'बाराला दहा कमी' हे मराठी भाषेतील एकमेवाद्वितीय पुस्तक आहे.
एकतर आपल्याकडे शुद्ध विज्ञान विषयावर लिहिली गेलेली पुस्तके नगण्य, फार फार तर विज्ञानकथा लिहिल्या जातात. त्यातही विज्ञान चवीपुरते नि कथाच जास्त अशी परिस्थिती असते.
अशा वेळी एखाद्या वैज्ञानिक संकल्पनेचा ऐतिहासिक, सामाजिक वेध घेणं त्याच्या राजकीय-सामाजिक इतिहासाचा अभ्यास करून त्याची 'बखर' मांडणं हे तर आपल्या तर्काच्या पलीकडचे म्हणावे लागेल. केवळ इथेच न थांबता त्याच्याशी निगडित व्यक्तींच्या वैयक्तिक आयुष्यात - संदर्भापुरते - डोकावून पाहात अनेक छोट्या छोट्या तपशीलांसह एक सारा कालपटच उभा करणं हे अशक्यप्राय वाटावं इतकं चिकाटीचं काम आहे.
दुसर्या महायुद्धाने एक नवे जग निर्माण केले. हे विधान अनेक अर्थांनी घेता येईल. एका बाजूने अमेरिकेचा जागतिक महासत्ता म्हणून उदय झाला, दुसर्या बाजूने हिटलरच्या सेनेला कोंडीत पकडून निर्णायक पराभवाच्या उंबरठ्यावर नेऊन तार्तरांना खंडणी नेणारा रशिया आता एक बलवान दुसरी शक्ती म्हणून उभे राहिल्याचे इशारे देऊ लागला होता. जगावर राज्य करणार्या युरपने अर्ध्या शतकात दोन महायुद्धे पचवून जगण्याचे सारे वैफल्य पदरी बांधून घेतले होते. (दोन सांडांच्या टकरीत वासरासारख्या अडकलेल्या पोलंडसारख्या देशांतून निर्माण होणार्या चित्रपटातून आजही हा वेदनेचा सूरच अधिक वारंवार ऐकू येत असतो.) युरपमधील सर्वसामान्य माणसांत संपत्ती आणि स्थावर सतत गमावत राहिल्याच्या नैराश्याने, आपण कधीही मरु शकतो या भावनेतून आलेल्या वैफल्याने ठाण मांडले.
आर्थिक कणा ढासळल्याने आणि महायुद्धाने कापून काढलेल्या कर्त्या पिढीच्या पाठिंब्याअभावी या युरपने अंकित केलेल्या अनेक देशांच्या स्वातंत्र्याचा मार्ग मोकळा होऊ लागला. याच वेळी पूर्वेला एक बलशाली शक्ती म्हणून उदयास येऊ पाहणार्या जपानचा पराभव एका अमोघ अस्त्राने करत एका बाजूने राजकीय शक्ती म्हणून जपानचा अस्त तर सर्वोच्च लष्करी ताकद म्हणून आपली द्वाही अमेरिकेने फिरवली.
या महायुद्धाने पाणबुड्या, रेडार, लढाऊ विमाने, विध्वंसके, क्षेपणास्त्रे आदींच्या संशोधनाला चालना देत युद्धाला तंत्रज्ञानाचे नवेच परिमाण बहाल केले. या दरम्यान समाजात 'काहीतरी विचित्र काम करत बसणारे वेडे लोक' अशी समाजात तसंच राज्यकर्त्यांमधे असलेली इमेज झाडून टाकत अचानक शास्त्रज्ञांना आणि तंत्रज्ञांना राज्यकर्त्यांकडून मान मिळू लागला, नव्हे त्यांना सोबत घेऊन अनेक विकास प्रकल्पांची आखणी सुरू झाली... आणि विध्वंस प्रकल्पांचीही! यात सर्वार्थाने मोठे स्थान मिळवले ते 'अणुबाँब' या संहारक अस्त्राच्या उदयाने.
युरपमधे वेगाने घोडदौड करत निघालेल्या हिटलरने यू-बोटी, नवी युद्धसज्ज विमाने आदी नव्या तंत्राच्या विकासावर भर दिला. त्यातच काही शास्त्रज्ञांनी शक्यता व्यक्त केलेले किरणोत्सारी मूलद्रव्यांच्या वापरातून निर्माण करता येईल असे अतिसंहारक अस्त्र हिटलर विकसित करण्याच्या खटपटीत आहे अशी कुणकुण हिटलरविरोधी दोस्त राष्ट्रांना लागल्याने त्याला प्रतिवाद म्हणून ते आपणच प्रथम तयार करावे असा प्रस्ताव काही शास्त्रज्ञांनी- त्याकाळात बव्हंशी लष्करी नेतृत्वाच्या पातळीवर उरलेल्या - नेतृत्वाच्या गळी उतरवला.
पुढे भयावह स्पर्धेला जन्म दिलेल्या या अस्त्राची निर्मिती ही शास्त्रज्ञांची चूष, राजकीय नेतृत्वाची चढाओढ, लष्करी नेतृत्वाची महत्त्वाकांक्षा आणि शीतयुद्धाचा अपरिहार्य भाग बनलेली देशादेशांतील कुरघोडीची आणि संशयाची भावना या सार्यांच्या एकत्रित पुढाकाराने झालेली दिसते. या अस्त्राची निर्मिती ज्याला खर्या अर्थाने युद्धपातळीवर म्हणतात तशीच झालेली आहे. लाखो माणसे क्षणात भूतलावरून नाहीसे करण्याचे हे तंत्र माणसाने अक्षरशः हजारो शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, सामान्य कामगार, लष्करी अधिकारी आदींना एका जागी एकत्र करून विकसित केले आहे.
शासकीय पातळीवरून अशी विध्वंसाची हत्यारे विकसित करण्याचे हे कदाचित पहिलेच उदाहरण असावे. या अणुबॉम्बच्या निर्मितीमधे हिटरलकृपेने युरपमधून परागंदा झालेल्या ज्यू शास्त्रज्ञांनी मोठी कामगिरी बजावलेली दिसते. हा थोडासा वैयक्तिक पातळीवरील सूडाचा आयामही त्याला लाभलेला दिसतो. पण पुढे हे अस्त्र तयार होण्याआधीच रशियाने हिटलरची नांगी ठेचली आणि एक प्रकारे त्यांचा अपेक्षाभंग झाला असे म्हणावे लागेल.
या पहिल्या सर्वसंहारक अस्त्राच्या निर्मितीची कथा 'बाराला दहा कमी' आपल्यासमोर ठेवते आहे. युद्धाची पार्श्वभूमी, या अस्त्राच्या निर्मितीच्या निर्णयाप्रत पोचताना राजकीय पातळीवर झाले विचारमंथन, शास्त्रज्ञांची परस्पर-कुरघोडीची भावना, त्यानंतर काही तरी नवे 'निर्माण' करण्याच्या भावनेने त्यांच्यात निर्माण झालेले चैतन्य, या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या तीन अणुनगर्या, त्यांचे व्यवस्थापन, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ तसेच लष्करी अधिकारी यांचे परस्पर-संबंध यांचा एक विस्तृत पट घेऊन हे पुस्तक उभे आहे.
या पुस्तकातून निवडलेला वेचा या अणुनगरीच्या निर्मितीच्या सुरुवातीचा भाग आहे. यात एक वस्ती उदयाला येण्याची कहाणी आहे. शून्यातून एक वसाहत उभी करताना करावी लागणारी उभारणी, कसरत, नियंत्रक व्यवस्था, परस्पविरोधी दृष्टीकोनांतून अपरिहार्यपणे उडणारा संघर्ष, उद्दिष्टे कितीही समान असली आणि शास्त्रज्ञांसारखी माणसे कितीही समाजविन्मुख असली, तरी त्यांच्याही मनात कायम ठाण मांडून बसलेली वर्चस्ववादी वृत्ती आदिंचा वेध घेत या विध्वंसाच्या निर्मितीप्रक्रियेचा श्रीकार या वेच्यामधे समोर येतो आहे. हा वेचा जरी दीर्घ असला तरी त्याची सुरुवात नि शेवट दोन विशिष्ट टप्प्यांना सांधणारा असल्याने कमी करण्याचा प्रयत्न केलेला नाही.
'केवळ इंग्रजी पुस्तकांतूनच ज्ञान मिळतं' अशी धारणा असलेल्या - बहुसंख्येपैकी एक - आमच्या एका मित्राने चुकून हे पुस्तक वाचले आणि तो इतका प्रभावित झाला की सवयीने त्याने 'हे पुस्तक कुठल्या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद आहे?' असे मला विचारले होते. या प्रश्नाचे उत्तर त्याने पुढे शोधून काढले की नाही मला ठाऊक नाही. कदाचित आपले इंग्रजी वाचन किती व्यापक आहे हे दाखवण्यासाठी काही छिद्रान्वेषी ते शोधून काढतील किंवा काढलेही असेल.
परंतु त्या वांझोट्या तर्कात पडण्यापेक्षा ते पुस्तक मला काय देते हे मला अधिक महत्त्वाचे वाटते. आजच्या काळात रूढ झालेल्या प्रघातानुसार चित्रपटांपासून विज्ञानापर्यंत सर्वच क्षेत्रात मेटा-डेटा ऊर्फ निव्वळ माहिती जमा करून कृतकृत्य होण्यापेक्षा, त्या त्या विषयात बुडी मारून थोडी ओल अंगाला लावून घेणं अधिक आनंददायी असतं असं मी मानतो. जगातलं सगळं काही जमा करण्यापेक्षा मर्यादित परिघात जगणार्या माझ्यासारख्या माणसाच्या दृष्टीने हे पुस्तक टनभर सोन्यापेक्षा अधिक मूल्यवान असतं.
-oOo-
या पुस्तकातील एक वेचा: विध्वंसाची निर्मिती
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा