवळाढवळ न करता, उत्क्रान्तीच्या माळेतला आजच्या घडीला शेवटून दुसरा, म्हणजे माणसाच्या आधीचा मणी जो माकड, त्याच्या जातीचे गोरिला, ओरँगऊटँग, चिंपँझी हे जे तीन प्राणी आहेत, त्यांच्या जीवनाचा शोध घ्यावा असाही प्रयत्न काही शास्त्रज्ञांनी केला. हे प्राणी आणि मनुष्यप्राणी यांच्यातली दरी ओलांडता येते का, नातं शोधता येतं का, यांना जोडणारा धागा कुठे सापडतो का, हे पाहण्यासाठी लुई लीकी (Louis Leakey) या शास्त्रज्ञाने तीन सुशिक्षित तरुण मुलींची योजना केली.

वैयक्तिक गरजा अत्यल्प असलेल्या, कष्टांची पर्वा नसलेल्या, संशोधन- कार्यातच रस असलेल्या या निर्भय मुलींना त्याने बापाची माया दिली आणि या कार्यासाठी लागणारं आर्थिक आणि मनुष्यबळही पुरवलं. आवश्यक तिथे मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या या काहीशा जगावेगळ्या जीवनक्रमाला आधार दिला. या संशोधनासाठी लागणारा खर्च स्वतःच्या आणि जगभरातील इतर संस्था आणि व्यक्ती यांच्या मदतीने उभा केला. त्यांच्या मदतीला स्वयंसेवक आणि शिक्षणोत्सुक विद्यार्थी दिले. या मुलींनी या आधारावर स्वतःला झोकून देत केलेल्या कामाचा अल्पसा परिचय करून देण्याचा हा प्रयत्न.

मण्यांची माळ

या तिघींमधली जेन गुडॉल (Jane Goodall) हिने चिपँझीचा, डियॅन फॉसी (Dian Fossey) हिने गोरिलांचा आणि बिरुटे गाल्डिकास (Birute Galdikas) हिने ओरँगऊटँगचा अभ्यास केला. त्यासाठी आनंदाने वनवास स्वीकारला. रूढार्थाने संसारावर, घरादारावर, आर्थिक उन्नतीवर, सुखोपभोगांवर, थोडक्यात सर्वस्वावर पाणी सोडलं आणि आपलं हे जगावेगळं आणि ‘सुसंस्कृत’ जगाबाहेरचं कार्यक्षेत्र निवडून त्या त्या ‘पर’देशात आयुष्यभराच्या वास्तव्याला म्हणून प्रस्थान ठेवलं.

जेन गुडॉलने ऐन तारुण्यात इंग्लंडहून निघून आफ्रिकेत टांझानियामधल्या गोंबेच्या डोंगरकपारीत तीस वर्ष वास्तव्य केलं. या तीसेक वर्षांच्या काळात अधूनमधून ती इंग्लंडला आणि इतरत्रही अल्पावधीसाठी जाऊन यायची. कधी मीटिंग्जसाठी, कधी आपल्या संशोधन-विषयावर व्याख्यानं देण्यासाठी, कधी तिच्या कार्यावरच्या लघुपटांच्या शूटिंगच्या दृष्टीने, तर कधी पीएच०डी०च्या प्रबंध लेखनासाठी. सुरुवातीची काही वर्ष आपल्या आईसह ती गोंबेला राहिली. इंग्लंडमध्ये घरदार असलेली ही सुशिक्षित मुलगी आफ्रिकेच्या जंगलात तंबू टाकून राहते, रोज सकाळी एक-दोन सँडविच, कॉफीचा थर्मास आणि दुर्बीण घेऊन डोंगर चढून जाते आणि उंचावरच्या काहीशा सपाट जागेतल्या एका खडकावर बसून, चिंपँझी कुठे दिसतात का, याचा शोध घेते.

कळप करून राहणाऱ्या या प्राण्याच्या मोठमोठ्या समूहातल्या प्रत्येकाला पुढे ती त्यांना तिने ठेवलेल्या नावाने ओळखू लागते. आपण केवळ निरीक्षणासाठी इथे आलो आहोत, आपल्यापासून त्या प्राण्यांना कसलाच उपद्रव होणार नाही, हे सिद्ध करण्याचा स्वतःहून कोणताही प्रयत्न न करता ती त्यांच्या जीवनक्रमाचा, हालचालींचा, सवयींचा, आपापसांतल्या नात्यागोत्यांचा आणि इतर प्राण्यांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाचा, मनुष्य प्राण्याबद्दलची जवळीक-दुरावा-प्रेमद्वेष-भीती वगैरे अनेक भावना जाणून घेण्याचा, खाण्यापिण्याच्या आणि लैंगिक गरजांचा, सूक्ष्मातिसूक्ष्म निरीक्षणांतून शोध घेते. संध्याकाळनंतर तंबूत परतल्यावर दिव्यापाशी बसून आपल्या निरीक्षणाची टिपणं करते.

विशिष्ट चिंपँझी मादी, तिची मुलं, नातवंडं, सर्वांना ती व्यक्तिशः ओळखत असते, पण या ओळखीची जाणीव स्वतःहून त्यांच्यावर न लादण्याची तिनं घेतलेली खबरदारीच तिचा अंगभूत सुसंस्कृतपणा सिद्ध करते. जणू ती स्वतःही, त्या जंगलात न जन्मलेला पण तिथे वस्तीला आलेला एक कुणी आपल्यासारखा प्राणीच असावा इतक्या अलिप्ततेने सुरुवातीची काही वर्ष गेल्यावर हळूहळू काही चिंपँझी तिला गृहीत धरू लागतात, निर्धास्तपणे तिच्या जवळपास वावरतात. तिला आपल्यातलीच मानतात. तिच्या ओळखीच्या एका चिंपँझी टोळीप्रमुखाचं नाव तिने ‘डेव्हिड ग्रे बियर्ड’ ठेवलं होतं. चांगली उंचीपुरी, पण शिडशिडीत अंगलटीची जेन ही त्या धिप्पाड ग्रे बियर्ड डेव्हिडलाही बहुधा आपल्या छोट्या बहिणीसारखी वाटू लागली असावी. जेन एकदा भर दुपारी झऱ्याकाठी एका झाडाखाली सावलीत बसली असताना हा डेव्हिडही तिच्या शेजारी येऊन बसला.

त्या झाडावरून नुकतंच पडलेलं फळ उचलून गंमत म्हणून तिने स्वतःच्या तळहातावर त्याच्यापुढे धरलं. त्याने त्या फळाकडे पाहिलं, पण ते उचललं नाही. तिने मग ते त्याला देण्यासाठी स्वतःचा हात आणखी थोडा पुढे केला. मग मात्र त्याने एकदा त्या फळाकडे, मग तिच्याकडे निरखून पाहिलं, ते फळ स्वीकारलं आणि तिचा हातही अलगद आपल्या हातात घेतला. ती मात्र निश्चलच बसून राहिलेली पाहिल्यावर त्याने तिचा हात सोडून दिला आणि आधी स्वीकारलेलं ते फळही जमिनीवर टाकून दिलं. जणू धिक्कारलं. चिंपँझी आणि माणूस या दोन प्राण्यांमधला उत्क्रान्तीचा कोट्यवधी वर्षांचा कालावधी त्या एका क्षणात लुप्त झाला. हा आपला पूर्वज आणि आपण यांतलं एकमेकांतलं नातं तिला त्या क्षणी जाणवून गेलं. शास्त्रोक्त अभ्यासातून निघणाऱ्या निष्कर्षापेक्षा खूप मोलाचा असा हा तिच्या प्रत्यक्ष अनुभवातून प्रतीत झालेला परस्परांच्या-चिंपँझी आणि माणूस यांच्या नात्याचा साक्षात्कार त्या क्षणी जेनला झाला. ‘स्पर्शाची भाषा स्पर्शालाच कळावी’ म्हणतात, तशी ती कळून गेली.

लुई लीकीच्या या तीन मानसकन्यांपैकी सर्वाधिक गाजलं गेलं आणि समृद्ध झालं ते जेनचंच जीवन, असंच म्हणावं लागेल. पण इतर दोघींचं शोधकार्यही तितक्याच तोलामोलाचं आहे. डियान फॉसीने गोरिलांचं निरीक्षणसुद्धा खूप बारकाईने केलं. लहानसहान गोष्टींबद्दलही सगळे तपशील तिनं नोंदवले, खूप टिपणं तयार केली. कळपातल्या प्रत्येकाचं वेगळेपण कशात आहे, याचा शोध घेताना त्यांच्या नाकपुड्यांवरच्या सुरकुत्यांपासून पाऊलखुणांपर्यंत प्रत्येकाच्या वैशिष्ट्यांची मोजमापं, आकडेवारी, आकृत्या, सर्व तहऱ्यांनी तपशीलवार माहिती जमा केली. एक प्राणी या दृष्टीने माणसंही सर्वसाधारणपणे सारखीच दिसतात. पण प्रत्येकाच्या अंगठ्याचा ठसा किंवा सही जाणकाराला बरोबर ओळखता येते. संशोधन कार्यात असे तपशील फार महत्त्वाचे असतात. त्यातून संशोधकाचं स्वतःचं शिक्षणही होतं आणि उत्क्रान्तीतला फार महत्त्वाचा शोधप्रवासही होतो.

ओढ असेल तर चाल सुरू होते आणि मग वाटा सापडू लागतात, मदत करणारे भेटतात. मुळात आपण निरपेक्ष असलो तर नवं नवं दिसत जातं. त्यांतून आणखी नवं सुचत जातं. या साऱ्यासाठी द्यावा लागणारा काळ आणि किंमत वगैरेचा विचार किंवा हिशेब करत बसलं तर हातून काहीच कार्य होणार नाही. एखाद्या कार्यात झोकून देणं आणि त्यातच रंगून जाणं, तेच जीवनाचं सर्वस्व होणं, हीच शोधकार्याची गरज असते आणि अशा मजबूत पायावर ठाम असताना अनेकदा अनपेक्षित फळ पदरी पडून जातं.

लुई लीकीच्या या तिन्ही मानसकन्यांचे शोध म्हणजे वैयक्तिक अनुभवांतून काढलेले निष्कर्ष किवा अंदाज आहेत. व्यक्तिसापेक्षच. त्या-त्या प्राण्यांप्रमाणे या तिघींचीही त्या-त्या प्राण्यातली मानसिक गुंतवणूक, त्यासाठी मोजलेली किंमत, कुवत, दृष्टिकोन, कार्यक्षेत्राच्या नैसर्गिक मर्यादा, स्वतःची शारीरिक शक्ती वगैरेची चौकट या शोधकार्याला आहेच; पण या चौकटीमुळेच येणारा घरगुतीपणा, जिवंतपणा, निर्भय प्रामाणिकपणा आपल्याला खिळवून टाकतो. असले अनुभव माझ्यासारख्या सामान्य माणसांची उत्सुकता टिकवून धरतात. आपले हे तीन संभाव्य पूर्वज आणि त्यांच्यावर अपरंपार माया करणाऱ्या या तीन बाया यांच्याशी आपलं नातं नकळतच जोडलं जातं आणि त्यांच्या अनुभवांशी आपण समरस होतो. आपल्या या कायाकल्पाचा आपल्याला अभिमानही वाटू लागतो.

डियॅन फॉसी ही दमेकरी असूनही सतत धूम्रपान करणारी बाई, जेन गुडॉलसारखीच आफ्रिकेच्या डोंगराळ (आणि छोट्या-मोठ्या ज्वालामुखींच्या) प्रदेशात सतत चढउतार करत गोरिला या प्राण्यावरचे शोधकार्य चालू ठेवते. सर्व आव्हानांना तोंड द्यायला खुषीने पुढे सरसावते आणि हिरिरीने हे काम करत असताना तिच्या या लाडक्या प्राण्यांचा– गोरिलांचा व्यापार करणाऱ्या माणसांच्या टोळ्यांविरुद्ध झुंजही देत राहते. गोरिला हे तर आपणा मनुष्यप्राण्याचे ‘पूर्वज’ आहेत. कोणत्याही परिस्थितीत या वडीलधाऱ्यांचा आदर आणि सांभाळ करणं हे आपलं कर्तव्यच आहे. त्या गोरिलांना अमानुष वागणूक देणाऱ्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे, अशी डियॅनची धारणा होती. गोरिला या मानवाच्या पूर्वजापेक्षा, माणूस हा गोरिलाचा वंशज किती स्वार्थी आणि दुष्ट असू शकतो, याचा धक्कादायक अनुभव आपल्याला डियॅन फॉसीच्या कार्याबद्दलची माहिती वाचताना येतो.

छोट्या छोट्या गोरिलांना बेकायदेशीररीत्या पकडून त्यांचा चोरटा व्यापार करणाऱ्यांविरुद्ध जिद्दीने लढा द्यायला उभ्या राहिलेल्या, गोरिलांच्या लहान लहान पोरांचे हात, पाय तारांनी बांधून विक्रीच्या दृष्टीने त्यांना कोंडवाड्यात डांबून ठेवणाऱ्या माणसांचेही असेच हाल करायला हवेत असं मनापासून मानणाऱ्या, आजारी गोरिलांना स्वतःच्या घरात आणून ठेवून त्यांच्यावर औषधोपचार आणि त्यांची सेवा-शुश्रूषा करणाऱ्या, दिवसाचे चोवीस तास फक्त गोरिलांचाच विचार करणाऱ्या, त्यांनाच सर्वस्व मानणाऱ्या डियॅनचा एका रात्री तिचे डोके फोडून शेवटी खून केला जातो आणि तो मारेकरी शेवटपर्यंत अज्ञातच राहतो, याचा अर्थ काय समजायचा?

गोरिला या प्राण्याने मात्र तिला कधीही दगा दिला नाही. ते सदैव तिचे मित्रच होऊन राहिले. जेन गुडॉलला ‘डेव्हिड ग्रे बियर्ड’ या चिंपँझीचा आला तसाच, अगदी तसाच अनुभव एकदा डियॅन फॉसीला ‘डिजिट’ या गोरिलाचा आला. तीही तिच्या गोरिलांना नावाने ओळखत असे. तिचा लाडका डिजिट नावाचा गोरिला वयात आल्यावर तोही त्याच्या टोळीचा प्रमुख झाला, पोशिंदा, संरक्षणकर्ता झाला. एकदा धो-धो पाऊस कोसळत असताना, आपल्या टोळीच्या मागावर कुणी तरी येत आहे याची जाणीव होताच हा टोळीप्रमुख डिजिट भरपावसात एकदम संरक्षक पवित्रा घेऊन सामोरा आला आणि ही तर आपली मैत्रीण डियन, आपली टोळी सुरक्षित आहे ना याची खात्री करून घ्यायला अपरात्रीही निघालेली आहे, हे लक्षात येताच त्याने आपल्या आवडत्या रानटी सेलरीच्या शेगांची डहाळी तोडून, तिच्या शेंगा काढून सोलून डियॅनला अर्पण केल्यासारख्या तिच्या पायाशी ठेवल्या आणि पाठ फिरवून तो निघून गेला. अशीच आणखी एकदा अनिश्चित हवामानात, ऊन-पाऊस-चिखल-खाचखळग्यांतून ही आजारी डियॅन आपल्या गोरिलांची खबरबात घ्यायला हिंडत असताना थकून झाडाखाली थोडी विसावली. तेवढ्यात तिच्या खांद्यावर कुणी तरी हात ठेवल्याची तिला जाणीव झाली. तिने मागे वळून पाहिले तर तो आश्वासक हात लाडक्या डिजिटचाच होता. त्याने तिला खांद्यावर थोपटले आणि मग तिच्या शेजारी जाऊन बसला; आणि तिनेही मग त्याच्या मांडीवर डोके ठेवून डोळे मिटून घेतले.

बिरुटे गाल्डिकास (Birute Galdikas) ची कथा मात्र याहून वेगळी आहे. माणसाचा पूर्वज चिंपँझीच याची जेन गुडॉलला खात्री होती. डियॅन फॉसीच्या मते, हा पूर्वज गोरिलाच आहे, हे निश्चित होतं. तर बिरुटे गाल्डिकास ही ओरँगऊटँग हाच माणसाचा पूर्वज आणि तो इंडोनेशियात ‘रेन फॉरेस्ट’मध्येच आहे याची खात्री असल्यानं चक्क तिथेच जाऊन राहिली.

‘रेन फॉरेस्ट’मधली पहाट म्हणजे निरनिराळे किडे, बेडूक, हरतर्‍हेचे पशुपक्षी यांच्या एकात एक मिसळलेल्या आवाजांनी फुलणाऱ्या आणि सडणाऱ्या उग्र फळा-फुलांच्या दर्पांनी, उष्ण दमट हवेने अरण्याच्या श्वासांनी निःश्वासांनी गच्च भरलेली. स्वर्ग आणि नरक यांचा एकाच वेळी प्रत्यय देणारी. अगदी सकाळी सकाळी तुम्ही घामाने निथळत असता. पायाखालची वाट काट्याकुट्यांनी आणि दगड-गोट्यांनी, चिखलाने भरलेली असते. कुठल्या झाडाची फांदी कधी डोक्यावर कोसळेल, सांगता येणार नाही. फणसासारखी मोठ्ठाली काटेरी अति पक्व फळं पायाखाली आली काय किंवा चालता चालता डोक्यावर पडली काय, आपण बरबटून जातो. अंगाला काटे टोचतात. आपल्याला रक्तबंबाळ करतात. किडे, मुंग्या, हरतर्‍हेच्या माशा, कोळी, जळवा, असले असंख्य क्षुल्लक वाटणारे प्राणी आणि छोटी छोटी झाडंझुडपं भयानक उन्हाळ्याने आणि त्या दमट हवेने होत्याची नव्हती बनून जातात. असल्या इतर अरण्यांचं तीन-चार वर्षांचं आयुष्य हे ‘रेन फॉरेस्ट’ सहा-सात महिन्यांत जगून संपवतं. इतक्या वेगाने इथलं जीवनचक्र फिरत असतं. इंग्लंडसारख्या प्रगत देशात नैसर्गिक (कलम केलेले वगैरे, कृत्रिम नव्हे.) वनस्पतीचे जे नमुने आढळतात त्याच्या वीसपट तरी तर्‍हेच्या वनस्पती, पशु-पक्षी या रेन फॉरेस्टमध्ये असतील. ओरँगऊटँग तर फक्त इथेच असल्याने बिरुटे गाल्डिकासने संशोधनासाठी हे ठिकाण निवडलं आणि उभं आयुष्य त्या जंगलावर आणि त्या ओरँगऊटँगवर प्रेम केलं.

जंगलात दिवसाचा अंक संपताच रात्रीचा पडदा पटकन पडतो. तिथलं दिवसाचं जग आणि रात्रीचं जग ही अगदी स्वतंत्र विश्वच असतात. काळोखातल्या हालचाली, कुजबूजही आणि प्रसंगी आरोळ्याही दिवसापेक्षा अगदी वेगळ्या सुरातल्या असतात. अभयारण्यात आजही ते ते प्राणी आपापलं नैसर्गिक जीवन जगताहेत. आपापला वंश वाढवताहेत. कोट्यवधी वर्षांच्या उत्क्रान्तीच्या काळात संपर्क नसलेल्या पूर्वजांसारखं आपलं त्यांच्याशी असलेलं नातं आपण विसरलो आहोत. पण आयुष्यात एखादा क्षण असा येतो, की हा मधल्या काळाचा पडदा अचानक नाहीसा होतो आणि हे गुप्त धनाचं घबाड आपल्याला लाभून जातं, आपल्याला थक्क करतं.

बिरुटे गाल्डिकास इंडोनेशियात या शोधकार्यासाठी कायम वास्तव्याला जाऊन राहिली. तत्पूर्वी याच कामासाठी तिथे काही दिवसांसाठी दोन-चार महिन्यांसाठी क्वचित एखाद-दुसऱ्या वर्षासाठीही काही संशोधक जाऊन आले होते; नाही असं नाही. पण युरोप-अमेरिकेच्या तुलनेने फारच मागासलेला, आर्थिकदृष्ट्याही फार गरीब असलेला, लाचलुचपत सरकारी कामांतली दिरंगाई वगैरेंत भारतीयांनाही लाजवील असा कारभार असलेला हा देश बिरुटेने वयाच्या ऐन पंचविशीतच कायम वास्तव्यासाठी निवडला. केवळ ओरँगऊटँग या प्राण्यावरच्या आपल्या शोधकार्यासाठी! आपल्या नवऱ्यासह ती या कामासाठी निघाली त्या वेळी स्वतःच्या पाठीवरून नेता येईल इतकंच सामान, म्हणजे दोन मोठाल्या पिशव्या फक्त त्यांनी घेतल्या होत्या. जरुरीपुरते चार कपडे, दोन पावसाळी टोप्या, दोन-चार भांडीकुंडी, मोजमापांची थोडी साधनं, वह्या, कागद-पेन्सिली, एक फ्लॅश लाइट, बस्स!

इतर प्राण्यांत मिसळायला राजी नसलेला, फणसासारखं ते भयानक वासाचं ‘डुरियान’ फळ आवडीने खाणारा, शक्यतो झाडावरच राहणारा आणि रोज रात्री एखादी फांदी आणि काही पानं यांची नवी गादी करून झाडावरच झोपणारा अशा या ओरँगऊटँग प्राण्याबद्दल बिरुटेला आपल्या पूर्वजांबद्दल, वडीलधाऱ्यांबद्दल असावी तशी खूप आदराची भावना होती. ती मायेने त्यांचा उल्लेख करताना ‘ओरोंग-ऊ-थँग’ असा करी. या प्राण्याचे डोळे हे हुबेहूब माणसाच्या डोळ्यांसारखेच आहेत आणि ते प्राणी आपल्याशी त्या डोळ्यांनी संवाद साधू शकतात, असं तिचं निर्विवाद मत होतं.

पूर्वजांच्या अशा ऋणांची फेड करणं केव्हाही शक्यच नाही, तेव्हा निदान आपल्या या भावनेला थोडं तरी मूर्त स्वरूप द्यांवं म्हणूनच जणू तिने इंडोनेशियासारखा संशोधनकार्याला सर्वार्थाने तापदायक असलेला देशही आपला मानला आणि तिथल्या या प्राण्याला सुरक्षित असा आपला संसार थाटला. पहिली तीन-चार वर्ष तर मनुष्य-वस्तीपासून खूप दूर झोपडीवजा, पावसाळ्यात गळणारं अनेक गैरसोयींनी परिपूर्ण असं घरच या नवरा-बायकोच्या वाट्याला आलं होतं. रानातला लाकूडफाटा गोळा करून जे काही मिळेल ते अन्न चुलीवर शिजवून, कधी कधी टिण्डफूड, तर कधी ते डुरियान किंवा केळंबिळं खाऊनच त्यांनी भूक भागवली.

त्यांच्या त्या झोपडीत म्हणा किंवा तंबूत म्हणा, त्यांच्या सोबतीला आजारी असलेली किवा पोरकी, चोरटा व्यापार करणाऱ्यांकडून छापा घालून सरकारने परत मिळवलेली तिच्या त्या ‘ओरोंग-ऊ-थँग’ची पोरं असत. त्यांचं संगोपन करतानाच, काट्याकुट्यांनी ओरखडे आलेल्या छोट्या-मोठ्या जखमा झालेल्या स्वतःच्या शरीराची मलमपट्टी करण्याचं कामही अनेकदा करावं लागे. रानात चालताना कपड्यांत शिरून अंगाला डसलेल्या आणि रात्री तंबूत परतेपर्यंत रक्त पिऊन टर्र झालेल्या जळवाही अनेकदा त्यांना स्वतःच्या अंगावर सापडत. एकदा रात्री तर आपल्या पायाशी काही तरी हुळहुळल्यासारखं वाटल्याने तिने दिवा लावला तेव्हा चक्क वेटोळं घातलेला एक नागच डोलताना दिसला. तत्पूर्वी तिला तो डसला नव्हता हे नशीबच म्हणायचं.

रानातल्या आपल्या राज्यात आपल्या नकळत शिरणाऱ्या मनुष्यप्राण्याला घाबरवून सोडण्यासाठी म्हणा किंवा तोंड देण्यासाठी म्हणा, झाडावरून् त्यांच्या अंगावर शी-सू करणं, मोठाल्या फांद्या तोडून किंवा ओंडके हातात घेऊन त्यांना झोडपण्याचा प्रयत्न करणं असले प्रतिकारात्मक उपायही या ओरँगऊटँगला अवगत असतात. अशा शोधकार्यात मृत्यू किती जवळपास वावरत असतो, याचा प्रत्यय अनेक संशोधकांना आला असणारच. तो मृत्यू प्रत्यक्ष वाट्याला आलेल्या कित्येक हुतात्म्यांच्या बलिदानावरच माणसाची ज्ञानलालसा आणि सतत प्रगत होणारं संशोधनकार्य मूळ धरून उभं आहे.

असं शोधकार्य हे खरं तर व्यक्तिनिरपेक्ष, निव्वळ सत्य असायला हवं. पण जिवंत प्राण्यांवर संशोधन करीत असताना सहवासाने म्हणा किंवा कशामुळे कोण जाणे, पण नकळतच तो संशोधक त्या प्राण्यांत काहीसा गुंततोच. ते ते प्राणीही काही काळाने माणसाबद्दलची भीती कमी झाल्याने आपला विश्वास संपादन करतात. शेवटी आपण सगळे प्राणी, ‘प्राण’ हा नश्वर असतो या खोल जाणिवेने कधी ना कधी काहीसे सैल होतो आणि एकमेकांबद्दल विश्वास बाळगून जगण्याच्या प्रयोगात सामील व्हायला तयार होतो.

ओरोंग-ऊ-थँग या माणसाच्या पूर्वजाचा अभ्यास करताना इंडोनेशियात वास्तव्याला आलेल्या बिरुटेच्या कामाचा व्याप हळूहळू इतका सर्वदूर वाढत गेला की, जणू एखाद्या दरीने जबडा पसरून मोठ्ठी जांभई द्यावी तसा तिच्या कामाचा, तिच्यावरच्या जबाबदारीचा आवाका होऊन राहिला. प्रचंड. तिनेच स्वतः वर ओढवून घेतलेला. त्यातून तिला आलेला एक अनुभव कुणालाही पटेल असा साधासुधा आणि खराखुरा आहे. माणसाची जात ही पराकोटीची स्वार्थी आणि प्रसंगी अत्यंत उद्धट आहे, पण व्यक्तिशः माणूस मात्र फार चांगला मित्र असू शकतो. याचाच अर्थ माणूस हा अद्याप प्राणीच, म्हणजे उन्नत पशूच आहे आणि पशू हेच माणसाचे पूर्वज आहेत, हा अनुभव हाच या संशोधनाचा मथितार्थ.

दगडाचे हळूहळू झिजून गोटे व्हावे तसे अनुभवांतून तावूनसुलाखून निघालेल्या बिरुटेच्या बोलांना गोलाई आली होती. तिचे शब्द कुणालाही दुखवत नसत. ते गद्य संगीतासारखे वाटत. त्याबरोबरच हेही जाणवे की, त्यांची पाळेमुळे खोल मातीला घट्ट धरून शुद्ध जीवनरसावरच पोसली जाताहेत. दीड कोटी वर्षांपूर्वीचे आपले आणि ओरोंग-ऊ-थँगचे पूर्वज एकच असावे. प्रेम, जिव्हाळा, वात्सल्य, सुखदुःख, भूक, चव असे बरेचसे अनुभव दोघांचेही सारखेच असावे. क्वचित एकान्ताची आवडही, मैत्रीची एकनिष्ठता किंवा बांधिलकीही, लागेबांधेही, बहुधा आठवणीही.

बिरुटेही तिच्या संशोधनात ओरोंग-ऊ-थँगच्या टोळीतील प्रत्येकाला तिने ठेवलेल्या नावाने ओळखत होती. स्वतःच्या बाळाला जोजवत आपल्या घराजवळच उभ्या असलेल्या बिरुटेच्या समोर एकदा राल्फ नावाचा ओरोंग-ऊ-थँग तंबूत जायला म्हणून येताना तिला दिसला. ती न डगमगता त्या वाटेत बाळाला घेऊन तशीच ठाम उभी राहिली. चौदा-पंधरा फुटांवर आल्यावर राल्फ थांबला आणि ‘वाटेतली दूर हो’ असं उर्मटपणाने सांगावं तसं हनुवटी उचलून मानेनं त्यानं तिला खुणावलं. तो इतका नजीक होता, तिच्या हातात तान्हं मूल होतं. तरीही जीवाचा धीर करून ती तशीच त्याच्यासमोर उभी राहिलेली पाहून राल्फनं तिच्या डोळ्याला डोळा दिला आणि मागे वळून तो निघून गेला. हे धिप्पाड जनावर एखाद्या समंजस माणसासारखं आपल्याशी वागलेलं पाहून तिचे डोळे भरून आले. घाबरून पळून तरी जाणं किंवा हल्ला तरी करणं या दोनच गोष्टी जाणणाऱ्या या प्राण्याच्या त्या कृतीतून तिच्याबद्दलची त्याची भावना स्पष्ट झाली.

भली माणसं तरी याहून वेगळं काय करतात? परस्परांतलं नातं ते हेच नव्हे का? त्यानंतर एकदा ती कॅम्पपासून खूप दूर रानात फिरत असताना, एका झाडावर हा राल्फ एका ओरोंग-ऊ-थँग मादीशी, त्या क्षणीच्या त्याच्या प्रेयसीशी लाडीगोडी करत असताना तिला दिसला. ओरोंग-ऊ-थँग प्राण्यांचा नर-मादी समागम खरं तर तिला पाहायचाच होता. तिच्या शोधकार्याच्या दृष्टीने असे सगळे तपशील महत्त्वाचे होते. पण या राल्फशी आपलं जोडलं गेलेलं नातं, त्याने आपल्या बाबतीत दाखवलेला समंजसपणा आठवून तीही त्या क्षणी त्या जोडीकडे पाठ फिरवून तिथून निघून गेली. राल्फ तिचा मित्र झाला होता ना? मग एखादा ओरोंग-ऊ-थँग अशा परिस्थितीत जसा वागला असता तसंच वागणं तिला प्रशस्त वाटलं. प्राण्यांशी दोस्ती करायची तर माणसाचे नियम त्यांच्यावर लादून चालणार नाही. ती बळजबरी होईल, ते प्रेम नव्हे, तो समजूतदारपणा नव्हे.

पण बिरुटेचा सर्वांत जास्त जीव जडला होता तो सुपिन्हा (Supinah) या ओरोंग-ऊ-थँग मादीवर. सुपिन्हाच्या योनिमार्गाला एकदा जखम झाली आणि पुढे ती जखम चिघळून त्यात किडे पडले. मग त्यापोटी तिचं छोटंसं ऑपरेशनही करावं लागलं. ऑपरेशनच्या वेळी भूल तर द्यावीच लागते, पण सुपिन्हावर त्या भुलीचा व्हावा तसा परिणाम होईना आणि तिला आवश्यक ती गुंगी येईना. त्या वेळी सुपिन्हाच्या केसांतून फणी फिरवत, मायेने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत, रडणाऱ्या लहान मुलाची आपण समजूत घालतो तशी सुपिन्हाशी गोडऽगोड बोलत बिरुटे कावऱ्याबावऱ्या झालेल्या सुपिन्हाला समजावत होती. ओरोंग-ऊ-थँगच्या अशक्त किंवा आजारी अर्भकांची ती खूप काळजी घ्यायची.

तिचं सगळं घरच तिने जणू दत्तक घेतलेल्या ओरोंग-ऊ-थँग अर्भकांनी भरलं होतं. एखाद्या अनाथाश्रमासारखं. हे घर सदैव अस्ताव्यस्त असे. ७०-८० छोट्या-छोट्या ओरँग-ऊ-थँगचा तिथे धुडगूस चाले. मोडतोड, उलथापालथ, आपापसांतले खेळ आणि मारामाऱ्या, कोणत्याही भांड्यात तोंड घालणं, कशातही थुंकून ठेवणं. त्या घराला घरपणाच राहिला नाही. वैवाहिक जीवनात जो काही एकान्त, काही गलबला असतो, त्यातला एकान्त क्षणभरही लाभेना झाला. फक्त ओरँग-ऊ-थँग याशिवाय दुसरा कसलाच विषयही आणि विचारही शिल्लक राहिला नाही. तेव्हा शेवटी तिच्या जोडीने तिच्या या कार्याला संपूर्ण वाहून घेतलेला तिचा नवरा रॉड हादेखील थकला. त्याची सहनशक्ती संपली आणि शेवटी तिला सोडून तो निघून गेला. भरल्या डोळ्यांनी त्यांनी एकमेकांचा निरोप घेतला.

त्यानंतर दोन वर्षांनी तिने तिच्या कामात तिला मदत करणाऱ्या पाक बोहाप (Pak Bohap) या इंडोनेशियन माणसाशी लग्न केलं. हा नवरा मुलगा तिच्याहून वयाने सातेक वर्षांनी लहान तर होताच; पण त्याची उंची, वजन, शरीरयष्टी काहीच तिच्या थोराडपणाला साजेसं नव्हतं. त्याला इंग्रजी येत नव्हतं. पण त्याच्याशी लग्न झाल्यावर तिच्या कामात तिला होणारा इंडोनेशियन सरकारी अधिकाऱ्यांचा जाच मात्र जवळ जवळ संपला. आणि पोरक्या ओरँग-ऊ-थँगचं पालनपोषण करून ते पुरेसे मोठे झाल्यावर स्वतंत्र जीवन जगायला त्यांना जंगलात सोडण्याच्या या जोडप्याच्या कार्यातले अडथळे दूर झाले.

लुई लीकीच्या या तिन्ही मानसकन्यांनी आपापल्या परीने माकडाच्या जातीतले गोरिला, ओरँग-ऊ-थँग आणि चिंपँझी या तीन प्राण्यांपैकी माणसाचा पूर्वज निश्चित कोण, ते शोधून काढण्याच्या कार्याला आपापलं आयुष्य वाहिलं आणि आपण सांगतो तोच नेमका माणसाचा पूर्वज आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. शेवटी त्यातून नेमकं काय सिद्ध झालं, ते माझ्या तरी लक्षात आलं नाही. पण त्या तिघींनीही त्या-त्या प्राण्यावर आणि त्या-त्या प्राण्यांनीही या तिघींवर जिवाभावाने प्रेम केलं ही गोष्ट निर्विवाद. त्यांच्या जीवनक्रमाबद्दल आणि शोधकार्याबद्दल वाचत असताना स्वतः तो लुई लीकी आणि त्याच्या या तीन मानसकन्या यांच्यावरून आपला स्वतःचा जीव ओवाळून टाकावा अशी भावना आपल्या मनात रेंगाळत राहते, हेही तितकंच खरं.

-oOo -

पुस्तक: मण्यांची माळ
लेखिका: सुनीता देशपांडे
प्रकाशक: मौज प्रकाशन गृह
आवृत्ती तिसरी
वर्ष: २००४
पृ. ८६-९४.

---

संबंधित लेखन:
वेचताना...: जिज्ञासामूर्ती
माकडे, माऊली आणि तिच्या मुली


संबंधित लेखन

३ टिप्पण्या:

  1. 👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽

    उत्तर द्याहटवा
  2. आपल्या पूर्वजांच्या शोधात...निधड्या छातीने.. जंगलात हिंडणाऱ्या या मानसकन्यांमधील स्त्री सुलभता..अभ्यासकार्यासारख्या क्लिष्टेतही..किती नैसर्गिक वाटली..

    उत्तर द्याहटवा