RamataramMarquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

शुक्रवार, २२ मे, २०२६

शुभास्ते पंथान: सन्तु

  • बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आम्ही दुपारच्या डेक्कन एक्सप्रेसने पुण्याहून मुंबईला जात होतो. पहिल्या वर्गाचा तो डबा नेहमीप्रमाणेच भरलेला होता. आमच्या पुढच्याच दोन जागांवर दोन बाया येऊन बसल्या. त्यांच्या जवळच्या सामानात एक जरा वेगळीच चीज होती. पाळण्याचा मुलांना निजवायचा मधला भाग असतो तसा साधारण चौकोनी उघडा पिंजरा, त्यात छोटी गादी आणि त्यावर गुंडाळून ठेवलेली चार तान्ही मुले. मग आणखीही सामान होते. त्या मुलांना प्रवासात लागणारे दूध, पाणी, थोडी औषधे, बदलायचे कपडे, इतरही काहीबाही. त्या दोघीतली एक तरुण पारशी की इराणी मुलगी होती, दुसरी प्रौढ मराठी बाई.

    सोयरे सकळ

    कपड्यांत गुंडाळून ठेवलेल्या त्या चार छोट्या अनपेक्षित प्रवाशांनी आजूबाजूच्या बहुतेक सर्व इतर प्रवाशांचे कुतूहल जागृत केले होते. तसा त्यांचा कुणालाच त्रास नव्हता. बहुतेक वेळ ती झोपलेलीच होती. मधूनच रडत जागी होत त्या वेळी त्यांचे कपडे बदलणे किंवा त्यांना दूध पाजणे यांतले आवश्यक ते त्या दोघी पटकन मोठ्या कुशलतेने करत होत्या. पण एकदम अशी चार मुले, अशा रीतीने प्रवासात आहेत, त्यांना घेऊन आलेल्या दोघीपैकी कुणाचीच स्वतःची ती मुले नसावी, मग ती कुणाची, कुठे आणि कशासाठी जाताहेत याबद्दलची माहिती आमच्याप्रमाणेच इतरांनीही हळूहळू काढायला सुरुवात केली आणि तासा-दोन तासांत पुढच्या, मागच्या डब्यांतल्या सर्वांना आणि हळूहळू अखंड गाडीतल्या बहुतांश प्रवाशाना ती माहिती कळली.

    अनाथालयात जन्माला आलेली किवा आणून सोडलेली ती अगदी कोवळी तान्ही मुले रात्रीच्या एअर इंडियाच्या विमानाने परदेशी पालकांकडे सांभाळायला पाठवली जात होती. त्यांची दत्तक मुले म्हणून ती उद्या-परवापासून वाढणार होती, त्याच देशाचे नागरिक होणार होती. इथे उकिरड्यावर फेकली जाणारी ती मुले एका सार्वजनिक संस्थेच्या बोटाला धरून नंदनवनाच्या दिशेला निघाली होती. त्यासाठीचे रीतसर कायदेशीर सर्व व्यवहार पूर्ण केलेले होते. त्या प्रौढ बाई होत्या श्रीमती द्रवीड. त्या पुण्यातल्या खूप अनुभवी सामाजिक कार्यकर्त्या होत्या. अद्यापही त्यांचे समाजकार्य चालूच आहे. अशा तर्‍हेचा हा त्यांचा पहिलाच प्रवास नव्हता. पण त्यांच्या बरोबरीची दुसरी तरुणी ही जरी सामाजिक कार्यकर्तीच होती, उत्तम नर्सिंग जाणत होती, तरी अशा मुलांना घेऊन इतक्या दूरवरचा सगळा प्रवास आणि नियोजित स्थळी पोहोचल्यावरचे सर्व सोपस्कार वगैरे कामे ती प्रथमच करणार होती. त्यासाठीची सगळी तयारी, सगळा अभ्यास तिने केलेला होता, फक्त तरीही पहिलटकरणीचा घाम तिच्या चेहऱ्यावर होताच. आणि म्हणून मुंबईहून विमान सुटेपर्यंत तिच्या मदतीला या बाबतीत बराच पूर्वानुभव असलेल्या द्रवीडबाई स्वतः आल्या होत्या. पुढे ती एकटीच त्यांना घेऊन जाणार होती. विमानात हवाई सुंदरी आणि नियोजित विमानतळावर त्या त्या मुलांचे पालक असणारच होते.

    ही इतकी माहिती मिळाल्यावर सहप्रवाशांना यात आणखी काही करण्यासारखे नव्हतेच. पण ती डेक्कन एक्सप्रेस अगदी वेळेवर पुण्याहून निघाली होती तरी वाटेत सारखी थांबू लागली. लेट होत गेली आणि अखेर वांगणी स्टेशनवर ‘सायडिंगला टाकली’ जाऊन तिथे स्वस्थ उभी राहिली. दादरला ही गाडी संध्याकाळी सव्वासातच्या सुमाराला जाऊन पोचते. विमान सांताक्रूझ विमानतळावरून रात्री एक की दीड वाजता सुटणार होते. मधला वेळ एरवी पुरेसाच नव्हे तर भरपूर होता. पण गाडी वांगणीहून हलण्याची चिन्हेच दिसेनात तशी हळूहळू सर्वांच्या चेहऱ्यावर चिंता दिसायला लागली.

    गाडीतल्या बहुसंख्य लोकांना प्रवासाचा चांगला अनुभव असतो. गाड्या लेट होणे, त्यामुळे पुढच्या सगळ्या कार्यक्रमात अडथळे निर्माण होणे, अनेकांची अनेक तर्‍हांची अडचण होणे वगैरे अनुभव अधूनमधून प्रत्येकाच्या वाट्याला कधी ना कधी आलेलेच असतात. त्यामुळे निर्माण होणारा वैताग आणि तक्रारी आजही होत्याच. पण एव्हाना त्या चार तान्हुल्यांच्या भवितव्याशी जवळजवळ सगळी गाडी नकळतच गुंतली गेली होती. आणि निदान त्यांचे पुढचे विमान चुकू नये यासाठी स्वतःला काय करता येईल याचा विचार आमच्यासह सर्वच सहप्रवाशांच्या डोक्यात सुरू झाला होता. जो तो आपापल्या परीने धडपडू लागला होता. आणि गाडी का सुटत नाही, अडथळे कोणते, त्यांचे संभाव्य परिणाम कोणते, कोणत्या पातळीवर काय प्रयत्न चालू आहेत वगैरेची तोंडी वार्तापत्रे प्रसारित केली जात होती. ओव्हरहेड वायर्स तुटल्याने वीजपुरवठा बंद पडला होता. दुरुस्तीचे काम चालू होते. वांगणी-दादर, दादर-सांताक्रूझ, परदेश प्रवासातले पासपोर्ट, कस्टम्स वगैरे आवश्यक ते सोपस्कार इत्यादी सर्व गोष्टींसाठी लागणाऱ्या वेळेच्या बेरजा, गणिते, उलटसुलट करून तयार होती. मनगटांवरच्या घड्याळात पुन्हापुन्हा पाहिले जात होते.

    गाडीच्या ड्रायव्हर-कंडक्टरपासून ते वांगणी स्टेशनवरचे रेल्वे-कर्मचारीही आता प्रवाशांच्या जोडीने त्या तान्हुल्यांत गुंतून गेले आणि त्या स्टेशनवरच्या फोनला उसंतच मिळेनाशी झाली. शेवटी ताजी बातमी आली “तात्पुरती दुरुस्ती झाली आहे आणि एक लाईन सुरू करण्यात आली आहे.” आम्ही हुश्श करणार इतक्यात कळलं, “पण–”

    “पण काय?”

    “अहो, डेक्कन क्वीनला नेहमीप्रमाणे पहिला मान ना? ती मुंबईहून सुटली आहे. तिला आधी लाईन मिळेल. मग आपण ते जावई लोक ना!”

    वास्तविक ह्या गोष्टी प्रवासी ठरवत नसतात. शिवाय आमच्यापैकी बहुतेक लोक हे डेक्कन क्वीनचेही अधूनमधून प्रवासी होतेच. आज आम्ही या गाडीत होतो इतकेच. पण ढोबळ मानाने पदरी पडणारे शत्रुत्व किवा मित्रत्व हे असे योगायोगानेच ठरत असते.

    “हे पाहा, जावई असले तर आपल्या घरचे आज तरी या गाडीला आधी लाईन दिली पाहिजे. मग डेक्कन क्वीन, आम्हांला आधी सोडा म्हणावं. नाही तर विमान चुकेल.”

    ते विमान गाठणे या एकमेव ध्येयावर प्रत्येकाने आपले सर्वस्व जणू पणाला लावायला सुरुवात केली. गाडीतल्या प्रवाशांची फलाटावर आणि स्टेशनमास्तरच्या खोलीपुढे इतकी गर्दी झाली की त्यापेक्षा आपल्या जागीच बसणे आता शहाणपणाचे असा विचार करून आम्ही येऊन आमच्या सीटवर बसलो. त्या दोघी जणीही गप्प बसून होत्या. करणार तरी काय होत्या? विमान चुकले तर त्या पालकांना परदेशी फोन करून काय झाले ते सांगणे, पुढल्या कोणत्या विमानाने जाता येईल ती योजना करणे आणि त्यासाठी काय काय करावे लागेल ते ठरवणे... असलेच काहीतरी त्यांच्या डोक्यात चालू असावे. इतक्यात आरडाओरडा सुरू झाला. एवढा प्रचंड कोलाहल कां व्हावा, काही अंदाज येईना. थोड्या वेळात पुन्हा सगळे शांत झाले आणि मग आणखी काही काळानंतर जो तो आपापल्या जागी बसायला गाडीकडे धावला. याचा अर्थ आता आमची गाडी आधी सुटणार होती. मग आम्हांला कळली ती बातमी अशी :

    कोणत्याही परिस्थितीत निदान आज तरी डेक्कन क्वीनच्या आधी आमच्या गाडीला लाईन मिळालीच पाहिजे हा समस्त प्रवाशांचा निर्णय वांगणीच्या स्टेशनमास्तरसह सर्व रेल्वे-कर्मचाऱ्यांना क्षणार्धात पटला होता. फक्त तो लाईन देणाऱ्या संबंधितांना पटवायला हवा होता. त्यासाठी फोनवरून स्टेशनमास्तरांनी सर्व परिस्थिती त्यांच्या कानांवर घातली, पण तरीही कुठेतरी काहीतरी अडचणी येताहेत हे लक्षात येताच प्रवाशांशी संगनमत करून त्यांनी लगेच पुन्हा फोन लावला आणि पवासी इतके खवळले आहेत की स्टेशनला आग लावण्याचा वगैरे धोका निर्माण झाल्याचे फोनवरून ते सांगत असताना प्रवाशांनीही उगाच मोठमोठ्याने आरडाओरडा करून तोही आवाज फोनवरून जात असल्याने काहीतरी धोका नक्कीच असल्याची जाणीव पलिकडल्या बाजूला फोन घेणाऱ्यांना करून दिली.

    यातले खरे किती, अतिरंजित किती, काहीच पुरावा देता येणार नाही. पण इतका वेळ थांबलेली आमची गाडी पुन्हा सुरू झाली होती खरी. हातात वेळ अगदी थोडा होता. त्यामुळे प्रत्येकाला आलेला औदार्याचा झटका अद्याप उतरला नव्हता. दादरला गाडी थांबताच त्या दोघींना प्रथम उतरू देणे, डब्यात शिरलेल्या पहिल्या हमालाला त्यांचे सामान घ्यायला सांगणे, धावत जाऊन टॅक्सी पकडणे आणि ती टॅक्सी प्रथम त्या दोघींना द्यायला जाणे, त्यांना आपल्या हातून काही ना काही मदत व्हावी म्हणून प्रत्येक जण धडपडत होता. शेवटी त्या मार्गी लागल्यावर आम्हीही मग टॅक्सी पकडून वरळीला आमच्या घरी येऊन पोचलो. तेव्हा रात्रीचे साडेबारा वाजून गेले होते.

    गेल्या गेल्या मी घरचा फोन उचलला. एअर इंडियातल्या आणि एअरपोर्टवरच्या ओळखीच्या अधिकाऱ्यांना मग अपरात्री त्यांच्या घरी फोन करून “या फ्लाइटवरचे हे उतारू अशा कारणानं अडकून पडले होते. ते आता एव्हाना एअरपोर्टवर येऊन पोचलेच असतील, त्यांच्यासाठी काय वाट्टेल ते करा, पण त्यांना घेतल्याशिवाय विमान सोडू नका, असे ड्यूटीवरच्या लोकांना सांगा,” हे सांगितलं. प्रत्येकाने “काळजी करू नका, शक्य तो प्रयत्न करतो,” असे आश्वासन दिले. पण तरीही आमचा पुण्यकर्माचा ताप उतरला नव्हता. फोन चालूच होता. शेवटी रात्री दीडच्या सुमाराला एअरपोर्टवरची ती बाई हसून मला म्हणाली, “तुमचे ते छोटे प्रवासी विमानात सुखरूप झोपले आहेत. आता विमान सुटेलच.” ती कुणीतरी पु० ल० देशपांडेना ओळखणारी निघाली. मी प्रत्येक फोनच्या सुरवातीला, “माफ करा, मी पु० ल० देशपांडेच्या घरून बोलतेय” हे वाक्य फेकतच होते. पलीकडे फोन घेणारा कुणी मराठी माणूस असेल तर नक्कीच काम होईल असा तो एकच मंत्र मला माहीत होता. त्या बाईकडून मला कळले की गेला अख्खा तास एअरपोर्टवर बहुतेक फोन ठिकठिकाणाहून याच कामासाठी, नेमक्या याच छोट्या प्रवाशांसाठी येत होते! म्हणजे ज्याने त्याने आपापल्या परीने शेवटपर्यंत जास्तीत जास्त प्रयत्न केले होते आणि ते पाची प्रवासी मार्गी लागल्याची खात्री झाल्यावरच ‘शुभास्ते पन्थानः सन्तु’ असा मनोमन आशीर्वाद देत त्यानंतरच स्वतःचा विचार केला होता.

    ती मुले कोण? दुपारी तीनच्या सुमाराला आम्ही त्यांना प्रथम पाहिले. त्यांनी तर डोळे उघडून आमच्यापैकी कुणाहीकडे एकदाही पाहिले नव्हते. समाजसेवा म्हणावी तर त्या दोघी जणींप्रमाणेच इतरही अनेक माणसे अनेक कार्यक्षेत्रांत अशी किंवा याहूनही खूप मोलाची कामगिरी जगभर करताहेत हेही आम्हांला कळत होते. समजा, गाडी लेट झाली नसती तर आम्ही त्या मुलांची, जरा वेगळे सहप्रवाशी यापलीकडे फारशी दखलही घेतली नसती. स्वतःच्या गाडीतून जाताना उद्या कुणा भिकाऱ्याचे पोर उकिरड्यात खेळताना पाहिले तर त्याच्या भवितव्याची चिंता आम्ही करूच याची खात्री नाही– नव्हे, बहुधा करणार नाहीच म्हणायला हरकत नाही. त्या काही तासांच्या विशिष्ट घटनेतून निर्माण झालेले हे खरेखुरे जातिवंत सुखान्त नाट्य. कुणाचाही कुणाशीही संबंध नसलेले, प्रत्येक बाबतीत वेगवेगळ्या स्तरावर जगणारे, काही क्षणांचे आम्ही सहप्रवासी. एरव्ही पहिल्या वर्गातले आणि दुसऱ्या वर्गातले प्रवासी आणि रेल्वे कर्मचारी, पासवाले आणि तिकिटवाले असे हजारो पोटभेद करून एकमेकांपासून दूर राहणारे. ज्या देशात ती अर्भके दत्तक म्हणून गेली त्याच देशाशी उद्या भारताचे युद्ध झाले तर एकमेकांवर गोळ्या झाडायला मागेपुढे न पाहणारी आपण माणसे. अशा नेमक्या कोणत्या कारणाने आमच्यातल्या माणुसकीला एकदम हा असा पाझर फुटावा? कितीही विचार केला तरी मला नेमके कारण कळू शकत नाही. पण आम्ही प्रत्यक्षच त्यात प्रथमपासून शेवटपर्यंत अगदी साक्षीदार होतो, त्यामुळे मी हा अनुभव दुर्लक्षितही करू शकत नाही. आज पाहावे तिथे काँग्रेस गवतासारखी बेपर्वाईच फोफावलेली दिसत असताना एका पुणे-मुंबई प्रवासातल्या त्या अनुभवाची आठवण, मोहरलेल्या आंब्याच्या झाडावरून येणाऱ्या गार वाऱ्याच्या झुळकीसारखी किवा एखाद्या संध्याकाळी काळ्याकुट्ट ढगांना लाभणाऱ्या रुपेरी कडांसारखी सुखावून जाते.

    प्रत्येक माणसात असा हा बौद्धिक पातळीवरचा आत्मविसर्जनाचा संभव कुठेतरी लपलेला असतोच आणि तो शोधून काढून ‘वन्ही तो चेतवावा रे’ असा चेतवता येतो, की एखाद्या उल्कापातासारखा हा लख्खकन प्रत्ययाला येऊन विझून जाणारा आकस्मिक अपघातच असतो? समाधानाची गोष्ट एकच म्हणता येईल की हे उल्कापातदेखील जगाच्या पाठीवर सतत कुठे ना कुठे लहानमोठ्या प्रमाणात होतच असतात. आपल्या, विशेषतः चोवीस तास झगमगाटात जगणाऱ्या शहरवासीयांच्या नजरेच्या टप्यात ते फारसे येत नाहीत, इतकेच.

    (‘रुपेरी कडा’ या ललित लेखातून)

    -oOo -

    पुस्तक: सोयरे सकळ
    लेखिका: सुनीता देशपांडे
    प्रकाशक: मौज प्रकाशन गृह
    आवृत्ती तिसरी
    वर्ष: २००३
    पृ. १०५-१०९.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा