अण्वस्त्रप्रकल्पावर अमेरिकेच्या लष्करातून मुरब्बी अभियांत्रिक घेतले गेले. हाती घेतलेलं काम धडक पद्धतीनं तडीला नेणारे अशी त्यांची ख्याती होती. संपूर्ण अण्वस्त्रप्रकल्पाचा प्रमुख सूत्रधार ज. लेस्ली ग्रोव्हज् हा त्यांच्यातलाच होता. पहिल्याच भेटीनंतर अमेरिकन अध्यक्षाच्या शास्त्रीय सल्लागारानं सेक्रेटरी ऑफ स्टेटला कळवलं, "ग्रोव्हज्चं आणि माझं जे काही बोलणं झालं त्यावरून अशा कामाकरिता लागणारा पोच त्याच्या ठिकाणी कितपत आहे, याची मला शंकाच वाटते..."
ग्रोव्हज्च्या मनातही वैज्ञानिकांविषयी अढी होतीच - सेनाधिकारी आणि अभियांत्रिक अशी वैज्ञानिकांची दोन सावत्र भावंडं त्याच्यात एकत्र झालेली होती ना!
शिकागो इथल्या प्रयोगशाळेला त्यानं प्रथम भेट दिली तेव्हाची गोष्ट. मुळात त्याला तंत्रज्ञांच्या रोकठोकपणाची सवय. कोणत्याही गोष्टीबद्दल पूर्णपणे खात्री पटेपर्यंत काही विधान न करणार्या वैज्ञानिकांचा गुळमुळीतपणा त्याला सहन होत नसे.
म्हणून त्यानं संशोधनाची शास्त्रीय बाजू अगदी जिवाचा कान करून ऐकली. काहीतरी खोटंनाटं सांगून आपल्याला गंडवायचा डाव असावा या धूर्त वैज्ञानिकांचा! तेवढ्यात एक वैज्ञानिक फळ्यावरचं एक समीकरण खालच्या ओळीत उतरवताना एक आकडा चुकला. ग्रोव्हज्नं ताड्कन उठून हिरिरीनं ती चूक निदर्शनाला आणली. वर म्हणाला, "एक गोष्ट तुम्हाला माहीत असलेली बरी. तुम्हाला याची कल्पना असेलच की मी पीएच्. डी. केलेली नाही. कर्नल निकोलस पीएच्. डी. आहे. माझं तसं नाही. असं असलं तरी तरी मी एकूण दहा वर्षं महाविद्यालयीन शिक्षण घेतलेलं आहे. ध्यानात घ्या. तब्बल दहा वर्षे अभ्यास एके अभ्यास! आणि तो ही नोकरीसाठी जरूर नसताना. तेव्हा मला वाटतं हे शिक्षण दोनदा पीएच्. डी. केल्याइतकं मानायला तुमची हरकत नसावी."
ग्रोव्हज् बाहेर पडताच झलार्डनं कपाळाला हात लावला, "या अशा लोकांबरोबर आपण काम करावं अशी अपेक्षा आहे यांची?"
पुढं एकदा ग्रोव्हज् आपल्या सहकार्यांना म्हणाला, "कमालीची खटपट करून जगाच्या पाठीवरची एकजात सारी चक्रम माणसं आपण इथं एकत्र केली आहेत." त्यांना तो 'झिपरे लोक' म्हणे!
सेहेचाळीस वर्षांच्या ग्रोव्हज्ची प्रकल्पप्रमुख पदावर नियुक्ती झाली ती मारुन मुटकून केल्यासारखी. त्याला खुमखुमी होती आघाडी गाजवण्याची; पण लष्करानं त्याला तब्बल दशकभर ठेवलं होतं बांधकामाच्या आघाडीवर, 'लेफ्टनंट' पदावर. कर्नल व्हायला त्याला उशीर झाला होता. या प्रकल्पामुळे तो कुरकुरत का होईना ब्रिगेडियर जनरल बनला!
-
आणि या धटिंगणानं शास्त्रीय संचालकपदासाठी निवडलं नाजूक चणीच्या, पुस्तकी व सिद्धान्तवादी प्राध्यापकाला.
प्रथम ओपनहायमरला विरोधच झाला. ओपनहायमर तोपर्यंत स्वतंत्रपणे एकही प्रकल्प हाताळलेला नव्हता. वय, अनुभव, विद्वत्ता आणि व्यवस्थापकीय कसब, कोणतीही बाजू ठोस जमेची नव्हती. यथावकाश सुरक्षा यंत्रणेनंही त्याच्या नेमणुकीला आक्षेप घेतला, पण ग्रोव्हज्नं त्याला पाठीशी घातलं.
ओपनहायमध्ये बौद्धिक चापल्य तर होतंच; शिवाय रक्तात मुरलेलं सुसंस्कृतपणही या कामात उपयुक्त ठरणारं होतं.
अणुनगरीत 'टाऊन कौन्सिल' निघेपर्यंत सर्व तंटेबखेडे तो एकटा हाताळी आणि गुंते हळुवारपणे सोडवून टाकी. ज्येष्ठ शास्त्रज्ञ त्याच्या नेतृत्वाखाली काम करायला राजी असत. तरुण संशोधकांचा आत्मविश्वास त्याच्यामुळे वाढे. शास्त्रज्ञ व व्यवस्थापन यांच्यातले संबंध सुरळीत ठेवण्याबद्दल तो प्रथमपासून जागरूक होता, त्यामुळे संघर्ष विकोपाला जातच नसत.
एकदा तरुण संशोधकांचा एक गट बिथरला. इथं आपल्यापेक्षा सुतारांना आणि सफाई कामगारांना अधिक वेतनवाढ मिळते हे त्यांच्या लक्षात आलं होतं. ओपनहायमरनं त्यांना तो काळ 'किरकोळ गार्हाण्यां'चा नाही हे इतक्या गोड आणि परिणामकारक शब्दांत पटवलं की त्या तरुणांचा केवळ रागच निवळला असं नाही, तर प्रसंगाचं गांभीर्य ओळखून पडेल ते काम करायची जिद्द त्यांच्यात निर्माण झाली.
अर्थात वैमनस्य वेळीच निस्तरणं प्रत्येक वेळी इतकं सोपं नसे. आरंभीच्या काळातच वैज्ञानिक आणि लष्कराधिकारी यांच्यात काही मूलभूत मुद्द्यांवर खटके उडाले.
या महाअस्त्राच्या निमित्तानं मानवी इतिहासात प्रथमच वैज्ञानिक वर्गानं इतक्या मोठ्या संख्येनं लष्करी लगामांचा स्वीकार केलेला होता. केवळ या निर्मितीतल्या शास्त्रीय आव्हानांची भुरळ पडून नव्हे तर अधिक व्यापक प्रेरणेनं ते मुक्तात्मे आपखुषीनं आपले पंख छाटून घेऊन अणुनगरीच्या पिंजर्यात येऊन पडले होते. युद्धकाळात शासनाच्या परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारच्या संशोधनाचे निष्कर्ष जाहीर करायचे नाहीत, हा निर्बंधही त्यांनी स्वतःवर लादून घेतला होता आणि आपल्या खुल्या वृत्तीला काचणार्या गुप्ततेच्या, सुरक्षिततेच्या अटी ते विनातक्रार पाळत होते; परंतु या सगळ्याला मर्यादा होतीच. लष्करी अधिकार्यांनी तिला धक्का लावताच वैज्ञानिक उसळले.
ग्रोव्हज् आणि ओपनहायमर यांनी ठरवलं होतं की वैज्ञानिकांना लष्करात भरती करून घ्यायचं. लष्करी किताब, वर्दी, कायदेकानू त्यांना लागू करायचे. ओपनहायमर लेफ्टनंट कर्नल होणार होता.
अण्वस्त्रनिर्मितीचे प्रयत्न युद्धपातळीवर करायचे असल्यामुळे हे सयुक्तिकही होतं!
परंतु बिटा, राबी, बेचर अशा काही वैज्ञानिकांनी रडार प्रकल्पावर काम करताना लष्करी जाच अनुभवला होता. लष्करी धोरण वैज्ञानिक कामाच्या बाबतीत पोषक ठरणार नाही, संशोधनाच्या कामात योग्य ती लवचिकता टिकवणं त्यामुळे जड जाईल, असं त्यांचं म्हणणं होतं. एकदा घेतलेला निर्णय बदलणं लष्कराधिकार्याला सोपं नसतं. उलट प्रत्येक फसलेला प्रयोग स्वतःच उधळून लावणं हा आपला जन्मसिद्ध हक्कच आहे, असं वैज्ञानिक मानत असतो!
या मंडळींनी लष्करजमा व्हायला निकरानं विरोध केला. शेवटी ओपनहायमरनं कोनांटच्या मध्यस्थीनं ग्रोव्हज्शी रदबदली केली आणि निदान पहिले नऊ महिने प्रकल्प लष्करी असावा असा करार करून घेतला.
एवढं झाल्यावरही ग्रोव्हज्नं वैज्ञानिकांना लष्करी गणवेषात कोंबायचा प्रस्ताव मांडला. तेव्हा वैज्ञानिकांकडून त्याला जोरदारपणे विरोध होणं साहजिकच होतं. वैज्ञानिकांना 'मोकाट' सोडलं तर ते आपल्या डोक्यावर बसतील अशी ग्रोव्हज्ची धारणा होती. तो ही हट्टाला पेटला. ओपनहायमरनं पुन्हा आपलं कौशल्य खर्ची घालून ग्रोव्हज्ची समजूत काढली आणि गणवेषाची कल्पना बासना गुंडाळून ठेवली गेली.
हा प्रकल्प गुप्त असल्यामुळे सुरक्षिततेच्या अटी अटळ होत्या. परंतु लष्करी अधिकार्यांनी त्यांच्या शिरस्त्यानुसार गुप्ततेचे हे निर्बंध अंतर्गत पातळीवरही इतके काटेकोरपणानं लावले की त्यांचं खरोखरच पालन करायचं म्हटलं असतं तर काय चाललं आहे हे या खात्याचं त्या खात्यालाच काय; पण या कानाचं त्या कानालाही कळणार नाही अशी वागणूक ठेवणं प्राप्त होतं.
हा केवळ भावनिक घुसमटीचा प्रश्न नव्हता. त्यामुळे वेगवेगळ्या शाखांमधला संवाद तुटून संशोधनकार्याला अडथळा होणार होता. वैज्ञानिक संशोधनाचं हे स्वरूप लष्कराधिकार्यांच्या लक्षात येईना. ग्रोव्हज्च्या दृष्टीनं हे सगळ वैज्ञानिकांचं 'विनाकारण चकाट्या पिटणं' किंवा वेळेची नासाडी करणं होतं. एकाच वेळी दोन विभागांचा प्रमुख असलेल्या हेन्री स्मिथची तर अशी पंचाईत होती की या पद्धतीनं काम करायचं तर त्याला झोपेतदेखील एका विभागाची गुपितं दुसर्या विभागाला फोडता येणार नव्हती!
फेनमन, स्मिथ, झलार्ड इत्यादिंनी डोकी लढवून हे नियम आपल्यापुरते शिथिल करून घेतले. यात झलार्डचा ग्रोव्हज्शी चांगलाच खटका उडाला आणि त्याचं पर्यवसान ग्रोव्हज्कडून या गुणी, दूरदर्शी वैज्ञानिकाची प्रकल्पावरून हकालपट्टी होण्यात झालं.
कंडनकडे ग्रोव्हज्नं वैज्ञानिक आणि लष्कराधिकारी यांच्यात सलोखा राखण्याचं काम सोपवलेलं होतं; परंतु खात्याखात्यांमध्ये अशा गुप्ततेच्या तटबंद्या उभारण्याच्या तत्त्वाशी न पटल्यामुळे त्याच्यावरच अखेर राजीनामा देऊन सोडून जायची पाळी आली.
एक लक्षात घेण्यासारखा तपशील असा की कंडननं राजीनामा देण्यापूर्वी ओपनहायमरला आपली कड घेण्याची विनंती केली; पण ओपनहायमरनं 'मला यात पडून ग्रोव्हज् ला दुखवायचं नाही.' असं म्हणून कानावर हात ठेवले. ही दूरदृष्टी म्हणायची, की धोरणीपणा, की नेमस्तपणा? मात्र त्याची 'नरो वा कुंजरो वा' वृत्ती अण्वस्त्रप्रकल्पाला पोषक ठरणार होती.
-
प्रकल्पाची सूत्रं हाती घेताना आपल्याला तीस वैज्ञानिक आणि त्यांचे इतर मदतनीस मिळून सुमारे शंभर जणांची व्यवस्था लागेल अशी ओपनहायमरची कल्पना होती; परंतु सहा महिन्यात एकट्या लॉस अलमॉस या अणुनगरीत तीन हजारांवर कर्मचारी राबू लागले होते. खर्च, जागा, बांधकाम, वेळ, मनुष्यबळ सर्वच बाबतींत तीनही अणुनगर्यांचा आवाका आणि आकार आधी बेडूक, बेडकाचा बोकड, बोकडाचा बैल, बैलाचा ऐरावत ... असा वाढतच जायचा होता...
दहा-बारा वर्षांपूर्वी ओपनहायमरनं चुकतमाकत प्राध्यापकी सुरू केली होती. तीच त्याची गत अण्वस्त्रनिर्मितीच्या या प्रकल्पाची सूत्रं हाती घेतानाही झाली होती.
एखाद्या कलाकृतीचं कल्पनाचित्र रेखाटावं तसा प्रकल्पाचा त्याचा पहिला आराखडा काव्यमय होता.
रॉबर्ट सर्बर या वैज्ञानिकाशी तो त्याविषयी जेव्हा सल्लामसलत करी तेव्हा ते दोघे एखाद्या नाटकाची जुळवाजुळव करताहेत असं वाटे, असं ओपनहायमरच्या सचिवानं लिहून ठेवलं आहे - शिकागोहून आलेल्या सॅम अलिसनपुढे ओपनहायमरनं हा 'कशिद्याचा नमुना' धरला तेव्हा अॅलिसन हादरलाच.
ओपनहायमरनं रॉबर्ट विल्यम्स या आपल्या बर्कलेच्या विद्यार्थ्यावर हार्वर्डमधल्या प्रचंड सायक्लोट्रॉनची लॉस अलमॉसच्या प्रयोगालयात प्रतिष्ठापना करायची कामगिरी सोपवलेली होती. विल्सन अणुनगरीतला सावळागोंधळ पाहून चक्रावून गेला.
सुदैवानं ओपनहायमरनं आपल्या चुका झपाट्यानं सुधारल्या आणि मग त्यानं प्रकल्पावरची आपली मांड सुटूच दिली नाही. कंडन आणि बिटा या त्याच्या व्यवसायबंधूंनी त्याला प्रकल्पाची अधिक नेटकी आखणी, पद्धतशीर नियोजन आणि संचालन करण्याचं महत्त्वं पटवून दिलं. त्याप्रमाणे त्यानं प्रकल्पाची चार मुख्य विभागांत, वेगवेगळ्या खात्यांत विभागणी करून त्यांच्यावर बिटा, बेचर, जोसेफ केनेडी आणि कॅप्टन पार्सन यांची शाखाप्रमुख म्हणून नेमणूक केली.
-
या सर्वांच्या प्रयत्नांतून जी अणुनगरी तिथं आकार घेऊ लागली, तिचं वर्णन करताना तिथल्या एका वैज्ञानिकाच्या पत्नीनं म्हटलं आहे, "लॉस अलमॉस म्हणजे जणू एक मोठं-थोरलं मुंग्यांचं वारूळच होतं. अणुबॉम्ब ही त्यातली राणी मुंगी. ही राणी मुंगी आपल्या 'तांत्रिक विभाग' नामक बिळात राहात असे आणि तिच्या खादाडपणाला सीमाच नसे. फक्त रविवारी ती झोप घेई. तेवढ्यात कामकरी मुंग्या वारुळातून बाहेर पडत आणि इतस्ततः भटकून घेत..."
अणुबॉम्बची निर्मिती जेवढी अवघड, तेवढंच अणुनगरीवासीयांचं जीवनही खडतर असणार होतं.
शाळेनं सत्तावीस छोट्या-मोठ्या इमारती मागे ठेवल्या होत्या. नंतरच्या तीन महिन्यांत तीन हजार कामगारांनी रात्रंदिवस राबून तिथं पाच प्रयोगशाळा, एक यंत्रशाळा, एक गोदाम आणि बर्याचशा बराकींच्या आणि घरांचा रांगा बांधून काढल्या.
'सॅण्टा फी'हून रोजच्या रोज मालवाहू ट्रक येत. कुंपणालगतच्या वखारींमधून हे सामान उतरवून घेतलं जाई. लॉस अलमॉस'मधे आलेल्या सैद्धान्तिक शास्त्रज्ञांना लगोलग संशोधनाला सुरुवात करता येई. प्रयोगवादी वैज्ञानिक मात्र - त्यांत नोबेल-पारितोषिकविजेते वैज्ञानिकही आले बरं का - उन्हातान्हात उभं राहून हे सामान उतरवून घेणं, त्यांच्या याद्या बनवणं असल्या कामांत गुंतून पडत!
अणुनगरीत शिरल्यावर अर्धा तास कच्च्या सडकेनं या मालवाहू गाडया आणि बुलडोझर यांच्यामधूनच वाट काढावी लागे. सुचेल त्या ठिकाणी, लागतील तसतशी घरं बांधून त्यांच्यात येतील तसतशी माणसं कोंबायची, कुणालाही बेघर ठेवायची नाहीत, हे एकच ध्येयधोरण ठेवून लष्कराचं बांधकाम चालू होतं आणि बांधकामाचा हा उद्योग पुढं तब्बल वीस वर्षांपर्यंत चालूच राहणार होता!
न्यू मेक्सिकोतला हा भाग दुष्काळी परिसर म्हणून प्रसिद्ध होता. पाण्याचा कायम दुष्काळ.
काही ठिकाणी तर दर ऐंशी एकरांमागे एक गाय पोसता येई!
लष्कराने ११ किलोमीटरवर धरण बांधून पाणीपुरवठा सुधारला, तरी 'लॉस अलमॉस' वासीयांना घरटंचाई, पाण्याचा प्रश्न आणि सुरक्षेचा जाच या तीन गोष्टी सतत सतावतच राहणार होत्या.
-
शाळेच्या मुख्य इमारतीत कचेर्या थाटण्यात आल्या. तळमजल्यावरच्या अभ्यासिकेत ग्रंथालयाची आणि मनोरंजनाची सोय झाली. 'फ्युलर लॉज' नावाच्या लाकडी ओंडक्यांच्या सुंदरशा इमारतीत उपाहारगृहं, अतिथीगृहं सजली. शा़ळेच्या वर्गांतून टपालकचेरी, प्रथमोपचार केंद्र, दुकानं उघडण्यात आली. शिक्षकांसाठी बांधलेल्या घरांची रांग प्रथम श्रेणीच्या व्यवस्थापकांनी व वैज्ञानिकांनी व्यापली.
नंतर घाईघाईनं बांधून काढलेल्या घरांमध्ये कंटाळवाणा सारखेपणा आणि सुखसोयींचा अभाव असे. भिंती इतक्या पातळ की सगळ्यांना सगळं ऐकू जाई. ऊबनियंत्रणाची सोय जेमतेम, त्यामुळे घटकेत घराचं शीतगृह व्हायचं, तर घटकेत भट्टी! तांत्रिक विभागात विजेचा वापर वाढला की घरातली वीज जाई. खिडकी लावायला गेलं की कडीच तुटून हातात येई!
तिथल्या तथाकथित रुग्णालयात बरेच दिवस शाळेच्या साठवणीतले आयोडिन आणि मर्क्युरीक्रोम हेच दोन सर्व दुखण्यांवरचे अक्सीर इलाज उपलब्ध होते. धोब्याचे कपडे सॅण्टा फी मधल्या ५६ किलोमीटरवरच्या धुलाईत धाडावे लागत. सॅण्टा फी इथं खरेदीकरता जायचं तर परवाना काढावा लागे आणि पाठीवर सुरक्षाधिकार्यांचा ससेमिरा बाळगून बाजार करावा लागे!
या सर्व आनंदीआनंदात भर घालणार्या आणखी दोनच गोष्टींचा उल्लेख व्हायला हवा. त्या मुलखात वरचेवर उद्भवणारी टायफॉईडची साथ आणि उन्हाळ्यात बिळांतून बाहेर पडणारे महाभयंकर खुळखुळे साप!
-
एरवी तो परिसर निसर्गरम्य होता.
विरंगुळ्यासाठी गिर्यारोहणाला, घोड्यावरून गिरीभ्रमणाला जाता येई. रेड इंडियनांचे पाडे धुंडाळणं, मासेमारी, बर्फघसरण करणं, हे आणखी काही विरंगुळे. तरी करमणूक कमीच पडत असावी; कारण वर्षभरातच इतकी बाळं जन्मली की ग्रोव्हज् कुरकुर करू लागला! मग मात्र ओपनहायमरनं कानावर हात ठेवले, 'याबाबतीत मी नाही हां काही करू शकणार!'
एवढ्या हालअपेष्टा काढत असूनही अणुनगरीच्या युद्धकालीन इतिहासात कुणालाही मनोदौर्बल्याचा झटका आल्याची नोंद नाही. बहुतेक रहिवाशांच्या तिथल्या स्मृती रम्यच आहेत!
एक तर बहुतेक रहिवासी ऐन पंचविशीच्या उमेदीतले होते. दुसरं, बाहेर महायुद्धामुळे जी रणधुमाळी, वाताहत माजलेली होती तिच्यातून हे लोक वाचले होते; निदान कुटुंबियांसह राहू शकत होते.
खेरीज या रम्या नगरीत नव्हते गोरगरीब, बेकार, अपंग, कैदी, गुन्हेगार. रस्त्यांना पायपथही नव्हते आणि सुरक्षाव्यवस्था आहे ती आपली चित्रपटांच्या आशेनं आदिवासींनी अणुनगरीत घुसू नये म्हणून, अशी बायका-मुलांची कल्पना होती!
मनुष्यस्वभावाची गंमत अशी की त्या 'माळराना'तही लवकरच श्रेणीबद्धता आकाराला आली. सर्व घरं सारखीच असली तरी कोण कुठल्या भागात राहतं यावर रहिवाशांची इज्जत ठरू लागली. अखेर लॉरा फर्मीनं मुद्दाम 'दर्जाहीन' घराची निवड करून या रोगट समाजरचनेवर घाव घातला.
- oOo -
पुस्तकः 'बाराला दहा कमी'
लेखकः पद्मजा फाटक, माधव नेरुरकर
प्रकाशकः राजहंस प्रकाशन
आवृत्ती दुसरी (१९९८)
पृ. २५९ - २६५.
---
संबंधित लेखन:
वेचताना... : बाराला दहा कमी >>
---