शनिवार, २५ मे, २०२४

छोटीशीच आहे फौज आपुली

मनुष्यप्राणी हा सर्वांत बुद्धिमान प्राणी हे तर खरेच. पण इतरही प्राण्यांना आपापल्या परीने कमीअधिक बुद्धी असतेच. स्वसंरक्षणासाठी तरी ते थोडीफार अक्कल वापरतातच. मत्स्यावतार हा आपण प्रथमावतार मानतो. माशांचेच उदाहरण घेतले तर पाण्याखालच्या साम्राज्यातला जगायचा पहिला हक्क हा माशांचा. पोटासाठी मच्छीमारी करणाऱ्या कोळ्यांना माशांनी आजवर समजून घेतले. तो एक निसर्गक्रमच आहे म्हणा किंवा जीवसृष्टीचा तो नियम आहे म्हणा किंवा जीवनचक्र अखंडित राहण्यासाठी अत्यावश्यक अशी अट आहे म्हणा, मासे स्वतःही आपल्याहून छोटे मासे खातात, तेव्हा माणसानेही खाण्यासाठी मासे पागले तोवर माशांनीही समजूतदारपणा दाखवला.

पण यंत्रयुगातला मानव जेव्हा वेगवेगळी स्फोटके, हत्यारे शोधून काढून पाण्याखालच्या साम्राज्यात घुसखोरी करून, कधी गंमत म्हणून तर कधी शिकार म्हणून, कधी भौतिक शोधातली आव्हाने स्वीकारावी आणि शौर्य गाजवावे म्हणून स्वतःचे बुद्धिश्रेष्ठत्व सिद्ध करायला लागला, तेव्हा माशांनाही मग विचार करणे भाग पडले असावे. स्वतःच्या मर्यादांचा त्यांनी अंदाज घेतला. स्वसंरक्षणाचे नवे मार्ग शोधून काढले. त्या त्या हत्याराच्या विध्वंसक शक्तीचीही एक कमाल मर्यादा असते. पाण्यातल्या शिकारीसाठी जे जे नवे शस्त्र माणूस निर्माण करत गेला, त्या त्या शस्त्राच्या पल्ल्याचा अंदाज घेऊन, त्या शिकारीचा सुगावा लागताच त्या शस्त्राच्या कक्षेच्या पलीकडे सुरक्षित अंतरावर झटकन निसटून जावे हे श्रेयस्कर, इतकी अक्कल माशांनाही आहे हे आता सिद्ध झाले आहे.

‘जीवो जीवस्य जीवनम्’ हे एकमेकांसाठीचे नाते सर्वत्रच, अगदी रानावनातही असतेच. पण जगण्याच्या या मर्यादा उल्लंघण्यासाठी नसतात. जन्ममरणाचा, जीवसृष्टीतल्या हारजितीचा हा खेळ अखंडित राहावा असे वाटत असेल तर त्यासाठी त्या मैदानावर उतरणाऱ्याने त्या खेळाचे नियम पाळायलाच हवेत. विज्ञानाचा पायाही गणिती काटेकोर विचारसरणीवर रचलेला आहे. या गणिताचे नियम मोडले तर तो पायाच डळमळेल आणि कळसासकट सारा मनोराच जमीनदोस्त होईल.

सोयरे सकळ

शिवाय वैज्ञानिक प्रगती याचा अर्थ कमीत कमी श्रमांत नवनवे, जास्तीत जास्त सुखोपभोग झटपट घेता येण्याच्या सोयी निर्माण होणे हाच नव्हे. प्रत्येक गोष्टीच्या जोडीने तिचे सहचारी भावही येतातच. नवे शोधही याला अपवाद नाहीत. तेव्हा विज्ञानाच्या प्रगतीकडेही आपण डोळस दृष्टिकोनातून पाहायला हवे. ती योग्य दिशेनेच होत आहे ना याची सतत खात्री करून घ्यायला हवी. कोणताही मोह, अगदी प्रगतीचाही मोह आपल्या सदसद्विवेकबुद्धीवरही मात करत नाही ना या बाबतीत कायम जागरूकता हवी. ही चिकित्सक दृष्टी म्हणजेच वैज्ञानिक दृष्टी ना?

कोलंबसाने अमेरिकेचा शोध लावल्यानंतर युरोपातून माणसांचे लोंढेच्या लोंढे अमेरिकेत स्थायिक व्हायला आले. तिथल्या जमिनीवर, निसर्गसंपत्तीवर आक्रमण करून त्यांनी आपली श्रीमंती वाढवायला सुरवात केली. ही संपत्तीची हाव वाढतच गेली आणि मग ‘गोल्ड रश’ सुरू झाला. सोन्याच्या खाणींच्या दिशेने या गोऱ्या लोकांनी आपले मोर्चे वळवले. मैलोन्‌मैल प्रवास करत हे लोक त्या मार्गाने निघाले. 

वाटेत त्यांना तिथल्या आद्य रहिवाशांच्या अनेक वस्त्या लागल्या, अनेक डोंगरदऱ्या, राने, अरण्ये लागली. तिथले ते रेड इंडियन आदिवासी हे आपल्यासारखे गौरवर्णी नाहीत म्हणजे ते आपल्याहून दुय्यम, हीन, त्यांची संस्कृतीही हीनच, असे या लोकांनी गृहीतच धरले. आपला वर्ण गोरा, आपली यांत्रिक प्रगती अधिक, आपली हत्यारे अधिक समर्थ, लेखनवाचनादी कलांत आपण प्रगत, म्हणजे आपली संस्कृतीही श्रेष्ठच, असे मानून या गोऱ्या लोकांनी तिथल्या आदिवासीना कस्पटासमान लेखून त्यांच्यावर आक्रमण केले. केवळ शिकारीचा मझा लुटायला म्हणून वाटेतल्या रानातले प्राण्यांचे कळपच्या कळप बंदुकीच्या गोळ्यांनी ठार केले. निष्कारण मारून टाकलेल्या त्या प्राण्यांचे ढीग कुजू लागले आणि सर्वत्र रोगराई पसरू लागली. तिथल्या आदिवासीना त्या गोऱ्या प्रवाशांच्या या कृतीचा अर्थच कळेना.

शिकार हा त्यांच्याही जीवनाचा अविभाज्य भाग होताच; पण त्यांची शिकार वेगळी होती, अपरिहार्य होती, त्यामुळे बळीचा मान राखून ती केली जाई. रानातला एक बैल मारला की त्याचे मांस खाण्यासाठी, कातडे पोशाखासाठी, हाडे, शिंगे वगैरे ही अवजारे, हत्यारे आदींसाठी, केस दोरखंड करण्यासाठी, असा पायाच्या नखापासून मेंदूच्या कवटीपर्यंत त्या प्राण्याचा उपयोग केला जाई. ही शिकार हा त्या लोकांच्या जगण्यासाठी आवश्यक असा जीवनक्रम होता. केवळ गमतीसाठी दुसऱ्याचा जीव घेण्याची ती बेपर्वाई नव्हती. प्रथम मारलेला प्राणी संपला, आता अन्नवस्त्रासाठी वगैरे दुसरा प्राणी मारण्यावाचून गत्यंतर नाहीसे झाले, म्हणजे त्यानंतरच ते दुसऱ्या प्राण्याच्या शिकारीला निघत. त्यामुळे गरज नसताना, निव्वळ खेळ म्हणून हत्यारे चालवून वन्य प्राण्यांची गोऱ्या लोकांनी चालविलेली ती कत्तल पाहून, हे इतके असंस्कृत लोक इथे आले तरी कुठून तेच त्या आदिवासी रेड इंडियन लोकांना कळेना.

मनुष्यप्राणी आणि मनुष्येतर जीवसृष्टी यांच्यातले नाते हे शत्रुत्वाचे, परकेपणाचेच कशासाठी राहायला हवे? निष्कारण हिंसा हा माणसाच्या सुखाचा, आनंदनिर्मितीचा आवश्यक घटक आहे का? आपल्यातल्या विध्वंसक शक्तींचे मोकाट प्रदर्शन हेच स्वतःच्या बुद्धीचे सामर्थ्य सिद्ध करण्याचे एकमेव साधन असायला हवे का? बुद्धिमत्तेप्रमाणेच संस्कृती हेही माणसाचेच व्यवच्छेदक लक्षण आहे ना? मग त्या मागनिच आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा आनंद आपण कां गमावायचा? परिणामी विध्वंसक ठरणाऱ्या बुद्धिजन्य कर्तृत्वापेक्षा सुसंस्कृतपणाचा अभिमान आपण कां बाळगायचा नाही?

जग जिंकायला निघालेल्या अलेक्झांडर दि ग्रेट या पराक्रमी राजाने सुरवातीच्या काळात आजूबाजूचे अनेक देश जिंकून काबीज केले. त्यांतल्या पराजित पर्शियन लोकांची संस्कृती या ग्रीक संस्कृतीपेक्षा वेगळी होती. नुसती वेगळी असणे यात नवल काही नाही. पण ती ती संस्कृती ज्या नैतिक मूल्यांवर आधारलेली असते, त्या मूल्यांच्या तुलनात्मक श्रेष्ठत्वावर सर्व काही अवलंबून असते. दोन्ही देशांतून वाहणारी एकच नदी घेतली तरी त्या नदीशी त्या त्या देशबांधवांचे नाते कोणते आहे हे पाहून त्या त्या देशाची संस्कृती जोखता येते. ग्रीक लोक नदीत उड्या टाकत, पोहत, काठाशी वाहत्या पाण्यात कपडे, घोडे, भांडीकुंडी धूत, नदीचे पाणी अशुद्ध करत. पर्शियन लोकांना कळेना की हे जेते असले तरी या ग्रीकांना सुसंस्कृत कां म्हणावे?

ते पर्शियन लोक स्वतःही नदीचेच पाणी वापरत. तीच तर त्यांची जीवनदात्री होती. नदीचे पाणी ते भरून नेत आणि मग ते आपल्या गरजेप्रमाणे वापरत. पण जी आपल्याला पाण्यासारखी अत्यावश्यक गोष्ट अनंतहस्ते विनामूल्य पुरवते, त्या नदीबद्दल डोळस कृतज्ञतेची भावना ठेवणे ही त्या पर्शियन लोकांची सांस्कृतिक गरज होती. पाणी स्वच्छ राखले काय किंवा घाण केले काय, नदी थोडीच तक्रार करणार? ती तशीच वाहत राहणार. पण प्रवाहाच्या पुढल्या प्रवासात तिथल्या काठावरच्या लोकांच्या वाट्याला येणारे पाणी गढूळ, अस्वच्छ होत असेल तर आधीच्या किंवा वरच्या प्रदेशातल्या रहिवाशांच्या निष्काळजी, बेपर्वा, असंस्कृत आचारांचेच ते प्रतीक नव्हे का? आपण असे अविवेकी वागणे हे आपल्यालाच अशोभनीय आहे याची सततची जाणीव ठेवणे हेच सुसंस्कृतपणाचे लक्षण. मग तरीही माणसे अशा बेपर्वाईने कां वागतात? मला वाटते, याचे कारण एकच असावे की बेपर्वाईने वागणे हे अधिक सोपे असते. विचार करायचा त्रास कोण घेते? पण मग प्रश्न असा येतो की विचार न करताच वागणाऱ्या मनुष्यप्राण्याला बुद्धिमान प्राणी कां म्हणायचे?

कुणी म्हणेल, कारस्थाने रचायला, स्वार्थ साधायलाही बुद्धी लागतेच. मग असा माणूसही बुद्धिमानच नव्हे का? किंवा अत्यंत शक्तिशाली विध्वंसक शस्त्रास्त्रे तयार करणाऱ्यांना आपण बुद्धिहीन म्हणायचे का? हा प्रश्न एका अर्थी बरोबर आहे. कृत्य हे बरे, वाईट दोन्ही तर्‍हेचे असू शकते. फळ रसरशीत, मधुर असते तसे सडके, किडकेही फळ असते. समर्थांनी ‘श्रेष्ठ धारिष्ट्य जीवीं धरावें’ म्हटले आहे. धारिष्ट्याप्रमाणेच बुद्धीही श्रेष्ठ आणि कनिष्ठ अशी दोन्ही प्रकारची असते. किंबहुना असे म्हणणे अधिक अचूक ठरेल की बुद्धी हीही त्या नदीच्या पाण्यासारखी फक्त ‘असते’. आपण तिला कोणती दिशा देतो, तिचा कसा वापर करतो त्यावर तिचे श्रेष्ठत्व किंवा कनिष्ठत्व अवलंबून असते.

गेल्या महायुद्धात हिरोशिमावर बाँब टाकून स्वतःच्या विध्वंसक शक्तीचे श्रेष्ठत्व सिद्ध करणारे शेवटी जिंकले. त्याहून अधिक विध्वंसक अस्त्र जर त्या क्षणी शत्रुपक्षाला लाभले असते तर या जयाचे पारडे फिरले असते. याचा अर्थ, शेवटी जय झाला तो अणुबाँबचा, त्या काळातल्या सर्वश्रेष्ठ विध्वंसक शक्तीचा.

या अणुबाँबची कल्पना करणाऱ्या आणि त्याचा शोध लावणाऱ्या थोर थोर शास्त्रज्ञांनी युद्धोत्तर काळात केलेले लिखाण आणि व्यक्त केलेले विचार पाहिले की लक्षात येते, त्या सगळ्यांना स्वतःच्या कृतीचा पश्चात्ताप झाला. विज्ञानाचा असा उपयोग त्यांना अभिप्रेत नव्हता. विध्वंसक शस्त्रास्त्रे ही विध्वंसच करणार हे साधे गणित या एवढ्या मोठ्या बुद्धिमंतांना सुरवातीलाच कळले कसे नाही? असा प्रश्न पडतो आणि वाटते, माणूस लहान असो अगर मोठा, त्याच्या बुद्धीला ज्वर चढला की तिची चाल बिघडते, ती भरकटते आणि मग तिच्या आधारावर उभा असलेला साराच डोलारा कोसळू लागतो.

बुद्धिभ्रम झाला की आपला सदसद्विवेक काम करीनासा होतो. ‘बळी तो कान पिळी’ किंवा ‘समर्थ असतो तोच टिकून राहतो’ हा तर निसर्गाचाच नियम आहे आणि टिकून राहण्याची इच्छा हीही नैसर्गिकच आहे. तेव्हा स्वतःचे सामर्थ्य वाढवण्याचा प्रयत्न करणे ही स्वाभाविक प्रवृत्तीच असते. मग हे वाढवलेले सामर्थ्य सिद्ध करून दाखवणे आलेच. अशा वेळी आपले शरीर, मन, कल्पनाशक्ती, बुद्धी, कर्तृत्व, ऐश्वर्य, सत्ता वगैरे अनेक शक्तींचे बळ इतरांपेक्षा श्रेष्ठ असल्याचे सिद्ध करत राहणे हेच जीविताचे प्रयोजन होऊन बसते. सारा प्रवास त्याच दिशेने होत राहतो. तीच एक नशा चढते आणि ती आपल्या सर्वस्वाचा कब्जा घेते.

हे सगळे संकुचित स्वार्थापोटीच होते असे नाही. जात, धर्म, राष्ट्र, विशिष्ट राजकीय विचारसरणी– अशा अनेक विशाल संकल्पनाही माणसाला त्या दिशेने प्रवास करायला प्रवृत्त करतात. अमली पदार्थांसारख्याच या अमली संकल्पना किंवा मतप्रणालीही भल्याभल्यांच्या बुद्धिभ्रमाला कारणीभूत होताना दिसतात. एकीकडून अशा कुठल्या तरी विचारसरणीचा असर, दुसरीकडून विज्ञानाच्या प्रगतीच्या झेपेतून सतत प्रचंड प्रमाणात वाढत असलेल्या आमच्या गरजा, अशा रेट्यातून माणसाची संवेदनाशक्तीच बोथट होऊ लागली आहे. अशा वेळी प्रश्न आहे तो हा, की सर्वांत बुद्धिमान प्राणी जो माणूस, त्याने ‘हा रस्ता अटळ आहे, माझ्या मना बन दगड’ हे सूक्त वाच्यार्थाने घेऊन टणक दगड बनत जायचे की ‘वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे’ हे सूक्त आचरणात आणण्याचा प्रयत्न करून फुलत जायचे?

स्वार्थाबरोबरच परमार्थाची, संकुचिततेबरोबरच विश्वात्मकतेची जाणीव ही बुद्धिमान अशा मनुष्यप्राण्यातच दिसून येते. जीवसृष्टीच्या चक्रात आजच्या घडीला मनुष्यप्राणी हा सर्वश्रेष्ठ म्हणता येईल तो केवळ या जाणिवेचा ठेवा फक्त माणसालाच लाभला आहे म्हणून. या प्रसादाचा कृतज्ञतेने स्वीकार करण्यातला निरामय आनंद लुटायच्या श्रेयस्कर मार्गाने जायचे की प्रवाहपतित व्हायचे ते जो तो आपापल्या परीने ठरवणार आणि शेवटी यांतले कोणते पारडे जड होते त्यावर एकूण जीवनप्रवाहाची दिशा अवलंबून राहणार.

आजच्या घडीचे चित्र असे आहे की हा अविचाराचा आणि मोहाचा प्रचंड लोढा इतक्या वेगाने फोफावत येत आहे की त्यात मूठभर सदसद्विवेकी आणि संवेदनाशील माणसे तग धरू शकणार नाहीत हे स्पष्टच दिसतेय. अशा वेळी अनिलांची ‘प्रेम आणि जीवन’ ही कविता आठवते. परस्परांच्या प्रेमात पडलेली तरुण मुलगा आणि मुलगी, त्यांच्या मीलनाला चहूबाजूंनी होणारा विरोध पाहून घाबरतात, आत्महत्या करतात. त्यांना उद्देशून कवी म्हणतो, जिवाभावाने प्रेम करणे ही गोष्ट मुळात इतकी दुर्मिळ आहे, की अशी तुमच्यासारखी माणसे फार थोडी आहेत. ‘छोटीशीच आहे फौज आपुली’. अशा वेळी त्यातली दोन माणसेदेखील कमी होणे म्हणजे फार मोठे, न परवडणारे नुकसान आहे. ‘जगणें आहे धर्म सर्वांचा, प्रेमी जनांचें तें कर्तव्य आहे’.

याच चालीवर म्हणावे वाटते, सोयरे सकळ हा जीवसृष्टीचा धर्म आहे, पण जागृत माणसाचे ते कर्तव्यही आहे.

(‘सोयरे सकळ’ या लेखातून)

-oOo -

पुस्तक: सोयरे सकळ
लेखिका: सुनीता देशपांडे
प्रकाशक: मौज प्रकाशन गृह
आवृत्ती तिसरी
वर्ष: २००३
पृ. ५७- ६१.

---
टीप: मोबाईलच्या लहान पडद्यावर वाचण्यास सुलभ व्हावेत म्हणून मजकुरात अथवा वाक्यांच्या क्रमात कोणताही बदल न करता, काहीही न वगळता, भर न घालता मूळ लेखातील एक-दोन मोठे परिच्छेद लहान परिच्छेदांत विभागले आहेत.


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा