-
"ओंजळीत सूर्य घेऊन समुद्रभर हेलकावे खाणार्या चंद्रदेवतेची एक झुलू दंतकथा आहे. ही शापभ्रष्ट देवता लाटालाटांवर पिंगा घेत खलाशांची गाणी गाते अन् आपल्या गाण्याने आपणच बेचैन होते. चंद्रदेवतेचं गाणं हा समुद्राचा निनाद आहे असं म्हणतात."
---ज्याला अभिजात किंवा शास्त्रीय संगीत असं सामान्यपणे म्हटलं जातं त्यात दिग्गज गायक-गायिकांनी पहिला 'सा' लावताच, किंवा पहिली सुरावट घेताच अनेक मुरलेल्या रसिकांकडून 'व्वा:' अशी दाद जाते. नवथर किंवा पुरेशा न मुरलेल्या रसिकाला कदाचित हा प्रकार फुकाचा शो-ऑफ वाटू शकतो. परंतु खरंच अनेकदा तो सूरच असा लागतो की पुढचं गाणं एकदम सजीव होऊन समोर उभे राहिल्याचा भास येतो. अनेकदा पुढचा राग-विस्तारही जेव्हा आपल्या मनात उमटलेल्या या चित्राशी सुसंगत होऊ लागतो तेव्हा तो रसिक त्या गाण्याशी तद्रूप होऊन अवर्णनीय अशा आनंदाचा धनी होतो.
अंबरीश मिश्र यांच्या 'शुभ्र काही जीवघेणे' या पुस्तकातील 'चंद्रदेवतेचं गाणं' या विदुषी शोभा गुर्टू यांच्यावरील आपल्या लेखाची सुरुवात वर दिलेल्या ओळींनी केली आहे. त्यांच्या या पुस्तकातील हा पहिलाच लेख असल्याने त्या लयबद्ध पुस्तकाचीही सुरुवात म्हणता येईल. हे संपूर्ण पुस्तक म्हणजे पहिला 'सा' लागताच 'व्वा:' ची दाद देण्याइतक्या मुरलेल्या रसिकाचे प्रकटन आहे. संगीत, नाटक, चित्रपट या तीन क्षेत्रातील काही दिग्गजांवरचे लेख विलक्षण आत्मीयतेने लिहिलेले आहेत. (हीच आत्मीयता मला 'माधव मोहोळकर' या रसिकाने चित्रपटसंगीतावर लिहिलेल्या 'गीतयात्री' या पुस्तकात आढळली होती.) ते लिहित असताना लेखकाची जी काही तंद्री लागली असेल जवळजवळ तशीच ते वाचतानाही एखाद्या संवेदनशील वाचकाची लागायला हवी.
आपला लेखनविषय असलेल्या कलाकाराबद्दलची आत्मीयता राखूनही मिश्र यांनी त्यांच्या आयुष्यातील नकारात्मक बाजूंचे उल्लेख मुळीच टाळलेले नाहीत, किंवा त्याचे समर्थन करण्याचाही प्रयत्न केलेला नाही... त्यात थोड्या ओलाव्याचे 'मोहन' घालून एकजीव करून घेतले आहेत. सआदत हसन मंटो किंवा पार्श्वनाथ आळतेकरांसारख्या व्यावहारिक आयुष्यात सातत्याने पराभूत होत राहिलेल्यांबद्दल लिहिताना ते विशेष हळवे होताना दिसतात. शोभा गुर्टू, अख्तरीबाई, ओ.पी., सज्जाद, पंकज मलिक यांच्यावरील लेखांसाठी त्यांनी निवडलेली शीर्षकेच बरंच काही सांगून जातात.
संगीत, नाट्य, चित्रपट या कला ज्यांच्या आयुष्याचे अविभाज्य आणि अतूट अंग आहे अशा मराठी माणसाने हे पुस्तक वाचले नाही तोवर त्याला मरायला परवानगीच नाही.
निवडलेला वेचा हा 'चंद्रदेवतेचं गाणं' या विदुषी शोभा गुर्टू यांच्यावरील लेखाचा भाग आहे. तो एकाहुन अधिक अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण आहे. (पहिल्याच वाक्यात येणारा जातीचा उल्लेख काहींच्या मते वाचनाच्या लयीत ठेच लावणारा असला तरी तो अनेक कारणांनी सुसंगत आहे. त्याबद्दल स्वतंत्रपणे लिहिणे आवश्यक आहे.) वर पहिल्या परिच्छेदात म्हटल्याप्रमाणे हा मूळ गाणे सुरू होण्यापूर्वी घेतलेला एक सुरेल उठाव आहे. शोभाताईंच्या पूर्वसुरींचा धावता आढावा घेत असताना तो त्या गाण्याच्या सुवर्णकाळाची पार्श्वभूमी बनलेला राजकीय र्हासकाळही नोंदवून पुढे जातो. आणि एखाद्या विलक्षण हरकतीनंतर लीलया समेवर यावे तसे शोभाताईंचे बोट पकडून पुढे चालू लागतो.
-oOo-
या पुस्तकातील एक वेचा: ठुमरीचा ’उठाव’
अमेझिंग अॅमेझॉन वांझ राहा रे परतुनि ये घरा... - ३ : ययाती, बुधा आणि... माणूस परतुनि ये घरा... - २ : कांदिद, कालिदास, आणि आरती देवी परतुनि ये घरा ... - १ : पेराल्टा, ऑर्फियस आणि नचिकेता ‘ग्लॅड फॉर ग्लाड?’ : ग्लाड, वीरभूषण आणि मी दोन बोक्यांनी... I. P. L. (इंडियन पोलिटिकल लीग) स्वबळ की दुर्बळ दोन हजारची नोट आणि चाकावरची अॅन्टेना आपले राष्ट्रीय खेळ
गुरुवार, १२ जानेवारी, २०१७
वेचताना... : शुभ्र काही जीवघेणे

वेचताना... : एक होता कार्व्हर
'एका अर्वाचीन मराठी पुस्तकाची चाळीसावी(!) आवृत्ती मला परवा मिळाली.' हे विधान ऐकून बहुतेक वाचक दचकतील. चटकन तुकोबाची गाथा अथवा तत्सम अध्यात्मिक किंवा...

वेचताना... : युगान्त
आपल्या अभिमानाची स्थाने भूतकाळात शोधणार्या भारतासारख्या देशात, इतिहासाच्या आधारे केलेले लेखन हे साहित्य क्षेत्रात वाचकांतील लोकप्रियतेबाबत संख्यात्म...

वेचताना... : बाराला दहा कमी
'बाराला दहा कमी' हे मराठी भाषेतील एकमेवाद्वितीय पुस्तक आहे. एकतर आपल्याकडे शुद्ध विज्ञान विषयावर लिहिली गेलेली पुस्तके नगण्य, फार फार तर विज्ञा...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा