शुक्रवार, १७ मे, २०२४

वेचताना... : आज धारानृत्य चाले...

महानगरी आयुष्यात माणसाच्या दृष्टीने वैय्यक्तिक पातळीवर पावसाचे अप्रूप फारसे राहिले नसले, तरी अनागर आयुष्यामध्ये उन्हाळ्याची काहिली शमवणारा आणि सुगीची चाहूल देणारा पाऊस जीवनदायी नि हवासा वाटणारा. पावसाचे हे कवतिक मानवाप्रमाणेच मानवसदृश प्राण्यांमध्येही तितकेच असोशीने व्यक्त केले जाते याची प्रथम नोंद डॉ. जेन गुडाल या विदुषीने केली आहे.

जेन गुडाल यांनी चिम्पान्झी या वानरकुलातील मानवाचा भाऊबंद मानल्या गेलेल्या प्राण्याच्या अभ्यासासाठी सारे आयुष्यच वेचले आहे. व्यंकटेश माडगूळकरांनी त्यांच्या ‘चित्रे आणि चरित्रे’ या पुस्तकामध्ये ‘साहसी संशोधक: जेन गुडाल(१) या शीर्षकाखाली तिच्यावर एक लेख लिहिलेला आहे. त्या लेखामध्ये जेनने अनुभवलेल्या एका प्रसंगाचे वर्णन त्यांनी दिले आहे.(२)


चित्रे आणि चरित्रे

एके दिवशी सकाळपासून आभाळ भरून आलं होतं. एका मोठ्या उंबराच्या झाडावर चरणाऱ्या चिंपॅन्झींचा कळप न्याहाळत जेन आपल्या नेहमीच्या डोंगरावरच्या शिळेवर बसली होती. झाडावर डेव्हिड होता. गॉलिथ होता. काही माद्या होत्या. काही तरुण नर होते, पोरं होती. आणि एकाएकी वादळ सुरू झालं. कडाड्ङ्कड् अशी जोराची वीज झाली. धो-धो पाऊस कोसळू लागला.

माकडं झाडाखाली उतरली. उघड्यावर आली. एकापाठोपाठ एक अशा गवताळ गवंडावर चढली. पुन्हा वीज चमकली. त्यासरशी एक नर दोन पायांवर उभा राहिला. हलू-झुलू लागला. तालात पाय टाकू लागला. पावसाच्या, वाऱ्याच्या आवाजातूनही त्यानं मारलेल्या उंच आरोळ्या ऐकू येत होत्या. मग एकाएकी उतारावरून धावत तो तीस यार्डावर असलेल्या त्या मघाच्या उंबराकडं आला. आपला घसरतीचा वेग सावरण्यासाठी एका लहान झाडाचा बुंधा धरून त्याच्याभोवती फिरला. डहाळीवर उडी मारून पावसात गप्प बसून राहिला.

त्याच्या मागोमाग आणखीही नर उभे राहिले. झाडावर चढून त्यांनी डहाळ्या वर-खाली हलविल्या. त्याच गतीत एकानं मोठी डहाळी तोडली. ती ओढत-ओढत चढ उतरला. हे त्याचं वर्षा-नृत्य बघत जेन बसून होती. वरच्यावर काळ्या आभाळात विजा लवत होत्या. माद्या-पोरं डहाळ्यांतून गप्प बसून होती आणि नर झुलत होते. फांद्या हलवीत होते, पळत होते. आनंदानं किंचाळत होते. डोक्यावर पॉलिथिन घेऊन जेन पाहत होती. तिला वाटलं, अश्मयुगात माणसानंही अशाच पद्धतीनं पंचमहाभूतांना आव्हान दिलं असेल!

पुढं सबंध दहा वर्षांच्या काळात तिला हे वर्षा-नृत्य फक्त दोनदा बघायला मिळालं.(३)


हे चिम्पान्झी पावसाचे हे असे स्वागत किती शतकांपासून करत आहेत हे कुणाला निश्चित सांगता येईल असे वाटत नाही. परंतु मानवी इतिहासामध्ये आदिम जमातींमधून पर्जन्य-नृत्यांचे दाखले मिळतात. ही पर्जन्य-नृत्ये दोन प्रकारची दिसतात.

पहिला प्रकार ‘पर्जन्य-स्वागत’ असते. हे पर्जन्याचे आगमन झाल्यानंतर, आपला आनंद व्यक्त करण्यासाठी केलेले नृत्य असते. आजच्या मानवी जगात ‘नृत्य’ या शब्दाला जी एक पठडी, एक चौकट अध्याहृत असते तितके औपचारिक नृत्य तेव्हा अपेक्षित नाही. लहान मुलांनी आनंदाने पहिल्या पावसात उंडारावे, साचलेल्या पाण्यात थयथया पाय आपटावेत, आकाशाकडे तोंड करुन पावसाच्या धारा थेट तोंडावर झेलाव्यात... जसे सुचेल तसे त्या वर्षावाचे स्वागत करावे असे काहीसे सुरुवातीला घडत असावे. जेन गुडाल यांनी पाहिलेले हे नृत्य असेच आनंद साजरा करणार्‍या काही मोजक्या कृतींचा समुच्चय इतपतच होते. त्यात विशिष्ट कृतींची पुनरावृत्ती होते म्हणून त्याला नृत्य म्हणायचे इतकेच. जे अनायासे लाभले त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा, आनंद घेण्याचा उद्देश असतो इतकेच.

‘अनायासे लाभले, ते आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग असल्याने हवे तेव्हा ते मिळायला हवे’ अशी भावना प्राण्यांच्या तुलनेत अधिक वेगाने बौद्धिक प्रगती दाखवणार्‍या मानवाच्या मनात निर्माण झाली. जे जेव्हा ते मिळत नाही तेव्हा थेट निसर्गाशी रुजवात करून आपली मागणी नोंदवण्याची सुरुवात मानवानेच केली. त्यासाठी पर्जन्य-स्वागत नृत्याप्रमाणेच त्याने ‘पर्जन्य-आवाहन नृत्य’ करण्यास सुरुवात केली. हा पर्जन्य-नृत्याचा दुसरा प्रकार.

हे नृत्य ओढ दिलेल्या पावसाला आवाहन करणारे असते. याची सुरुवात मानवाने आप, तेज, वायु आदि प्राकृतिक घटकांचे दैवतीकरण करण्याची प्रक्रिया सुरु केली तेव्हाच झाली असावी. पर्जन्याला केलेले आवाहन पुढे पर्जन्यदेवतच्या आराधनेमध्ये, तिला बोललेल्या नवसामध्ये, कबूल केलेल्या पापक्षालनामध्ये अथवा घातलेल्या साकड्यामध्ये रूपांतरित झाले असावे.

मानवी इतिहासामध्ये शेतीचा शोध हा निसर्गासंबंधामध्ये मानवी स्वार्थाची, अधिकारापलिकडे जाऊन सत्ता प्रस्थापित करणारी पहिली कृती होती. तोवर अन्न-संग्राहक (gatherer) असणारा माणूस असा उद्दामपणे निसर्गाला आपण आखून दिलेल्या भूमीच्या चौकटीतच अन्न देण्यास भाग पाडू लागला. विसाव्या शतकामध्ये त्याहीपुढे जाऊन अधिकाराला हक्कामध्ये रूपांतरित करण्यासाठी मानवाने कृत्रिम पाऊस पाडण्याचे तंत्र विकसित केले आहे. दुबईसारख्या राष्ट्रात केव्हा पाऊस पडावा याचे नियोजनच केले जाते... त्यांनी नुकतेच त्याचे दुष्परिणामही भोगले आहेत. नागर आयुष्यात अस्तंगत झालेल्या पर्जन्य-स्वागत नृत्याप्रमाणेच आता पर्जन्य-आवाहन नृत्याचे नवस-साकड्यादी अवशेषही हळूहळू माघार घेतील असे दिसते आहे.

सुरुवातीला माडगूळकरांच्या लेखात आलेले चिम्पान्झींच्या पर्जन्य-स्वागत नृत्याचे वर्णन दिले आहे. या प्रसंगावरून मला जी.एं.च्या ‘कळसूत्र’(४) या कथेमध्ये वर्णन केलेले पर्जन्य-नृत्य आठवते. इथे ‘देहसूक्त’ या शीर्षकाखाली ते शेअर केले आहे. जेनने अनुभवलेले– पर्जन्याच्या आगमनानंतर केलेले वर्षा-नृत्य आहे, तर हे पर्जन्य-आवाहन-नृत्य आहे. मानवसदृश प्राणी ते मानव या स्थित्यंतरादरम्यान माणसाचे पावसाशी असलेले नाते कसकसे विकसित होत गेले यावर ‘बिम्मच्या पतंगावरून’ या मालिकेमध्ये पाऊस या लेखामध्ये आधीच लिहिले आहे.

मानवी जीवनप्रवासाचा विचार केला तर जेनने अनुभवलेले नृत्य वा आनंद-अनुभव हा मानवपूर्व मानवसदृश प्राण्यांचा आहे. जी.एं.च्या कथेतील वर्णन हे टोळी करुन राहणार्‍या पण मानव-पदास पोहोचलेल्या आदिम मानवी प्रजातीचा आहे. तिसरे एक वर्षानृत्य माझ्या हाती लागले. हे महानगरी माणसाच्या आयुष्यातील आहे, मानवी जीवनप्रवासाच्या पुढच्या टप्प्यावरचे आहे.

माणूस नागर झाला नि त्याचे जिणे निसर्गापासून दूर सरकत गेले. कार्यविभागणीमुळे मानवी प्रगतीला वेग आला असला, तरी त्यामुळेच आपल्या उपभोगाचे साधन निसर्गातील कशा-कशाच्या वापरातून, नाशातून सिद्ध होते याकडे त्याचे हळूहळू दुर्लक्ष होऊ लागले. संपूर्ण महानगरी झालेल्या आयुष्यात तर हे अज्ञान नि ही बेफिकिरी इतकी वाढली, की आपल्या चैनीसाठी निसर्गातील कोण-कोणत्या गोष्टींचा नाश होतो आणि उपभोगोत्तर कचरा निसर्गाची कशी हानी करतो याचे भान नाहीसे झाले. उपभोगाची क्षमता नि साधने सतत वाढती राहायला हवीत या प्रमाथी आवेगाने महानगरी माणूस उर फुटेतो धावत असतो. विश्रांती घेणे, संतुष्ट राहणे या कृतींना या जगात महत्त्वाकांक्षाहीन आणि म्हणून नव-पाप मानले जाते.

झिपर्‍या

पण याच जगात असेही जीव अजून प्रचंड संख्येने आहेत ज्यांच्याबाबत हे धावणे अपरिहार्य असते. इतरांसाठी गरजा भागवणे म्हणजे चार पावलांचे अंतर पार करणे असेल, तर यांच्या दृष्टीने पूर्ण अंतराची मॅरेथॉन असते. दैनंदिन गरजांसाठीच इतकी उरस्फोड करत असताना निसर्गाकडे वगैरे पाहणे त्यांना परवडत नसते. असे असूनही नागरी माणसामध्ये आदिम मानवाची, त्याचाही पूर्वज असलेल्या त्या वानरांची असोशी उद्या चूल पेटवण्यासाठी दडपून ठेवलेल्या निखार्‍यासारखी पहुडलेली असते. विशेषत: महानगरी आयुष्याची नि संस्कार नामक जुनाट वाकळीची झूल अंगावर घेऊन नंदीबैलासारखे आयुष्य जगण्यास सुरुवात करण्यापूर्वी– कदाचित, नितळ दृष्टी असलेल्या लहान मुलांमध्ये ती अधिक असते.

अशाच चार मुलांच्या टोळीने ‘पाऊस म्हणजे रोजगाराचा सत्यानाश’ हे भान झुगारून देऊन केलेले अफाट स्वागत मला अरुण साधूंच्या ‘झिपर्‍या’ मध्ये सापडले. तो सारा प्रसंग मी ही अक्षरश: जगलो इतके ते वर्णन प्रत्ययकारी आहे. (या ‘झिपर्‍या’वर पुढे चित्रपटही येऊन गेला. माझा सुस्त स्वभाव नि मराठी चित्रपटांचे अल्पजीवी असणे यामुळे पाहायचा राहून गेला. त्यामुळे त्यात हे शब्दचित्र किती ताकदीने उतरले आहे मला ठाऊक नाही.)

साधूंसारखा माणूस कुठलीच पठडी मानत नाही. या अफाट माणसानेच ‘सिंहासन’सारखी राजकारणाचा वेध घेणारी कादंबरी दिली, ‘मुंबई दिनांक’ मधून महानगरी व्यक्तींच्या वैय्यक्तिक आयुष्याकडे सूक्ष्मदर्शकातून पाहिले, पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांच्या जिण्याचा मागोवा घेणारी ‘मुखवटे’ लिहिली, ‘त्रिशंकू’मधून विलक्षण आत्ममग्न व्यक्तीच्या मनोव्यापाराचा वेध घेतला... विज्ञानकथा, कादंबर्‍याही लिहिल्या. एकाहुन एक अव्वल! इतकेच काय ‘फिडेल, चे आणि क्रांती’ तसंच ‘ड्रॅगन जागा झाल्यावर’ सारखी क्यूबा नि चीन सारख्या देशांतील संक्रमणकाळाचा पट मांडणारे लेखनही केले.

‘झिपर्‍या’मधून महानगरी जीवनातील उपेक्षित वर्गातीलही तळाचे स्थान ज्यांच्या वाट्याला आले आहे अशा स्वयंरोजगार करणार्‍या मुलांचे आयुष्य उलगडले आहे. बालकामगार ही मानवी प्रगतीच्या नागरी टप्प्यावरील उत्पत्ती. त्यातही इतरांकडे रोजगार करणार्‍यांना शिळ्या-विटक्या भाकरीचे, पाव-उसळीच्या तुकड्याची थोडीफार शाश्वती असते. स्वयंरोजगार करणार्‍यांना ती ही नाही. इतक्या विपन्नावस्थेत राहूनही पहिल्या पावसाचे अप्रूप असलेली ही मुले तो आनंद उस्फूर्तपणे नि बेभानपणे कसा साजरा करतात याचे वर्णन या वेच्यामध्ये आहे. त्या बेभान जगातून बाहेर येतानाच त्या पावसाचा दुसरा अर्थ आऽ वासून त्यांच्यासमोर उभा राहतो. ती विसंगती अक्षरश: अंगावर येते इतकी साधूंनी ती जिवंत केली आहे.

‘ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा’ म्हणत घरच्या सुरक्षित जगातून तो आनंद साजरा करणार्‍या मुलांचे नि पहिला कैफ उतरताच ‘जा रे जा रे पावसा, हाती नाही पैसा’ म्हणावे का अशा संभ्रमात पडलेल्या झिपर्‍या, पोंब्या, गंजू, असलम, नार्‍या, दाम्या यांचे जग निराळे. महानगरी जीवनानेच भरपूर रुंद केलेली एक दरी या दोहोंमध्ये आहे आहे.

- oOo -

(१). त्यातील एक वेचा ‘माकडे, माऊली आणि मुली’ इथे ‘वेचित चाललो...’वर आधीच शेअर केला आहे.
(२). ‘चित्रे आणि चरित्रे’ - व्यंकटेश माडगूळकर, पृ. ७३-७४.
(३). You-Tube वर ‘Chimpanzee Rain Dance’ असे शोधले तर जेनच्या अनुभवाशी मिळतेजुळते व्हिडिओ सापडतात. हा त्यातलाच एक.
Chimpanzee Rain Dance - Mahale National Park
(४). पुस्तक: काजळमाया - ले. जी. ए. कुलकर्णी (पॉप्युलर प्रकाशन)

---

‘झिपर्‍या’ या कादंबरीतील वेचा: धंदा >>


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा