गुरुवार, ९ मे, २०२४

वेचताना... : जिज्ञासामूर्ती

‘एक ना धड भाराभार चिंध्या’ म्हणा किंवा ‘अनावर जिज्ञासा नि अशक्त चिकाटी’ म्हणा अशा वृत्तीने जगत असताना मला स्तिमित करणारे बरंच काही सापडत गेलं. रुजलं नाही तरी भावत गेलं.

मण्यांची माळ

काही वर्षांपूर्वी पक्ष्यांबद्दल कुतूहल जागं झालेलं असताना एका निसर्गप्रशिक्षण शिबिराला उपस्थिती लावली होती. तिथे प्रायमेट्स म्हणजे वानरकुलातील प्राण्यांवरील व्याख्यानामध्ये जेन गुडाल या विदुषीचे नाव प्रथम ऐकले होते. मोजका काळ वगळता सारं आयुष्य चिंम्पान्झींच्या सहवासात व्यतीत करुन चिकाटीने त्या प्रजातीच्या जगण्याचे तिने दस्तऐवजीकरण केले होते. त्यातून मानवी जीवनप्रवासाच्या अनेक कोड्यांना सोडवण्यात अनुभवसिद्धता, निरीक्षणक्षेत्रात मोठा वाटा उचलणार्‍या या स्त्रीने मला स्तिमित केले होते. पुढे तिच्यासह तसंच तिच्या अनुभवाच्या आधारे चित्रित केलेले काही माहितीपट पाहण्यात आले नि तिच्या अफाट कामाची प्रचिती येत गेली.

पण पुढे असे लक्षात आले, की असली अफाट जिज्ञासा नि समर्पणभाव घेऊन जगलेली ही एकच नाही. डायान फॉसी नामे आणखी एक माऊली गोरिला या अन्य वानर प्रजातीशी याच धर्तीवर जोडली गेली आहे हे प्रथम समजले. त्यानंतर ‘गोरिलाज्‌ इन द मिस्ट’ (१९८८) या नावाचा चित्र-कम्‌-चरित्रपटही पाहण्यात आला. निव्वळ जिज्ञासा, दस्तऐवजीकरण या पलिकडे जाऊन गोरिलांच्या पंजांशी संबंधित अंधश्रद्धांमुळे होणारी तस्करी रोखण्यातही तिने स्वत:ला झोकून दिले नि बलिदानही.

इजा झाला, बिजा झाला नि तिजाही. या दोन आफ्रिकन वानरगणांच्या सोबतच ओरोंग-ऊ-थँग या आशियाई प्रजातीचा अभ्यास करणारी बिरुटे गाल्डिकास या स्त्रीचीही ओळख झाली. दुर्दैवाने जेवढी प्रसिद्धी जेनला मिळाली, तेवढी डायानला मिळाली नाही. बिरुटेचे नावही– वानरकुलाचे अभ्यासक वगळता इतर कुणाच्या – कानावर पडले असण्याची शक्यता नाही.

संस्कृती, संस्कार नि कर्मकांड यांचे अवजड खोगीर पाठीवर घालण्यापूर्वीचे स्त्री नि पुरुष पाहिले तर स्त्रियांमध्ये जिज्ञासा वा उकलक्षमता अधिक असते असे माझे प्रथमपासून मत आहे. (त्याला अनेक कारणे आहेत, पण त्याबद्दल इथे बोलणे अस्थानी होईल.) संभावित समाजाने अंगावर घातलेली कौटुंबिक नि नागरी आयुष्याची झूल उतरवून या तीन माऊल्यांनी आपले आयुष्य मानवसदृश प्राण्यांचे जगणे समजून घेण्यात व्यतीत केले नि त्यायोगे त्यांच्या नि मनुष्यप्राण्याच्या जीवनप्रवासाची अनेक कोडी उकलली. कुण्या देव नावाच्या अदृश्य प्राण्याने लेंड्या टाकाव्यात तशी माणसे पृथ्वीवर टाकली असे समजणार्‍यांना यातील परिश्रम, त्याचे मूल्य समजू शकणार नाही, पण जिज्ञासेचा अंशमात्रही ज्यांच्यामध्ये अस्तित्वात आहे त्यांच्या दृष्टीने या तिघींचे आयुष्य नक्कीच अभ्यासनीय आहे.

बंगळुरच्या भारतीय विज्ञान संस्थेतील ‘सेंटर फॉर इकलॉजिकल सायन्सेस’मध्ये तेव्हा कार्यरत असलेल्या मित्रवर्य मिलिंद कोलटकर याच्याशी या तीन माऊल्यांबद्दल बरेच बोललो. पुढच्या भेटीत त्याने एक पुस्तक माझ्या हाती ठेवले. हे पुस्तक होते लुई लीकी या मानववंशशास्त्र, पुरातत्त्वशास्त्राच्या अभ्यासकावरचे. हा या ‘तीन मुलींचा बाप’– अशा अर्थाने की या तिघींच्या कार्याची संकल्पना, प्रेरणा, नि संपूर्ण पाठबळ त्याचे होते. आपले सारे आयुष्य एक-एका प्रजातीच्या अभ्यासाला वाहून घेणार्‍या या मुलींचा हा आधारस्तंभ.

या मुलींच्या अभ्यासाने, अनुभवाने नि त्यांच्यासह इतरांनी त्यांतून निर्माण केलेल्या आकलनामागचा दृष्टिकोन भूतकालभोगी भारतात कधीकाळी रुजेल याबद्दल माझ्या मनात फारशी आशा कधीच नव्हती. भारतातील एक-दोन प्रमुख निसर्ग-माहितीपट निर्मात्यांची किंवा एकुणात ‘वर्तमानातील कुठल्याही दोन भारतीय शास्त्रज्ञांची - मिसाईलचे तंत्रज्ञ नव्हे- नावे सांगा’ असे आव्हान दिले तर किती जण उत्तीर्ण होतील. मी स्वत:च पहिला अनुत्तीर्ण असेन.

अलिकडच्या काळात पुतळे, देवळे, शेण, संस्कृती(?) तुम्ही-आम्ही, भूतकालातले तुमचे वीर वि, आमचे वीर यात अधिकाधिक रमू लागलेल्या समाजात हे प्रमाण आणखीनच घटत चालले आहे. आलेला प्रत्येक हिंदी चित्रपट, मग हॉलिवूड चित्रपट, मग ओटीटी मालिका, मग के-सीरिज या मार्गाने प्रगती(?) करत असलेला आपला दर्शक/प्रेक्षक कधीच एखाद्या निसर्गपटाबद्दल बोलताना दिसत नाही. डेविड अटेनबरो या अफाट माणसाने बीबीसीसाठी जे अलौकिक कार्य (अर्थात तांत्रिक चमूच्या मदतीनेच, त्याचा उल्लेख अत्यावश्यकच) करुन ठेवले आहे, त्याबाबत किती जणांना ठाऊक आहे? जगण्याशी जोडलेल्या गोष्टींकडे पाठ फिरवून सर्वस्वी काल्पनिक, अतर्क्य, अनेकदा अवास्तव कथानकांत रमणारे लोक जिज्ञासेपेक्षा मनोरंजनाला अधिक प्राधान्य देतात हे उघड आहे.

अशा समाजामध्ये या तीन माऊल्यांबद्दल उदासीनता असणे ओघानेच आले. दत्तगुरुंच्या जन्माच्या धर्तीवर या त्रिमूर्तीचे एखादे मंदिर बांधले, तर कदाचित नवस बोलण्यासाठी काही जणांचे पाय तिकडे वळतील. पण त्याने त्यांच्यातील जिज्ञासा नि समर्पणभाव यांच्यात संक्रमित होईल असे मात्र नाही. जनकल्याणकारी राजा विठोबालाही विष्णूचा अवतार करुन दिव्यत्वाच्या बेडीमध्ये अडकवून टाकणारा समाज त्या त्रिमूर्तीलाही कुण्या देवाचा अवतार जाहीर करून उपास्य बनवून टाकेल. (अर्थात भारतीय समाजात स्त्री देवांचे मार्केट डाऊन असल्याने फार प्रसिद्धी मिळणार नाही. ऐंशीच्या दशकात वेगाने वाढलेले संतोषी मातेचे प्रस्थ संपूर्णपणे अस्तंगत झाले आहे हे याचे उत्तम उदाहरण.)

अशा वेळी मराठीमध्ये सर्वसामान्यांसाठी यांच्यावर कुणी लिहील ही शक्यता नगण्यच होती. तेव्हा आपणच या चौघांबाबत– निदान तिघींबाबत, एकत्रित एक लेख लिहावा असे तेव्हाच ठरवले होते... माझ्या अनेक संकल्पांप्रमाणे ते ही वाहून गेले. काही वर्षांपूर्वी व्यंकटेश माडगूळकरांनी त्यांच्या ‘चित्रे आणि चरित्रे’मध्ये जेनबद्दल लिहिलेला एक लेख वाचण्यात आला होता. त्यातील एक वेचा माकडे, माऊली आणि मुली इथे ‘वेचित चाललो...’ वर शेअर केलेला आहे. पण इतर दोघींची दखल घेतलेली माझ्या पाहण्यात नाही. (अभ्यासकांच्या क्षेत्रात घेतली असेल.)

सुदैवाने काही वर्षांपूर्वी सुनीताबाई देशपांडेंचे ‘मण्याची माळ’ हाती पडले नि सुखद धक्का बसला. बाईंची कुशाग्र बुद्धी, संवेदनशीलता, आदर-आपुलकी, जिज्ञासा नि चिंतन या सार्‍यांचे दर्शन त्यांच्या तीनही पुस्तकांतून दिसते. त्यांच्या ‘मनातलं अवकाश’मधील एक वेचा मी आधीच इथे शेअर केला आहे. या तीन माऊल्यांबद्दल, मायेनेच लिहिलेल्या लेखातील एक वेचा इथे शेअर करतो आहे.

-oOo-

सुनीताबाईंच्या लेखातील वेचा: जिज्ञासामूर्ती

---

संबंधित लेखन:
माकडे, माऊली आणि मुली


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा